एका डॉक्टरची कोविड डायरी

डॉ. वसुधा सरदेसाई
मंगळवार, 27 एप्रिल 2021

विशेष

मे-जून २०२०मध्ये सुरू झालेली कोविड ड्युटी आजही सुरूच आहे. डिसेंबर -जानेवारीमध्ये रुग्णसंख्या घटली, कोविड वॉर्डातले बेड रिकामे राहू लागले तेव्हा थोडं हायसं वाटलं होतं. पण मार्चमध्ये पुन्हा रुग्णवाढ पाहून धक्काच बसला... आम्ही पुन्हा सरसावून कामाला लागलो!

ऑगस्ट -सप्टेंबर २०२० 

कोविड काळात सहज हसू आणणाऱ्याही काही घटना होत्या. थोडंस टेन्शन कमी करायला अशा गोष्टींची मदत होते.
वॉर्डात सगळेच ऑक्सिजनवर आहेत. कुणी कमी, कुणी अधिक प्रमाणात.. त्यातही हा बायकांचा वॉर्ड! नाकाला ऑक्सिजन असला तरी शेजारी शेजारी झोपलेल्या बायका आपापसात कुचू कुचू बोलत असतात. सुनेच्या चहाड्यांपासून सिस्टरच्या तक्रारीपर्यंत सर्व काही चालू असतं.
अशीच एकदा राउंड घेताना, एक पेशंट आजी मला म्हणाल्या, “डॉक्टर, त्या.. त्या.. बेडवर आहेत ना, त्या पेशंटला इथून हलवा..”
“का हो?”- मी.
“अहो, रात्रभर खोकताहेत त्या..!” त्यांच्या शेजारची पेशंट म्हणाली.
“मग काय झालं? खोकू दे की..” - मी.
“अहो, काही काय बोलता? आम्हाला कोरोना होईल ना!” रागारागानं पहिल्या पेशंट आजी म्हणाल्या.
“म्हणजे? तुम्हाला काय झालंय असं वाटतंय?” मी आश्चर्याने विचारलं.
“म्हणजे आम्हालाही कोरोना झालाय?” दुसरी पेशंट म्हणाली.
“हो! इथे सगळे कोरोनाचेच पेशंट आहेत ना!” - मी.
यावेळी दोघींनी एकमेकींकडे चमकून पाहिले. एकजण म्हणाली, “आम्हाला वाटलं, आम्हा दोघींना न्यूमोनिया झालाय आणि त्या बाईंना कोरोना..!”
मी कपाळावर हात मारून घेतला.
***
चेहेऱ्यावर लावलेल्या शिल्ड आणि गॉगलमुळे इतकं बाष्प जमा होतं की त्यामुळं कित्येक विनोदी प्रसंग निर्माण झाले.
“डॉक्टर, पेशंट इथे आहे, तिथे नुसतीच चादर आहे..”
“डॉक्टर रूम ४०६ला जायचंय, तुम्ही ४०८मध्ये कुठे जाताय” इ.इ.
माझ्या असिस्टन्टने एकदा माझी फिरकी घ्यायला विचारलं, “मॅडम, नक्की दिसतंय तुम्हाला?”
“तुला धपाटा देण्याइतकं नक्की दिसतंय...”
त्या गंभीर वातावरणातही आम्ही खळखळून हसलो....
***
गौरी गणपतीचे दिवस आणि माझी कोविड ड्युटी एकदमच आली. इतरवेळी मी छानशी साडी नेसून, दागिने घालून गौरी गणपतीच्या कौतुकात मग्न असते. पण हे वर्ष वेगळं आहे. मी साध्याशा कपड्यात.. हातात बांगडी नाही, गळ्यात कानात काही नाही. एवढंच कशाला, कपाळावर साधी टिकली नाही. आरशात पाहिलं, तर माझं मलाच कसंसं होतंय.. हीच का मी?
