तस्मैं श्री गुरुवे नमः

योगेश बोराटे
सोमवार, 14 डिसेंबर 2020

विशेष

गुरु वंदना हा आपल्याकडचा एक महत्त्वाचा संस्कार. अगदी बालपणापासूनच कानावर पडणारा ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः’ हा श्लोक प्रत्यक्षात आचरणातही आणायचा असतो, हे हळूहळू आपल्याला समजू लागते. मात्र, इतर सर्वच संस्कारांप्रमाणे अलीकडच्या काळात या संस्काराशी संबंधित आचरणही केवळ सेलिब्रेशन पुरते मर्यादीत होऊन गेल्याचे जाणवत रहाते. गुरुपौर्णिमा असो, राष्ट्रीय शिक्षण दिन असो, की मग शिक्षक दिन, त्यातला नेमका फरक न कळताही आपल्याकडे त्यासाठीच्या सेलिब्रेशनचे सुसंस्कारित संदेश प्रसारित व्हायला सुरुवात होते. बरं, मुद्दा हा केवळ संस्कार आणि संस्कृतीशीच संबंधित आहे, असेही नाही. शिक्षकी पेशाशी संबंधित असणाऱ्यांविषयी आपल्या समाजात असणारे गांभीर्य आणि त्यांच्या कामाला दिली जाणारी प्रतिष्ठा यांच्याबाबत निर्माण होत असलेले प्रश्नचिन्हही सध्या एकूणच शिक्षण क्षेत्रासाठी काहीसे त्रासदायक ठरणारे वास्तव आहे. आता ही केवळ आपल्याकडचीच परिस्थिती आहे, असे कोणाला वाटत असेल, तर ते तितकेसे खरे नाही बरं. जगभरात इतर देशांमध्येही काहीसे असेच चित्र गेल्या काही काळात निर्माण झाले होते. आणि त्यामुळेच की काय, शिक्षकांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी केवळ राज्य वा राष्ट्रीय पातळीवरूनच नाही, तर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही वेगळे प्रयत्न सुरू करण्याची एक गरज निर्माण झाली असावी. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी येथील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक असणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना मिळालेला ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड’ हे अशाच प्रयत्नांचे एक स्वरूप म्हणून सध्या आपल्यासमोर आले आहे. 

इंग्लंडमधील वर्की फाउंडेशन २०१४ सालापासून दरवर्षी जगभरातील एका शिक्षकाला ग्लोबल टीचर अवॉर्ड देऊन सन्मानित करत आहे. फाउंडेशनतर्फे त्यासाठी सुनियोजित प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेसाठी जगभरातील शिक्षक आपापल्या प्रस्तावांसह त्यांची कामगिरी फाउंडेशनकडे पाठवतात. सुरुवातीच्या टप्प्यात आलेल्या सर्व प्रस्तावांमधून पन्नास उत्कृष्ट प्रस्तावांची निवड केली जाते. त्यातून १० सर्वोत्कृष्ट प्रस्तावांचा अंतिम फेरीसाठी विचार केला जातो. या अखेरच्या टप्प्यातील प्रस्तावांमधून एका प्रस्तावाची ग्लोबल टीचर अॅवॉर्डसाठी निवड होते. यंदा डिसले यांचा प्रस्ताव त्यासाठी निवडला गेला. असा पुरस्कार मिळणारे ते पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. पुरस्काराच्या रुपाने आपल्याला मिळालेल्या जवळपास सात कोटी रुपयांच्या पुरस्कारापैकी निम्मी रक्कम अंतिम फेरीतील उर्वरित नऊ शिक्षक- स्पर्धकांना देणारे डिसले सर केवळ कामाच्या बाबतीतच नाही, तर दातृत्त्वाच्या बाबतीतही इतरांपेक्षा वेगळे ठरले आहेत. वर्की फाउंडेशनच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली या संबंधित प्रस्तावांची झलक सध्या ही बाब अधोरेखित करणारी ठरते आहे. त्याच अनुषंगाने या पुरस्कारासाठीची निवड प्रक्रिया, त्यासाठीची पात्रता, यापूर्वी हा पुरस्कार जिंकणारे जगभरातील इतर शिक्षक हे सारेच मुद्दे शिक्षकी पेशाविषयीची तुमची- आमची समज आणि त्याविषयीची जाण अधिक व्यापक करण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहेत.     

