सन्मान पर्वतपुत्रांचा 

इरावती बारसोडे
सोमवार, 30 डिसेंबर 2019

वृत्तांत
 

शेर्पा ही पर्वतांवर रमणारी मंडळी. पर्वत हेच त्यांचं जीवन. गिर्यारोहण त्यांच्या रक्तात भिनलेलं. कुणी माउंट एव्हरेस्ट पाच वेळा चढला आहे, कुणी कांचनजुंगा सहा वेळा, कोणी सर्वच्या सर्व म्हणजे १४ अष्टहजारी शिखरं सर केली आहेत. तर दुसरीकडं चार सख्ख्या भावांनी एकाच वेळी कांचनजुंगा सर करून वेगळाच विक्रम केला आहे. एवढंच नव्हे तर परदेशातून आलेल्या गिर्यारोहकांना ही मंडळी चढाईमध्ये अगदी शेवटपर्यंत साथ देतात. त्यांच्याशिवाय हिमालयीन गिर्यारोहण शक्य नाही. अशा विविधांगी धुरंधर गिर्यारोहक शेर्पांचं कौतुक व्हायलाच हवं! 

आज हिमालयातील शिखरचढाई सुकर करण्यामध्ये नेपाळमधल्या शेर्पांचा खूप मोठा हातभार असतो. चढाईसाठी मार्ग मोकळा करण्यापासून जेवण तयार करण्यापर्यंत सगळ्याच ठिकाणी यांच्याशिवाय पान हालत नाही. पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या गिर्यारोहकांनी आत्तापर्यंत एव्हरेस्टसह आणखी काही अष्टहजारी शिखरं सर केली आहेत. मे २०१९ मध्ये ‘गिरिप्रेमी’च्या १० शिलेदारांनी एकाचवेळी चढाईसाठी सर्वांत कठीण असा कांचनजुंगा सर केला. या प्रत्येक मोहिमेध्ये त्यांना मोलाची साथ लाभली ती तिथल्या शेर्पांची. दर मोहिमेमध्ये त्यांचं शेर्पांबरोबरचं नातं अधिक घट्ट होत गेलं. कांचनजुंगा मोहिमेमध्येही शेर्पांची खूप मदत झाली. म्हणूनच ‘गिरिप्रेमी’नं या सर्व शेर्पांना नेपाळहून खास पुण्याला आणून नुकताच त्यांचा सन्मान केला. ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’चं औचित्य साधून ‘कांचनजुंगा इको एक्सपिडिशन २०१९’ या मोहिमेमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या सर्व शेर्पांचा पुणेरी फेटा बांधून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी दिल्लीतील इंडियन माऊंटनियरिंग फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर अशोक अॅबे होते. तर, शिर्डीच्या श्री साई संस्थानाचे अध्यक्ष व हावरे ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश हावरे आणि महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त आयएएस ओमप्रकाश बकोरिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

कार्यक्रमामध्ये नेपाळच्या पीक प्रमोशन प्रा. लि.चे प्रमुख केशव पौडियाल शेर्पा, संचालक आंग पासांग शेर्पा, आंग बाबू शेर्पा, नावांग थुले शेर्पा, वांगदा शेर्पा, चढाईचा मार्ग खुला करणारे लाक्पा शेर्पा, फुर्बा शेर्पा, आंग दोर्ची शेर्पा, दावा फिनजोक शेर्पा, चढाईसाठी मदत करणारे पासांग शेर्पा, छिजी मुर्बू शेर्पा, तेनझिंन शेर्पा, फुर्बा शेर्पा, पासा दावा शेर्पा, फुर्बा दोरची शेर्पा, मिंगमार शेर्पा, पासांग जेयोक शेर्पा, ओंग्जू शेर्पा, फिंजू शेर्पा आणि दावा ओंग्जू शेर्पा यांचा सन्मान करण्यात आला. 