त्या दिवशी दुपारी दमूनभागून राउंड घेऊन आले, तर बिल्डिंगच्या अंगणात अतिशय रम्य वातावरण! पाऊस नुकताच पडून गेलेला.. हवेत छानसा गारवा.. आणि तुळशीवृंदावनापाशी छानशा नटलेल्या बायका हातात गौरीचे मुखवटे घेऊन उभ्या! रांगोळीतून गौरीची पावले रेखाटलेली..
‘गौरी आल्या सोन्यामोत्याच्या पाऊली...’
सर्व वातावरणच अतिशय रम्य आणि पवित्र वाटत होतं. क्षणभर मी माझा थकवा विसरले, मरगळ विसरले. मनातून सुखावले, हसले... आणि लक्षात आलं, ‘माझ्या चेहेऱ्याला मास्क आहे, माझं हसू कसं दिसणार यांना?’ पण त्याचबरोबर त्यांच्या कुणाच्याही चेहेऱ्यावर मास्क नाही, हे पाहून मी जास्त धास्तावले. सुंदर साड्या नेसलेल्या त्या तिघी-चौघीजणी मास्क न घालताच हास्यविनोदात मग्न होत्या. माझी अस्वस्थता यांना सांगू कशी?
“मॅडम, संध्याकाळी हळदीकुंकवाला या बरं का!”
मी संध्याकाळी छान साडी नेसून, थोडेसे दागिने घालून पण चेहेऱ्याला मास्क लावून त्यांच्या घरी गेले. किती वेगळंच आणि प्रसन्न वाटत होतं मला! मला पाहून मग जमलेल्या सगळ्याजणींनी आपापले मास्क लावले. एकमेकींच्यात अंतर ठेवून बसल्या. थोड्याफार गप्पा झाल्यावर, हळदीकुंकू देताना यजमानीण बाई मला हळूच म्हणाल्या, ‘‘खरंच का हो, कोरोनाचे खूप पेशंट आहेत? आणि पेपरमध्ये येतं इतकं, खरंच का भयानक आहे सगळं?”
मला त्या काकूंचा हेवाच वाटला! ‘अज्ञानात सुख’ म्हणतात ते हेच असावं.. यांना एकदा माझ्याबरोबर राउंडला घेऊन जावं का? एकदा त्यांनी ऑक्सिजन लावलेले, तळमळणारे पेशंट्स पाहिले, की जाग येईल का त्यांना?
***
“मावशी, माझी चुलत बहीण आहे ना, तिला नववा महिना चालू आहे..”
मला ‘मावशी’ म्हणणाऱ्या एका भाचीचा हा फोन..
“बरं मग?”
“तिला ना नेमका कोविड झालाय. तशी बरी आहे ती, पण तिचं ज्या हॉस्पिटलमध्ये डिलीव्हरीसाठी नाव घातलंय ना, ते डॉक्टर म्हणाले, ‘आता आमच्याकडे येऊ नका, दुसरीकडे बघा...’”
“म्हणजे?”
“म्हणजे, ते डॉक्टर तिची डिलीव्हरी करायला तयार नाहीत, तेव्हा तुझ्या हॉस्पिटलला पाठवू का तिला?”
“पाठव..”
मग मी माझ्या हॉस्पिटलमधल्या ‘स्त्री रोग व प्रसूतिशास्त्रा’च्या माझ्या मैत्रिणीशी बोलले. ‘ती’ येणार आहे, असं सर्व संबंधितांना सांगून ठेवलं.
एक दिवस गेला, दोन दिवस गेले, तिचा पत्ताच नाही. काय झालं असावं?
मी रोज चौकशी करत होते, “आली का ती?”
उत्तर रोजचंच, “नाही!”
तीन चार दिवसांनी त्या भाचीचा परत फोन आला, “मावशी, तिनं ना, त्या ‘अमक्या’ हॉस्पिटलमध्ये नाव घातलं. इथे नको म्हणाली ती!”
“का गं?”
