विद्याताईंच्या स्मृती...!

ज्योती बागल
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

‘मिळून साऱ्याजणी’चा वर्धापन दिन सर्वांसाठी नेहमीच एक खास अनुभव असतो. हा वर्धापन दिन म्हणजे वैचारिक मेजवानी, प्रत्यक्ष गप्पा आणि मनोरंजन असा त्रिवेणी संगम! मात्र विद्याताई नसतानाचा हा पहिलाच वर्धापन दिन... विद्याताई आणि मिळून साऱ्याजणीच्या आठवणी जागवणारा...

‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाला ३१ वर्षे झाली. मात्र, या ३१ व्या वर्षी ‘मिळून साऱ्याजणी’च्या संस्थापक संपादक विद्या बाळ आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार कायम आपल्याबरोबर आहेत आणि असतील. ‘मिळून साऱ्याजणी’चा प्रत्येक वर्धापन दिन म्हणजे वैचारिक मेजवानीसह प्रत्यक्ष गप्पा आणि मनोरंजन असते. मात्र, कोरोना महामारीमुळे यावर्षी असा प्रत्यक्ष सोहळा होऊ शकला नाही. ‘मिळून साऱ्याजणी’ परिवाराशी आज देशातूनच नव्हे, तर जगभरातून अनेक वाचक, लेखक जोडले गेले आहेत. त्यामुळे सर्वजण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘मिळून साऱ्याजणी’च्या वर्धापन दिन सोहळ्याची आवर्जून वाट पाहत होते. शिवाय विद्याताईंनंतरचा तसा हा पहिलाच वर्धापन दिन आणि त्यात कोरोनासारखी महामारी. अशावेळी ‘मिळून साऱ्याजणी’ आपला वर्धापन दिन कसा साजरा करणार, याकडे अनेकांचे लक्ष होते. 

विद्याताई गेल्यानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने अर्थातच हा विद्याताईंच्या स्मृती जागवणारा, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा असल्याचे ‘मिळून साऱ्याजणी’च्या संपादक गीताली. वि. मं. यांनी सांगितले. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विद्याताईंच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ‘विद्या बाळ अध्यासन प्रकल्प’ सुरू केला जात आहे. यामध्ये कारण विद्या बाळ म्हणजे ‘मिळून साऱ्याजणी’ असेच समीकरण सर्वांच्या मनात रुजले आहे. म्हणून विद्याताईंच्या या जिवाभावाच्या मासिकाचे गेल्या ३१ वर्षांतले योगदान काय आहे, याचा सखोल अभ्यास या प्रकल्पामध्ये होणार आहे. हे मासिक बघता बघता ‘मासिक नव्हे चळवळ’ या टप्प्यावर पोचले आहे आणि म्हणून या प्रकल्पाच्या निमित्ताने स्त्री-पुरुष, वाचक, लेखक अशा सर्वांना ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाने काय दिले? काय दिले नाही? आणि मुख्य म्हणजे ‘मिळून साऱ्याजणी’कडून आपल्या भविष्यात काय अपेक्षा आहेत, यावर एखादे छोटेसे टिपण अथवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून मागवले होते. या परिवाराशी एवढी वर्षे जोडल्या गेलेल्या अनेकांनी विद्याताई आणि मासिकाबद्दलच्या त्यांच्या आठवणी जागवल्या आणि हा आगळावेगळा वर्धापन दिन आणखी खास केला. वर्धापन दिनाच्या या ऑनलाइन गप्पांच्या विशेष समारंभाच्या भागात ज्येष्ठ लेखिका सानिया यांच्याशी गीतालीताईंनी लाइव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी ‘लेखनाच्या प्रवासात आत्मभान ते विश्वभान असा लेखिकेचा स्वतःचा प्रवास आणि लेखिकेने वाचकांचा घडवलेला प्रवास’ हा कसा होत गेला? या विषयावर गप्पा झाल्या.

