वयस्क ‘नरसांबर’ दर्शन ! 

धीरज वाटेकर
सोमवार, 28 डिसेंबर 2020

विशेष

कालभैरव जयंतीच्या सोमवारची, गेल्या ७ डिसेंबरची, सकाळ. वेळ साधारण अकरा वाजताची. निसर्ग न्याहाळत जंगलातून चालायला सुरुवात होऊन तीनेक तास झालेले होते. डाव्या हाताला दूरवर सह्याद्रीच्या एका स्वतंत्र डोंगरावर विस्तीर्ण पसरलेल्या महिमतगडाचे रांगडे सौंदर्य, दुतर्फा दिसणारे त्याचे बुरूज पाहात आणि उजव्या बाजूच्या खोल दरीतील गुहेत विसावलेल्या श्रीक्षेत्र मार्लेश्वरचरणी मनोमन नतमस्तक होत लिंग डोंगराच्या दिशेने निघालेलो. दोनही बाजूला खोल दऱ्या असलेल्या दंडाच्या वाटेवरून चालताना, लिंगाचा डोंगर नजरेच्या टप्प्यात आला. नेमकं तेव्हा एका गवताळ टप्प्यावर डाव्या बाजूच्या झाडीतील आडोशाला चरत असलेला वयस्क आणि रुबाबदार सांबर वाऱ्याच्या वेगानं आल्या वाटेला परत फिरलं अन् क्षणार्धात आमच्या नजरेआड झालं. दोन फुटांहून अधिक वाढलेली आकर्षक शिंगे आणि खांद्यापर्यंत किमान दीडेक मीटर उंची, पूर्ण वाढ झालेली अशा धिप्पाड देहयष्टी असलेल्या वयस्क एकलकोंड्या नरसांबराचं नजरेला पडलेलं शरीरसौष्ठव केवळ अवर्णनीय! 

सांबर हरिण (Cervix Unicolour)ही भारतात आढळणारी हरणाची सर्वात मोठी आणि मुख्य जात. सांबर हरणाचा स्वभाव गरीब आणि भित्रा असला तरी त्याचा गडद तपकिरी रंग त्याच्या रुबाबात भर घालतो. आम्हाला ज्यानं दर्शन दिलं तोही असाच रुबाबदार, आकर्षक शिंगे आणि धिप्पाड देहयष्टी असलेला होता. हे नर सांबर झाडाच्या खोडाला शिंगे घासत असतात. जंगलात फिरत असताना त्यांनी घासलेली झाडे दिसतात. लिंगाच्या डोंगरावर जाण्याआधी, डिसेंबरच्या ४ तारखेला, कोयना निसर्ग संवर्धन व पर्यावरण पर्यटन संस्थेचे मित्र सचिन धायगुडे यांची फेसबुकवर ‘सांबराची घासण’ ही पोस्ट वाचलेली. अंगावरच्या गोचिडांचा त्रास, खाज कमी करण्यासाठी सांबरं चिखलात लोळतात. खाज असेल तर झाडाच्या खोडाला जोरजोरात अंग घासतात. जंगल फिरताना झाडांच्या खोडांवर ही ‘सांबराची घासण’ दिसून येते. त्यासाठी सांबरं झाडाची सालं शिंगांनी सोलतात. सोललेली सालं खातात. तिचा काही भाग झाडाच्या बुंध्याजवळ पडलेला दिसतो. पोस्ट वाचताना सांबराची ही वर्तवणूक लिंगाच्या डोंगरावर बघायला मिळाली तर? असं सहज वाटून गेलेलं, अन् चक्क सांबरानेच दर्शन दिलं! 

नरसांबर दर्शन क्षणाचे फोटो घ्यायला न मिळाल्याने आम्ही दोघे-तिघे चुटपुटलो. तेव्हा ‘जंगल हे वर्तमानपत्रासारखं वाचत वाचत चालताना, “सांबर अचानक डोळ्यासमोरून गेलं” ही “फ्लॅशन्यूज” होती.  

‘अशा क्षणातल्या हालचाली कॅमेऱ्यापेक्षा डोळ्यांनी टिपणे फार महत्त्वाचे असते,’ असं वन्यजीव अभ्यासक नीलेश बापट आम्हाला सांगत होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सांबराचे डोळ्यांनी दिसणारे सौष्ठव, काही सेकंदांच्या अवधीत कॅमेऱ्यात टिपणे अवघड होते. मानवी आवाजांना घाबरल्याने झुडपात सांबराचा आवाज झालेला. तेव्हा पहिल्यांदा माकड किंवा डुक्कर असेल असं वाटलेलं. आमच्या नऊ जणांतील सुरुवातीचे दोघे-तिघे विशेष आवाज न करता दांडीच्या वाटेनं किंचित पुढे गेलेले. मधल्या फळीतील आम्ही तिघे-चौघे निसर्गाच्या गप्पा करत चाललेलो. पाठीमागे काहीशा अंतरावर शेवटचे दोघे होते. तेव्हा मधल्यांच्या आवाजाने त्या सांबराची वाळलेलं गवत खाण्यातली तंद्री भंगली आणि झुडुपातून ते अचानक समोर आलं. अपरिचित चाहूल जाणवल्यास वन्यजीवांमध्ये सजगता निर्माण होण्यीची ती नैसर्गिक प्रतिक्रिया होती. 

साहित्यिक अनंत काणेकर यांनी १९५५ साली लिहिलेली ‘सांबर’ नावाची एकांकिका आहे. ‘साम्बरी’ या काल्पनिक वन्यजमातीच्या, ‘सांबरी पुरुषाने एकतरी सांबर मारलाच पाहिजे. नाहीतर त्याला समाजात मान नाही’ या मूळ जीवनसूत्राला छेद देणारी ही शोकान्त एकांकिका आपल्याला वन्यजीवांच्या हत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. महाविद्यालयीन जीवनात स्नेहसंमेलनाच्या वातावरणात कधीतरी ती ऐकलेली. आज पहिल्यांदा असं सांबर दर्शन घडल्यावर विविध ठिकाणी वाचलेलं सांबरांचं वर्णन आठवलं. तेव्हा ‘गरीब स्वभावाचा हा प्राणी हिंस्र प्राण्यांपासून स्वतःला कसा वाचवीत असेल?’ असाही विचार मनाला स्पर्शून गेला.

जगभरातील अभयारण्यांच्या चौकटीतलं वन्यजीव दर्शन आणि आजचं मोकळ्या आकाशाखाली मुक्त संचार करणारं, मानवी पावलांची चाहूल लागताच, अवघ्या काही सेकंदात, डोळ्यांच्या पापण्या लवण्याच्या आत सुरक्षित जागेत पसार झालेलं ते सांबर हरणाचं दर्शन डोळे भरून निसर्ग पाहायला शिकविणारं होतं. आमच्यासारखे हाता-गळ्यात कॅमेरे घेऊन फिरणाऱ्यांनाही सांबराने काही सेकंदांच्या एंट्रीने चकवलं. मोकळ्या वातावरणात जंगलातील खरीखुरी गंमत समजावून सांगितली. फोटोंच्या फारशा मोहात न अडकणारे सन्मित्र निलेश बापट अनेकदा सांगतात तसा जंगलात असा अचानक समोर येणारा क्षण उघड्या डोळ्यांनी बघण्यातलं, ते दृश्य अनुभवण्याचं सुख वेगळंच! ते जंगलातील खरं सौंदर्य !’ त्याची अनुभूती घेऊन आम्ही लिंगाचा डोंगर उतरलो.

संबंधित बातम्या