देवबाभळी : आधी नंतरच्या नेमक्या क्षणांच्या पुसट नोंदी

प्राजक्त देशमुख
सोमवार, 8 मार्च 2021

विशेष

विठ्ठल पत्नी रखु‍माई आणि संत तुकोबांची पत्नी आवली या दोन व्यक्तिरेखांमधून बाईचे मन समजावून घेत मानवी नात्यांविषयी भाष्य करणाऱ्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने पदार्पणातच मराठी रंगभूमीवरच्या सर्वोत्कृष्ट नाटकांच्या यादीत आपले स्थान निश्चित केले. महाराष्ट्रातल्या संगीत नाटकांच्या परंपरेला नव्याने उजाळा देणाऱ्या, अनेक पुरस्कार मिळालेल्या या नाटकाविषयी नाटककार प्राजक्त देशमुख यांच्या स्मरणातल्या या काही नोंदी....

घर लहान होतं. आम्ही तिघं भावंडं हॉलमध्ये झोपत असू. गावाकडून दादा त्यांच्या गुरूंसोबत अधूनमधून घरी येत. वितभर पितळी पांडुरंगाच्या मूर्तीसमोर ते पहाटे चारला हरिपाठ, गीता आणि नामस्मरण करत बसत. मी उबदार निळ्या रगाच्या आडून ते सगळं पडल्या पडल्या बघत बसायचो. ‘ही अशी दुलईमस्त साखरझोप सोडून कोण का पहाटे उठून बसत असेल?’ डोक्यात अशा असंख्य प्रश्नांच्या बाभळी असायच्या. त्या पितळी मूर्तीसमोर लावलेल्या उदबत्तीच्या सुगंधात परत कधी डोळा लागायचा कळायचं नाही. त्या अंधाऱ्या पहाटेत दिसणारा उदबत्तीचे ते प्रखर टिंब अजूनही आठवतो.

“मला सांगा इथे तीन-तीन डोंगर आहेत, मग तिला काय माहिती तुकोबा कोणत्या डोंगरावर आहेत,” मी कसल्यातरी शोधात देहूला पोचलो तेव्हा तिथे असतांना विचारलेला प्रश्न.

“ती तिथल्या अगणित पायांच्या ठशांना कान लावायची. ज्यातून विठ्ठलाचं नामस्मरण ऐकू येतंय ते तिच्या नवऱ्याचे.”

कुणासोबत माहीत नाही पण हा संवाद झाल्याचं स्पष्ट आठवतं. खरं-खोट्याच्या पलीकडे जाऊन ह्या घटनेत असलेल्या काव्याने आणि अशा कितीएक काव्याच्या शक्यतेने मी भारावून गेलो होतो. ते धुकं आतमध्ये साठलेलं होतं खूप दिवस. खूप वर्षं.

***

चार डिसेंबर २०१६…. थिएटर अॅकॅडमी…. बालगंधर्व, पुणे… एकांकिकेचा स्पर्धेचा प्रयोग.. पडदा… प्रचंड टाळ्या… स्टॅंडिंग ओव्हेशन…. सगळ्यांना नियोजित वेळेत सेट काढायची घाई…. सगळ्यांनी ठरल्याप्रमाणे आपापली जबाबदारी पार पाडत स्टेज क्लिअर केलं होतं. मी दिग्दर्शक म्हणून एकदा खात्री करायला पिटातून वर चढलो. सर्व नेपथ्य विंगेत गेलं होतं. पण फक्त एकच गोष्ट जणू माझ्यासाठी तिथं राहिली होती... पांडुरंगाची मूर्ती. मी घाईघाईने ती मूर्ती उचलून विंगेत गेलो आणि अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन समोर उभ्या ठेवलेल्या लेव्हल्सवर ती मूर्ती ठेवली. अनेक दिवसांपासूनची सर्व टीमची मेहनत, लिखाणाच्या प्रक्रियेत डोक्यात घडणारे प्रसंग तसेच्या तसे बघितल्याच्या समाधानाने कृतकृत्य झालेला मी, समोरच ठेवलेल्या पांडुरंगासमोत नतमस्तक झालो आणि काय झालं मला माहीत नाही. मी ओक्साबोक्शी रडू लागलो. जणू आम्हा दोघांचा मुक्त संवाद सुरू होता. विंगेत रसिकांची रीघ लागली होती. माझ्या अगदी मागे मित्र अल्हाद येऊन फक्त उभा होता. त्याने सांत्वन म्हणून मला मिठी मारली नाही की काही बोलून तिथे तयार झालेल्या वलयाला धक्का लावला नाही. त्याला काय वाटलं असेल; तो केवळ उभा राहून आमचा मुक्त संवाद बघत होता. नंतर मी वळून सवयीने सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

