हवं आहे राष्टकरणाचं आध्यात्म

रवी परांजपे
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

विशेष
 

विसावं शतक सुरू झालं आणि तिकडं अमेरिकेत विज्ञानाचा रथ खूपच वेगानं धावू लागला. विज्ञानावर आधारित नव्या उत्पादनांचा शोध हे त्या रथाचं वैशिष्ट्य होतं. त्यातून नवसंपत्ती-निर्माण वाढलं. उत्कर्ष आणि मंदी यांचाही खेळ सुरू झाला. त्या नंतरच्या काळात अमेरिकेत अनेक अाध्यात्मिक गुरूंचे आश्रमही स्थापन होऊ लागले. या परिस्थितीनं भारतात असा एक समज निर्माण केला, की अाध्यात्माशिवाय विज्ञान अपूर्ण आहे. ‘आपल्या कलेचं अंतिम उद्दिष्ट अध्यात्मिक उंची गाठणं हेच आहे,’ असं पुढं विविध कलाक्षेत्रातले मान्यवरही भारतात सांगू लागले. यावर ‘अाध्यात्म-धर्म वगैरे सर्व झूठ आहे,’ असं मानण्याची एक प्रतिक्रियाही भारतात मिळत गेली. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन वाढायलाच हवा’ असा त्या अाध्यात्म-धर्मविरोधी लोकांचा आग्रह होता. 

या साऱ्या प्रकारात सामान्य माणूस मात्र गांगरून गेला. देशातील अभिजातता - राष्ट्रकरण - सार्वभौमत्वविरोधी सत्ताकरणातील जातीय, सांप्रदायिक, प्रांतिक आणि भाषिक जमातवादांच्या भडक रंगांनी सामान्य माणसाचं हे गांगरून जाणं शतपटीनं वाढवलं. या रंगांमध्ये लोकांची माथी भडकवण्याची ताकद इतकी मोठी होती, की देशात अाध्यात्म वा विज्ञान असूनही नसल्यासारखेच होते. काही लोकांचं तुणतुणं सुरूच असायचं - कोणी म्हणायचं अाध्यात्म वाढलं की हे माथी भडकणं कमी होईल. तर कोणी विज्ञानाकडं बोट दाखवायचं. पण मुळातली गरज सर्वसामान्यांपर्यंत अभिजातता पोचवण्याची होती आणि या कामी शिकवला जाणारा इतिहास तर याबाबतीत मुळीच उपयोगी ठरत नव्हता. सर्वसामान्य माणूस गांगरलेला, गोंधळलेलाच राहिला. त्याचं पर्यवसान गोंधळात टाकणाऱ्या लोकशाहीत होत गेलं. 

हा गोंधळ नको असेल, सर्वसामान्यांचं गांगरून जाणं नको असेल, तर भडक रंगांचं जमातवादी सत्ताकारण थांबावयास हवं. अभिजातता - राष्ट्रकरण - सार्वभौमत्व या संकल्पना योग्य प्रबोधनातून लोकांपर्यंत पोचावयास हव्यात. या तीन संकल्पनांच्या साखळीला लेखनाच्या सोयीसाठी ‘अ.रा.सा. साखळी’ असं आपण संबोधू. या अ.रा.सा. साखळीतील कुठल्याच संकल्पनेबद्दल १९०० या वर्षापासून भारतात नीट विचार व आवश्‍यक ते प्रबोधन घडलेलं नाही. त्या संकल्पनांच्या संदर्भात विज्ञान म्हणजे काय, अाध्यात्म म्हणजे काय या प्रश्‍नीही भारतात चर्चा झालेली नाही. ती संक्षिप्तपणे करण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे. वास्तविक अ.रा.सा. साखळीची ओळख पटवणारा एक शब्द महाराष्ट्रात आहे - हिंदवी! परंतु, हिंदवी स्वराज्याचा इतिहास अ.रा.सा. च्या संदर्भात बहुधा लिहिला गेला नसावा. त्यामुळं सामान्य माणसाचं गांगरणं शिल्लक आहे आणि हे गांगरणं नेहमीच आपल्याबरोबर गोंधळ आणतं. 

अभिजातता हा शब्द आज समजण्यापेक्षा नेहमीच्या मराठीतला वाटत नाही, हे आमचं दुर्दैव. अभिजातता या शब्दाचा सोपा अर्थ म्हणजे, वीतभर विटेएवढ्या आकारालाही सत्कारणी लावणं. त्या छोट्याशा जागेवरही स्थिर उभं राहावयास शिकणं. त्यासाठी स्वतःची देहबोली स्थैर्याला अनुरूप करणं आणि स्थिर करून नवनिर्मितीवर लक्ष केंद्रित करणं. या लक्ष केंद्रित करण्यातून वा आंतरदृष्टीनं पाहण्यातून नवनिर्मितीचा मार्ग सापडत असतो. हा विठ्ठल विचार आपल्याला जागेचा - स्पेसचा वा अवकाशाचा सदुपयोग करण्याच्या प्रेरणा देतो. या प्रेरणांतूनच ‘डिझाइन थिंकिंग’ वाढत असतं आणि ‘डिझाइन थिंकिंग’ची परिणती विज्ञान-तंत्रविज्ञानात होत असते, असा प्रगत देशांचा अनुभव आहे. 

