आठवणीतले आर. के. लक्ष्मण 

चंद्रकांत गोविंद भिडे
सोमवार, 2 मार्च 2020

विशेष
 

काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट. टाइपरायटरवर मी नवीन नवीन चित्रे काढत होतो. माझा एक मित्र एकदा मला म्हणाला, 'भिडे, आर. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन काढून ओरिजिनल मला दे. मी माझ्या लक्ष्मण यांच्या कार्टून्सच्या अल्बममध्ये लावीन.’ माझ्या त्या मित्राने लक्ष्मण यांच्या सर्व कार्टून्सचे संकलन केले आहे. काही दिवसांनी मी त्याला कॉमन मॅनचे चित्र काढून भेट दिले आणि त्या चित्राच्या काही झेरॉक्‍स कॉपीज माझ्याजवळ ठेवल्या. 

एक दिवशी मनात विचार आला, की हे चित्र लक्ष्मण यांना दाखवावे. १८ सप्टेंबर १९८२ ला तो योग आला. त्या चित्राची झेरॉक्‍स कॉपी आणि आणखी काही चित्रे घेऊन मी टाइम्सच्या ऑफिसमध्ये गेलो (हल्लीसारखी त्यावेळी सिक्युरिटी स्ट्रिक्‍ट नव्हती). दुसऱ्या मजल्यावर लक्ष्मण साहेब बसायचे. मी त्यांना भेटलो आणि माझी ओळख करून दिली. शिवाय माझी काही चित्रे त्यांना दाखवायची असल्याचे सांगितले. त्यांनी मला बसायला सांगितले. कॉमन मॅनचे चित्र बघितल्यावर मला म्हणाले, 'Fantastic!' आणि त्या चित्राखाली 'Fantastic! Even with pen and brush the result couldn`t have been better!` असा अभिप्राय लिहून सही केली. त्या दिवशी जवळजवळ ३५-४० मिनिटे मी त्यांच्याबरोबर होतो. बोलता बोलता आर्थिक अडचणींमुळे मी जे. जे. स्कूलमध्ये कसा प्रवेश घेऊ शकलो नाही, ते सांगितले. तेव्हा ते म्हणाले, 'भिडे, आता जे जे विसरा! तुम्ही तुमच्या अभिनव कलेसह पुढे जा. त्या कलेचा विकास करा. माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्याबरोबर आहेत. जर तुम्हाला माझी मदत लागली, तर आवर्जून सांगा. यापुढे जेव्हा केव्हा टाइम्स ऑफिसला याल, तेव्हा मला नक्की भेटा. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही अपॉइंटमेंटची आवश्यकता नाही.’ (एकेकाळी त्यांनाही जे. जे.मध्ये प्रवेश मिळाला नव्हता). त्यांनी मला अनेक प्रश्‍न विचारले. चित्र काढताना कुठ ल्या 'कीज'चा वापर करतोस. एक चित्र काढायला किती वेळ लागतो. बोटे दुखतात का? वगैरे वगैरे...

लक्ष्मणसाहेबांना पहिल्यांदा भेटल्याचा अनुभव अविस्मरणीय होता. घरी आल्यावर दादांना चित्र दाखवले. लक्ष्मण यांचा अभिप्राय वाचल्यावर दादा म्हणाले, 'खरेच फॅंटॅस्टिक रिमार्क दिला आहे. चंद्रकांत मला एक गोष्ट कळत नाही, ही सगळी मोठी माणसे तुला कशी भेटू देतात? तुला भीती नाही वाटत.' यावर मी काय बोलावे, हे मला स्वतःलाच अजून समजले नाहीये. 

मला १९८५ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 'गुणवंत कामगार' कल्याण पुरस्कार मिळाला. हा राज्य पुरस्कार मला बॅंकिंग क्षेत्रातील मी केलेल्या उल्लेखनीय कामासाठी मिळाला होता. लक्ष्मण साहेबांना मी हा पुरस्कार नेऊन दाखवला. त्यांनी माझे अभिनंदन आणि कौतुक केले आणि एका कागदावर कॉमन मॅनला अवॉर्ड मिळाल्याचे चित्र काढून त्यावर सही करून मला भेट दिले आणि म्हणाले, 'तुमच्या वेगळ्या स्ट्रोक्ससाठी नाही, तर वेगळ्या कामासाठी ही भेट आहे.'