छिजी मुर्बू शेर्पा म्हणाले, ‘मी २००७ पासून गिर्यारोहण करतो आहे. पर्वत अवघड आहे, सोपा नाही.’ फिंजू शेर्पा हे कुकिंग शेर्पा आहेत. ‘गिरिप्रेमी’चे सदस्य त्यांना प्रेमानं अन्नदाता संबोधतात. त्यांना भारतीय जेवण मिळावं म्हणून फिंजू शेर्पा यूट्युबवर बघून भारतीय स्वयंपाक शिकले. पासांग शेर्पा हे शेर्पांचे प्रमुख आणि अतिशय कसलेले गिर्यारोहक. यांनी हिमालयातील सहा-सात हजारी शिखरं तर सर केलीच आहेत, पण त्याशिवाय दोन वेळा चो ओयू, मानस्लू तीन वेळा, के-२ दोन वेळा, कांचनजुंगा सहा वेळा आणि एव्हरेस्ट तब्बल सात वेळा सर केला आहे. इतर काही अष्टहजारी शिखरंही त्यांनी सर केली आहेत. हा विक्रम करणारा हा जगातील एकमेव मनुष्य आहे. ‘गिरिप्रेमी’च्या कांचनजुंगा मोहिमेमध्ये छिजी मुर्बू शेर्पा, तेनझिंन शेर्पा, फुर्बा शेर्पा, पासा दावा शेर्पा हे चार सख्खे भाऊ सहभागी झाले होते. यातील छिजी मुर्बू शेर्पा यांनी एव्हरेस्ट पाच वेळा, लोत्से दोन वेळा, कांचनजुंगा आणि के-२ एकदा सर केला आहे. ‘गिरिप्रेमी’चे गिर्यारोहक सांगतात, की तेनझिंन शेर्पा हे एकदम ‘फास्ट’! जिथं इतरांना चढाई करायला २०-२४ तास लागतात, तिथं हा इसम पाठीवर वजन घेऊन दोन तासांतसुद्धा पोचू शकतो. या चारही भावांनी कांचनजुंगावर एकत्रित चढाई करून नवीन इतिहास रचला. दावा ओंग्जू शेर्पा यांनी १४ पैकी १२ अष्टहजारी शिखरं सर केली आहेत. 

एकीकडं ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांनी कांचनजुंगा मोहिमेमध्ये असाध्य ते साध्य केलं; तर दुसरीकडं बंगालहून आलेल्या संघातील दोघांचा मृत्यू झाला, पण दोघांना वाचवण्यात यश आलं. बचाव कार्यामध्येही शेर्पांचं मोलाचं कार्य आहे. तसंच मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह खाली आणण्याचं मोठं कामही त्यांनी केलं. यात दावा ओंग्जू शेर्पा, फुर्बा शेर्पा, ओंग्जू शेर्पा, पासांग दावा शेर्पा, फु दोर्जी शेर्पा, तेनझिंग शेर्पा यांनी बेस कँपवरून पुन्हा आठ हजार मीटरहून अधिक चढाई करत मृतदेह खाली कँप २ वर आणले. संपूर्ण आठ हजार मीटर चढाई सलग दोनदा करणं म्हणजे चेष्टा नाही. अशा या दिग्गज पर्वतपुत्रांची भेट ‘गिरिप्रेमी’नं पर्वत दिनाच्या निमित्तानं घडवून आणली. तसंच त्यांच्या सन्मानार्थ ‘शेर्पाज द माउंटन लव्हर्स’ हा १० मिनिटांचा लघुपटही प्रदर्शित करण्यात आला. उमेश झिरपे लिखित ‘पर्वतपुत्र शेर्पा’ या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. या पुस्तकामध्ये शेर्पांची संस्कृती, इतिहास, जीवनमान, गिर्यारोहणातील योगदान, सद्यस्थिती इत्यादींवर भाष्य करण्यात आलं आहे. 

या वेळी रघुनाथ गोडबोले यांच्या कांचनजुंगा सीडी-बुकचंही प्रकाशन करण्यात आलं. गोडबोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी कांचजुंगाच्या उत्तर बेसकँपवरील दृश्‍यं या सीडी-बुकमध्ये कैद केली आहेत. 

कांचनजुंगा लघुपट
‘गिरिप्रेमी’चे गिर्यारोहक पुण्याहून निघाल्यापासून पुन्हा सुखरूप परत येईपर्यंतचा रोमांचक प्रवास आणि काही अनमोल क्षण गिर्यारोहक आणि शेर्पांच्या कॅमेरामध्ये कैद झाले आणि त्यातून तयार झाला ‘कांचनजुंगा’ हा लघुपट!