शिक्षकांच्या कार्याचा समाजावर सकारात्मक परिणाम होतो, केवळ स्थानिकच नाही, तर राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरही त्याचा व्यापक परिणाम दिसून येत असतो, ही वर्की फाउंडेशनच्या या पुरस्कारामागची एक मूलभूत प्रेरणा ठरते. पुरस्कारांची सुरुवात करण्यापूर्वी फाउंडेशनने जगभरातील एकवीस देशांमध्ये शिक्षकांच्या कार्याविषयीचे एक सर्वेक्षण केले होते. त्या आधारे झालेल्या संशोधनातून फौंडेशनने ग्लोबल टीचर स्टेटस इंडेक्स रिपोर्ट जगासमोर मांडला होता. जगभरात शिक्षकांच्या कार्याला मिळणारे महत्त्व कमी झाल्याचे चित्र समोर आले होते. हे महत्त्व वाढविण्याच्या हेतुने फाउंडेशनने ग्लोबल टीचर प्राइज हा जागतिक पातळीवरील पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. त्या आधारे गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत शिक्षकांच्या कार्याविषयीची सकारात्मकता वाढविण्याचा हेतू फौंडेशनने समोर ठेवत आपले काम सुरू ठेवले आहे. डिसले यांच्यापूर्वी हा पुरस्कार मिळालेल्या जगभरातील इतर पुरस्कार विजेत्यांच्या कार्यावर एक नजर टाकली, तरी आपल्याला या पुरस्काराचे आणि ते मिळविणाऱ्या जगभरातील शिक्षकांचे महत्त्व सहजच समजून घेता येते. पुरस्काराच्या पहिल्याच वर्षी, २०१४ साली जगभरातील १२७ देशांमधून पाच हजारांहून अधिक प्रस्ताव फाउंडेशनकडे आले होते. यंदा, २०२० मध्ये त्यासाठीच्या स्पर्धेत १२ हजारांहून अधिक प्रस्ताव होते. तसेच, या पुरस्कारामुळे जवळपास ४० देशांमध्ये संबंधित शिक्षकांचे काम गौरविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील विशेष पुरस्कारांचीही सुरुवात झाली आहे, ही या स्पर्धेची सकारात्मक बाजू ठरते.

अमेरिकेतल्या नॅन्सी अटवेल या शिक्षिकेला २०१५ साली या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘इन द मिडल’ या पुस्तकाची लेखिका असणाऱ्या नॅन्सी यांनी लेखन- वाचन प्रक्रियांच्या मदतीने इंग्रजीचे धडे देणारी पद्धत आपल्या विद्यार्थ्यांसाठी वापरली. त्यातूनच पुढे त्यांचे अनेक विद्यार्थी आता लेखक – प्रकाशक म्हणून पुढे येऊ लागले आहेत. आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्या आता शिक्षणाच्या क्षेत्रात आपले काम करत आहेत. पॅलेस्टाईनमधील युद्धग्रस्त भागात शालेय शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या हनन अल रोऊब या शिक्षिकेला २०१६ साली या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘वुई प्ले अँड लर्न’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपले शैक्षणिक प्रयोग जगासमोर मांडले आहेत. युद्धग्रस्त विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठीचे त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे त्या प्रदेशामध्ये साक्षरतेचे महत्त्व वाढीस लागण्याची बाब पुरस्कार निवड समितीसाठी महत्त्वाची ठरली होती. मॅगी मक्डोनेल या कॅनडामधील शिक्षिकेला २०१७ साली ग्लोबल टीचर अॅवॉर्डने गौरविण्यात आले होते. कॅनडामधील मूळ स्थानिक नागरिकांच्या शिक्षणासाठी आग्रही भूमिका घेत काम करणारी शिक्षिका, ही त्यांची ओळख. कॅनडाच्या अतिदुर्गम भागामध्ये शिक्षणप्रसाराचे काम करतानाच त्यांनी मुलींसाठी  जीवनावश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमाची निर्मिती केली आणि त्या विषयीचे प्रशिक्षणही सुरू केले. विद्यार्थ्यांसोबतच स्थानिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हेल्थ सेंटरचीही सुरुवात त्यांनी केली होती. 

