पर्यावरणाचे हुकमी रक्षण 

सुनील चोरे 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

विशेष

संपूर्ण भारताला पर्यावरणाच्या दृष्टीने कुणी तारले असेल तर कडुनिंब या वृक्षाने. न लावताही नैसर्गिकरित्या येत गेला म्हणून आपल्या कितीतरी पिढ्यांनी कडुनिंबाला गृहीत धरले आहे. ज्याने स्वतःहून या वृक्षाची रोपे करून लावली, असे क्वचितच कोणी सापडेल. पण याच मायबाप वृक्षाने आपले बांध नकळत सजवले आहेत. 

आपण कुठल्याही कार्यक्रमाला गावाला गेलो, की गाडी पार्किंगसाठी हमखास एखादा लिंब बघतो... मग एक लिंब आणि सहा गाड्या. सावली हलली की गाडी हलवायची घाई. वर्षानुवर्षे हा कार्यक्रम चालू आहे. गाड्या आम्ही भरमसाठ घेतल्या पण लिंब कुठे लावली? आता थोडी समज यायला लागली, पण लिंब काय गाडी आहे का एका दिवसात असेंबल करून बाहेर निघायला? एवढ्या बिकट परिस्थितीत तरणाऱ्या झाडापेक्षा आम्ही झटत बसलो भलत्याच झाडांसाठी! जे फुकट मिळते त्याची किंमत नसते. लावा विदेशी झाडे, करा वृक्षारोपण, काढा फोटो.. खड्डा तोच पुढल्या वर्षी तिथेच वृक्षारोपण. पुन्हा गाडी चालली धूळ उडवत, कारण झाडेच नाहीत. एक झाड २० किलो धूळ स्वतःच्या अंगावर घेते, वर्षाला ७०० किलो प्राणवायू देते २० टन घातक कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेते; तेव्हा कुठे आपला श्वास सुंदर होतो. पण आपल्या आयुष्याची असेंब्ली सजवताना पुढच्या पिढीच्या पार्टचे काय होणार याचा विचार आपण कुठे केला? 

काही पानगळती सोडली तर अती उन्हाळ्याशी चार हात करत कडुनिंब दिमाखात हिरवी शाल पांघरून उभाच असतो. वाढलेला कडुनिंब साधारण ४ अंश सेल्सियसने त्याच्या आसपासचे तापमान कमी करतो. अल्प पर्जन्यमान असलेल्या दुष्काळी भागाला या कडुनिंबाच्या अस्तित्वामधून एका अर्थाने वरदान लाभले आहे. कसल्याही जमिनीत ४० फुटापासून पाणी ओढण्याची क्षमता ठेवत खोडापासून ते पानाफुलापर्यंत उपयोगी असणारा, स्वतःला दुसऱ्यासाठी कायम सिद्ध ठेवणारा हा आपला देशी बहुगुणी वृक्ष आहे. 

जंतुनाशक, कीटकनाशक व बुरशीनाशक म्हणून दुसरे लोक याच्यापासून औषधे निर्माण करतात आणि आपण ती भल्या मोठ्या किमतीत विकत घेतो. कारण जमाना पॅकिंग, रॅपिंग आणि ब्रॅण्डिंगचा आहे. सेंद्रिय स्वरूपात नायट्रोजनचा खजिना असलेला कडुनिंब, त्याची भेसळयुक्त निमपेंड ४० रुपये किलोने विकत घेतो. पण ती तयार करण्यासाठीचे कष्ट आणि वेळ आपल्याकडे नाही. शास्राने सिद्ध केले आहे, की हे झाड नैसर्गिक एअर प्युरिफायर आहे, त्यांची थंड छाया म्हणजे परत नैसर्गिक AC, मनाबरोबर घरही थंड करते. आपले नववर्ष आरोग्यदायी जावे म्हणून गुढी पाडव्याला कडुनिंबाचा मान आहे. 

