कोसळणारे बाल्य सावरायला.. 

प्रा. डॉ. अपर्णा महाजन
सोमवार, 1 जुलै 2019

विशेष
अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाला होता, ‘तुम्हाला तुमची मुले संस्कारित, संवेदनशील आणि बुद्धिमान व्हावीत असे वाटत असेल, तर त्यांना परीकथा वाचायला द्या. ती अधिक हुशार व्हावीत असे वाटत असेल, तर अधिक परीकथा वाचायला द्या.’
कोसळणारे बाल्य सावरायला.. 

चित्रपट, टीव्ही, मासिके, वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमांतून लहान मुलांच्या क्रूरतेच्या, गुन्ह्याच्या, व्यसनाधीनतेच्या आणि अशा जातीतल्या किती बातम्या येतात. त्यावरचे, ‘समाज’ म्हणवणाऱ्या आपले प्रतिसादही तितकेच निगरगट्ट असतात. जेवढे कृत्य भयानक, तेवढेच हे प्रतिसाददेखील! सामाजिक मानसिकतेची ही उलटी सुलटी अशी दोन रूपे आहेत. 

जुन्याच पण मध्यंतरी नव्याने वाचनात आलेल्या एका वाक्‍प्रचाराची मला आठवण आली. भाकरी करपते म्हणून भाकरीला नावे ठेवायची का? की ती करपण्यामागचे कारण शोधून काढायचे? 

हल्ली दिसणारे बालकांचे हे प्रश्‍न, गुन्हे, अमानुषता यांचा खोल खोल खणत शोध घेत गेले, तर कदाचित या परिस्थितीला जबाबदार कोण आणि यातून मुळापासून कसा मार्ग काढायचा याचे उत्तर मिळू शकेल असा विश्‍वास मला वाटतो. मुलांना वाढविणे, संस्कारित करणे यापेक्षा, पैसा आणि करिअर या गोष्टींना परम महत्त्व आले असल्यामुळे, मुलांना उत्तम ब्रॅंडेड कपडे, महागाची खेळणी आणि लेटेस्ट मोबाईल घेऊन दिला की मुलांकडे लक्ष आहे असे समजणारे पालक मोठ्या टक्‍क्‍यांनी आहेत. अगदी बाल्यावस्थेपासून मोठ्या आधुनिक टीव्हीवर किंवा आयपॅडवर गाणी दाखवत, कार्टून दाखवत भरवणे किंवा उत्तम बनावटीच्या बाबागाडीला समोर कार्टून चालू करून, स्वतः कानाला मोबाईल लावून फिरायला नेणे इथून एका संस्काराची सुरुवात होते. पुढे मुलगा, मुलगी भेद. ‘तो मुलगा आहे, पण तू मुलगी आहेस हे कळायला पाहिजे नं तुला,’ असे बोलून बोलून मुलींना समजत नसलेल्या प्रतिमेमध्ये स्वतःचे पंख कापून अडकवणे, याची पुढची पायरी सेक्‍स, प्रजनन संस्था याबद्दल शास्त्रीय माहिती न देणे, त्यामुळे अपरिचित गोष्टींबद्दल कुतूहल वाटणे आणि ते विचारण्याचा मोकळेपणा नसल्यामुळे कशाही पद्धतीने ते माहीत करून घेणे, घरातल्या रोल मॉडेल आईवडिलांचे नकळत अनुकरण करणे हे सारे अगदी स्वाभाविकपणे होते. याचेच दृश्‍य स्वरूप म्हणजे, वर मांडलेले सगळे प्रश्‍न होत.

वडिलांना ड्रिंक्‍स करून देण्याचे कौतुक वाटणाऱ्या आईबापांना उद्या मुलगा व्यसनी झाला तर आश्‍चर्य वाटावे का? ‘शाळेच्या आवारात तंबाखू खाणे अथवा बाळगणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो’ ही पाटी लावणाऱ्या सरांनी आठवीतल्या मुलाला एक ‘विमल’ आणायला पाठवले. (विमल नावाची तंबाखू किंवा त्यासदृश एक नशेचा पदार्थ आहे). इथे तो क्षण गेला पण त्या मुलाला शिक्षण काय मिळाले? असे लिहिणे आणि प्रत्यक्ष वागणे या स्वतंत्र गोष्टी आहेत. शाळेमध्ये सेक्‍स या विषयाचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनाच जर नीट सांगता येत नसेल आणि त्याबद्दल संकोचाने ते सांगणे टाळत असतील, तर दृश्‍य स्वरूपात ‘भाकरी करपणार’च ना? 

अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाला होता, ‘तुम्हाला तुमची मुले संस्कारित, संवेदनशील आणि बुद्धिमान व्हावीत असे वाटत असेल, तर त्यांना परीकथा वाचायला द्या. ती अधिक हुशार व्हावीत असे वाटत असेल, तर अधिक परीकथा वाचायला द्या.’ 

