‘तांबट’ पक्ष्याचा फराळ!

धीरज वाटेकर, चिपळूण
सोमवार, 7 डिसेंबर 2020

विशेष

दीपावलीच्या चौथ्या दिवशीची, रविवार (१५ नोव्हेंबर) सकाळची घटना. पूर्वेकडल्या दारात बांधलेल्या किल्ल्यावर सूर्याची कोवळी किरणे पडण्याच्या तयारीत होती. किल्ल्यावर उशिरा पेरलेले धान्यही किंचितसे उगवले होते. किल्यावर पाणी शिंपडण्याच्या हेतूने मावळ्यांना, ‘थोडी विश्रांती घ्या’ म्हणत जमिनीवर उतरवले. पत्नीला भोवताली साधीशी रांगोळी काढायला सांगितली. बहिणीने पुण्याहून मावळे पाठविल्याने गेल्या वर्षीच्या सैन्यदलात चांगलीच भर पडलेली. लेकाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना किल्यावर पुन्हा स्थानापन्न करत असताना पश्चिमेकडच्या उंबरावरची फळे जमिनीवर पडत असल्याचा आवाज आला. झाडावरून पडणाऱ्या उंबराच्या फळांच्या आवाजाचा वेग नेहमीपेक्षा जास्त असल्याने उत्सुकता ताणली गेली. थोडे बारकाईने पाहिले तेव्हा डोके, छाती आणि कंठ तपकीरी असलेल्या तांबट पक्ष्याची (Brown Headed Barbet) जोडी पिकलेल्या उंबराच्या फळांच्या फराळाचा आस्वाद घेताना दिसली. ‘तांबट’ पक्ष्याचा हा दिवाळी फराळ कार्यक्रम तिसेक मिनिटे चालला. एरव्ही कॅमेऱ्याची चाहूल लागताच उडून जाणाऱ्या ‘तांबट’ची आजची कृती मात्र आमची दीपावली सुखद करून गेली.

जवळपास अर्धा डझनहून अधिक खारुताईंची टीम परसदारी आंबा, नारळ आणि उंबरावर फळे खायला कायम येत असते. निसर्ग नियमानुसार सकाळी त्यांचा खाण्याचा वेगही अधिक असतो. आता हे सवयीचे झालेले. पण त्या दिवशीच्या आवाजाचा वेग कानाला अधिक जाणवला, मात्र दोघे ‘तांबट’ स्वतंत्रपणे फलाहार करण्यात मग्न होते. दारातल्या उंबराला फळे धरू लागल्यावर तांबटाचे एकट्याने येणे आम्हाला नवीन नाही. तसे विविध पक्षी येत असतात. पण आजचे दीपावलीच्या, फटाक्यांच्या आवाजी वातावरणात सकाळी सकाळी यांचे जोडीने येणे, नाही म्हटले तरी सुखद पर्यावरणीय अनुभूती प्रदान करणारे होते.

गेली काही दशके वर्षे फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा, त्यांच्या अतितीव्र प्रकाशाचा पशुपक्ष्यांवर परिणाम होत असल्याचे आपण वाचतो आहोत. पक्ष्यांच्या स्थलांतरणाचाही हा काळ असल्याने अनेक स्वयंसेवी संस्था, पक्षीप्रेमी, अभ्यासक, संशोधक याबाबत समाजात सतत जागरुकता निर्माण करण्याचे काम करत असतात. दीपावलीतील रॉकेट्ससारख्या फटाक्यांमुळे पक्ष्यांची झाडावरील घरटी जळण्याचा धोका असतो. फटाक्याच्या आवाजाचा सर्वाधिक परिणाम चिमण्यांवर होत असल्याचेही वाचल्याचे आठवते. तशी मलाही यंदा दीपावलीत परसदारी चिमणी दिसली नाही. 

तर आजच्या फटाक्यांच्या आवाजात, जमिनीवर कमी उतरणाऱ्या वृक्षवासी तांबटला सकाळच्या सूर्यप्रकाशात उंबराच्या झाडावर बसून फराळ करताना पाहाण्यात खूप मजा आली. त्या दोघांमधला एकजण तर आपल्या चोचीत उंबराच्या फळांचा नुसता बकाणा भरत होता. त्यांच्या आजच्या वावरात भीती दिसत नव्हती. त्यांना न्याहाळताना मला ज्येष्ठ साहित्यिक स्नेही प्रल्हाददादा जाधव यांनी लिहिलेल्या ‘तांबट’ पुस्तकाची आठवण झाली. दीपावलीच्या दिवसात निमशहरी भागात सकाळ संध्याकाळी फटाके वाजविण्याच्या मुहूर्तावर परसदारी शुकशुकाट असतो. यंदा कोरोनामुळे फटाक्यांचे आवाज काहीसे कमी झाल्याने पक्ष्यांची हालचाल जाणवत होती. आमच्या परसदारचे उभयता तांबट पक्षी म्हणूनच चटकन उडून न जाता फराळ करीत बसले असावेत! नंतर दुपारी, भोजनसमयी एक कोकीळही उंबरावर येऊन विसावलेला. पण तो मला पाहून चटकन उडाला, बहुधा त्याला आज फराळात रस नसावा. सोमवारी, दीपावलीच्या पाचव्या दिवशीही सकाळी तांबट आलेला, पण एकट्याने! आणि मला बघताच तोही उडून गेला. जाण्यापूर्वी मात्र त्याने दोन-तीन वेळा ‘कुटरुक् कुटरुक् कुटरुक्’ एकसुरी आवाज ऐकवून मला मोहवून टाकले.

खरेतर उंबराच्या झाडाची दारात होणारी पानगळ, फळांची पडणारी रास यांना कितीही नाही म्हटले तरी मी कंटाळलोय. शहरी वातावरणात, मर्यादित जागेत यांचे करायचे काय? असे गेल्या दहा-बारा वर्षांत अनेकदा वाटून गेलेय. एक-दोनदा उंबराच्या काही फांद्या तोडूनही झाल्यात. आत्ताही तोडायच्यात. पण सकाळ-दुपार-संध्याकाळी झाडावर बसलेले पक्षीवैभव न्याहाळताना फांद्या छाटण्याचा विचार आपोआप गळून पडतो आहे. गेली दोन-तीन वर्षे हे असेच चाललेय. यंदा तर पानगळीचा आणि फळांचा त्रासही वाढला. आगामी दिवसांत काही फांद्या छाटण्याचे जवळपास निश्चित केले असताना तांबटाच्या जोड्याने ऐन दीपावलीत फलाहाराच्या (फराळ) निमित्ताने दिलेले हे दर्शन मला पुन्हा माझ्या विचारापासून परावृत्त करू पाहाते आहे. 

संबंधित बातम्या