‘गिरिप्रेमी’च्या १० गिर्यारोहकांनी १५ मे २०१९ च्या पहाटे जगातील तिसरं उंच शिखर असलेल्या माउंट कांचनजुंगावर यशस्वी चढाई केली व भारतीय गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय रचला. ही मोहीम सर्वार्थानं वेगळी होती. वर्षभर आधीपासून याची तयारी सुरू झाली होती. हे एक इको इक्सपिडीशन होतं. बेस कँपपर्यंतची चढाई करत असताना गिर्यारोहकांनी आजूबाजूच्या परिसंस्थेमधून पाणी, वाळू, वनस्पती, बुरशी अशा अनेक गोष्टींचे नमुने गोळा केले. या नमुन्यांवर सध्या अनेक नामवंत संस्थांमध्ये अभ्यास सुरू आहे. कांचनजुंगाच्या बेस कँपपर्यंत पोचणंही सोपं नव्हतं. तिथं हेलिकॉप्टरनं जाता येतं, पण ‘गिरिप्रेमी’ सदस्यांनी पायीच जायचं ठरवलं होतं. बेस कँपपर्यंत पोचण्यासाठी ९० किलोमीटर्सचा १० दिवसांचा ट्रेक करावा लागला. यासाठी सह्याद्री गिर्यारोहकांच्या मदतीला धावून आला होता. सह्याद्रीमध्ये केलेला सराव इथं उपयोगी पडला. 

कांचनजुंगा जगातील तिसरं उंच शिखर असलं, तरी त्याची चढाई एव्हरेस्टपेक्षाही कठीण आहे. या शिखर मोहिमेच्यावेळी ‘गिरिप्रेमी’च्या संघाला अनेक नवनवीन गोष्टींचा सामना करावा लागला. फणी चक्रीवादळाच्या प्रभावामुळं अचानक झालेल्या बर्फवृष्टीमुळं साधे ट्रेकिंग शूज घालून एक-दीड फूट बर्फातून चालावं लागलं. खडतर वाटचालीनंतर त्यांना काही विरंगुळ्याचे क्षणही अनुभवायला मिळाले. बेस कँपवर वेगवेगळ्या देशांतून आलेल्या गिर्यारोहक आणि शेर्पांचं कुटुंबच तयार होतं. रात्री पडलेला बर्फ मोकळा करण्याच्या कामाचं रूपांतर नंतर ‘स्नो बॉल फाइट’मध्ये झालं. एवढ्या उंचीवर खास केक तयार करून वाढदिवसही साजरा करण्यात आला. 

शिखरावर चढाई करताना वाहणारे जोरदार वारे, शिखर चढाईच्या मार्गावर असणारे हँगिंग ग्लेशियर्स (हिमनद्या), काटकोनात उभ्या असलेल्या भिंती, हिमप्रपातांचा धोका अशा धोक्यांचा सामना करत शिखर सर करण्यात आलं. 

हे सगळे अनोखे क्षण कांचनजुंगा लघुपटामध्ये पाहायला मिळतात. कँप ४ ते शिखरमाथा ते पुन्हा कँप ४ ही २६ तासांहून अधिक वेळ चढणे-उतरणे, कँप ४ हून दोन बंगाली गिर्यारोहकांचा केलेला रेस्क्यू, खडतर चढाई या सगळ्या थरारक अनुभवांना कॅमेरात कैद करण्यात आलं आहे. ‘गिरिप्रेमी’ सदस्यांना घरून पत्र आली तेव्हा ती वाचतानाचे भावूक क्षणही कैद झाले आहेत. हा ४५ मिनिटांचा लघुपट आपल्याला कांचजुंगावर घेऊन जातो.

‘आम्ही पहाड दाखवले, त्यांनी समुद्र दाखवला’
शेर्पामंडळींपैकी बहुतेकजणांनी आयुष्यात कधीच समुद्र पाहिलेला नाही. पण, ही कसर ‘गिरिप्रेमी’नं भरून काढली. कार्यक्रमानिमित्त पुण्यात आलेल्या सगळ्या शेर्पामंडळींना घेऊन छोटी कोकण सहल आखण्यात आली होती. शेर्पांनी समुद्राचा पुरेपुर आनंद लुटला. दावा ओंग्जू शेर्पा यांनी आपला अनुभव सांगताना म्हटलं, ‘हमने उन्हे पहाड दिखाएँ, उन्होने हमे समुद्र दिखाया। गिरिप्रेमीनं आम्हाला इथं आणलं, फिरवलं. खूप छान वाटलं. आम्ही खूप शिकलेलो नाही. पर्वतांमध्ये काम करतो. ते खूप कठीण असतं. सगळ्यांना सुरक्षित नेऊन परत आणण्याचा आमचा प्रयत्न असतो.’

संबंधित बातम्या