मुंबईतील माझ्या एका प्रदर्शनाच्या उद्‌घाटनसाठी जेव्हा मी लक्ष्मण यांना बोलवायला गेलो, तेव्हा त्यांनी जमणार नाही म्हणून सांगितले. पण त्याचवेळी त्यांनी एका बॉंड पेपरवर कॉमन मॅनच्या हातात बॅनर आहे असे चित्र काढले आणि त्यात 'Mr. Bhide, you are doing a wonderful job in a unique medium. Keep it up. More strength to your fingers.' असे लिहून ते चित्र मला दिले आणि माझ्या प्रदर्शनात लावायला सांगितले. 

माझे पत्रकार मित्र आणि Afternoon & Despatch Courier या इंग्रजी पेपरचे संपादक बेहराम कॉन्ट्रॅक्‍टर यांनी आर. के. लक्ष्मण यांची एक प्रदीर्घ मुलाखत घेतली होती आणि ती एका रविवारच्या Afternoon मध्ये छापली होती. मी टाइपरायटरवर काढलेले कॉमन मॅन आणि लक्ष्मण यांचे मोठे चित्रपण त्यांनी त्याबरोबर छापले होते. माझ्या कलेला मिळालेली ही मोठी कॉम्प्लिमेंट होती. दोन दिवसांनी लक्ष्मणसाहेबांनी मला फोन करून माझे अभिनंदन आणि कौतुक केले. 

एकदा पु. ल. देशपांडे यांना भेटलो असता त्यांना माझी सर्व टंकचित्रे दाखवली. एक चित्र बघितल्यावर मला म्हणाले, 'भिडे हे चित्र काय आहे?' मी सांगितले, 'टाइम्स ऑफ इंडियाने आर. के. लक्ष्मण यांच्या कार्टून्सवर एक पुस्तक छापले आहे. त्याचे नाव आहे 'Eloquent Brush.' या पुस्तकाची किंमत जास्त आहे. म्हणजे कॉमन मॅनवरचे पुस्तक आणि कॉमन मॅनच विकत घेऊ शकत नाही. म्हणून मी ब्रशमध्ये कॉमन मॅन काढला आणि 'Priceless Eloquence' असे कॅप्शन दिले. त्यावर पु. ल. म्हणाले, 'भिडे एक असे चित्र काढा, ज्यात लक्ष्मणसाहेबांच्या हातात ब्रश आहे आणि त्या ब्रशने त्यांनी कॉमन मॅनला बाजूला सारला आहे आणि त्यावर 'Common Man Brushed Away' असे कॅप्शन लिहा.' यावर मीही 'भाई क्‍या बात है' म्हणून दाद दिली. काही दिवसांनी टाइम्सच्या ऑफिसमध्ये जेव्हा लक्ष्मणसाहेबांना भेटलो, तेव्हा त्यांना हा किस्सा सांगितला. त्यांनी भरभरून दाद दिली आणि दिलखुलास हसले. 

माझ्या मुलाने आदित्यने (तेव्हा तो ११ वर्षांचा होता) कॉमन मॅनचे एक चित्र स्केच पेनने काढले आणि मला देऊन म्हणाला, 'बाबा लक्ष्मणसाहेबांकडे जाल, तेव्हा त्यांना हे चित्र दाखवा.' नंतर जेव्हा लक्ष्मणसाहेबांना भेटलो आणि आदित्यने काढलेले चित्र दाखवले. त्यांनी आदित्य किती वर्षांचा आहे ते विचारले आणि त्या चित्राखाली कॉमेंट लिहून सही केली. त्यांनी एका कार्ड पेपरवर कॉमन मॅन काढला आणि त्यांच्या हातात एक बोर्ड दाखवला. त्यात 'Good Luck for Aditya' असे लिहून सही करून देत ज्युनिअर भिडेंना द्या म्हणाले. 

 जेव्हा जेव्हा मी लक्ष्मणसाहेबांना भेटलो, तेव्हा तेव्हा त्यांनी मला कॉमन मॅन काढून दिला. मला गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्यावर, माझ्या ५० व्या वाढदिवसाला, इतकी वर्षे टंकचित्रे काढत असल्याबद्दल, माझ्या प्रदर्शनाबद्दल, बॅंकेतून सेवानिवृत्ती घेतल्याबद्दल असे त्यांनी मला जवळजवळ १५ कॉमन मॅन काढून दिले आहेत. ते सर्व मी लॅमिनेट करून ठेवले आहेत. 