या अवकाशाची महती सांगताना समर्थ रामदासांनी तीन ऐहिक सुखाचे अवकाश सांगितले आहेत. घटाकाश, मठाकाश आणि महादाकाश; म्हणजे गाव, राज्य, राष्ट्र वगैरे. आकाश म्हणजे अवकाश हे निर्माण करावे लागतात - डिझाइन करावे लागतात. या प्रत्येक ऐहिक अवकाशाबरोबर आंतरिक समाधानाचाही अवकाश हवा, ही भारतीय अभिजाततेती औचित्य-सौंदर्यमूल्यांना धरून केलेली मागणी असते. ते तीन आंतरिक समाधानाचे अवकाश आहेत - जीवात्मा-शिवात्मा-परमात्मा! इथं ‘आत्मा’ म्हणजे माणसाच्या आंतरिक समाधानाचा अवकाश असा अर्थ आहे. या सहा अवकाशांना व्यापणारा चिदाकाशही समर्थांनी सांगितला आहे. चिदाकाश म्हणजे, चैतन्याचा अवकाश - निर्मळात्मा नरेश... ‘उपाधी वेगळा.’ 

या अवकाशीय मांडणीचा अर्थ असा, की कुठल्याही नवनिर्मितीतून ऐहिक सुखाबरोबर आंतरिक समाधानही मिळायला हवं. ते चैतन्याचा अनुभव देणारं हवं. हे भारतीय राष्ट्रकरणाचं अाध्यात्म आहे. यात कुठंही ‘अाध्यात्म म्हणजे आत्म्याचं ज्ञान’ हा उल्लेख नाही. हे सारं अवकाशविषयक चिंतन औचित्य अन् सौंदर्य या आदिम मूल्यांच्या भक्तीतून उगम पावलेलं आहे. ते अाध्यात्म ‘सुंदर तेचि वेचावे.. सुंदर करेनी मांडावे.. सर्वांच्या सुख-समाधानासाठी।’ हा पाडव्याच्या गुढीचा संदेश सर्वत्र पोचवणारं आहे. ‘प्रॉडक्ट इनोव्हेशनमधून संपत्ती निर्माण’ - हे त्या अाध्यात्माचं ब्रीद आहे. ‘याहुन करावे विशेष। तरिच म्हणावे पुरुष।।’ - हे शिवछत्रपतींचं वैशिष्ट्य त्यांच्या ‘डिझाइन थिंकिंग’मधून त्यांच्यात उतरलं होतं. त्या वैशिष्ट्यालाही महाराष्ट्रानं ‘अभिजात राष्ट्रकरणाचं अध्यात्म’ मानलं असतं, तर महाराष्ट्र-भारताचा सारा इतिहासच बदलून गेला असता. 

साखळीतला दुसरा मुद्दा राष्ट्रकरणाचा आहे. राष्ट्रकरणाच्या संदर्भात अभिजातता म्हणजे कलात्मक-उद्यमशील अवकाशीय मांडणीबाबतचं सर्जनशील चिंतन होय. या सर्जनशील चिंतनानं निर्माण केलेली औचित्य-सौंदर्यवादी नागरी संस्कृती व सभ्यता, औचित्य-सौंदर्यभक्त सर्वसामान्यांची गुणवत्ताशाही निर्माण करणं म्हणजेही राष्ट्रकरण होय. नित्यनियमानं आपलं गाव लखलखीत व स्वच्छ ठेवणं म्हणजेही राष्ट्रकरण होय. देशातील सर्व संप्रदायांना निष्प्रभ करणारा संप्रदायनिरपेक्ष सेक्युलॅरिझम किंवा धर्मसापेक्षता किंवा संविधानसापेक्षता अबाधित ठेवणं म्हणजेही राष्ट्रकरण होय. गुन्हेगारीविरुद्धचा बुलंद आवाज उठवणं म्हणजे राष्ट्रकरण! 

या सर्व बाबतीतील राष्ट्रकरण आज भारतापासून दूर आहे. कारण भारतानं राष्ट्रकरणाचं अाध्यात्म म्हणून अभिजाततेकडं पाहिलेलंच नाही. या ‘नकारा’तून हिंदवी स्वराज्य तेवढं वगळायचं. 