‘‘मिळून साऱ्याजणी’च्या या वर्षीच्या वर्धापन दिनाबाबत दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे विद्याताई आपल्यात नाहीत आणि दुसरी म्हणजे कोरोना महामारी. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता आम्ही ऑगस्टमध्ये असणारा वर्धापन दिन जुलैपासूनच साजरा करायला सुरुवात केली,’ अशी माहिती गीतालीताईंनी दिली. त्या पुढे म्हणाल्या, ‘लॉकडाउन केव्हा संपेल, कोरोना महामारी आणखी किती दिवस राहील, गोष्टी केव्हा नॉर्मल होतील, हे माहीत नव्हते. शिवाय या काळात सर्वजण घरात असल्याने आता लोकांच्या हाताशी थोडा जास्तीचा वेळही होता, म्हणून आपण आत्ताच लोकांशी बोलायचे ठरवले आणि ‘ऑनलाइन गप्पा’ हा फेसबुक लाइव्ह कार्यक्रम सुरू केला. हा ३१ वा वर्धापन दिन असल्याने या कार्यक्रमात कला, क्रीडा, अभिनय, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील ३१ लोकांच्या मुलाखती घेण्याचे ठरवले. म्हणजे हा कार्यक्रम साधारण वर्षभर चालेल. या कार्यक्रमातील सहभागी व्यक्तींची निवड करताना, आपल्याला तरुणांवर भर द्यायचा होता, म्हणजे तरुणांनी बोलावे हा त्यामागचा हेतू आहे. तसेच काही ज्येष्ठ लोकांचाही या गप्पांमध्ये समावेष असेल. आपण नेहमी सभागृहात करतो त्याप्रमाणेच विशेषांकाचे प्रकाशन आणि त्यानंतर गप्पा असा कार्यक्रम करायचे ठरले, फरक एवढाच की हा कार्यक्रम व्हर्च्युअल असेल.’ या ३१ व्या वर्धापन दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रातील ३१ लोकांबरोबर वर्षभर ऑनलाइन गप्पांचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. तसेच ‘विद्या बाळ अध्यासन प्रकल्प!’ या  प्रकल्पामध्ये विद्याताईंनी समाजासाठी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात काय योगदान दिले याविषयीचा सविस्तर अभ्यास असेल. हे दोन्हीही कार्यक्रम वर्षभर चालणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी आपण खूप मोठ्या प्रमाणावर वर्धापन दिन साजरा करत आहोत आणि या सर्व गोष्टींमध्ये विद्याताई प्रत्यक्ष नसल्या, तरी विचारांनी मात्र सतत आपल्याबरोबर आहेत, असेही त्या म्हणाल्या. 

ज्येष्ठ लेखिका सानिया यांनी विद्याताईंच्या आठवणी सांगितल्या. ‘ऑगस्ट २०२०च्या विशेषांकाचे मुखपृष्ठ मला फार आवडले. आपल्या पहिल्या अंकाचे मुखपृष्ठही गोधडीचेच होते. त्यावरही सगळ्यांनी मिळून अशी विणलेली उबदार गोधडी होती. आज विद्याताईंची आठवण तर येतच आहे, शिवाय त्या आपल्यात नाहीत हे स्वीकारणेही थोडेसे अवघड जात आहे. कारण मी जरी पुण्यापासून लांब असले, तरी पुण्यात आल्यावर दर खेपेला मी विद्याताईंना भेटले नाही किंवा त्यांच्याशी तासभर बोलले नाही, असे कधीही झाले नाही. विद्याताई आणि माझी भेट सत्तरच्या दशकात झाली. तेव्हा मी महाविद्यालयात होते आणि स्त्री मासिकासाठी लिहीतही होते. विद्याताई तेव्हा ‘स्त्री’च्या संपादिका होत्या. त्या मासिकात माझ्या कथांना स्थान मिळाले आणि विद्याताईंशी भेटही झाली. तेव्हापासून आमच्या दोघींचे छान जमले. कारण माझ्यावर स्त्री आणि किर्लोसर मासिकांचा खूप प्रभाव होता. त्यातले लेख वाचून माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहत होते. आपल्याला जे म्हणायचे आहे ते यात म्हटलेले आहे, असे वाटत होते. त्यामुळे आपोआप माझे विद्याताईंशी नाते जुळत गेले. मला आठवते, १९८९ मध्येच त्या एकदा बंगलोरला आल्या होत्या, तेव्हा आम्ही दोघींनी मिळून म्हैसूरच्या प्रवास केला होता. आम्ही बसमध्ये होतो, त्यावेळी त्यांनी मला सांगितले होते, की त्यांना एक मासिक सुरू करायचे आहे, तशी कल्पना त्यांनी सांगितली होती. पण त्याचवेळी त्यांना याचीही जाणीव होती, की हे काम खूप अवघड आहे. शिवाय किती वर्षे चालेल? कसे चालेल? याविषयी शंकाही होती. मात्र त्यांची उमेद फार मोठी होती. त्यामुळे त्या म्हणाल्या, काही का असे ना, पण मी मासिक सुरू तर करणारच, हार नाही मानणार! आणि आज बघता बघता मिळून साऱ्याजणीला ३१ वर्षे झाली. याचा आपल्या सर्वांना आनंद वाटतोच आहे आणि हे विचार पुढे नेऊ शकलो आहोत याचा अभिमानही वाटतो आहे. माझ्यासाठी तर ‘मिळून साऱ्याजणी’चे व्यासपीठ कायम मोकळेच होते. 

