पूर्वग्रहांचा वेताळ

दीपा कदम
सोमवार, 5 एप्रिल 2021

‘ती’ची लढाई

स्त्री कशी असावी, तिनं दिसावं कसं, तिनं कोणत्या प्रकारची कर्तव्य पार पाडावीत... एकूणच आदर्श स्त्री कशी असावी याविषयीचे काही समज समाजमनात पक्के रुजलेले आहेत. गेल्या महिनाभरातल्या दोन घटना समजांची ही खुंटी पक्की करणाऱ्या आहेत. बलात्काऱ्याला ‘पीडितेसोबत लग्न करणार का?’ असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने करणे आणि लैंगिक अत्याचार करणाऱ्याला जामीन मिळविण्यासाठी पीडितेकडून राखी बांधून घेण्याची सूचना मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने करणे ह्या घटना एकंदर समाजाचेच महिलांविषयी असलेले पूर्वग्रह प्रतिबिंबित करणाऱ्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने राखी बांधून घेण्याचा निकाल रद्दबादल ठरवला. तसेच महिलांविषयी टिप्पणी करताना लिंगाधारित पूर्वग्रहदूषित आणि पुरुषसत्ताक वक्तव्य न्यायालयाने करू नयेत अशा प्रकारची सूचना केली.

मुळात विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातही बलात्काराचा आरोप असणाऱ्याला मोकळीक मिळण्यासाठी लग्नाचा मार्ग दाखवला जातो, अत्याचार करणाऱ्याला लग्न नावाच्या (एका बाजूला तकलादू ठरू शकणाऱ्या) 'बेड्या' घालण्याची ‘शिक्षा’ दिली जाऊ शकते यावरून एकूणच महिलांच्या प्रश्नांविषयी, त्यांच्या मुद्द्यांविषयी यंत्रणांना संवेदनशील करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. पुरुषांनी तयार केलेल्या निकषांवर, पुरुषांसाठी सोयीची आणि पुरुषांच्या तुलनेत दुय्यम अशी आदर्श स्त्रीची व्याख्या तयार झालेली आहे. देशात महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटनांची नोंदच केली जात नाही, कारण यंत्रणांवर असलेला पुरुषप्रधानतेचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पगडा. महिला पोलिस ठाण्यात तक्रार करायला जाण्यास कचरतात कारण बाईच्या तक्रारीविषयी संशय व्यक्त करणे, कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अनेकदा बाईचीच समजूत काढून तिला घरी परत पाठवून देण्याकडे पोलिसांचा कल असतो. रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या महिलेकडे शेजारीपाजारीच नव्हे तर पोलिसही संशयाने पाहतात. कोणत्याही प्रहरी शहर सुरक्षित आहे असा विश्वास एखाद्या महिलेला वाटण्यापेक्षा तिला भय वाटणे यात सुरक्षा यंत्रणेचे अपयश आहे. बलात्काराच्या प्रकरणांमध्ये टू फिंगर टेस्टला सामोरे जाऊन तिच्यावर बलात्कार झाला आहे, याची सत्यता पटवून देण्यासाठी तिलाच अग्निपरीक्षा पार करावी लागते. यंत्रणांसोबत आणि समाजासोबत अशा दुहेरी संघर्षाचा सामना तिला करावा लागतो. 

महिलांविषयी सामाजिक व्यवस्था अधिक संवेदनशील बनविण्याची आवश्यकता असणे, ही आदर्शवत समाजाची रचना झाली. पण ती एकविसाव्या शतकातही प्रत्यक्षात येऊ शकत नाही, या वास्तवामागच्या कारणांचा धांडोळा घेण्याची आवश्यकता आहे. पुरुषांनीच तयार केलेली स्त्रियांची आदर्शवत प्रतिमा अधिकाधिक मजबूत करण्यात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही कारणीभूत आहेत का? हे ही पाहायला हवे. ‘फेमिनिझम इन इंडिया’ या संस्थेने केलेल्या एका पाहणीमध्ये ४८ टक्के जाहिराती या लिंगाधारित असतात. कपडे धुणारी बाई आणि साबण विकणारा पुरुष, सामोसे तळताना बाई आणि डायनिंग टेबलवर वाट पाहणारा तिचा नवरा, गाडी चालवणारा पुरुष तर त्याच्या शेजारी बसून लिपस्टिक लावणारी बाई...हे चित्र कोणत्याही दशकातल्या भारतीय जाहिरातींमध्ये दिसते. प्रत्यक्षात ही परिस्थिती आता काही प्रमाणात बदललेली असली, तरी ती तशीच असावी आणि हेच चित्र आदर्शवत असल्याचे समाजमनावर थोपवले जाते.

महिलांविषयी संवेदनशील समाज बनविण्याची व्यवस्था तयार करण्याची व्यवस्थाही यापुढे बाईंच्याच हातात असायला हवी आणि त्याची सुरुवात घरापासूनच व्हायला हवी. आपल्या घरातला पुरुष, मुलगा बाईचा आदर करणाराच असेल याचे भान त्याला देण्याची जबाबदारी आईचीच असायला हवी. मुलगा अधिक महत्त्वाचा आणि मुलगी तर लग्न करून जाणारी असल्याने ती कमी महत्त्वाची असा दृष्टिकोन कुटुंबात देखील असतो, तो बदलण्याची आवश्यकता असते.

बायको, बहीण, मैत्रीण, प्रेयसी कशी असायला हवी हे पुरुषाने ठरवले आहे. त्या साच्यात बसण्यासाठीची अव्याहत धडपड ‘सुपर वूमन’लाही करावी लागते. बदलत्या काळात पुरुषाला त्याच्या घरातही ‘सुपर वूमन’ असायला हवी असते; जी आधुनिक पेहरावात घराबाहेर पडून नोकरी, व्यवसाय करेल आणि घरात आल्यावर कुटुंबाच्या सर्व अपेक्षांना पुरेही पडेल. यात तिच्या होणाऱ्या फरफटीकडे 'सुपर वुमन’चा किताब देऊन सोयीप्रमाणे डोळेझाक केली जाते. 

पुरुषाच्या नजरेत आदर्शवत बनण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत अधिक कर्तृत्ववान बनण्याची हातोटी आता आईनेच मुलीला शिकवावी लागेल. भारतात महिला शिक्षिकांचे प्रमाण जवळपास ६५ टक्क्यांच्या आसपास आहे. महिलांविषयी संवेदनशील पुरुष घडवण्याची दिक्षा शाळेमध्येच विद्यार्थ्यांना मिळाली तर पुढील काम कदाचित अधिक सोपे होईल. आदर्शवत स्त्रीच्या पुरुषांनी तयार केलेल्या प्रतिमेचे भूत पूर्वग्रहाच्या रूपात बाईच्याच मानगुटीवर वेताळासारखे बसले आहे. त्याला मानगुटीवर बसवून मिरवायचे की ते झुगारायचे हे बाईच्याच हातात आहे.

संबंधित बातम्या