गिर्यारोहकांचे साहस! 

उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ 
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

उपक्रम

साहस - धाडसाचा परमोच्च बिंदू म्हणजे गिर्यारोहण. मात्र गिर्यारोहण म्हणजे अनिश्चितता. सतत बदलणारे हवामान, हाडे गोठवणारी थंडी, सततचे हिमप्रपात, लहरी निसर्गमान इत्यादींची अनिश्चितता.. गिर्यारोहकांना ही अनिश्चितता तशी नवीन नाही. मात्र, डोंगरदऱ्यांत, कडेकपारीत, अतिउंचीवर असताना जाणवणारी अनिश्चितता आता सर्व जगच रोजच्या जगण्यात कोरोनाच्या रूपात अनुभवत आहे. 

कोरोना व्हायरस संक्रमणाचा सुरुवातीचा काळ हा सर्वांसाठीच अभूतपूर्व होता. प्रशासनाच्या पातळीवर, वैद्यकीय पातळीवर या नव्या आजाराला तोंड देण्यासाठी कसून तयारी करण्यास सुरवात झाली. संक्रमण रोखण्यासाठी कडक लॉकडाउनचे उपाय योजले गेले. सर्वांच्याच मनात एक अनामिक भीती होती. मात्र, अनेकांना आपल्या घरातून बाहेर पडून कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी काम करण्याची गरज होती. प्रशासकीय व वैद्यकीय सेवेतील ‘योद्ध्यां’नी अक्षरशः अहोरात्र काम केले, आजही करत आहेत. समाजाच्या मदतीसाठी जबाबदार लोकांनी बाहेर पडून काम करण्याची गरज होती. तसे आवाहनदेखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला ताबडतोब प्रतिसाद म्हणून उभी राहिली अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाची ‘टास्क फोर्स’! 

महाराष्ट्रातील साहसी गिर्यारोहकांनी आजवर भूकंप, ढगफुटी; तसेच दुर्गम ठिकाणी होत असलेल्या अनेक दुर्घटनांमध्ये मदतकार्य केले आहे. कोरोनाच्या अकल्पित संकटामध्येसुद्धा महाराष्ट्रातील साहसवीरांची फौज ‘टास्क फोर्स’च्या माध्यमातून कंबर कसून लढत आहे. 

‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ’ ही महाराष्ट्रातील गिर्यारोहणाची शासनमान्य शिखर संस्था आहे. राज्यभरातील विविध गिर्यारोहण व साहसी संस्था महासंघाशी संलग्न आहेत. साहस करणारे, अनिश्चित काळामध्ये न घाबरता, अतिशय शिस्तबद्धपणे व संयमाने काम करण्याचा अनुभव असलेले गिर्यारोहक महासंघाशी जोडलेले आहेत. या अनुभवी लोकांचा कोरोना संकटकाळामध्ये विविध कामांसाठी उपयोग होईल या विचाराने ‘टास्क फोर्स’ तयार करण्यात आला. ‘टास्क फोर्स’मध्ये सहभागी होण्यासाठी केलेल्या आवाहनानंतर अवघ्या काही दिवसातच महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील १५०० हून अधिक साहसी नागरिकांनी व गिर्यारोहकांनी नावनोंदणी केली. यात काही डॉक्टर्स होते, वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी होते, विविध कामांचे नियोजन करणारे व्यावसायिक होते. 

