अक्का आणि ताई

गीतांजली जोशी 
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

विशेष
एक प्रसिद्ध कवयित्री, तर दुसरी प्रसिद्ध लेखिका... साहित्यात रमणाऱ्या या आक्का आणि ताईला आयुष्याचे जोडीदारही साहित्यिकच मिळाले. साहित्यप्रेमानंच त्यांचं नातं बळकट केलं...

मोटारीनं बेळगावला जाताना निपाणी शहर मागं पडलं, की थोड्याच वेळात तवंदीचा घाट लागतो. तवंदी स्तवनिधी या नावाचा अपभ्रंश असावा. कारण पाटीवरती स्तवनिधी असंच नाव लिहिलं आहे. रस्ता जरा चढणीचा आणि वळणावळणाचा आहे. भवतालचा निसर्ग रूक्षच आहे. दृष्टीला एकही हिरवंगार झाड पडत नाही. डाव्या हाताला एक डोंगर दिसतो. हाच तवंदीचा डोंगर. डोंगरावर सुकलेलं पिवळं गवत आणि खडकाळ जमीन दिसते आहे. डोंगरमाथ्यावरच्या तुरळक हिरवाईतून काही कौलारू घरं दिसत आहेत. डोंगराच्या पायथ्याशी ब्रह्मदेवाचं एक प्रशस्त मंदिर दिसतं. भारतात राम, कृष्ण, शिव, दुर्गा आणि अन्य देवीदेवतांची असंख्य देवळं आहेत, पण ब्रह्मदेवाचं मंदिर क्वचितच दिसतं. पूर्वी डोंगरमाथ्यावर जायला कच्चा रस्ता होता, त्यामुळं गाडी वरपर्यंत जात नसे. आता मात्र वरपर्यंत गाडी, बस जाते. मूठभर आकाराचं खेडं अजूनही सुधारणेच्या परिस स्पर्शापासून दूरच आहे. गावातली बहुतांशा घरं कुणबी-दलितांची आहेत. एक-दोन घरंच ब्राह्मणांची आहेत. अजूनही इनामदार-दीक्षितांचा वाडा विचारलात, तर ''बामणाच्या वाड्यात जायचं हाय व्हय?'' असं विचारलं जातं. 

वाडा पूर्णपणे उद्‌ध्वस्त स्थितीत आहे. वाड्याच्या ढासळलेल्या कमानीतच दिंडीदरवाजा असणार. आता मात्र कुत्र्या-मांजरींनाही आत यायला मुक्त प्रवेश आहे. दारातून आत गेल्यावर डाव्या भिंतीत कोनाडा आहे. तिथं कुणा पूर्वजांच्या पादुका आहेत. सकाळी सकाळीच कुणी येऊन फुलं वाहून दिवा लावून गेलं आहे. तिथं उभं राहिल्यावर आक्काच्या 'मृद्‌गंध' पुस्तकातलं वाड्याचं वर्णन आठवलं. 

दोन्ही बाजूला उंच जोते असलेला गोपाळराव दीक्षितांचा दुमजली वाडा. सोप्याच्या डाव्या बाजूला शिसवी लाकडाचा प्रशस्त पाराचा झोपाळा. झोपाळ्यावर बसून इंदिरा (संत) आणि कमला (फडके) या गोपाळरावांच्या लहानशा मुली झोके घेत. सारवलेल्या हिरव्यागार अंगणात हळदीनं गौरीचे पाय रेखलेले असत. धान्याच्या राशी निवडायला, सुपानं पाखडायला, मसाले कांडायला गावातल्या बायका येत. गोठ्यात हंबरणाऱ्या गाई, म्हशी होत्या. दुधातुपानं भरून वाहणारं समृद्ध घर. चांदीचे खणखणते रुपये आईच्या हातावर ठेवणारे रुबाबदार, देखणे मामलेदार वडील. आक्का आणि ताईंच्या मनात हे तवंदी गाव आणि हा वाडा सदैव जिवंत राहिला. अगदी शेवटपर्यंत. तवंदीचा निसर्ग, तिथल्या निरागस मैत्रिणी, गुरं-वासरं आक्काच्या कवितांमध्ये आणि ताईच्या कथा कादंबऱ्यांमध्ये वाचकांना भेटत राहिले म्हणूनच कदाचित या उद्‌ध्वस्त वास्तूच्या पडक्‍या भिंतींनाही त्या दोघींच्या लहानपणाचा सुगंध अजूनही लगडलेला आहे. 