***

बावीस डिसेंबर २०१७…. भद्रकाली प्रॉडक्शन निर्मित व्यावसायिक नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग.. दीनानाथ रंगमंदिर, पार्ले… सगळी तयारी झाली आहे. भरलेल्या प्रेक्षागृहात एक उत्सुकता आहे. प्रेक्षक असो वा पडद्यामागचा कलावंत प्रत्येकाच्या कपाळावर गंधबुक्का आहे. आनंद माझ्याकडे आणि मी आनंदकडे बघत ‘नॉर्मल’ असल्याचा अभिनय करत होतो. पण आतून काळजाच्या ठोक्यांनी भजनी ठेका सुरू केला होता. माझ्या हाताने प्रसाददादाला मी लावलेला विठूनाम…. त्याची लगबग… मिठी… डोण्टवरी असं मला (खरंतर स्वत:लासुद्धा) सतत सांगत राहणं… खिडकीत बोटांतून धूर सोडत उभे असलेले, अवघी हयात ज्यासाठी घालवली तरीही दर शुभारंभाच्या प्रयोगाला अस्वस्थ असणारे नेपथ्यकार मुळ्ये मामा.. त्यांच्या कपाळावर मी विठूनाम लावून पाया पडलो. त्यांनी थांबवून मिठी मारली. मला परत ‘काहीतरी’ झालं, बांध फुटला. शुभारंभाचा प्रयोग. मी घाबरलो होतो.

***

देवबाभळीबद्दल एक लेख मागितला तेव्हा विचार केला नेमकं कशाबद्दल बोलू?

भरल्या डोळ्याच्या गाथा सांगू की थरथरत्या ओठांनी ‘धन्य झालो’ म्हणणाऱ्या लोकांच्या कथा सांगू? सद्गदित कृतार्थ भावाने ‘फार भरून आलंय रे’ म्हणणाऱ्या दीपाताई लागू, माझ्या जोडलेल्या हातांवर आपल्या जोडलेल्या हातांची पखरण करून तेच हात आपल्या माथ्याला लावून वारकरी परंपरेचा नमस्कार घालणारे, ‘माझ्याकडे शब्द नाही,’ म्हणणाऱ्या डॉ लागूंबद्दल सांगू? नेमकं कशाबद्दल सांगू?

‘प्रत्येक पिढीत तुकाराम नव्याने उलगडून सांगणारा कुणी तरी असतोच’, ‘कधी कधी मागे मुळांकडे येणं म्हणजेदेखील ‘पुढे’ जाणं असतं’, ‘अनेक वर्षांनी संस्कृतीपासून दुरावलेल्या मराठी नाटकाच्या केंद्रस्थानी पुन्हा मराठमोळी संस्कृती आली आहे’ हे सांगणारे भालचंद्र नेमाडेंसोबतच्या भेटीमधल्या नेमकं कशाबद्दल सांगू?