 हिंदवी स्वराज्याची ३५ वर्षं वगळून भारताचा जो २३१९ वर्षांचा इतिहास घडला, त्यात संपत्ती निर्माण संस्कृतीला आम्ही मुकलो. कारण सर्जनशीलता-रसिकता-सभ्यतेची प्रेरणा ठरलेल्या धर्माच्या ठिकाणी आम्ही कर्मकांडप्रधान संप्रदायाला आणलं. त्याच्या प्रभावात भारतातील वैज्ञानिक शोधकार्यांची संख्या रोडावत जवळजवळ शून्यावर आली. भारत ७४१ वर्षांच्या पारतंत्र्यात अडकला, तो भारताचं राष्ट्रकरण अभिजातताशून्य परिस्थितीत संपल्यामुळं; अ.रा.सा. साखळी संपल्यामुळं! त्या ७४१ वर्षांत भारतीय संप्रदाय आणि आत्म्याचं शास्त्र ठरलेलं अाध्यात्म आमच्यापाशी होतंच; पण अ.रा.सा. साखळी निर्माण करणारी औचित्य-सौंदर्य मूल्यभक्ती आमच्यात नव्हती. या भक्तीच्या नाशानं आम्ही परकीयांच्या हाती देशाची सूत्रं सोपवली. किंबहुना आमचं राष्ट्र-अवकाशभान संपवलं. या प्रक्रियेत भारताचं सार्वभौमत्वही संपुष्टात आलं. चीनबरोबर असलेली आमची सीमा आज विवाद्य ठरली आहे. कारण हिंदवी स्वराज्यानंतर भारताने अ.रा.सा. साखळीबाबत १९०० या वर्षापर्यंत कोणताही विचार केला नव्हता. सांप्रदायिकता आणि राष्ट्रकरणद्रोही अाध्यात्मानं आम्हाला एका अ-वास्तववादी चमत्कारांच्या विश्‍वात पोचवलं आहे. या विश्‍वात धनिकांच्या इमारती उभ्या राहताना भूमिपूजन होत असतं. परंतु, भाषावार प्रांतरचनेनंतर देशातील प्रत्येक राज्यात ‘राष्ट्र-अवकाश पूजन’ करण्याचं तारतम्य आम्ही ठेवलेलं नाही. मग देशाला सार्वभौमत्वाबद्दलचं ममत्व कसं वाटणार? 

जगातलं विज्ञान-तंत्रविज्ञान आज मर्यादेबाहेर वाढले आहे. त्याचा संबंध अर्थव्यवस्थेशी लागल्यामुळं आता जागतिक तापमानवाढीचा धोका वाढला आहे. अशावेळी विज्ञान ज्याचा भाग असते, राष्ट्रकरण औचित्य-सौंदर्यभक्तीवर आधारित आहे, की पाश्‍चिमात्यांप्रमाणं औचित्य-सौंदर्य आसक्तीवर? - याबाबत साऱ्या जगालाच एकत्र येऊन निर्णय घ्यावा लागणार आहे. अशा परिस्थितीत भारताचा आवाज ऐकला जायचा असेल, तर हिंदवी स्वराज्यातील अभिजातता-राष्ट्रकरण- सार्वभौमत्व यांची साखळी भारतानं त्वरित आपलीशी करायला हवी. तिच्या मुळाशी असलेली औचित्य-सौंदर्यभक्ती पुन्हा जगाला पटवावी लागेल. विज्ञान-तंत्रविज्ञान क्षेत्रातील प्रगत जगाचं अंधानुकरण थांबवूनसुद्धा अर्थव्यवस्था सुधारून दाखवावी लागेल. 

हे खूप मोठं सर्जनशील आव्हान भारतापुढं आहे. ते अाध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याच्या गप्पा मारून संपणार नाही. ते संपेल कलात्मक उद्यमशील अभिजाततेतलं नवनिर्माणकारक अध्यात्म सांगणारा सर्जनशील ‘विठ्ठल’ आम्ही जवळ केला, तरच! आज तो सिंगापूरमध्ये आहे. जपानमध्ये आहे. इस्राईलमध्ये आहे. तो पुन्हा भारतात पंढरपुरी आणावयाचा असेल, तर महाराष्ट्रानं ‘सिंहावलोकनी पुरोगामित्व’च जवळ करायला हवं. कारण असं पुरोगामित्व अभिजातता शोधक असतं. ते तर्कबुद्धी-सृजनबुद्धीच्या समन्वयातूनच प्राप्त होतं. ही गोष्ट स्पष्ट करणारं ‘त्रिशूळ’ आम्ही आज विसरलो आहोत. किंबहुना घटसापेक्षता-शिवसापेक्षता आम्ही विसरलो आहोत. या विसराची जबरदस्त किंमत भारतानं आजपर्यंत मोजली... पण आता नाही! 

संबंधित बातम्या