परीकथा हे बालपणातील खूप प्रेरणादायी रंजक आणि आयुष्यातल्या मूलभूत मूल्यांची ओळख करून देणारे साहित्य आहे. त्यामध्ये वापरलेल्या प्रतिमा आणि त्यातून व्यक्त होणारे संदेश हा सहज, नैसर्गिकपणे मुलांच्या मनापर्यंत पोचतो, रुजतो. त्याला ठाकठूक करून कोंबावे लागत नाही. त्यामुळे मुलांच्या मनाला घडवण्याचे, त्यांच्या विचारशक्तीला, त्यांच्या विश्‍वाला आकार, रूप द्यायचे काम नकळतपणे साध्य होते. मुलांच्या मनाच्या वाढीसाठी एकमेव मदत करणारा हा साहित्य प्रकार होय. 

परीकथा प्रत्येक वाचकासाठी वेगवेगळ्या पातळीवर काम करते. मोठी माणसे जेव्हा या गोष्टी वाचतात, तेव्हा त्यातला आशय हा तत्त्वज्ञान बनतो. मुलांच्या पातळीपर्यंत तो एक मजेचा, काल्पनिक आणि रंजक अनुभव असतो. उदाहरणार्थ, ‘लिंबाचे झाड आणि लोभी म्हातारी’ ही गोष्ट वाचताना त्यातले बोलणारे, समोरच्या आज्जीआजोबांच्या इच्छा पूर्ण करणारे आणि प्रसंगी ताळतंत्र सोडून अवाजवी, हावरट आणि क्रूर मागणी करणाऱ्या आज्जीला शिक्षा देणारे लिंबाचे झाड हे मुलांना मज्जा वाटणारे आहेच; पण मोठ्यांना नक्की लोभी स्वभावावर विचार करायला लावणारे आहे. 

साहित्य हे मानवी मनाचा आरसा असते. जाणवणाऱ्या - न जाणवणाऱ्या, व्यक्त केलेल्या - व्यक्त न केलेल्या, खोल मनात असलेल्या, न बोललेल्या सगळ्या सगळ्या भावभावनांची विविध रूपे आपल्याला कथा, कादंबरी, कविता किंवा नाटक यांसारख्या साहित्यकृतीतून दिसतात. वाचक सद्‌हेतूने त्यातल्या पात्राशी एकरूप होतो आणि आयुष्य कसे हाताळायचे ते त्याचे त्यालाच कळते. संकटांशी सामना कसा करावा तेही कळते. आलेली भयानक अनुभवांची लाट कशी पचवायची तेही कळते.

जे. आर. आर. टोल्कीन हा अद्‌भुत कथा लिहिणारा विख्यात लेखक. तो त्याच्या ’On Fairy Tales’ या निबंधात असे लिहितो, ‘परीकथा खरे तर प्रौढ लोकांसाठीच आहेत.’ परीकथेमधून मनातल्या कोपऱ्यात दडलेल्या असंख्य विचारांना खाद्य मिळते, इच्छापूर्तीचा आनंदही अनुभवता येतो. भले मग त्यांचे विश्‍व अगदी चिमुकले असले, तरी मनाच्या मशागतीला ही सुपीक जमीन तयार होते. कल्पनाविलासामध्ये काही काळ रममाण होतात आणि ते त्यांच्या वाढीला नक्की उपयोगी पडते. 

परीकथा माहीत असलेल्या प्रतिमांमधून, सोप्या भाषेतून, बाल्यावस्थेपासून ते वार्धक्‍यापर्यंत अतूटपणे जोडलेल्या असतात. या अद्‌भुत प्रतिमा या छोट्या मुलांच्या कल्पनाशक्तीला, विचारशक्तीला वाव देणाऱ्या असतात. त्यात धाडस, भीती, प्रेम, मृत्यू, वाढदिवस, दुष्ट आईबाबा, प्रेमळ आईबाबा, फसवणारे मित्र, नातेवाईक, शेजारी सारे आहे. कथा वाचताना नवनिर्मितीची क्षमता निर्माण होते, जी संस्कारित करायला महत्त्वाची भूमिका वठवत असते. हे सारे काहीच नसेल तर मुले मोठी होतील, त्यांची दिवसागणिक वाढ होईल पण विकास होणार नाही. 