“हे कोविड हॉस्पिटल आहे ना, म्हणून नको म्हणे ..”
“काऽऽय?” मला हसावं की रडावं कळेना..
“अगं, पण तिलाही कोविड झालाय ना?”
“हो, पण इथे सगळ्या कोविड पेशंट्समध्ये नको, असं घरचे लोक म्हणाले, म्हणे!”
मी कपाळावर हात मारून घेतला.
***
रविवार संध्याकाळ! कोविड ड्युटीचा आठवडा संपलेला आहे. सध्यापुरतं तरी स्वस्थ वाटतं आहे. थोडीशी सुस्तावलेली मी, सुखाच्या शोधात रमलेली.. तेवढ्यात फोन वाजला. डोळे मिटूनच मी फोन उचलला,
“हॅलो..”
पलीकडून माझा एक मित्र बोलत होता,
“अगं, माझ्या जवळचे एक जण आहेत. कोविड आहे. ऑक्सिजन लागेल असं दिसतंय. प्लीज, बघ ना, तुझ्या हॉस्पिटलला स्पेशल रूम मिळते का?”
मी रविवारचा आराम सोडून हॉस्पिटलला फोन लावण्यात गुंतले.
“...असा एक पेशंट येतोय.. आला की मला कळवा..”
मग जवळजवळ दोन तासांनी फोन.. “मॅडम, पेशंट आलाय..”
अनंत प्रश्नांमधून, पेशंटला कोविड आहे, हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे, याच हॉस्पिटलला ठेवायचंय.. असे अनेक निर्णय घेऊन एकदाचा फोन बंद केला.
लगेच दहा मिनिटात माझ्या मित्राचा फोन आला,
“अगं, स्पेशल रूम मिळत नाही म्हणताहेत, बघ ना जरा...”
“अरे, रूमचं आपल्या हातात नसतं. किती गर्दी आहे माहितेय ना? जिथं जागा होईल तिथं होऊ दे अॅडमिट.. यथावकाश रूम मिळेलच ना!”
“अगं पण जनरल वॉर्ड मिळतोय..”
“अरे, सोपं नाहीये इतकं! जागा मिळते आहे हेच चांगलं नशीब आहे,” 
“तरी पण..”
कितीही सांगून काहींचं समाधान होत नाही, हेच खरं!
दुसऱ्या दिवशी तातडीनं मी हॉस्पिटलला गेले. “.. या पेशंटला कुठं दाखल केलंय?”
“ते.. ते? नाहीच आहेत इथे..”
“काय? मग कुठे आहेत?”
“काही कल्पना नाही. लिस्टमध्ये नाव तर दिसत नाही.”
मी रात्रीच्या डॉक्टरांचा फोननंबर शोधून, त्यांना फोन लावून चौकशी केली.
“मॅडम, ते ना? ते डिसचार्ज अगेन्स्ट मेडिकल अॅडव्हाइस (DAMA) घेऊन निघून गेले..”
“काय?” मी गपगार ..!
“स्पेशल रूम हवी म्हणून हटून बसले होते ते. आमचाही खूप वेळ खाल्ला त्यांनी.” फोन ठेवताना त्या ज्युनिअर डॉक्टरने माहिती पुरवली.
मी दीर्घश्वसनाचा व्यायाम करून घेतला.. let go...
***
रुग्णांच्या बाबतीतले काही तापदायक अनुभव आले की वाटतं... हे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आम्हा डॉक्टरांना काय समजतात? आम्ही कुणी ‘माणूस’ नाही का? कोविडचा धोका आम्हाला काय कमी आहे का? बातम्यांमध्ये आपण पाहिलं ना, किती डॉक्टर या आजाराला बळी पडलेत.. त्याचं कुणालाही काही वाटू नये? कधीतरी कुठेतरी थोडाफार उमाळा दाटतो. मग परत “गरज सरो, वैद्य मरो..” हेच खरं !
