हिरवे सोने

मृणाल तुळपुळे
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

विशेष

वसाच्या सरी बरसू लागल्या, की धरती हिरव्यागार पर्णराशीत लपेटून गेलेली दिसते. श्रावण सुरू झाला, की तो महिना आणि त्यानंतर सणवार व धार्मिक व्रतवैकल्यांचे दिवस असल्यामुळे त्या वेळी या पर्णराशींतील बेल, दुर्वा, केवडा, केळी, आंबा व विड्याच्या पानांना विशेष मागणी असते. 

भारतीय संस्कृतीमध्ये देवपूजा व सणसमारंभात विड्याच्या पानांना खास असे स्थान आहे. त्यानुसार प्रत्येक धार्मिक विधीमध्ये, पूजेमध्ये व इतर धर्माचारात विड्याचे पान हा एक महत्त्वपूर्ण घटक असून पूजेत त्याचा वापर  करणे हे शुभ समजले जाते. धार्मिक विधींमध्ये वा पूजेच्या वेळी या पानाला हळद कुंकू लावून त्यावर सुपारी ठेवली जाते. पूजेच्या कलशावर नारळ ठेवण्याआधी कडेने विड्याची पाने लावून त्यावर नारळ ठेवला जातो. तसेच दक्षिणा देताना विड्याच्या पानांवर दक्षिणा ठेवली जाते. अशा तऱ्‍हेने धार्मिक विधींमध्ये विड्याच्या पानाचा विविध प्रकारे वापर केला जातो.

विड्याचे पान हे पान सुबत्ता व तजेलदारपणाचे प्रतीक मानले जात असल्यामुळे सामाजिक स्तरावरदेखील त्याला खास महत्त्व आहे. विड्याचे पान व सुपारी यांचे तर एक वेगळेच नाते आहे. पानसुपारी समारंभ व मंगल कार्याच्या वेळी आलेल्या पाहुण्यांना विड्याच्या पानावर सुपारी ठेवून ते देण्याची पद्धत आहे. लग्न, मुंजीचे आमंत्रण करतानादेखील पान आणि सुपारी देऊन बोलावणे केले जाते.

विड्याची पाने ज्या वेलीवर येतात, त्या वेलीचे शास्त्रीय नाव ‘पायपर बीटल’ असे असून त्याला आपल्याकडे नागवेल किंवा पानवेल असे म्हटले जाते. नागवेलीचे मूळ इंडोनेशियातील जावा बेट मानले जाते. तेथून त्याचा आशिया खंडात व इतर देशात प्रसार झाला व भारत, श्रीलंका, आग्नेय आशियाई देश व आफ्रिकेतील काही देशांत या वेलीची लागवड करण्यात आली. आज भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात व बंगालमध्ये नागवेलीची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. 

नागवेलीच्या जवळपास ९० जाती व प्रजाती असून त्यापैकी निम्म्या जाती भारतात बघायला मिळतात. नागवेल कायम हिरवागार राहत असून तो कशाच्या तरी आधाराने वर चढतो किंवा जमिनीवर पसरतो. या पानांना एकप्रकारची चकाकी असून ती सुगंधी, किंचित तिखट व जराशी तुरट अशा चवीची असतात.

या पानांपासून खाण्याचा विडा तयार केला जात असल्यामुळे ती विड्याची पाने म्हणूनच ओळखली जातात. कात, चुना, सुपारी असे पदार्थ पानावर ठेवून त्या पानाची व्यवस्थित घडी करून विडा तयार केला जातो. आवडीनुसार त्यात कातरलेली सुपारी, ओले खोबरे, गुलकंद, बडीशेप, वेलदोडा असे पदार्थ घातले जातात. स्थानपरत्वे विड्याचे अनेक प्रकार आढळतात. त्याच्या आकारानुसार आणि घडीनुसार गोविंद विडा, पानपट्टी, पुणेरी विडा, मद्रासी पान अशी त्याला नावे पडली आहेत. विडा किंवा पान करणारा पानवाला म्हणून ओळखला जातो. उत्तम व चविष्ट पान तयार करणे ही एक कला समजली जाते. त्यात घातला जाणारा प्रत्येक घटक योग्य प्रमाणात घेणे व पानाला योग्य ती चव देणे हे फार महत्त्वाचे असते.

विडा म्हणजे भारतीय खाद्यपरंपरेचा एक भाग आहे. आपल्याकडे पूर्वापार मुखशुद्धीसाठी विडा खाण्याची पद्धत  असून आजही तो सर्वत्र आवडीने खाल्ला जातो. अनेक समारंभ व कार्यक्रमांमध्ये जेवणाची सांगता ही विडा खाऊनच होते. भारतातील काही प्रांतात देवाला पानाचा विडा करून वाहिला जातो व नंतर तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो. 