याची सुरुवात झाली, गिरिप्रेमी या ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’शी संलग्न संस्थेद्वारे. ‘टास्क फोर्स’ व ‘गिरिप्रेमी’चे सदस्य असलेल्या गिर्यारोहकांनी कडक लॉकडाउनच्या काळामध्ये पुण्यात अडकलेल्या विविध राज्यांतील मजुरांना, त्यांच्या कुटुंबांना दोन महिने पुरेल एवढे रेशन व अत्यावश्यक वस्तूंचा दोन टप्प्यांत पुरवठा केला. एकीकडे हे मदतकार्य चालू असताना दुसरीकडे गिरिप्रेमी संस्थेने रक्तदान मोहीम केली. लॉकडाउन व कोरोनाच्या भीतीने पुणे शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत होता. अशा परिस्थितीमध्ये रक्तदान शिबिर घेणे शक्य नव्हते. त्यामुळे शिबिराऐवजी रक्तदान मोहीम राबविण्यात आली. विविध वयोगटातील, विविध रक्तगटांच्या ६० हून अधिक व्यक्तींनी अत्यंत गरजेच्या वेळी पुण्यातील विविध रुग्णालये व रक्तपेढी येथे जाऊन रक्तदान केले. ही मोहीम चालविण्यासाठी रक्तदात्यांचा एक डेटाबेस करण्यात आला. हा डेटाबेस आता गिरिप्रेमी संस्थेच्या माध्यमातून महासंघाद्वारे महाराष्ट्रभरासाठी बनविण्याचे काम चालू आहे. गिरिप्रेमी संस्थेला या दोन्ही कामांमध्ये स्वरूपसेवा या सामाजिक संस्थेची मदत झाली. 

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ निर्मित ‘टास्क फोर्स’चा मुख्य उद्देश, शासनाच्या विविध खात्यांना त्यांच्या गरजेनुसार व सूचनेनुसार मदत करणे, हा आहे. टास्क फोर्सच्या निर्मितीनंतर त्याच्या जिल्हावार याद्या बनविण्यात आल्या. सदस्य संख्या, त्यांचे स्किल्स, वय, संपर्क क्रमांक अशी यादी बनवून व समन्वयक नेमणूक करण्यात आली. या याद्या संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, विविध पालिकांचे आयुक्त यांना पाठविण्यात आल्या व हवी तेव्हा मदत करण्याची हमी देण्यात आली. 

कोरोनाचे संकट अधिक तीव्र होत असतानाच निसर्ग चक्रीवादळाचे संकट किनारपट्टी व घाटमाथ्यांच्या भागांमध्ये उभे राहिले. निसर्ग चक्रीवादळाने मुंबई शहराला सुदैवाने हुल दिली, मात्र सह्याद्रीचा घाटमाथा मात्र ‘निसर्ग’च्या कचाट्यात सापडला. दुर्गम व डोंगरी भागांमध्ये काही तासांच्या वादळीवाऱ्याने लोकांना अक्षरशः रस्त्यावर आणले. सह्याद्रीचा हा भाग म्हणजे अतिशय दुर्गम. दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत, वीज व इतर सुविधांची काही ठिकाणी वानवा आहे, तसेच ट्रेकर्स व भटकंती करणाऱ्या लोकांवर चालणारा व्यवसायदेखील कोरोनामुळे ठप्प झाला होता. अशातच वादळाने होत्याचे नव्हते केले. आम्ही गिर्यारोहक मंडळी याच घाटमाथ्यांवर फिरतो, भटकंती करतो. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेली गावे, तेथील कुटुंबे ही आमच्यासाठीही ‘फॅमिली’च आहेत. त्यांना मदत पोचविणे आवश्‍यकच होते. त्यानुसार टास्क फोर्सशी संबंधित विविध संस्थांनी विविध भागांमध्ये मदतकार्य केले. या विविध संस्थांच्या माध्यमातून इर्षाळगड, अचकरवादी, काटेवाडी, उंबरवाडी, कळकराई, माणगाववाडी इत्यादी या इर्षाळगड, प्रबळगड, माथेरान, ढाक या किल्ल्यांच्या परिसरातील दुर्गम वाड्यावस्त्यांमध्ये अन्नधान्य पाकिटे, जीवनावश्यक वस्तू व घरांच्या पुनर्उभारणीसाठी विविध साहित्यांचे वाटप केले. तसेच वादळांनंतर सैरभैर झालेल्या माकडांना पुन्हा  जंगलात सोडणे, पळसधरी धरणातील मगर पकडून महाडच्या वशिष्ठ नदीत सोडणे, साप पकडून जंगलात सोडणे अशीही कामे करण्यात आली. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याचे परिणाम वर्षभर तरी त्या भागांमध्ये जाणवतील. त्यामुळे येणाऱ्या काळात ४०० हून अधिक कुटुंबांना आयुष्य सुरळीत करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. 