या अद्‌भुत कथांची आणखी एक गंमत म्हणजे त्या काल्पनिक ठिकाणी घडतात, त्यात सतत तार्किकता असतेच असे नाही. केव्हाही, अचानक काहीही घडू शकते. याचाही मानसिक जडणघडण होण्यासाठी फायदा होतो. ज्या गोष्टींची भीती वाटते त्यांना सामोरे जाण्याचे बळ मिळू शकते. अगदी हॅरी पॉटरच्या आयुष्यातला जादूचा आरसा आपण वाचतो, तेव्हा मनात बुडबुडे येतात की असे काय काय लपले आहे आत आत आपल्या मनाच्या तळाशी? जसे हॅरीला मृत आईवडील भेटले, त्याच्या मित्राला आपण विजयी झालो असे वाटले. अशाच प्रत्येकाच्या मनात निद्रिस्त अवस्थेतल्या विचारांना या कथांमुळे ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. स्वप्न बघण्याची क्षमता निर्माण होते. मनातल्या वाटेल त्या प्रश्‍नांची त्याला समजेल अशी उत्तरे मिळतात. सिंड्रेलाची गोष्ट पाहिली, तरी त्यातली अद्‌भुतता ही एका पातळीवर आनंददायी आहे. उंदरांचे भले मोठे डौलदार घोडे होणे, भोपळ्याचा रथ होणे वगैरे... आपल्यालापण अशी एखादी ‘गॉड मदर’ मिळावी असे तीव्रतेने वाटते. पण त्याच गोष्टीत कितीतरी ताणाचे प्रसंग मुले वाचतात. बाराच्या आत सिंड्रेला पोचली नाही तर? राजपुत्राला कळेल नं आपल्या सिंड्रेलाकडेच तो हरवलेला बूट आहे ते? अशा प्रश्‍नांनी मुलांना आयुष्यातल्या संकट-क्षणांची ओळख होते. आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष नसले, तरी असेही असू शकते याची जाणीव प्रगल्भतेसाठी आवश्‍यक आहे. या परीकथांमधून स्त्रीवाद, पुरुषप्रधान संस्कृतीसुद्धा दिसून येते. मानसशास्त्रज्ञांनी ‘सिंड्रेला सिंड्रोम’ अशी एक संज्ञा या गोष्टीतून निर्माण केली. म्हणजे काय, तर ‘सिंड्रेला’मध्ये सारेकाही आहे. ती सुंदर तर आहेच, पण त्याबरोबर ती कष्टाळू आहे, आपल्याला हवे ते मिळवण्याची धमक असलेली आहे. पण ती वाट बघत बसलीय आपल्या आयुष्यात कोणी राजपुत्र येईल का? आणि तो आल्यावर, तिला पत्नी म्हणून मान्य केल्यावर जणू तिच्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, अशा थाटात आनंदी आनंद. 

परीकथा नेहमी खूप खूप वर्षांपूर्वीची असते. ती केव्हातरी घडली असते, घडत असते आणि घडणारही असते. म्हणजेच त्यात आशयाची वैश्‍विकता जाणवते. जादूच्या घटना, चेटकिणी, राक्षस, बुटके, यांसारखी अमानवी आणि अद्‌भुत पात्रे, उडणाऱ्या, इच्छा पूर्ण करणाऱ्या जादूच्या गोष्टी यामुळे त्या रंजक असतात. त्यातले नायक-नायिका तुम्हा-आम्हासारखे साधी मुले, मुली, माणसे असतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखा विचार मुले करू शकतात. असे माझ्याही बाबतीत घडले तर? अशा विचाराच्या दिशेतून एक प्रकारचे शिक्षण मिळते. यातून जीवनाचा संघर्षही दिसतोच. तो मुलांच्या आयुष्याशी संबंधित, त्यांच्या विश्‍वातला असतो. परीकथेमुळे अगदी सरळसोटपणे हे संघर्ष सोपे होऊन समजतात. चांगल्याचा नेहमी विजय होतो, वाईटाला नेहमी शिक्षाच होते, हा भाग मुलांच्या थेट हृदयापर्यंत भिडतो. परीकथेतून कितीतरी माहीत नसलेली मूल्ये, गोष्टी, भावना मते समजायला मदत होते. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, फसवणूक, वाईट मार्गाने वागणे, चांगले वागणे, दिलेला शब्द पाळणे या आणि अशा किती गोष्टी बेडूक आणि राजकन्या, रेड रायडिंग हूड, द लिटील मर्मेड, शॅडो, सेल्फिश जायंट, एलिस इन वंडरलॅंड, कुरूप बदक.. अशा अनेक इंग्रजी कथांमधून आणि मराठीतल्या पंचतंत्रांतून माहिती होतात. या विविध भावभावनांची ओळख होते. झाडे, प्राणी, पक्षी, वृत्ती यांना मानवी रूप दिल्यामुळे गोष्टी वाचण्यात रस निर्माण होतो आणि आशय नेमका समजतो. विस्मयचकित करणारे अद्‌भुत जग आणि वास्तव यातला समन्वय समजून घेताघेता मुलांचे अनुभवविश्‍व व्यापक होते. Alice in wonderland किंवा The wizard of oz प्रवास हा रूपकात्मक आहे. अधिक चांगल्या जगाची ओळख होऊन त्यातून मोठे होणे आणि शेवटी एक छान, परिपूर्ण व्यक्ती होणे हे साध्य आहे. हेच विचार त्यांना त्यांच्या मोठेपणात पुढे नेतात. त्यांचे मानसिक, भावनिक व्यक्तिमत्त्व घडवतात. बुद्धी, संवेदनशीलता वाढवण्यासाठी, एकमेकांचा जिव्हाळ्याने विचार करण्यासाठी या कथांचा उपयोग होतो. 

या कथा पालकांनी वाचल्या, तर त्यांच्या स्तरावरचा अर्थ त्यांना समजेल आणि पालक - मुले हे नाते अधिक आरोग्यपूर्ण होईल यात शंकाच नाही. एक दिवस आत्ता दिसणारे भयानक जग बदलून ते अधिक सुंदर होईल आणि कोसळणारे बाल्य सावरायला मदत होईल...

संबंधित बातम्या