विडा किंवा खाण्याचे पान तयार करण्यासाठी नागवेलीच्या सर्वात लोकप्रिय जाती म्हणजे कलकत्ता, बनारस, मघई व कपुरी. बंगालमध्ये पिकणाऱ्‍या पानांना बंगला पान किंवा कलकत्ता पान म्हणतात. ही पाने चवीला किंचित तिखट असतात. मघई पाने बदामाकृती व आकाराने लहान असून ती गोडसर चवीची व अगदी नरम असतात. पान करताना नेहमी मघईच्या पानांची जोडी घेतली जाते. मघईची पाने इतर प्रकारच्या पानांच्या मानाने महाग असतात. या सर्व प्रकारच्या भारतीय पानांना परदेशात खूप मागणी असून अनेक युरोपियन देशात ती निर्यात केली जातात.

विड्याच्या पानात भरपूर आयुर्वेदिक गुणधर्म असून प्राचीन काळापासून त्यांचा वापर औषधे तयार करण्यासाठी केला जात आहे. या पानातील काही घटक तोंडाची दुर्गंधी दूर करतात, त्यामुळे त्याला उत्तम माउथ फ्रेशनरही मानले जाते. भोजनोत्तर विडा खाल्याने अन्नपचनास मदत होते. पानात गुलकंद, लवंग, वेलदोडा असे पदार्थ घालून केलेला विडा खाल्ल्यामुळे आळस आणि थकवा दूर होतो. निद्रानाशाच्या समस्येवरदेखील असा विडा रामबाण उपाय ठरू शकतो. आयुर्वेदानुसार तोंड आले असेल, तर विड्याच्या पानावर तूप घालून ते खाल्ले जाते. सर्दी झाली असता पानात लवंग पूड व मध घालून ते खाल्ले जाते, तर दात व हिरड्याचे दुखणे कमी करण्यासाठी हिरवे पान खाल्ले जाते.

अनेक गायक नेमाने विडा खाताना दिसतात. याचे कारण विड्याच्या पानाच्या सेवनाने आवाज स्वच्छ आणि पातळ होतो. हल्ली लोकांना विड्याचे पान खाण्याचे महत्त्व समजल्यामुळे त्यापासून मिल्कशेक्स, स्मूदी, आइस्क्रीम असे निरनिराळे पदार्थ तयार केले जातात. ‘पान खाये सय्या हमारो’ किंवा ‘खायके पान बनारसवाला’  अशी गाजलेली गाणी ऐकली, की डोळ्यासमोर येते ते वर्खाने सजवलेले पान किंवा लवंग टोचलेला विडा आणि आठवते त्या पानाची मस्त चव. शृंगारामध्येही अशा पानाची महती सांगितली जाते. ‘कळीदार कपुरी पान, कोवळं छान केशरी चुना...’ ही सुलोचना चव्हाण यांनी गायलेली एक मस्त लावणी. त्यात गीतकारांनी पान तयार करताना त्यात काय काय घालायचे हे अगदी रंगवून सांगितले आहे. त्यात त्यांनी काव्यरूपात म्हटले आहे, की कोवळे कपुरी पान घेऊन त्यावर केशरी चुना लावा व त्यात कात, बारीक सुपारी व वेलची घालून त्याची घडी करा. घडीवर लवंग टोचून तो विडा वर्ख लावून सजवा.

अशा या विड्याचे व पानाचे भारताच्या इतिहासाबरोबर खूप जुने नाते आहे. पूर्वीचे राजेरजवाडे वा नबाब यांचा पान खाणे हा एक शौक होता. पानाच्या रूपात ते आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करत असत. त्यांच्या पानात केशर, बदाम, बेदाणे असा सुकामेवा असे; पानाचा सरंजाम ठेवण्यासाठी खास चांदीचे पानदान असे. आपल्याकडे गल्ली बोळात दिसणारी पानाची दुकाने बघितली, की आज पान खाणे हा फक्त श्रीमंतांचा शौक राहिला नसून पान हे सामान्य जनतेतही खूपच लोकप्रिय झाले आहे असे दिसून येते.

विड्याच्या पानांविषयी रामायणातली एक आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार जेव्हा मारुती रामाचा निरोप घेऊन सीतेकडे लंकेला अशोकवनात जातो, तेव्हा तिला खूप आनंद होतो. तो आनंद दर्शवण्यासाठी तिच्या मनात मारुतीला फुलांचा हार घालायचा असतो, पण तिला जवळपास फुले न मिळाल्यामुळे ती नागवेलीच्या पानांचा हार करून तो मारुतीला घालते. तेव्हापासून मारुतीची पूजा करताना त्याच्या गळ्यात विड्याच्या पानांचा हार घालण्याची पद्धत पडली आहे. 
विड्याच्या पानांची महती ऐकून लोक आपल्या घरी नागवेल लावू लागले आहेत. तसेच त्यापासून विविध पदार्थदेखील करताना दिसू लागले. अशा या शुभ प्रतीक समजल्या जाणाऱ्‍या बहुगुणी विड्याच्या पानांना हिरवे सोने म्हटले जाते ते मनोमन पटते.

संबंधित बातम्या