निसर्ग चक्रीवादळाच्या संपूर्ण मदतकार्यामध्ये अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने समन्वयाची प्रमुख भूमिका पार पाडली. सह्याद्रीचा पट्टा विस्तृत आहे, काही भाग दूरस्थ आहे. त्यामुळे माहिती मिळण्यास, मिळविण्यास वेळ लागत होता. चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेकांच्या घरांची छपरे उडाली होती. साठवणूक केलेले अन्नधान्य भिजले होते. भिंती खचल्या होत्या, खांब निखळले होते. अनेक जण अक्षरशः उघड्यावर आले होते. या सर्वांच्या मदतीला विविध संस्था धावून गेल्या. या सर्व संस्थांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा होता, नाहीतर वस्त्यांवर-वाड्यांवर नको असलेले सामान जाऊन पडेल किंवा काही लोकांपर्यंत पुन्हा तीच तीच मदत पोचेल, हे टाळण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था कोठे व कोणत्या प्रकारचे मदतकार्य करत आहेत इत्यादीची इत्थंभूत माहिती महासंघाने घेऊन सर्व मदतकार्य नियंत्रित केले. हे करत असताना वाड्यावस्त्यांवर झालेले नुकसान, आवश्यक असलेली मदत याचा आढावा घेतला व मदतकार्यात सुसूत्रता आणली. ट्रेकक्षितिज, यंग झिंगारो ट्रेकर्स, यशवंती हायकर्स, गिरिप्रेमी या संस्थांनी मदतकार्यात पुढाकार घेतला. 

निसर्ग चक्रीवादळानंतर मदतकार्य जोमात चालू होते. मात्र, दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच होता. पुण्या-मुंबईत परिस्थिती बिकट होत चालली होती. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने महासंघाकडे ‘कोविड सेवक’ माध्यमातून मदत करण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या आवाहनाला तत्पर प्रतिसाद देत महासंघाच्या एकूण ७० सदस्यांनी ‘कोविड सेवक’ म्हणून पुण्यात विविध ठिकाणी काम करण्यास सुरुवात केली. गिरिप्रेमी संस्थेच्या यंत्रणेद्वारे हे काम चालू आहे. यात पुणे शहरातील बिबवेवाडी, सिंहगड कॉलेज, कोथरूड, केळेवाडी येथील बॅक ऑफिस, शहरातील विविध कोविड सेंटरमध्ये, Swab कलेक्शन सेंटर तसेच महापालिकेची कंट्रोल रूम येथे स्वयंसेवक सकाळी ९ ते रात्री १२ या वेळेत चार तासांच्या चार शिफ्टमध्ये काम करत आहेत. महासंघाचे बिनीचे शिलेदार विकास भोंडवे, आनंद दरेकर, चैतन्य जोशी, अपर्णा प्रभुदेसाई, क्षितिजा कुलकर्णी, केतकी करंदीकर, विश्राम पाटणकर, अमृत धनगर, अजित ताटे, कौस्तुभ ठकार, सुयश मोकाशी हे इतर ५० हून अधिक गिर्यारोहकांच्या मदतीने कोरोनाच्या विरुद्ध किल्ला लढवत आहेत. सोबतीला पुणे जिल्हा गिर्यारोहण महासंघाचे सचिन गायकवाड, दीपक मोरे, मुफ्फदलाल लोखंडवाला इत्यादी टास्क फोर्स सदस्य अहोरात्र झटत आहेत. 
  
कोरोनाचे संकट जोपर्यंत असेल तोपर्यंत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाची टास्क फोर्स सतत कार्यरत असेल. कोरोना आजाराची ही आणीबाणी परिस्थिती अभूतपूर्व आहे. अशा संकटांचा कोणत्याही व्यवस्थेने याआधी सामना केलेला नव्हता. तरीही जोखीम उचलून न थकता अहोरात्र काम करणारे डॉक्टर्स, वैद्यकीय व्यावसायिक, आरोग्य सेवा कर्मचारी, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, पोलिस दल व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या झटणारे हजारो हात अतिशय तळमळीने काम करत आहेत, हा अनुभव आम्ही घेत आहोत. 