गोपाळराव दीक्षित मामलेदार होते. त्यांच्या नोकरीनिमित्त त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं वास्तव्य हावेरी, गदग अशा गावांमध्ये व्हायचं. गोपाळरावांच्या प्रथम पत्नीला लग्नानंतर काही वर्षें अपत्य झालं नाही, तेव्हा तिनंच आग्रहानं आपल्या नवऱ्याचा दुसरा विवाह करून दिला. गोपाळरावांच्या द्वितीय पत्नीला दोन मुली झाल्या. थोरली इंदिरा आणि धाकटी कमला. दुर्दैवानं गोपाळरावांचा अल्प आजारानं अकालीच मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी गोपाळरावांनी आपल्या दोन बायकांची, दोन मुलींची आणि शेतीवाडीची जबाबदारी आपल्या एका दूरच्या चुलत भावाकडं सोपवली. गोपाळरावांच्या मृत्यूनंतर दीक्षित कुटुंब तवंदीच्या वाड्यात वास्तव्याला गेलं. इंदिरा आणि कमला काकांच्या कठोर शिस्तीत तवंदीच्या वाड्यात राहू लागल्या. 

घरातले लोक इंदिराला आक्का म्हणत. कमलाचा जन्म नागपंचमीचा असल्यानं तिला नागूताई किंवा ताई म्हणत. वडील गेले, तेव्हा आक्का सात वर्षांची होती आणि ताई अवघी चार वर्षांची. तवंदीला शाळा नव्हती. त्यामुळं दोघींचा वेळ खेळण्यात, मैत्रिणींबरोबर पाणंदीवर फिरायला जाण्यात किंवा गोठ्यात जनाबाईबरोबर गाई-म्हशींची देखभाल करण्यात जायचा. तवंदीच्या डोंगरदरीतल्या पाणंदीचं आक्कानं केलेलं वर्णन अतिशय लुब्ध करणारं आहे... 

''पाणंदीच्या दोन्ही बाजूला बोरी, बाभळी, चिंच, अडुळशाची खुरटी झाडं होती... आणि या झाडांना वेढून एकमेकांशी जोडणाऱ्या करवंदीची, शतरंगी घाणेरीची, घंटीच्या फुलांची कुंपणीची अशा नाना तऱ्हेच्या जाळीदार, हिरवी भिंत उभी करणाऱ्या वेली होत्या. त्यांच्या तळाशी तेरड्याची, तरवडीची, टाकळ्याची, धोतऱ्याची उंच उंच तणांची गर्दी होती. अशा दोन्ही बाजूंनी सजवलेल्या जाळीतून पाणंदीची वाट जायची. दगडगोट्यांची आणि भक्क पांढऱ्या मातीची. चालताना वर पाहिलं, की भिंतींनी रेखलेली आकाशाची निळी पट्टी दिसायची. दोन्ही बाजूंनी हिरव्यांनी गुंफलेला आणि वरून उघडा असा हा जणू बोगदाच!’’

दुपारच्या वेळी घरातली मोठी माणसं वामकुक्षी घेत असली, की आक्का आणि ताई माडीवरच्या खोलीत जायच्या. तिथं एक मोठी लाकडी संदूक होती. संदुकीत वडिलांची पुस्तकं ठेवली होती. हावेरीला असताना आक्का आपली आपणच मैत्रिणीकडून वाचायला शिकली होती. संदुकीतलं पुस्तकं काढून आक्का, ताईला वाचून दाखवायचा प्रयत्न करीत असे. आक्का त्या वयातच कविता करू लागली होती. गदगला असताना वडिलांनी कौतुकानं तिला कविता लिहिण्यासाठी वही आणून दिली होती. आता काकांच्या हुकूमशाहीत मात्र हे सगळं लपूनच करावं लागत होतं. 