योजना आयोगाचे माजी सदस्य डॉ. जयंतराव पाटील यांच्या एका लेखातून कळते साबरमती आश्रमातील कडुनिंबाचे असंख्य वृक्ष एका फिजी युवकाने महात्मा गांधीजींच्या सूचनेवरून एक एक रोप आणून लावले आणि वाढवले. ते पाहण्यासाठी खास परदेशातून  लोक यायचे. पण माझ्या माहितीतील एकाने - फार निंबोळ्या पडतात, खूप स्वच्छता ठेवावी लागते, तेव्हा हे झाड दुसरीकडे लावा अशी विनंती केली होती. मी अवाक झालो. या निंबोळ्या म्हणजेच तर सृजनाचा नियम! तेच नको तर झाड कसे येईल? माणूस इतका सोयीस्कर झाला की लिंब बांधावर पाहिजे पण दारात, शाळेत नको.. मुळात निंबोळ्या पडणे ही आनंदी समस्या आहे. त्या बीजामुळे तर वृक्ष येतो, शिवाय आपल्याला कडू वाटणारी निंबोळी अनेक पक्ष्यांचे अन्न आहे. 

निसर्गाने बहाल केलेली किती मोठी गोष्ट आपण नाकारणार आहोत? याच निंबोळीला जगात खूप मागणी आहे. त्यामधून निघणाऱ्या औषधी मार्गोस तेलासाठी, खतासाठी आणि ऑरगॅनिक कीटकनाशकांसाठी ती उपयुक्त आहे. गावोगावी आता व्यापारी पैसे देऊन निंबोळी गोळा करायला माणसे पाठवतात. आमच्या विद्यार्थी साहाय्यक समिती वसतिगृहाच्या यावर्षीच्या एक हजार आशीर्वाद वृक्ष  उपक्रमात, कोविड काळात घरी असलेला विद्यार्थी वर्ग ८० टक्के कडुनिंब लावत आहेत. सर्वश्री देणगीदारांच्या पाठबळाने समितीच्या मुला - मुलींनी पूजा-आरतीने स्वागत करून कडुनिंबाला घरी, दारी, शाळेत, मंदिरात लोखंडी जाळीसह लावून सुरक्षित केले आहे. 

कोरोनाने निसर्गाकडे पाहण्याची नवीन दृष्टी दिली आहे. प्राणवायूची किंमत पैशात किती, याचा हिशोब आता अवघे जग करते आहे. बायोपायरसीतून अमेरिकेने दावा केलेल्या या परोपकारी वृक्षाचे पेटंट मिळवण्यासाठी भारताला दहा वर्षे युरोपियन पेटंट ऑफिस (EPO) मध्ये झगडावे लागले. गेली काही हजार वर्षांचा कडुनिंबाचा भारतीय इतिहास आणि त्यातील आपल्या पूर्वजांनी शोधलेला त्याचा उपयोगी प्रवास समजावून सांगावा लागला. दातांच्या आरोग्यासाठी आपल्याकडे प्रचलित असणारी टूथ ब्रश आणि टूथ पेस्ट याचा संगम असलेली कडुनिंबाची काडी हा EPO मध्ये एक भक्कम पुरावा मानला गेला. 

‘तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी’ हे कडुनिंब आपल्याला मूकपणे ओरडून सांगत आहे. ७० टक्के जंगल विकासाच्या नावाखाली १०-१२ टक्क्यांवर आले आहे, तरी आपण आपल्यापाशी असलेल्या कस्तुरीकडे पाहायला तयार नाही. बाहेरच्या जगात कडुनिंबाला मोठा मानसन्मान मिळतो आहे. त्याच्यावर संशोधन होऊन त्याच्या वाढीसाठी प्रयत्न होत आहेत. पण आपण त्याकडे म्हणावे तितके लक्ष देत नाही, ते द्यायला हवे.

संबंधित बातम्या