काळजी काळानंतरचा पहिला हिमवर्षाव

सुबोध गोरे
सोमवार, 11 जानेवारी 2021

‘नेमेची येतो मग पावसाळा..’, या उक्तीनुसार झालेला या हिवाळ्यातला पहिला हिमवर्षाव नेहमीसारखाच असला तरी कोरोनाकोंडीच्या पार्श्वभूमीवर अनुभवलेला हा हिमवर्षाव खरोखरच अविस्मरणीय होता. मुळचे पुणेकर असणारे आणि सध्या हरबिंजर ग्रूपच्या झुरीच (स्वित्झर्लंड) येथील कार्यालयात एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत असणारे सुबोध गोरे यांनी ‘सकाळ साप्ताहिक’च्या वाचकांसाठी पाठवलेली झुरीच जवळच्या ऐनसिडेल्न येथे अनुभवलेल्या पहिल्या हिमवर्षावाची ही छायाचित्रे आणि हिमवर्षावाचा त्यांचा अनुभव.

कोरोनानी गेलं संपूर्ण वर्षच विस्कळित करून टाकलं होतं. इथे स्वित्झर्लंडमध्येही गेल्या मार्च महिन्यापासूनच एकूणच लोकांच्या वावरावर निर्बंध आले होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मर्यादित झाली होती; सर्वत्र मास्कचा वापर, दुकानांत एका वेळेला जाऊ शकणाऱ्या ग्राहकांच्या संख्येवर मर्यादा, मोबाईल ॲपवरून कोविडच्या प्रसाराबद्दल माहिती, शक्यतो घरूनच काम, या व अशा गोष्टींमुळे पुढचे सात-आठ महिने कोरोनाच्याच छायेत होते.

स्वित्झर्लंडच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा खूप मोठा आहे. मुख्यतः उन्हाळ्यातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेटी आणि हिवाळ्यातील हिमपर्यटन. उन्हाळ्यात भारताप्रमाणेच चीन, जपान आदी आशियायी देशातील पर्यटक आणि हिवाळ्यात युरोपिअन व अमेरिकी पर्यटक असा अर्थव्यवस्थेचा एक मोठा कणा आहे. कोरोनामुळे एप्रिल ते ऑगस्टमधील पर्यटन पूर्णपणे बंद झाले होते. इतर देशांप्रमाणेच इथेही या सगळ्यावर अवलंबून असणाऱ्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले.

नोव्हेंबरमध्ये हिवाळ्यातील पर्यटन सुरू होऊ शकते अशी शक्यता निर्माण झाली होती; पण त्यातच कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा सर्व बंद होणार अशी परिस्थिती आली. या वेळी मात्र स्वित्झर्लंडच्या सरकारने हिवाळी पर्यटन सुरू ठेवायचा निर्णय घेतला. अन्य युरोपीय देशांनी, विशेषतः फ्रान्स, जर्मनी आणि ऑस्ट्रिया या शेजारील देशांनी त्यांच्याकडचे हिवाळी पर्यटन (मुख्यत्वे स्की स्लोप व स्की रिसॉर्ट्स) बंद ठेवले असल्यामुळे तेथील लोक स्वित्झर्लंड मध्ये येऊ लागले (शेंगेन देशात सीमेवर निर्बंध नाहीत.) यामुळे थोडी गंमतशीर परिस्थिती निर्माण झाली. फ्रान्ससारख्या देशांनी मग स्कीईंगसाठी बाहेर जाणाऱ्या लोकांवर निर्बंध आणले. अखेरीस स्वित्झर्लंडने फक्त स्थानिक पर्यटकांसाठीच स्की स्लोप व रिसॉर्ट चालू राहतील असे ठरवले.

एकुणात काय तर या वर्षीच्या पहिल्या हिमवर्षावाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होते. नोव्हेंबरमधील गूढ, गार व अंधारे वातावरण, मधे मधे पण रिप रिप पडणारा पाऊस, लहान झालेला दिवस, पूर्ण पानगळी मुळे बोडकी झालेली झाडं, कसोटीच्या काळा नंतर डिसेंबरच्या मध्यात सुरू झालेली शाळांची सुट्टी, ख्रिसमसचे वातावरण. एकूणातच दिवस अंधाराकडून प्रकाशाच्या वाटेवर वळणारे ...

युरोपमध्ये हिवाळ्यात ख्रिसमस प्रमाणेच स्कीइंगचे खूप प्रस्थ आहे. लहान मुलांपासून, नवशिक्यांपासून ते कुशल स्कीअरपर्यंत सर्वांना सामावणारी व्यवस्था येथे आहे. रिसॉर्ट, लिफ्ट, हिम वितरण, हिम उताराचे सपाटीकरण, बर्फात चालण्याच्या लांब लांब वाटा, स्की, स्की गियर भाड्याने देणे, स्की शिक्षक, गाड्यांसाठी वाहनतळ, उपहारगृह, व एक किंवा दोन दिवस राहण्याची सोय, या व अशा कित्येक गोष्टींचा अर्थ व्यवस्थेला हातभार लागतो. तर, ‘नेमेचि येतो मग पावसाळा..’ या उक्तीनुसार डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या दोन -तीन दिवस आधी स्वित्झर्लंडच्या १००० मीटर पेक्षा जास्त उंचावर असणाऱ्या भागात सर्वदूर हिमवर्षाव झाला.

वर्षभर कोरोनाच्या कचाट्यात सापडून, उन्हाळ्यातील सुटीवर पाणी सोडून, सतत मास्कच्या पडद्याआड व काहीशा अनुत्साही, उदास वातावरणात राहून कंटाळलेल्या लोकांना पहिला हिमवर्षाव ही मोठीच पर्वणी होती. कोरोनाची लवकरच येणाऱ्या लशीच्या बातमी बरोबरच पहिल्या हिमवर्षावानी वातावरणात एकदम फरक पडला ... शुभ्र हिमाचा सर्वत्र थर, वातावरणात बोचरी थंडी, लोकांच्या चेहेऱ्यावर आलेला आनंद, आर्थिक चक्राला पुन्हा सुरुवात आणि २०२० हे वर्ष आठवणीतून मागे टाकून नवीन वर्षाची ओढ असा बदल एका हिमवर्षावाने केला.

झुरिकच्या दक्षिणेला पन्नास किमीवर ऐनसिडेल्न नावाचे गाव आहे. तेथील १०व्या शतकातली एक मॉनेस्ट्री आहे. या गावालाही जवळजवळ एक हजार वर्षांचा इतिहास आहे. त्या परिसरातल्या आल्प्सच्या पर्वत रांगांच्या उतारावर झालेला पहिला हिमवर्षाव अनुभवणे हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरोखरच अविस्मरणीय आनंदानुभव होता. 

येथील हिमवर्षावाबद्दल सुद्धा काही समजुती आहेत. डिसेंबर ते फेब्रुवारी हे तीन महिने खूपच थंडी असते. नंतर मार्च मध्ये स्प्रिंग म्हणजे आपल्याकडील वसंत ऋतू सुरू होतो. झाडांना नवीन पालवी, ताजी फुले, नवनवीन रंग आणि निसर्गात बहार वगैरे .. असे स्वरूप असते. पण तरीही एप्रिल महिन्यात एकदा तरी हिमवृष्टी होते असा अनुभव आहे. गेल्या काही वर्षात, एप्रिलमध्ये वसंत ऋतू बहरात असताना एक तरी दिवस तापमान अचानक उतरून शून्य होऊन बर्फ वृष्टी होते, आणि मग खऱ्या अर्थाने थंडी संपते.

संबंधित बातम्या