लष्कर भारताचे, सन्मान भारताचा..

डॉ. यशवंत थोरात
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

मनापासून

मी सहा वर्षांचा असतानाचा तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. सगळेजण बाबांच्या अभ्यासिकेत जमले होते. वातावरण गंभीर होते आणि माझ्या दोन्ही बहिणींचे चेहरे रडवेले झाले होते. माझ्याकडे पाहात आई म्हणाल्या, ‘बाबा कोरियाला चाललेत. किती काळ ते घरापासून दूर असतील माहीत नाही पण त्यांना तुझ्याशी बोलायचंय’. ऑलिव्ह ग्रीन रंगाचा बुश शर्ट आणि पॅंट घातलेले देखण्या व्यक्तिमत्वाचे बाबा तिथंच उभे होते. ‘तुम्ही कोरियाला का चाललात?’, मी विचारलं. ‘शांतता निर्माण करण्यासाठी.’ बाबांचं बोलणं मोजकंच असायचं... 

वें गुर्ल्याहून घरी परतत असताना वाटेत पश्चिम घाटाचं सुंदर दृश्य मी कौतुकानं न्याहाळत होतो. इतक्यात फोन वाजला.

“डॉ. थोरात?”

“हो, बोला.”

“नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ यशवंत थोरातच का?”

“हो.” 

“जनरल थोरांताचे चिरंजीव?” आता माझा संयम ढळत चालला होता पण मी शांत राहिलो.

“सर, नमस्कार. मी सेऊल येथील दूतावासातून लष्करी संलग्नक कर्नल मिश्रा बोलतोय”. 

“हो, बोला.” 

“सर, १९५३- ५४ साली इथं (कोरियात) शांतता प्रस्थापित करण्यात भारतानं जी महत्त्वाची भूमिका बजावली त्यानिमित्तानं एक उत्सव करण्याचं दक्षिण कोरिया सरकारनं ठरवलं आहे. त्याची आठवण म्हणून इथं सेऊलमध्ये एक भारदस्त स्मारक उभारण्यात आलं असून त्याच्या उद्‌घाटनासाठी भारताचे संरक्षण मंत्री येत आहेत.” 

“छान कल्पना आहे, कर्नलसाहेब. पण या बाबतीत मी काय करू शकतो ते मला नाही समजलं,” मी म्हणालो. 

“सर, याच स्मारकाच्या एका दालनामध्ये भारताने दिलेल्या योगदानाशी संबंधित बाबींची मांडणी करण्यात येणार आहे. जनरल थोरात हे युद्धग्रस्त कोरियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून पाठविण्यात आलेल्या सीएफआय अर्थात संरक्षक दलाचे प्रमुख होते. त्यांचे त्यावेळचे काही फोटो किंवा कात्रणे आपल्याकडे असतील का? थोरात साहेब कोरियाला गेले त्यावेळच्या आपल्या काही आठवणी आम्हाला सांगू शकाल का?”

क्षणार्धात काळ कित्येक वर्षें मागे सरकला. मी सहा वर्षाचा असतानाचा तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. मी बाहेर लॉनवर खेळत होतो. मला घरात बोलावण्यात आलं. सगळेजण बाबांच्या अभ्यासिकेत जमले होते. वातावरण गंभीर होते आणि माझ्या दोन्ही बहिणींचे चेहरे रडवेले झाले होते. माझ्याकडे पाहात आई म्हणाल्या, ‘बाबा कोरियाला चाललेत. किती काळ ते घरापासून दूर असतील माहीत नाही पण त्यांना तुझ्याशी  बोलायचंय’. ऑलिव्ह ग्रीन रंगाचा बुश शर्ट आणि पॅंट घातलेले देखण्या व्यक्तिमत्वाचे बाबा तिथंच उभे होते. ‘तुम्ही कोरियाला का चाललात?’, मी विचारलं. ‘शांतता निर्माण करण्यासाठी.’ बाबांचं बोलणं मोजकंच असायचं.  

कोरिया नेमका कुठं होता आणि तिथं शांतता निर्माण करण्यासाठी बाबांची काय गरज होती हे काही मला समजत नव्हतं. पण मी गप्प राहिलो. एवढ्यात आपल्या बलदंड हातांनी त्यांनी मला अलगद वर उचललं आणि माझा चेहरा थेट आपल्या चेहऱ्यासमोर आणून म्हणाले, “मी परत येईपर्यंत आईची आणि तुझ्या बहिणींची जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यांची काळजी घेशील ना? नक्की?” 