पुढं दोघींच्या शिक्षणासाठी दोघी मुली, धाकटी आई आणि काका काकू बेळगावला स्थायिक झाले. थोरली आई मात्र शेतीवाडीचं काम सांभाळायला तवंदीलाच राहिली. 

दोघींचं शालेय शिक्षण बेळगावलाच पार पडलं. कॉलेजसाठी आक्कानं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतला. आक्काची राहायची सोय वसतिगृहात झाली. आयुष्यात प्रथमच इतर तरुण मुलींना पाहून मुक्त आनंदी आयुष्य किती सुखद असतं हे आक्काला जाणवलं. काकांच्या तुरुंगासमान घरात जगताना आक्का आणि ताईला न हसायला परवानगी होती ना मोकळेपणानं बोलायला! मैत्रिणींच्या सहवासात आक्का हसू-बोलू लागली. उमलू लागली आणि कविताही लिहू लागली! या कवितांमुळंच आक्काची भेट ना. मं. संतांशी झाली. संत स्वतः कविता लिहायचे आणि कॉलेजच्या मराठी मंडळाचे सदस्य होते. या एका भेटीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते दोघांनाही कळलं नाही. पण हे प्रेम काकांना समजलं, तेव्हा त्यांच्या क्रोधाच्या अग्नीत आक्का होरपळून निघाली. काकांनी आक्काचं नाव फर्ग्युसनमधून काढलं... आणि ताईची शालान्त परीक्षा झाल्यावर दोघींचं नाव कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात घातलं. कुटुंब कोल्हापूरला वास्तव्याला गेलं. एका पुतणीचं प्रेमप्रकरण निकालात काढायच्या या प्रयत्नामुळं दुसरीच्या आयुष्यात काय घडणार आहे, याची कल्पनासुद्धा काकांना नसावी! कारण राजाराम कॉलेजातच स्वप्नाळू डोळ्यांच्या कमलाची भेट प्रोफेसर ना. सी. फडके यांच्याबरोबर झाली आणि एका वादळी प्रेमकथेची सुरुवात झाली! 

आक्का आणि ताई दोघींच्या प्रेमकथांमध्ये पुष्कळ साम्य आढळतं. या दोघीही ज्या व्यक्तींच्या प्रेमात पडल्या, ते दोघंही साहित्यिक होते. ना. म. संत प्रतिभावंत कवी होते. पुढं जाऊन ते नामवंत लघुनिबंधकारही झाले. आप्पाही आघाडीचे कादंबरीकार, लघुनिबंधाचे (गुजगोष्टी) जनक, कथाकार.  

घांचंही नाव नारायण! आणि दोघंही अतिशय देखणे. आक्का आणि ताई दोघींच्या वाचनाच्या आवडीला खतपाणी घातले ते आप्पा आणि ना. म. संतांनीच. आक्काला एक कवयित्री म्हणून घडवण्यात ना. म. संतांचा फार मोठा हात होता... आणि ताईला तर आप्पांनीच लेखिका केलं. दोन्ही बहिणींची प्रेमकथा वादळी होती. घरातल्यांचा विरोध झाला तरीही दोघींनी खंबीरपणे त्या विरोधाला न जुमानता आपल्या निवडीच्या पुरुषाशी लग्न केलं. दोघींच्या वैवाहिक आयुष्यात साहित्यप्रेमानंच त्यांचं नातं बळकट केलं. बी. ए. च्या परीक्षेचा निकाल लागला त्याच दिवशी आक्का आणि ना. म. संत ऊर्फ नाना यांचा विवाह झाला. ताईला मात्र दीर्घ कालावधीच्या अग्निदिव्यातून जायला लागलं. दोघींच्या पाठीशी थोरली आईच भक्कमपणे उभी होती.  आक्काचं वैवाहिक जीवन केवळ दहा वर्षांचं टिकलेलं एक सुंदर स्वप्न होतं. नानांना विषमज्वर झाला आणि त्यांचा अकाली मृत्यू झाला. केवळ ३२ वर्षांचं वय आणि पदरात तीन लहान मुलं... पण आक्कानं खंबीरपणानं कोसळलेल्या घरकुलाच्या भिंती सावरल्या. आप्पा-ताई तिच्यामागं भक्कम आधार देत उभे राहिले. बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजात शिक्षिकेची नोकरी करणारी आक्का प्राचार्यपदावरून निवृत्त झाली. या खडतर प्रवासात आप्पा-ताई नेहमी तिच्या पाठीशी राहिले. 