प्रचंड मोठे वैविध्य असणाऱ्या गटांना एकत्रितपणे शिकविणे हे तसे मोठे आव्हानाचेच काम. मात्र त्याही परिस्थितीत केवळ शिकविण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थी- विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम अँड्रिया झफिराकौ यांनी करून दाखवले आहे. त्यांना वर्की फाउंडेशनने २०१८ सालच्या पुरस्काराने गौरविले. युनायटेड किंग्डममधील ही शिक्षिका वांशिकदृष्ट्या प्रचंड मोठे वैविध्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटांसाठी विविध कलांचे शिक्षण- प्रशिक्षण देते. असे वैविध्य असणाऱ्या गटांमधून शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपलेसे वाटू शकतील, असे अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी अँड्रिया यांनी पेलली. केवळ स्वतःच्या विषयापुरते मर्यादीत न राहता, त्यांनी इतर सर्व विषयांचे अभ्यासक्रमही त्याच पद्धतीने तयार करून दिले. ‘आर्टिस्ट इन रेसिडन्स’ सारख्या अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांसाठी चौकटीबाहेरच्या जगातून शैक्षणिक उपक्रमांची आखणी करत आहेत.  त्या पाठोपाठ फाउंडेशनने केनियामधील ग्रामिण भागातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देणाऱ्या पीटर तबैची या शिक्षकाला २०१९ सालच्या ग्लोबल टीचर अॅवॉर्डने गौरविले. आपल्या पगारामधून गरिबांना मदत करण्यासोबतच विद्यार्थ्यांसोबत विज्ञानाचे नानाविध प्रकल्प करण्यामध्ये स्वतःला गुंतवून घेणारा हा शिक्षक आहे. विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये स्वतः गुंतवून घेणाऱ्या या शिक्षकाचे विद्यार्थी हे केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील विज्ञानविषयक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करू लागले आहेत. गणित आणि विज्ञानामध्ये गती नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वेळेव्यतिरीक्तचा वेळ विशेष शिकवणी घेऊन त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांची शालेय कामगिरी उंचावण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठीही त्यांचे काम उपयुक्त ठरल्याची नोंद फाउंडेशनने घेतली आहे. अशाच शिक्षकांच्या यादीत आता मराठमोळ्या रणजितसिंह डिसले या शिक्षकाच्या नावाची नोंद झाली आहे. 