“हो,” मी गंभीरपणे म्हणालो. त्यानंतर ताबडतोब आमचा निरोप घेऊन ते निघाले.

कोरिया हे रशिया, चीन आणि जपान यांच्या मधोमध असलेलं एक द्वीपकल्प आहे. या तीनही बलाढ्य देशांना ते खूप काळापासून हवंहवंसं वाटलेलं. जपानने १९१०मध्ये ते ताब्यात घेतलं. तेव्हापासून १९४५पर्यंत दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करेपर्यंत कोरिया जपानच्याच ताब्यात होता. युद्ध संपल्यानंतर जेव्हा विजयी देश जिंकलेल्या प्रदेशाच्या विभाजनास बसले तेव्हा सोव्हिएत संघ आणि अमेरिका यांनी ३८ अक्षांशावर कोरियाची विभागणी केली. पुढची तीन वर्षं अमेरिका, चीन, ब्रिटन आणि सोव्हिएत संघ या विजेत्या राष्ट्राचं संयुक्त प्रशासन कोरियावर ठेवण्यात आलं. नंतर संयुक्त राष्ट्रसंघानं दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आणि रशिया अमेरिकेनं आपापलं सैन्य परत घेतलं. मागे उरले ते एका नाजूकशा सीमारेषेमुळे विभागले गेलेले आणि एकमेकांबद्दल कडवं शत्रुत्व बाळगणारे दोन देश.         

२५ जून १९५०. अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी ट्रुमन आपल्या गावी रात्रीच्या भोजनासाठी बसले असताना उत्तर कोरियाच्या रणगाड्यांनी ३८वा अक्षांश ओलांडत दक्षिण कोरियात प्रवेश केला. पुढच्या काही मिनिटांत परराष्ट्र मंत्र्यांनी परिस्थितीची माहिती देताना त्यांना सांगितले की ही केवळ सीमेवरची साधी चकमक नसून युद्ध आहे. ट्रुमन ताबडतोब वॉशिंग्टनला परतले. उत्तर कोरियाच्या हल्ल्यामागे रशिया आणि चीनचा ‘अदृश्य हात’ आहे याची त्यांना जाणीव होती. दक्षिण कोरियाला मदत करण्याची त्यांची तयारी होती, परंतु अमेरिकी मदत पोहोचेपर्यंत त्यांचे सैन्य तग धरेल की नाही याची त्यांना शाश्वती वाटत नव्हती. 

त्यानंतर बरोबर ४८ तासांनी, दुपारी बाराच्या ठोक्याला, राष्ट्रध्यक्षांचा सचिव बाहेर आला आणि व्हाइट हाऊसच्या लॉबीत ताटकळत थांबलेल्या सुमारे शंभर पत्रकारांसमोर त्याने अध्यक्षांचं प्रसिद्धिपत्रक वाचून दाखवलं. एकदम शांतता पसरली. पत्रकात असं म्हटलं होतं, ‘कम्युनिस्टांना लष्करी आक्रमण आणि युद्धाच्या मार्गाने सर्व स्वतंत्र देश जिंकून घ्यायचे आहेत. सुरक्षा परिषदेनं सदस्य राष्ट्रांना मदतीचं आवाहन केलं असून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेच्या रक्षणासाठी मी अमेरिकेच्या सैन्य दलांना दक्षिण कोरियाला मदत करण्याचा आदेश दिला आहे.’  

पुढची तीन वर्षं लष्करी कारवाई चालू राहिली. त्यात तेहेतीस हजार अमेरिकी सैनिक मारले गेले. निष्णात सेनानी आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सैन्याचे पहिले कमांडर-इन-चीफ जनरल डग्लस मॅकऑर्थर यांची गच्छंती केली गेली. ‘सीआयए’सारख्या अमेरिकी गुप्तहेर संघटनेच्या विश्‍वासर्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कोरियन जनता दोन परस्परविरोधी विचारसरणीत विभागली गेली. अशा पार्श्वभूमीवर भारताला आपलं सुरक्षादल कोरियाला पाठवावं लागलं.