‘स्त्रियांनी आणि पुरुषांनी एकमेकांशी संवाद साधावा यासाठी ‘मिळून साऱ्याजणी’ मासिक गेली ३१ वर्षे अविरतपणे काम करते आहे. विवेकवाद, स्त्रीवाद याविषयी वेळोवेळी लेखांमधून, कवितांमधून, कथांमधून मांडणी केली आहे. मीदेखील या मासिकाचा छोटासा भाग आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि यापुढेही या चळवळीने असेच प्रबोधन करावे आणि स्त्री-पुरुष समता, स्वातंत्र्य, आत्मनिर्भरता यांचा जागर करावा अशा मी भरभरून शुभेच्छा देते,’ अशी प्रतिक्रिया कवयित्री आश्लेषा महाजन यांनी दिली.

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे म्हणाले, ‘विद्या बाळ यांनी तीन दशकांपूर्वी सुरू केलेली ही चळवळ, त्यांचे सहकारी आज त्यांच्यानंतरही जोमाने पुढे घेऊन जात आहेत, ही फार सुखद गोष्ट आहे. शहरी मध्यमवर्गीय महिलांबरोबरच ग्रामीण भागाचाही समावेश ‘मिळून साऱ्याजणी’ने केला आहे. स्त्री मुक्तीच्या चळवळीत पुरुषांचेही सामीलीकरण व्हावे, पुरुषांचाही अर्धा सहभाग हवा, असा आग्रह विद्याताई धरत असत. हा आग्रह पुढेही धरून मिळून साऱ्याजणी भविष्यामध्ये नव्या पिढीला आपलेसे करून घेईल अशी माझी अपेक्षा आहे.’ 

‘‘मिळून साऱ्याजणी’ने मला वाचक म्हणून खूप सुजाण केले. माझ्या लेखनाला, फोटोग्राफीला प्रोत्साहन दिले. आपल्या करिअरमध्ये आपल्याबरोबर एक सजग मैत्रीण असेल तर आपणसुद्धा एक जबाबदार माणूस होतो, तसे माझ्याबाबतीत झाले. आता गीतालीने जो विद्याताईंच्या स्मृतींसाठी ‘विद्या बाळ स्मृती अध्ययन’ प्रकल्प सुरू करायचे ठरवले आहे, तो आपल्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठीही खूप शुभेच्छा आणि साऱ्याजणीची मी आयुष्यभर मैत्रीण राहणार आहे हे प्रॉमिससुद्धा!’ या शब्दांत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

हैदराबाद येथील सखी मंडळच्या मंगला निलंगेकर म्हणाल्या, सुमारे ४० वर्षांपूर्वी मी आणि माझ्या काही मैत्रिणींनी मिळून विद्याताईंच्या प्रोत्साहनातून सखी मंडळ सुरू केले. हैदराबादसारख्या रूढिप्रिय शहरात सखी मंडळ कितपत चालेल, याबद्दल शंका होती. पण विद्याताईंनी सुचवलेले काही कार्यक्रम आम्ही राबवत गेलो आणि त्याचा चांगला परिणाम झाला. बऱ्याचशा स्त्रिया विचार करू लागल्या. १९८९ मध्ये विद्याताईंनी मासिक सुरू केले आणि आमच्या कार्यक्रमांना एक चांगली दिशा मिळाली.

स्त्री पुरुष समता प्रस्थापित करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाने केले आहे. तसेच स्त्रियांमध्ये स्वाभिमान, अभिमान आणि आत्मभान जागृत करण्याचे कामही ‘मिळून साऱ्याजणी’ने केले आहे. विद्याताई आणि मिळून साऱ्याजणी हे एक समीकरण होते, पण आज विद्याताई नाहीत, पण त्यांची धुरा अतिशय व्यवस्थितपणे गीतालीताई पार पडत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगलीच्या प्रतिनिधी डॉ. सोनिया कस्तुरे म्हणाल्या.

संबंधित बातम्या