या सर्वांचे काम पाहिले, तरी लक्षात येणारी बाब म्हणजे या प्रत्येकाचे वेगळेपण. शिक्षकांच्या कार्यामधील हे वेगळेपण टिपण्यासाठी फाउंडेशनने या पुरस्कारासाठी पात्र व्यक्तीच्या निवडीसाठी काही महत्त्वाचे निकष घालून दिले आहेत. त्यानुसार जागतिक पातळीवर शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा या पुरस्कारासाठी विचार होतो. त्यांची शिकवण्याची पद्धत ही केवळ त्यांच्यापुरतीच मर्यादीत राहणारी न ठरता ती इतरत्रही तितक्याच चांगल्या पद्धतीने वापरता येईल, त्यामध्ये अधिक वाढ करता येईल, अशी असावी ही शिक्षकांसाठीची एक महत्त्वाची अट आहे. संबंधित शिक्षकाच्या शिकविण्याच्या पद्धतीमध्ये केवळ शालेय पातळीवरच नव्हे, तर सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवरही सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद असणे अपेक्षित आहे. त्यातून शालेय शिक्षणामध्ये निर्माण झालेल्या आव्हानांवर या शिक्षकांनी मात केलेली असावी. इतकंच नाही, तर त्या पद्धतींच्या वापरामधून तसे घडत असल्याची उदाहरणेही संबंधित शिक्षकांनी आपल्या प्रस्तावातून निवड समितीसमोर मांडणे फाउंडेशनला अपेक्षित असते. प्रस्ताव सादर करणाऱ्या शिक्षकांनी अध्यापन पद्धतींच्या बाबतीत केवळ आपला वर्ग वा शाळेपुरते मर्यादीत न राहता, इतर सहकारी आणि समाजासमोर एक आदर्श उदाहरण म्हणून समोर येणे फाउंडेशनला अपेक्षित असते. विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक शिक्षक आणि अभ्यासापुरते मर्यादीत न ठेवता, त्यांना त्यापलीकडे नेत जागतिक पातळीवर सुजाण नागरिक म्हणून घडविण्यासाठी आवश्यक असणारी मूल्ये या शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे फाउंडेशनला अपेक्षित आहे. आपल्यासारख्याच इतर शिक्षकांना सहकार्य करत, त्यांच्या अडचणी दूर करत एकूण शैक्षणिक क्षेत्राच्या गुणवत्तेची पायरी उंचावणारी कामगिरी या शिक्षकांनी करणे हीसुद्धा फाउंडेशनच्या या पुरस्कार मिळविण्याच्या प्रक्रियेमधील एक प्रमुख अट आहे. या शिवाय सरकारी पातळीवरून शिक्षकांच्या कार्याची घेतली जाणारी दखल, शिक्षक प्रशिक्षणासाठी कार्यरत संस्थांमधून त्यांच्या कार्याची घेतली गेलेली नोंद आदी मुद्देही या पुरस्काराच्या निवड समितीकडून विचारात घेतले जातात. 

मुळात समाजामध्ये शिक्षकांचे महत्त्व हे एखाद्या निष्णात डॉक्टरइतकेच असल्याचे वर्की फाउंडेशन ही संस्था मानते. त्या अनुषंगाने या पुरस्काराच्या माध्यमातून केवळ शिक्षकांचेच नाही, तर समाजाचेही शिक्षकी पेशाविषयीचे मत सकारात्मक पद्धतीने विकसित करण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. डिसले यांच्या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे शिक्षकांविषयी, त्यांच्या कार्याविषयी घडून आलेल्या चर्चांचा रोख पाहिल्यास, फाउंडेशनचा तो उद्देश काही प्रमाणात सफल झाला असल्याचे आपण म्हणू शकतो. वास्तविक ही बाब एक वेगळी सुरुवात म्हणूनच आपण विचारात घ्यायला हवी. शिक्षणाच्या क्षेत्राविषयीची ही सकारात्मक चर्चा आपल्याकडील शिक्षकांच्या आणि पर्यायाने शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकते. शिक्षकांचे कार्य केवळ लाखमोलाचे नसून, ते आता कोटीच्या कोटींची उड्डाणेही घेऊ शकतात, हेच या पुरस्काराच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे. पारंपरिक साच्यामधील शिक्षकांविषयीच्या कल्पना बदलण्याची ही सुरुवात व्यापक सामाजिक बदलांसाठीही तितकीच प्रेरणादायी ठरणारी आहे. 

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या
संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात सहायक प्राध्यापक आहेत.) 

 

-----------------------------------------------------------------------------------------------

ग्लोबल प्राथमिक शिक्षक

सूर्यकांत बनकर

युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या सात कोटी रुपयांच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी रणजीतसिंह डिसले यांच्या नावाची घोषणा अभिनेते स्टीफन फ्राय यांनी केली आणि संगणकाद्वारे या पुरस्कार सोहोळ्याला आपल्या कुटुंबासमवेत हजर असणाऱ्या मराठमोळ्या डिसलेंच्या घरातले वातावरण एका क्षणात बदलून गेले. आपले नाव ऐकल्यावर आनंदातिरेकाने आपल्या आई-वडिलांना मिठीत सामावून जाणाऱ्या डिसलेंबरोबर तो क्षण जगभरात अनेकांनी अनुभवला. हा आनंदाचा क्षण लगेचच सोशल मीडियावर व्हायरलही झाला.

सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करणाऱ्या डिसले गुरुजींचा ग्लोबल टीचर पुरस्कारापर्यंतचा प्रवासही तितकाच खडतर आहे. शून्यातून विश्व निर्माण करणे काय असते, याचे रणजीतसिंह डिसले हे मूर्तिमंत उदाहरण आहे. पडून गेलेल्या, शेळ्या बांधायला वापरल्या जाणाऱ्या जागेला विद्येचे मंदिर बनविताना त्यांनी फक्त विद्यार्थीच घडविले असे नाही तर शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या क्रांतिकारक बदलांची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षणतज्ज्ञांनी घेतली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील साकत ह्या छोट्याशा गावातला रणजीतसिंह डिसले नावाचा एक युवक २००९ साली माढा तालुक्यातील परितेवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाला. शाळेची अवस्था पाहिल्यावर खचून न जाता या ताज्या दमाच्या शिक्षकाने प्राप्त परिस्थितीला सामोरे जात झोकून देवून काम करण्याचा निश्चय केला. सुरुवात झाली पालकांच्या प्रबोधनापासून. शेतात कामाला जाणाऱ्या, गुरांच्या मागे जाणाऱ्या मुलांना डिसले गुरुजींनी घरोघरी जाऊन, वेळप्रसंगी अगदी शेतामध्ये जाऊन गाडीवर बसवून शाळेत आणले. मुलं शाळेत रमली पाहिजेत म्हणून पहिले सहा महिने त्यांनी पुस्तकाला हातही लावला नाही. आपल्या मोबाईल व लॅपटॉपच्या साह्याने त्यांनी मुलांना गाणी, गोष्टी, कार्टून यामध्ये रमवून ठेवले. ज्या शाळेची जागा जनावरांनी घेतली होती तेथे तब्बल आठ महिन्यांनतर वर्ग भरायला सुरुवात झाली. 

अलार्म ऑन, टीव्ही ऑफ सारख्या अनोख्या उपक्रमातून डिसले गुरुजींनी मुलांच्या शैक्षणिक प्रवासात मुलांच्या पालकांनाही सामावून घेतले. तंत्रज्ञानाची गोडी असल्याने उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांसाठी कसा करता येईल या प्रयत्नात असणाऱ्या डिसले यांना क्यूआर कोड वापराची कल्पना सुचली. आज तब्बल अकरा देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या पद्धतीमागे विचार होता तो विद्यार्थ्यांना अधिकाधिक समृद्ध करण्याचा. नऊ विद्यार्थ्यांच्या सहभागाने सुरू झालेली, पाठ्यपुस्तकांतील शिक्षणाला जोड देणारी डिसले यांची क्यूआर कोड पद्धत २०१५मध्ये इयत्ता सहावीच्या क्रमिक  पुस्तकांमध्ये समाविष्ट झाली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यावर महाराष्ट्र शासनाने संपूर्ण अभ्यासक्रमात या पद्धतीचा समावेश केला.

वृक्ष संवर्धनासाठी अराऊंड द वर्ल्ड’ सारखा उपक्रम आणि ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ आणि देशोदेशीच्या विद्यार्थ्यांना आपापसांत संवाद साधण्यास मदत करणाऱ्या ‘पीस आर्मी’ सारखे प्रयत्नांतूनही डिसले यांचे वेगळेपण अधोरेखित होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मानसन्मानांचे मानकरी असणारे डिसले सर मायक्रोसॉफ्ट, गुगल, ब्रिटिश कौन्सिल, प्लिपग्रीड, प्लीकेर्स, यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत जोडलेले आहेत. सत्याऐंशी देशांमधल्या ३००हून अधिक शाळांमधील मुलांपर्यंत पोचणाऱ्या ‘व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप’ या शैक्षणिक प्रयोगातही त्यांचा सहभाग आहे

संबंधित बातम्या