सत्यान्वेषी

दीपा कदम
सोमवार, 17 मे 2021

‘ती’ची लढाई

क्लोई चाव. ऑस्कर विजेता चित्रपट ‘नोमॅडलँड’ची दिग्दर्शक, पटकथाकार, संकलक आणि चार निर्मात्यांपैकी एक. तिच्या बोलण्यातला साधेपणा तिचा सिनेमा किती वास्तववादी असेल याची चुणूक दाखवतो.

चित्रीकरण करताना ‘नोमॅडलँड’विषयी तिच्या डोक्यात चालू असणारा विचार काय होता, याबद्दल बोलता बोलता खुर्चीवरच दोन पाय जवळ घेऊन ती बसली; तिच्या बोलण्यात खंड नव्हता, ‘‘नोमॅडलँडचं एडिटिंग मी स्वतः केलं. शूटिंग करताना इतकं काय काय गोळा केलेलं होतं की त्याचा वापर कुठे करायचा हे कोणाला काय सांगणार. काही वाया जाऊ नये आणि प्रत्येक गोष्टीचा वापर व्हावा म्हणून मी स्वतः एडिटिंग केलं....’’

क्लोई चाव. ‘नोमॅडलँड’ची दिग्दर्शक, पटकथाकार, संकलक आणि चार निर्मात्यांपैकी एक. तिच्या बोलण्यातला साधेपणा तिचा सिनेमा किती वास्तववादी असेल याची चुणूक दाखवतो. 

त्र्याण्णवाव्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘नोमॅडलँड’ला उत्कृष्ट सिनेमा, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी असे तीन पुरस्कार मिळालेत. ‘नोमॅडलँड’ची गोष्ट आहे २००८ सालची. अमेरिकेची कोसळलेली अर्थव्यवस्था त्यातून कर्जबाजारी झालेला सामान्य माणूस. घर, संसार काही नकोच असं म्हणून व्हॅनमध्ये आवश्यकतेच्या चार गोष्टी टाकून जगण्यासाठी बाहेर पडलेली जगण्यापुरतं कमवायचं आणि मुक्त श्वास घ्यायचा. कोणत्याही पाशात अडकायचं नाही. जिप्सी, हिप्पींपेक्षा वेगळे आहेत हे नोमॅड. जेसिका ब्रुडर हिच्या ‘सर्व्हायव्हिंग अमेरिका इन द ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी’ या पुस्तकावर आधारलेला हा चित्रपट आहे. चार महिने या भटक्यांसोबत व्हॅनमध्ये राहून घेतलेल्या अनुभवानंतर आधारलेला चित्रपट कसा असेल? अर्थातच खूपच वास्तववादी, इतका की अनेकदा आपल्याला डॉक्युमेंटरी पाहत असल्याचा भास व्हावा.  

ऑस्करच्या ९३ वर्षाच्या आयुष्यात फक्त सातच वेळा महिला दिग्दर्शकांना ऑस्करचे नामांकन मिळालेले आहे, आणि क्लोईच्या आधी फक्त एकाच महिला दिग्दर्शकाच्या वाट्याला ऑस्कर आले आहे. ‘हार्ड लॉकर’ या अमेरिकन युद्धपटासाठी कॅथरिन बिगेलोला हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आता अकरा वर्षांनी क्लोई चाव. मूळ चिनी वंशाची क्लोई दिग्दर्शनासाठी ऑस्कर मिळवणारी पहिली आशियायी महिला आहे.

अडतीस वर्षांच्या क्लोईचा हा तिसरा चित्रपट. ‘दी सॉंग्ज माय ब्रदर टॉट मी’ आणि ‘द रायडर’ हे तिचे यापूर्वीचे दोन चित्रपट. हे तिन्ही चित्रपट न चमकणारी, उदास आणि जीवनाच्या शोधात असणारी अमेरिका दाखवतात. अमेरिकेची ही ग्रे बाजू दाखवताना एकाधिकारशाही, भांडवलशाहीतून ढासळत असलेल्या मूल्यांचा शोध क्लोई घेते. लखलखीत आणि भौतिक सुखात मश्गूल असणाऱ्या अमेरिकेच्या पलीकडे मानवी मूल्यांचा शोध घेणाऱ्या माणसांचा शोध क्लोईने तिच्या या तिन्ही चित्रपटांमधून घेतलाय. ‘दी सॉंग्ज...’मध्ये कुठल्याशा उजाड गावात दारूचं स्मगलिंग करणाऱ्या भावाची कथा. तर ‘द रायडर’मध्ये घोडेस्वाराच्या अपघाताची कथा. हे तिन्ही चित्रपट आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर चमकले आहेत. 