टाइम्समधला आणखी एक किस्सा आहे. काही कामासाठी तिथे गेलो होतो. काम झाल्यावर ओळखीच्या एका वरिष्ठ पत्रकारांना भेटलो. ते म्हणाले, 'भिडे, इकडे कुठे?' सांगितले, 'लक्ष्मणसाहेबांना भेटायला जातो आहे.' तर ते म्हणाले, 'भिडे, अपॉइंटमेंट घेतली आहे का?' मी नाही म्हणताच ते म्हणाले, 'मी चांगल्या हेतूने सांगतोय, ते अपॉइंटमेंट शिवाय कोणालाही भेटत नाहीत. उगीच तुम्हाला कोणी काही बोलू नये म्हणून सांगतोय.' त्यावर मी म्हणालो, 'तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण तसे काही होणार नाही याची मला खात्री आहे.' असे म्हणून मी लक्ष्मणसाहेबांच्या केबिनच्या बाहेर असलेल्या सोफ्यावर बसलो. त्यांचा प्युन मला ओळखायचा. त्याला साहेबांना विचारायला सांगितले. त्यांनी बसायला सांगितले. पाच-सात मिनिटांनी लक्ष्मणसाहेब स्वतः बाहेर आले आणि त्यांनी मला आत बोलवले. साधारण १५ मिनिटे त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या. बाहेर आल्यावर त्या वरिष्ठ पत्रकारांना भेटलो आणि भेट झाल्याचे सांगितले. शिवाय त्यांना लक्ष्मणसाहेबांनी मला काढून दिलेला कॉमन मॅनही दाखवला. त्यांना कमाल वाटली. त्यांनी लगेच एका रिपोर्टरला बोलवले आणि माझ्याशी बोलायला सांगून माझ्यावर सिटी लाइट कॉलममध्ये लेखही लिहायला सांगितला. 

 एकदा लक्ष्मणसाहेबांबरोबर बोलत असताना भ्रष्टाचाराचा विषय निघाला. तेव्हा मी बोलता बोलता 'More the person is ashamed of more respectable he is.' असे बोलून गेलो. दोन दिवसांनी त्यांचा मला ऑफिसमध्ये फोन केला आणि उद्याचे 'You said It' बघा म्हणून सांगितले. तर ते कार्टून त्या वाक्यावर आधारित होते. असे तीनचार वेळा झाले आहे. मी त्यांना काहीतरी सांगितले आणि त्यांनी त्यावर त्यांच्या 'You said It' कॉलममध्ये कार्टून काढले होते. 

 मुंबईत नेहरू सेंटरमध्ये जवळजवळ नऊ वर्षांनी म्हणजे २० नोव्हेंबर २०१२ ला त्यांना भेटण्याचा योग आला. जाताना मी कॉमन मॅनची मी काढलेली आणि त्यांनी मला दिलेली चित्रे बरोबर घेऊन गेलो होतो. लक्ष्मणसाहेब आणि त्यांच्या पत्नी दोघेही व्हील चेअरवर बसले होते. लक्ष्मणसाहेबांना बोलता येत नव्हते. त्यांना भेटलो आणि मला ओळखले का विचारले. त्यांनी लगेच ओळखले नाही. जवळजवळ नऊ वर्षांनी त्यांना भेटत होतो. नंतर मी त्यांना माझे व्हिजिटिंग कार्ड दाखवले, तेव्हा त्यांनी हाताच्या बोटांनी टायपिंग केल्यासारखे केले. त्यांनी मला दिलेली कॉमन मॅनची चित्रे दाखवली. त्यांनी त्यांच्या पत्नीला आणि सुनेला खूण करून बघायला सांगितली. नंतर त्यांनी माझा हात हातात घेतला आणि कितीतरी वेळ धरून ठेवला होता. हे बघून त्यांच्या घरचे चाट पडले. त्यांच्या स्पर्शांनी आणि नजरेतून मी काय समजायचे ते समजलो. प्रदर्शनाच्या इथे मी खूप वेळ होतो, पण मी दिसलो की ते टक लावून माझ्याकडे बघायचे. लक्ष्मणसाहेबांच्या सर्व व्यंगचित्रांत कॉमन मॅन नेहमी कुठेतरी असतो. पण तो कधीच बोलत नाही आणि नियतीची पण कमाल आहे. शेवटची काही वर्षे त्यांनासुद्धा बोलता येत नव्हते. 

माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला, म्हणजे एका कॉमन मॅनला 'क्रिएटर ऑफ कॉमन मॅन'कडून नेहमीच प्रोत्साहन, प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद मिळाले. एके दिवशी त्यांची आठवण आल्याने वरळी सी फेसवर जाऊन लक्ष्मणसाहेबांच्या 'कॉमन मॅन'च्या पुतळ्याचे दर्शन घेतले, तेव्हा कुठे बरे वाटले!

संबंधित बातम्या