१९५३च्या जुलैमध्ये शांतता करार झाला. पण तोवर उत्तर कोरियाचे सैनिक आणि नागरिक मिळून १३ लाख तर दक्षिण कोरियाचे ३० लाख नागरिक आणि सव्वा दोन लाख सैनिक जिवाला मुकले होते. तसेच सहकारी कम्युनिस्टांच्या बचावासाठी युद्धात असंख्य चिनी सैनिकही मारले गेले होते. शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्धबंदी कराराच्या माध्यमातून दोन संस्थांची स्थापना करण्यात आली. तटस्थ राष्ट्रांची एक समिती (न्यूट्रल नेशन्स रिपॅट्रिएशन कमिशन, एनएनआरसी) नेमण्यात आली. यात भारत, स्वीडन, स्वित्झर्लंड, पोलंड आणि (त्यावेळचा) चेकोस्लोव्हाकिया या देशांचा समावेश होता. लेफ्टनंट जनरल के.एस. थिमय्या यांच्याकडे एनएनआरसीचं नेतृत्व देण्यात आलं. त्याचबरोबर मेजर जनरल एस. पी. पी. थोरात यांच्या नेतृत्वाखाली एका  शांतीसेनेचं - कस्टोडियन फोर्स ऑफ इंडियाचं (सीएफआय) - गठन करण्यात आलं.  या दलाचं नियंत्रण पूर्णपणे भारताकडे ठेवण्यात आलं. युद्धबंदीनंतर ज्या हजारो सैनिकांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आलं होतं त्या सर्वांना सुरक्षितपणे घरी पाठविण्याची जबाबदारी एनएनआरसी आणि सीएफआयकडे सोपवण्यात आली. 

वर वर पाहता हे सहजसाध्य कार्य वाटत होतं. परंतु युद्धकैदी आपापल्या घरी परतायला तयार नव्हते. कारण परत गेलात तर तुमचा वध केला जाईल असं त्यांच्या मनावर बिंबवण्यात आलं होतं. जगाच्या इतिहासात प्रथमच असं घडत होतं. त्या युद्धकैद्यांवर प्रचंड मानसिक दडपण होतं. एखाद्या कैद्याला परत जाण्याची इच्छा आहे अशी कुणकूण लागलीच तर बेदम मारहाण करून त्याच्या शरीराचे तुकडे तिथेच कंपाउंडमध्ये फेकून दिले जात. मृत्यू हाच अशा प्रकरणाचा शेवट होता. मृत्यूच्या या तांडवामागे तथाकथित बडी राष्ट्रे होती. एखाद्या कैद्याने स्वखुशीने मायदेशी परत जाणं हा त्यांना आपला वैचारिक पराभव आहे असं वाटत असे. कम्युनिस्ट आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भांडवलशाही देश या दोघांचीही धारणा तशीच होती. आता खुल्या झालेल्या कागदपत्रांवरून हे स्पष्ट झालेलं आहे की कोरियाच्या सगळ्या प्रश्नांमध्ये कैद्यांच्या हस्तांतरणाचा प्रश्न हा सर्वात नाजूक आणि सर्वात स्फोटक होता. 

याची जाणीव असल्यामुळेच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी सीएफआयच्या अधिकारी आणि जवानांना सांगितलं होतं, “तुम्ही शांतता निर्माण करण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कामगिरीवर जात आहात. तुमच्या मनात कोणाहीविषयी द्वेष भावना असता कामा नये. ही कठीण कामगिरी भारताकडे सोपवली जाणं हा भारताचा सन्मान आहे. तो सन्मान तुम्ही अबाधित ठेवाल असा मला विश्वास आहे.” सीएफआय दलाचं ‘भारताच्या सन्मानासाठी’ (For the Honour of India) हे बोधवाक्य पंतप्रधानांच्या त्या प्रेरणादायी उद्‌गारांतून घेतलं गेलं होतं.

आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांच्या लखलखाटात भारतीय सेना कोरियाच्या भूमीवर उतरली आणि तिथं शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं कार्य तिनं सुरू केलं. भारतीय दलाला कल्पना होती की बिगर-गोऱ्या लोकांचा एक देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शांतता प्रक्रियेत राजकीय आणि लष्करी आघाडीवर इतिहासात प्रथमच नेतृत्व करीत आहे. 

वरवर पाहता परिस्थिती शांत होती परंतु तिच्या पोटात दंगल, हिंसा आणि रक्तपात घडवू शकणाऱ्या स्फोटक शक्ती दडलेल्या होत्या. सैन्य दलाच्या कमांडरला पुरेपूर कल्पना होती की चुकीचं एक पाऊल पडायचा अवकाश, मग हिंसाचाराचा आगडोंब, मृत्यूचा नंगानाच आणि त्यातून भारताची बदनामी हे सारं ठरलेलंच. कमांडरला हे मात्र ठाऊक नव्हतं की खरोखरच तशी वेळ त्यांच्या समोर येऊन ठेपली होती.       

(अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे)

 

(पूर्वार्ध)

संबंधित बातम्या