डॉक्टरांशी बोलताना नरमाईचा स्वर नाही! नम्रता, कृतज्ञता या फक्त पुस्तकात लिहायच्या का गोष्टी आहेत? फोनवर किंवा प्रत्यक्षात पेशंटच्या नातलगांशी बोलताना ठाई ठाई याचा प्रत्यय येत राहतो. परिस्थितीवरचा राग, नशिबावरचा राग, अपराधीपणाच्या भावनेतून निर्माण झालेला राग काढायला ‘डॉक्टर’ हे एक साधन झालं आहे. डॉक्टर काय सांगताहेत हे नीट समजावूनही न घेता प्रश्नांचा भडिमार करायचा! कधी तेच तेच असंबद्ध काहीतरी सांगत राहायचं! डॉक्टरांना विश्रांतीसाठी, विचार करण्यासाठी वेळ द्यायला हवाय, याची जाणीवही ठेवायची नाही. हातात ‘मोबाइल फोन’ नावाचं शस्त्र आलं की काळवेळाचा विचारही न करता डॉक्टरवर ते चालवत राहायचं! इतकी कमालीची असंवेदनशीलता या मंडळींच्याकडे कुठून येते? यासाठी शिक्षण नाही; सुसंस्कृत, सुसंस्कारित मन असण्याची गरज आहे. माझा समाज इतका शहाणा, सुसंस्कृत कधी होईल? 
या कोविड काळात डॉक्टरांचं महत्त्व छानच अधोरेखित झालं. समाजाला डॉक्टरांचं काम समजलं असावं .. “कोविडमुळे डॉक्टरांचा मृत्यू झाला तर..” म्हणून आमचा विमा उतरवलाय सरकारनं.. पण डॉक्टरांना केलेली मारहाणीची बातमी वाचली की वाटतं काय उपयोग आहे या सगळ्याचा?
***
‘मला कोविड झाला तर..’ हा विचार मधून मधून डोकावतोच. कितीतरी जवळच्या, ओळखीच्या डॉक्टरांना कोविड झालेला पाहिलाय. मग माझं काय विशेष? कितीही धिटाईचा आव आणला तरी, कुठंतरी मन चरकतंच! पण हा विचार झटकून टाकावा लागतो. कोविड राउंड संपवून घरी आल्यावर सणकून भूक लागलेली असते. तेव्हा ‘आधी जेवण की आधी अंघोळ?’ अशा गोंधळात जसं गुपचूप अंघोळीला जावं लागतं, तसंच प्रयत्नपूर्वक विचार बदलायचे... शॉवरखाली गरम पाणी अंगावर घेताना हळूहळू शांत आणि छान वाटायला लागतं. मनातून, शरीरातून सुखाची संवेदना फिरते.. आणि मग असे नकारात्मक विचार त्या पाण्याबरोबर धुऊन टाकायचे. मस्त ताजंतवानं वाटायला लागतं. “कशाला उद्याची बात..” असं म्हणत आलेल्या दिवसाला सामोरं जायचं, हेच खरं!
***
कोविडमधून बऱ्या झालेल्या लोकांना नंतरही काही ना काही त्रास होताहेत असं दिसतंय. रक्त गोठून त्याची रक्तवाहिनीत गुठळी होऊन, रक्तपुरवठा बंद पडल्यानं, हृदयविकार, लकवा इ. त्रास आहेतच. पण फुप्फुसाच्या सुजेमुळं दम लागणं, कार्यक्षमता कमी होणं हेही प्रश्न दिसताहेत. नुसता थकवा किंवा मानसिक अस्वास्थ्य तर खूपच रुग्णांमध्ये बराच काळ दिसतं आहे.
कोविडमधून जे रुग्ण बरे झाले, ते किंवा त्यांचे नातलग नंतर आवर्जून भेटायला येतात, मनापासून धन्यवाद देतात. काहीजण तर छानसं पत्र किंवा कविता लिहून देतात. काही प्रेमानं छोटी-मोठी भेटवस्तू आणतात. क्षणभर जीव सुखावतो, पण लगेच मलाच मी भानावर आणते, ‘लक्षात ठेव, You treat, HE cures..’ 