हातात हात घेऊन ‘किती कौतुकं ऐकायची रे, शेवटी आलेच बघ. त्यांची कितीतरी पुस्तक वाचतांना त्यांचा आवाज आणि स्वभावाची कल्पना केली होती तशाच आईसारख्या बोलणाऱ्या अरुणाताई ढेरे. एका रांगेत बसलेल्या अरुणाताई ढेरे, सिंधूमाई सपकाळ, आई, मावशी हे चित्र बघणं एक स्वतंत्र अनुभव होता. त्याबद्दल नेमकं काय सांगू?

‘हे सगळं तुला कसं जमलं?’, ‘हे नसतं बाई मला जमलं’, असं खोटं की खरं बोलताय हा संभ्रम वाढवत बोलणाऱ्या मिस्कील डोळ्यांच्या रंगभूमीवरच्या गुरुतुल्य विजयाबाईंनंतर ‘पुरे हं! कौतुकाचा कोटा पूर्ण झाला. आता नाही बोलत मी बास्स !’ बोलत बोलत ‘अरे एकदा काय झालं…..’ ह्या रमलेल्या मंतरलेल्या क्षणांबद्दल सांगू?

‘माझे कशाला? तुझे धन्यवाद. तू एक अप्रतिम नाटक दिलंय म्हणून,’ हे म्हणणाऱ्या नाना पाटेकरांबद्दल बोलू?

कमलाकर नाडकर्णींच्या तब्येतीमुळे येऊ न शकण्याच्या, पण अभिनंदनाच्या फोनबद्दल सांगू की शेवटी महिनाभराने कुटुंबासोबत हट्टाने येऊन केलेल्या प्रदीर्घ फोनवर केलेल्या प्रदीर्घ संभाषणाबद्दल सांगू? की त्यांनी हाताने लिहलेल्या चिठ्ठीतल्या ‘ह्या नाटकाने माझ्या आयुष्य वाढवलं’ हे शब्द वाचल्यानंतर आलेल्या शहाऱ्यांबद्दल बोलू? नेमकं कशावर?

राजीव नाईकांच्या ‘तुझं वय काय रे?’ ह्या आणि नंतरच्या त्याच्या खोडकर प्रश्नाबद्दल की त्यांनी मांडलेल्या त्याच्या अभ्यासपूर्ण विवेचनातून अचानक अंगावर आल्या पंचमहाभूतांच्या आकलनानंतरच्या मला अनपेक्षितपणे रडवलेल्या क्षणांबद्दल सांगू? की ‘हा एक मराठमोळा ऑपेरा आहे, मराठमोळा ऑपेराच !’ असं सद्गदित आवाजात सांगणाऱ्या काकडे काकांबद्दल?

‘तुम्ही सगळे खरे आहात का? की कुणी चमत्कार आहात? मी चिमटा काढून पाहू का तुम्हाला?’ पाणीलाल डोळ्यांची अमृता सुभाष, कापऱ्या आवाजात ‘एका नाटकाने असा काही दुर्मीळ जीवनानुभव देणारं घडू शकत, आपलं अस्तित्व उजळून ढवळून टाकणारा अनुभव’ असं बोलणाऱ्या दोनदा नाटकाला आलेल्या ज्योती सुभाष आणि रंगभूमीवर एक अद्वितीय घटना घडलेली आहे असं मी नमूद करतो’ असं एकेक शब्द काळजीपूर्वक पोचवणाऱ्या संदेश कुलकर्णीबद्दल.. नेमकं कुणाच्या भेटीबद्दल सांगू? 

‘यार ये क्या है, दोस्त?’ डोक्याला हात लावून प्रश्न विचारणाऱ्या, कित्येक वर्ष समर्थपणे गुजराथी रंगभूमी गाजवणारे परेश रावलजी असोत की ‘मै कुछ लफ्जों के मानी समझ नही पाया लेकिन नाटक पुराका पुरा समझमे आया और मै फिर आऊंगा’ हे सांगणाऱ्या नसिरजींबद्दल सांगू ? नेमकं कुणाचं काय सांगू?