पती-पत्नी, आई-मुलं किंवा दोन मित्र, कुठल्याही नात्यात ते नातं संपूर्णतेला नेणारा महत्त्वाचा घटक एकमेकांना स्वतःचा वेगळेपणा जपत वाढायला संधी देणं हा असतो. हल्लीच्या भाषेत त्याला 'स्पेस' देणं असं म्हणतात. आक्का आणि ताई यांच्या नात्यात मला अशी एक स्पेस दिसते. दोघींचं बाह्यरूप एकमेकींपेक्षा खूप वेगळं होतं. आक्का अगदी साधी. साधं नऊवारी लुगडं, एक वेणी, कपाळाला छोटीशी टिकली. तिचं व्यक्तिमत्त्व सोज्ज्वळ, शांत, गंभीर होतं. ताईचं रूप अगदी वेगळं. तिचे कापलेले केस, स्लीव्हलेस ब्लाऊज, जॉर्जेटच्या साड्या अशा त्यावेळी आधुनिक वाटणाऱ्या वेशभूषेत ती फार ग्लॅमरस दिसायची. (पुढं मात्र सुती साड्या नेसायची.) स्वभावही भावूक, अतिशय मिश्‍किल. पण त्या दोघी शेवटपर्यंत तशाच राहिल्या. दोघींची साहित्यिक वर्तुळं अगदी वेगळी. आक्काची स्नेहीमंडळी मुख्यतः ‘सत्यकथा’ मौजमधली साहित्यिक मांदियाळी. श्री. पु. भागवत, श्रीनिवास कुलकर्णी तर कौटुंबिक जिव्हाळ्याचे. तसंच बा. भ. बोरकर, संजीवनी मराठे, पद्मा गोळे, शांताबाई शेळके, अनुराधा पोतदार, ना. धों. महानोर ही सगळी जिव्हाळ्याची माणसं. ताईचं विश्‍व आप्पांपुरतंच होतं. पण तरीही कथाकार मंडळाची ती सदस्य होती. दि. बा. मोकाशी, श्री. ज. जोशी, अरविंद गोखले हे इतर सदस्य घरी यायचे. तिला आवडणारे आप्पांचे स्नेही म्हणजे विठ्ठलराव दीक्षित, डॉ. राहातेकर, माणिकलाल परदेशी, बापूराव शाळिग्राम. पण या वेगळ्या स्नेहपरिवारांचा त्या दोघींना कधी त्रास झाला नाही. 

आक्का पुण्याला आली किंवा ताई बेळगावला गेली, की सुना-लेकींसाठी साड्या घेण्याची दोघींना प्रचंड हौस! नाटक, सिनेमा किंवा गाण्याच्या मैफिलींना दोघी मिळून जायच्या. परतल्यावर कॉफी पिताना पाहिलेल्या कार्यक्रमाची चर्चा व्हायलाच हवी! दोन्ही कुटुंबांनी दुःखाच्या प्रसंगात एकमेकांना साथ दिली. शुभप्रसंग एकत्रित साजरे केले. याला कारण मुळात या दोघींचं अतूट नातं होतं. 

आक्का पुण्याला आली, की रात्रीची जेवणं झाल्यावर दोघी बहिणी अंगणातल्या झोपाळ्यावर मंद-मंद झोके घेत गप्पा मारायच्या. त्या दोघींचं आणि झोपाळ्याचं तवंदीच्या दिवसांपासूनच काहीतरी नातं असावं. झोपाळ्याजवळच्या गुलमोहरानं त्यांच्या गप्पा ऐकल्या होत्या. 

आता आक्का आणि ताई या जगात नाहीत, गुलमोहराचं झाड, दौलत बंगला आणि तो झोपाळाही उरला नाही. फक्त त्या गेलेल्या सुंदर दिवसांच्या आठवणीच उरल्या आहेत. ''कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही'' हेच खरं!  

संबंधित बातम्या