औषधोपचारात अंतर्भूत असलेला देवाचा सहभाग विसरून कसं चालेल? त्यामुळंच, अगदी बरे म्हणता म्हणता हातातून सुटलेले रुग्णही स्मरणात राहतात आणि माणसाच्या कर्तृत्वाच्या मर्यादा अधोरेखित करतात. चटका लावून गेलेल्या रुग्णांची आठवण कधी फुशारकी मारू देत नाही.
***
रुग्णालयात काम करणाऱ्यांची संख्या पाहिली, तर त्यातले १०-१५ टक्के लोकच ‘डॉक्टर’ आहेत. आणखी काही टक्के परिचारिका किंवा नर्सिंग स्टाफ असतो. पण बाकीचा बहुतांश हा ‘मदतनीस’ वर्ग असतो. यात अगदी रुग्णसेवा करणाऱ्या आयांपासून (ज्यांना आम्ही मामा किंवा मावशी म्हणतो), प्रयोगशाळेतील मदतनीस, ECG, Xray  काढणारे लोक, इतर विभागात काम करणारे लोक किंवा बिलिंग, अकाउंट सांभाळणारे लोक- असे अनेक प्रकारची कामं करणारे, ‘हॉस्पिटल स्टाफ’ या नावाखाली येतात. डॉक्टरांइतकी यांचीही कामं जोखमीची असतात. रुग्णांच्या संपर्कात ही मंडळीही येत असतात.
यात मामा-मावशांचं काम तर विशेष कौतुकास्पद! रुग्णांचे कपडे बदलण्यापासून ते म्हाताऱ्या किंवा खूप आजारी व्यक्तींना जेवण भरवण्यापर्यंत सारी कामं हे लोक करत असतात. कोविड काळात यांचीही कामं वाढली आहेत.
...आणि मृत रुग्णांना हाताळणारे लोक? त्यांच्या नुसत्या स्मरणानं जीव कालवतो. या कोविड रुग्णांना मरणोत्तर नीट गुंडाळून, त्यांच्यापासून इतरांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वतोपरी खबरदारी घेणं हे फारच धोक्याचं काम! स्वतःच्या जिवाची पर्वा न करता हे वीर गेले कित्येक महिने वारंवार हे काम करत आहेत.
प्रसंगी ज्या रुग्णांकडे घरच्यांनीदेखील पाठ फिरवली, अशा मृत रुग्णांचे अंत्यसंस्कार करणं ही याच लोकांची जबाबदारी होऊन बसते.
असंवेदनशील समाजाला याची जाणीव कधी होणार?
***
डिसेंबर २०२० -जानेवारी २०२१
कोविडवर लस उपलब्ध झाली आहे... हा अगदी सोन्याचा दिवस म्हणायला हवा. माणसाच्या दुर्दम्य आशावादाचं आणि अविरत कष्ट करण्याचं मला नेहमीच अप्रूप वाटलं आहे. या भयानक अशा महामारीनं खचून न जाता कितीतरी लोकांनी ही लस निर्माण करण्यासाठी अहोरात्र श्रम केले, त्याचं हे फलित आहे.
या महामारीतून सहीसलामत बाहेर पडायला हवं असेल तर लसीकरणाला पर्याय नाही. सर्वसामान्य माणसांच्या मनात कोणताही किंतु राहू नये असं वाटत असेल तर डॉक्टरांनीच पुढाकार घेऊन लस घ्यायला हवी..
मी माझा लस घेतानाचा फोटो नक्की काढणार! 
***
कोरोनाची साथ कमी होतेय...! माझा अजून विश्वासच बसत नाहीये.
“खरंच का?” असं मी स्वतःलाच पुन्हा पुन्हा विचारतेय..
