‘वॉसॅच’ पर्वताच्या पायथ्याशी

डॉ. उमेश लिमये, मेसा, अरिझोना, अमेरिका
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

विशेष

आता पुन्हा इतक्या वर्षांनी वॉसॅच पर्वतांमध्ये परतताना आई-वडील, नातेवाईक यांना पूर्वी मी वॉसॅच पर्वतातून फिरवले होते, त्याच्या आठवणी जाग्या झाल्या.  तेव्हाच्या त्यांच्या वयाइतके आता आपले वय होत आले आहे, ह्या जाणिवेने थोडे वयस्कर झाल्यासारखेही वाटले.  हिमालय असो किंवा रॉकिज्... महापर्वत त्यांच्या एका अनामिक गांभीर्याने किंवा  ‘आपूर्यमाणम् अचलप्रतिष्ठम्’ अशा स्थितप्रज्ञतेने आपल्याला अंर्तमुख करतात हे खरे.

अ­ मेरिकेतील 'रॉकीज्' हे पर्वत खरे तर जगप्रसिद्ध आहेत पण अमेरिकेची सफर करताना भारतीय नागरिकांचा प्रवास मुख्यत्वे कोस्टल म्हणजे न्यू यॉर्क, फ्लोरिडा, कॅलिफोर्नियासारख्या राज्यांतूनच होतो.  आपल्याकडे महाराष्ट्र, कर्नाटक व केरळ राज्ये जशी सह्याद्रीच्या विविधतेने नटलेली आहेत, त्याप्रमाणे अमेरिकेत आयडाहो, मॉन्टेना, यूटा, कोलोरॅडो, अरिझोना ही काही राज्ये रॉकीज् पर्वताच्या रांगांच्या विविधतेचे दर्शन घडवतात.  या पर्वतीय अमेरिकेच्या (इंटर माऊंटन) उत्तर दक्षिण पट्ट्यात सर्वात उत्तरेला, ग्लेशियर नॅशनल पार्क पासून पाहायला सुरू केले तर येलोस्टोन, रॉकी माउंन्टन, ब्राईस कॅनियन, झायन, ग्रॅन्ड कॅनियन अशा प्रसिद्ध नॅशनल पार्क मधून आपल्याला रॉकीज् पर्वताची वेगवेगळी स्वरूपे दिसतात. मात्र या पर्वतीय अमेरिकेला आवर्जून भेट दिल्याशिवाय बऱ्याच लोकांना हे सौंदर्य बघायला मिळत नाही. 

येलोस्टोन, रॉकी माउंन्टन, ब्राईस कॅनियन, झायन, ग्रॅन्ड कॅनियन या पट्ट्याच्या मध्यभागी असलेल्या यूटा राज्यात हे वैविध्य उत्तरेला बर्फाच्छादित प्रदेशापासून दक्षिणेला हळूहळू वाळवंटी प्रदेशाकडे सरकत गेलेले दिसते. यूटा राज्याची राजधानी असणारे ‘सॉल्ट लेक सिटी’ हे नावाप्रमाणेच प्रचंड खाऱ्या पाण्याच्या सरोवराच्या काठी वसलेले शहर आहे. या शहराच्या पश्चिमेला खाऱ्या पाण्याचे सरोवर तर पूर्वेला उत्तर-दक्षिण गेलेली ‘वॉसॅच फ्रंट’ ही रॉकी पर्वतांमधील एक उत्तुंग पर्वतरांग आहे.  वॉसॅच पर्वताचे उंची व रुंदीचे प्रमाण हे इतर पर्वतांपेक्षा  जास्त असल्याने वॉसॅच पर्वतातील डोंगरांचा सर्वसाधारण उतार (स्टीपनेस) खूप जास्त आहे, हे वॉसॅच पर्वतरांगेचे वैशिष्ट. 

यूटा स्टेट युनिर्व्हसिटीतून डॉक्टरेट केल्यानंतर तब्बल पंचवीस वर्षांनी यंदा या वॉसॅच फ्रंट पर्वतांमध्ये फेरफटका मारायचा योग आला.  शरद ऋतू चालू असल्याने झाडांच्या पानांनी रंग बदलले होते.  बर्फाचा पहिला शिडकावाही दोन एक दिवस आधीच झाला होता. ऑफिसचे काम लवकर संपल्यामुळे एक पूर्ण दुपार युनिर्व्हसिटीमधल्या  आठवणींना उजाळा देत देत,  पर्वतांची शिखरे व पानांचे बदलते रंग बघत मनसोक्त भटकलो. पंचवीस वर्षांपूर्वी खिशात पैसे फार नसले तरी वॉसॅच पर्वतात कधी ट्रेकिंग तर कधी नुसते ड्राईव्ह करीत असू. तेव्हा शिक्षणाव्यतिरिक्त जबाबदाऱ्याही नव्हत्या, हाताशी वेळ होता. डॉक्टरेट झाल्यानंतर मधली वर्षे प्रचंड वेगाने मागे पडली आणि शरदातील पानांसारखे वैयक्तिक आयुष्यातील रंगही हळूहळू बदलत गेले.   आता पुन्हा इतक्या वर्षांनी वॉसॅच पर्वतांमध्ये परतताना, आई-वडील, नातेवाईक यांना पूर्वी मी वॉसॅच पर्वतातून फिरवले होते त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हाच्या त्यांच्या वयाइतके आता आपले वय होत आले आहे, ह्या जाणिवेने थोडे वयस्कर झाल्यासारखेही वाटले.  त्याकाळी पी.एचडी. नंतर पुढे काय करणार, ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते; तर आज मुले मोठी होऊन काय करतील हा प्रश्न अनुत्तरीत आहे.  येथे पुन्हा येणे कधी होणार? हा प्रश्नही आपल्या भविष्याच्या नाड्या आपल्या हातात नक्की किती असतात?  ह्याची जाणीव देऊन गेला. 

हिमालय असो किंवा रॉकिज्... महापर्वत त्यांच्या एका अनामिक गांभीर्याने किंवा  'आपूर्यमाणम् अचलप्रतिष्ठम्' अशा स्थितप्रज्ञतेने आपल्याला अंर्तमुख करतात हे खरे. रंग बदलत चाललेली ही पाने, कधी तरी गळून पडतील मग वसंतामध्ये नवीन पाने येतील.  पुन्हा हेच कालचक्र ... हजारो लाखो वर्षांचे!  आपणही त्याचेच एक घटक... काही वर्षांचे साक्षीदार! हा सारा खेळ बघत उभा असणार आहे वॉसॅच पर्वत... ‘अनादी मी अनंत मी’ म्हणत… त्या बदलत्या जीवसृष्टीकडे गूढ स्थितप्रज्ञतेने बघत. आणि अशा दिङ्मूढ करणाऱ्या विचारांच्या नादात त्या निसर्गाचे फोटो काढावे तितके कमीच पडत राहिले. 

(लेखक ‘मायक्रॉन टेक्नॉलॉजी’ या मेमरी चिप्स बनवणाऱ्या कंपनीत कॉर्पोरेट डेव्हलपमेंट डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत.)

संबंधित बातम्या