आतापर्यंत हॉलीवूडपटातून अमेरिकेची श्रीमंती, अक्राळविक्राळ ताकद, सायफाय काल्पनिका जगासमोर आल्या. हॉलिवूड मधून दिसणाऱ्या अमेरिकेचं अप्रूप आणि आकर्षण जगाला वाटू लागलं. पण या अमेरिकेलाही वेस आहे आणि वेशीवर राहणाऱ्यांचे अवकाश विखुरलेले आणि जमीन कंप पावणारी आहे. भांडवलशाही संस्कृतीतून जन्माला आलेले नोमॅड अमेरिकेच्या किनाऱ्याने जगतायत; जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या माफक साधनांसह. ‘नोमॅडलँड’ ही भौतिक सुखासाठी जगणं गहाण ठेवणाऱ्यांच्या तोंडावर मारलेली चपराक आहे. क्लोईने सिनेमाच्या तंत्राचा तिची गोष्ट सांगण्यासाठी उपयोग केलाय, पण तिला आयुष्याविषयी, भौतिक जगाविषयी, गरजा, निकड, भावभावना आणि जगण्यासाठी आवश्यक असणारा पैसा याविषयी सांगायचंय. त्यासाठी तिनं अमेरिकेत उपरं जीवन जगणाऱ्यांच्या जगण्याला हात घातलाय. 

क्लोईच्या तिन्ही चित्रपटांमध्ये निसर्ग मुख्य भूमिकेत आहे. ‘दी सॉंग्ज..’ मधील वाळवंट आणि ‘द रायडर’मधील शेवटची घोड्यावरची रपेट किंवा नोमॅडलॅंन्डमधील ओकाबोका झालेला निसर्ग, सगळंच उद्‌ध्वस्त झालेलं असताना वर्षानुवर्षे टिकून राहिलेला निवडुंग, डोंगर आणि दगडांमधलं सौंदर्य. कोणासाठी? कशासाठी? असे प्रश्न पडत असताना समुद्राच्या लाटांच उधाण अंगावर यावं आणि नायिकेच्या ओठावर हलकसं स्मित उमटावं... क्लेई तिच्या एका मुलाखतीत सांगते, ‘निसर्ग तुम्हाला जगायला शिकवतो. निसर्गाचेदेखील मूड असतात. अर्थात ते तसेच टिपता यावेत म्हणून तीन वेगवेगळ्या ऋतूंमध्ये चित्रपटाचे शूटिंग करावे लागले. निसर्ग हा माझ्या चित्रपटांमधला प्रमुख पात्रांपैकीच एक आहे, हे मात्र खरंच. निसर्ग तुम्हाला विनयशील करतो.’ ‘नोमॅडलँड’मध्ये ‘ही व्हॅन हेच घर’ ही मोहीम राबविणाऱ्या बॉब चित्रपटाची नायिका, फर्नला, म्हणतो, ‘तुझ्यापासून तुझं घर, नवरा सगळंच काही हिरावलं गेलंय, तुला कोण काय दिलासा देणार? निसर्गाच्या जवळच कदाचित तुला आधार मिळेल..’ सत्य हे सर्व कोनातून सारखंच दिसायला पाहिजे. कलावंताना तर ते सत्य व्यक्त करताही आले पाहिजे. अमेरिकेच्या विखुरलेपणावर बोट ठेवणाऱ्या क्लोईने चीनमधील दडपशाहीवरदेखील जाहीर भूमिका घेतली. चीनमध्ये ठिकठिकाणी खोटेपणा आहे, हे तिने रोखठोकपणे मांडलं, म्हणूनच क्लोईला ऑस्कर मिळाल्याचे कौतुक चीनला नाही. शिवाय क्लोईच्या ‘नोमॅडलँड’ला ऑस्करचे नामांकन मिळाल्याने त्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यासही चीनने बंदी घातली. चिनी वेब पोर्टलवरून यासंदर्भातील सर्व मजकूर हटविण्यात आला. पण कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा थोडाच राहतो? 

‘प्रत्येक माणसामध्ये चांगुलपणा असतो, असं एक सार्वत्रिक सत्य चिनी पौराणिक कथांमध्ये सांगितलेलं असतं. जगभरात मी जिथेजिथे जाते तिथे मला त्याचा अनुभव येतो,’ असे ऑस्करचा स्वीकार करताना क्लोईने जाहीरपणे सांगितले. चीनने जरी तिच्या कलाकृतींवर बंदी घातली असली तरी चिनी मूल्ये, संस्कृतीतून तिच्यावर झालेले संस्कार ती मान्य करते. सत्य कितीही ओंगळवाणं आणि कटू असलं तरी जगाकडे पाहण्याच्या वैश्विक दृष्टिकोनातून ती तिच्या कलाकृतीतून ते सत्य मांडते तेव्हा अमेरिकेसारख्या बलशाली आणि चीनसारख्या कठोर देशांनाही ती जुमानत नाही. क्लोई याविषयी नम्रपणे म्हणते, ‘आपण जसे जगतो, जे पाहतोय ते तसंच प्रतिबिंबित व्हायला हवं. पण कलावंत म्हणून मला वेगवेगळे फॉर्म हाताळायचेत ज्याचं मलाच आव्हान असेल.’

चांगल्या कलाकृतींच्या मापदंडांपैकी एक म्हणजे, वाचकाला किंवा प्रेक्षकाला शाश्वत सत्याच्या जवळ घेऊन जायचं आणि 

ज्याला त्याला आपापलं उत्तर शोधण्यासाठी अनेक वाटा उपलब्ध करून द्यायच्या… क्लोई प्रेक्षकांना या वाटेच्या तोंडावर आणून उभी करते, म्हणूनच ती काही वेगळं सांगू पाहते...

संबंधित बातम्या