पण खरोखरच हॉस्पिटलमधले रुग्ण कमी झालेले दिसताहेत. बेड रिकामे राहताहेत. एक एक वॉर्ड कोरोनामुक्त केला जातोय.. म्हणजे खरंच असणार हे!
ही परिस्थिती थोड्याफार फरकानं सर्वच हॉस्पिटल्सची दिसतेय. वर्तमानपत्रातले आकडेही हेच सांगत आहेत.. म्हणजे खरंच असणार हे!
गेले आठ-नऊ महिने हे ‘कोरोना’ नावाचं वादळ सतत घोंघावतं आहे. 
मार्च २०२० या महिन्यात जगाच्या कुठल्याशा कोपऱ्यात आहे, असं वाटणारा हा आजार बघता बघता आपल्या देशात, आपल्या राज्यात, आपल्या शहरात, आपल्या गल्लीत कधी येऊन पोहोचला कळलं नाही. सुरुवातीला भीतीपोटी ‘कोविड झालाय’ हे लपवण्याकडे ज्यांचा कल होता, ते कालांतरानं ‘आम्हाला कोविड होऊन गेला’ असं सांगत मिरवतानाही पाहिले. 
कोविड या आजाराबाबत अनेकजण अजूनही अनभिज्ञ आहेत आणि अर्धवट ज्ञानामुळे भयगंडाने ग्रासले आहेत.
माणसाच्या स्वभावाच्या विविध छटांचं दर्शन मला या निमित्तानं झालं. कोविड बरा होऊन महिना लोटल्यावरसुद्धा आजी अथवा आजोबांना घरी घेऊन जायला नकार देणारे महाभाग जसे या समाजाचा घटक आहेत, तसेच पीपीई किट घालून आईबाबा किंवा जोडीदाराची सेवा करणारेही याच समाजातून निर्माण झाले आहेत, हे माझ्या लक्षात आलं.
डॉक्टरांना स्वतःच्या क्षमतांची जाणीव याच काळानं दिली. या क्षमतांचा कसही याच काळात लागला. आपल्याकडून जास्तीत जास्त किती कष्ट घडू शकतात, हे मीच आश्चर्यानं अनुभवलं आहे. 
गेल्या शंभर वर्षांत अशी साथ कधी आली नाही आणि पुढंही कधी येऊ नाही, असं मात्र वारंवार वाटतं आहे.
***
मार्च २०२१ 
डिसेंबर २०२० अखेरपर्यंत डायरी लिहिली. कोरोनाची साथ कमी झाली, असं वाटेपर्यंत २०२१ फेब्रुवारीच्या मध्यापासून परत रुग्णसंख्या वाढायला लागली. जगभरातील कोरोनाची साथ बघता हे थोडं अपेक्षितही होतं. आमचे वरिष्ठ, अनुभवी, अभ्यासू डॉक्टर्स याची आम्हाला वारंवार कल्पनाही देत होते. पण सगळ्यांसारखा मलाही धक्काच बसला....
डिसेंबरनंतर धुमधडाक्यात सुरू झालेले समारंभ, मास्कचा कमी झालेला वापर, सार्वजनिक ठिकाणची गर्दी, 
अशी अनेक कारणं यामागे आहेत. पण हा विषाणूही चांगलाच उपद्रवी आहे. अस्तन्या सरसावून आम्हा डॉक्टरांना पुनःश्च कामाला जुंपून घ्यावं लागलं आहे. आमच्या बरोबरीनं इतरही अनेकजण अहोरात्र राबत आहेत, याचीही जाणीव आहे.
‘अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा..’ असं गर्वानं म्हणणाऱ्या कोलंबसाची विजिगीषू वृत्ती ही आपली जमेची बाजू आहे. या शक्तीच्या जोरावर पुन्हा पुन्हा उभारी धरत आपण नक्कीच विजयी होऊ, याची मला खात्री आहे..

संबंधित बातम्या