समाजाच्या कठीण परिस्थितीमध्ये येणाऱ्या धोक्यांशी सामना करत निःस्वार्थीपणे काम करणारे गिर्यारोहक सतत कार्यरत राहून समाजापुढे मानवतेचे व संवेदनशीलतेचे उदाहरण पुढे ठेवत आहेत. निसर्गात रमणारे, गडकिल्ल्यांवर भटकंती करणारे, सह्याद्रीच्या अजस्र कातळकड्यांचे आव्हान पेलणारे, अतिउंच शिखरांवर चढाई करून तिरंगा फडकविणारे गिर्यारोहक, साहसवीर या कोरोनाच्या संकटामध्ये आपली आवड बाजूला ठेवून समाजाच्या मदतीला धावून जात आहेत. आपल्या भटकंती, मोहिमा बाजूला ठेवून परिस्थिती रुळावर आणण्यामध्ये आपल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. याचे उदाहरण म्हणजे देशभरात प्रसिद्ध असलेली पन्हाळा-पावनखिंड मोहीम सर्व संस्थांनी रद्द करून मध्यवर्ती समन्वय समितीतर्फे पाच पावलांच्या प्रतीकात्मक मोहिमेचे आयोजन केले. यात पन्हाळा येथील वीर शिवा काशीद पुतळ्यापासून बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापर्यंत मोहीम आखण्यात आली. कोल्हापूरचे गिर्यारोहक डॉ. अमर अडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे घडवून आणले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतीकात्मक मोहीम करून प्रशासनाला मदत करण्याचे सर्वांनी ठरविले आहे. 

फील्डवरील प्रत्यक्ष कामांचे आयोजन, नियोजन, समन्वय करत असताना लॉकडाऊनच्या सुरवातीच्या दिवसांपासून याविषयी जनजागृती करण्याचे काम महासंघ करत आला आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक दिवस घरात अडकलेल्या शहरातील अनेकांना डोंगरदऱ्यात भटकण्याची इच्छा झाली होती. त्यांना ट्रेकिंग, भटकंतीपासून जनजागृतीच्या माध्यमातून प्रवृत्त करण्याचे काम महासंघाने केले. आपणच जर दुर्गम वाड्यावस्त्यांवर जाऊन अनवधनाने का होईना पण कोरोनाचे संक्रमण केले तर त्याचे खूप वाईट व दूरगामी परिणाम होतील. वैद्यकीय सुविधांची वानवा असलेल्या या भागांमध्ये कोरोनाचे संक्रमण हाहाकार माजवू शकते. अशा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकांना भटकंतीपासून थांबविले. यासाठी पारंपरिक माध्यमांबरोबरच सोशल मीडिया, डिजिटल कम्युनिकेशन इत्यादीच्या माध्यमातून जनजागृती केली. त्याचबरोबर लॉकडाऊन-कोरोनानंतर गिर्यारोहण कसे असेल, काय नवीन बदल घडतील, गिर्यारोहकांना काय बदलावे लागेल, गिर्यारोहण-भटकंतीचे आर्थिक परिमाणे कशी बदलतील, राष्ट्रीय स्तरावरील गिर्यारोहणाचे पॉलिसी मेकर्स या बदलांकडे कसे बघतात यांसारख्या अनेक मुख्य विषयांवर ऊहापोह करणारे वेबिनार्स महासंघाने आयोजित केले. यामध्ये राज्यातील व देशातील गिर्यारोहण क्षेत्रातील दिग्गजांबरोबरच जॉन पोर्टर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्गज गिर्यारोहकांनी या वेबिनार्समध्ये सहभाग नोंदविला. हे सर्व वेबिनार्स गिर्यारोहण जगतामध्ये सर्वदूर पसरले. 

सह्याद्री-हिमालयात रमणाऱ्या गिर्यारोहकांना काही महिने विनामोहिमेचे, ट्रेक्सचे गेल्यामुळे मनाचा कोंडमारा होत आहे. मात्र कोरोनाच्या काळामध्ये परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गिर्यारोहकांनी डोंगरात न जाणे स्वीकारले आहे. एरवी तर पावसाळा म्हणजे डोंगरभटक्या गिर्यारोहकांची पर्वणी! पावसाळ्यातील नवचैतन्याचे, नवसर्जनाचे सोहळे अनुभवण्यासाठी गिर्यारोहक डोंगराची वाट धरतात. यावेळी मात्र हे सुख घेता येणार नाही. कोणत्याही अवघड प्रसंगी प्रतिकूलतेवर मत करून पुढे चढाई करण्याची जिद्द असलेला गिर्यारोहक आपल्या संपूर्ण ताकदीने आज महाराष्ट्रामध्ये या कोरोनाला पराभूत करण्यासाठी उभा आहे. याची साक्षच ३६ जिल्ह्यांतील १५०० हून अधिक गिर्यारोहक कोरोना वॉरियर्स आपल्याला देत आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