मला हाताला धरून बाजूला एकांतात नेऊन हळुवार बोलणाऱ्या आण्णा सावरकरांबद्दल की नंतर भेटल्यावर घट्ट मिठी मारून पाठीवर ठापठूप आवाज काढत ‘मित्रा !!!’ असं अभिमान मिश्रित कौतुक करणाऱ्या वैभव मांगलेबद्दल बोलू?

‘त्रास झाला यार’ असं म्हणून शांत उभे असलेले चिन्मय मांडलेकर, ‘आता ताबडतोब फेसबुक लाइव्ह जाऊया’ म्हणत सगळ्यांसोबत बोलणारे सलिल कुलकर्णी, ‘मला यायची इतकी ओढ होती की मी घाईत वेगवेगळ्या सँडल्स घालून आले बघ’ सांगणारा गितांजली कुलकर्णी, प्रत्यक्ष भेटून कौतुक केल्यानंतर आठवडाभराने पुन्हा फोन करून नाटकाबद्दल बोलणाऱ्या सुमित्रा भावे, जयंत पवारांसोबतच्या अभ्यासपूर्ण चर्चेबद्दल की ‘तुला कल्पना आहे का काय केलंय तुम्ही?’ विचारणारे सयाजी शिंदे.

हमसून हमसून रडलो आम्ही दोघे’ हे सांगणाऱ्या राहुल देशपांडेबद्दल सांगू, की ’हे फारच अप्रतिम आहे. मराठी संस्कृतीचा तळ आणि खोली स्पष्ट दाखवणारं आजचं नाटक. वारीला जाणाऱ्या सश्रद्ध-अश्रद्ध सगळ्यांचं नाटक’ भेटल्यानंतरही असं दोन दिवसानंतर पुन्हा मेसेज करून आवर्जून सांगणारे आळेकर सर, फोन करून भरभरून बोलणारे पुरु बेर्डे सर, सौमित्र, अतुल पेठे, सुकन्याताई मोने, किरण करमरकर नेमका कोणाकोणाचा संवादांचा तपशील सांगू? ‘इतकं अभ्यासपूर्ण संगीताचा वापर विरळा आहे’ सांगणाऱ्या देवकीताई पंडीत, ‘प्रत्येक चालीत आणि गाण्यात वेगळी मजा आहे’ सांगणारे पत्की सर. नेमकं कशाबद्दल सांगू?

जाऊ दे, त्यापेक्षा एक अव्यक्त क्षण सांगतो. प्रयोग संपल्याच्या गर्दीत एक आजोबा आले आणि भरल्या डोळ्याने हात जोडून काहीही न बोलता उभे राहिले. पाया पडायला वाकणार, मी ते पाप होण्यापासून त्यांना रोखलं आणि त्यांच्या पाया पडायला वाकलो उठून उभा राहतो तो त्यांनीच उठवलं आणि त्यांचा डोळ्यातला एक थेंब माझ्या हातावर पडला. ते लगेच वळून जमलेल्या गर्दीचा भाग होताना, पाठमोरे गेले. मी ते कोण होते असं आजूबाजूला विचारलं पण कुणालाच ठाऊक नव्हतं. अत्यंत संथपणे भिंतीचा आधाराने चालत चालत ते निघून गेले. धावत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना विचारावं कोण कुठले? पण गराड्यामुळे शक्य झालं नाही. आज अनेक पुरस्कार, अनेक कौतुकं, अनेक लेख, रसिकांचे अनेक आशीर्वाद मिळत असताना कधीकधी मला माझ्या हातावर त्यांच्या डोळ्यांतून पडलेला अश्रुगोल आठवतो आणि डोळे मिटल्यावर हातावरच्या त्या थेंबभर आठवणीत इंद्रायणीचा ओलावा भासतो.

संबंधित बातम्या