महासंघाचे काम करत असताना, गिरिप्रेमी संस्थेच्या माध्यमातून गेली ४० वर्षे गिर्यारोहण करत असताना मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे, आपल्या समाजात साहसाचे महत्त्व व त्याचे शिक्षण पुरेसे रुजले नाही. ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंग’च्या माध्यमातून करत आहोत. शालेय जीवनापासून मुलामुलींमध्ये साहस रुजविले तर सशक्त समाज घडेल व त्याचबरोबर कोरोनासारखी अकल्पित संकटे भविष्यात उभी राहिल्यास त्याला धीराने तोंड देऊ शकणारा समाज तयार होईल. 

आजच्या घडीला ज्या प्रसंगी खरोखर माणुसकी दाखविणे अत्यंत महत्वाचे आहे तिथे अनेक जण घराबाहेर पडायचेदेखील धैर्य दाखवत नाहीत. अशा ठिकाणी महासंघाचे कार्यकर्ते जिवाची बाजी लावून समाजासाठी झटत आहेत. डोंगरातील ‘भटका गिर्यारोहक ते फील्डवर काम करणारा योद्धा’ अशा नव्या भूमिकेत जाताना कुठेही नैराश्य, हवालदिलपणा कोणत्याही  गिर्यारोहकाला आला नाही. डिप्रेशन व आत्मविश्वासाचा अभाव यामुळे भयभीत झालेल्या समाजात एका मोठ्या संकटाला सामना करणारे गिर्यारोहक हे गिर्यारोहणातील धाडसी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करते. डोंगरदऱ्यांत, अतिउंच शिखरमाथ्यावर जाताना असलेला अनिश्चितपणा अनुभवण्याची सवय असलेल्या गिर्यारोहकाचे शारीरिक स्वास्थ्याएवढे मानसिक स्वास्थ्य उत्तम असते. यामुळे कणखरता, प्रचंड मानसिक स्थैर्य, प्रतिकूलतेवर मात करण्याची जिद्द या गुणांच्या पाठबळावर गिर्यारोहक हे नेहमीच समाजासाठी अविरतपणे काम करताना पाहून एक गिर्यारोहक म्हणून मला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे लॉकडाऊन असो, चक्रीवादळानंतरचे मदतकार्य असो वा फील्डवर उतरून प्रशासनाला केलेली मदत असो, गिर्यारोहक व साहसवीर सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी खंबीर असलेले गिर्यारोहक ‘कोरोना योद्धा’ म्हणून लढत राहून ‘समर्पण’ या शब्दाचा खरा अर्थ अलगदपणे उलगडत आहेत. 

महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे कार्य 

  • राज्यातील ३६ जिल्ह्यातील १५०० हून अधिक गिर्यारोहक कोविड योद्ध्यांची टास्क फोर्सची सज्जता. 
  • लॉकडाउनच्या काळात व चक्रीवादळानंतर जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य इत्यादींचे योग्य वितरण. एकूण ५००० हून अधिक कुटुंबांना मदत. 
  • पोलिस व स्थानिक प्रशासनाला त्यांच्या गरजेनुसार तत्पर सहाय्य. 
  • निसर्ग चक्रीवादळानंतर सह्याद्रीतील दुर्गम भागांमध्ये आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी तातडीने समन्वय केंद्राची स्थापना. 
  • लॉकडाउन तसेच कोरोनानंतरचे गिर्यारोहण या संदर्भामध्ये प्रबोधन. विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या वेबिनार्सचे आयोजन. सोशल मीडिया, पारंपरिक मीडिया यांच्या माध्यमातून लाखो लोकांशी कनेक्ट.

संबंधित बातम्या