गोल्डन हॅटट्रिकवीर 'बलबीर'

किशोर पेटकर
रविवार, 7 जून 2020

क्रीडांगण
 

हॉकीमध्ये हिरवळीच्या मैदानावर कौशल्य प्रदर्शित होत असताना, भारताने या चपळ खेळात देदीप्यमान यश संपादन केले. हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांनी अफलातून खेळीने संपूर्ण जगास थक्क केले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ध्यानचंद यांनी अजरामर केलेल्या पायवाटेने काही वर्षे भारतीय हॉकीपटू गेले. यात सर्वांत आघाडीवर बलबीर सिंग राहिले. त्यांचे पूर्ण नाव बलबीर सिंग दोसांझ, भारतीय हॉकीत बलबीर नावाचे अन्य खेळाडू असल्याने बलबीर सिंग सीनियर या नावानेच ते नंतरच्या काळात ख्यातनाम झाले. आयुष्यातील वयाचे शतक पूर्ण करण्यास चार वर्षे बाकी असताना हॉकीतील `पितामह` बलबीर यांचे निधन झाले. १९४८ मध्ये लंडन, १९५२ मध्ये हेलसिंकी, १९४८ मध्ये मेलबर्न येथे ऑलिंपिक स्पर्धेत भारताने हॉकीत सुवर्णपदक जिंकले. या तिन्ही वेळच्या स्पर्धेत बलबीर यांची कामगिरी अविस्मरणीय ठरली. साहजिकच त्यांच्या कारकिर्दीस `द गोल्डन हॅटट्रिक` संबोधले गेले. ब्रिटिशांच्या जोखडातून देश स्वतंत्र होऊन वर्षभराचा काळ लोटत आला होता. १२ ऑगस्ट १९४८ रोजी हॉकी संघाने साऱ्या देशवासीयांची मान ताठ करणारी भारी कामगिरी बजावली. जिगरबाज भारतीय संघाने आंग्ल भूमीत वेम्बली स्टेडियमवर ऑलिंपिक हॉकी सुवर्णपदकाची कमाई केली, तेव्हा ग्रेट ब्रिटन संघाचा ४-० फरकाने धुव्वा उडविला, त्यात बलबीर यांचे दोन गोल होते. बलबीर यांचे वडील दलिप सिंग दोसांझ स्वातंत्र्य सैनिक होते. लहान असताना बलबीर आपल्या वडिलांना नेहमीच स्वातंत्र्याचा अर्थ विचारत असत. त्यावेळी वडील सांगायचे, की स्वतःची ओळख, ध्वज आणि अभिमान म्हणजेच स्वातंत्र्य, जे ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीयांसाठी दुर्लभ होते. १९४८ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर हजारोंच्या संख्येतील प्रेक्षकांच्या साक्षीने वेम्बली स्टेडियमवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकताना पाहून बलबीर यांना स्वातंत्र्याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. `तो माझ्यासाठी आणि देशवासीयांसाठी अतिशय अभिमानास्पद क्षण होता. जेव्हा राष्ट्रगीत वाजू लागले आणि देशाचा ध्वज उंचावला जाऊ लागला, तेव्हा मी उडत असल्याची भावना होती,` असे बलबीर एका मुलाखतीत म्हणाले होते. 

देशाभिमानी आणि संघभावनेचा भोक्ता
भारताने लंडन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले, तेव्हा बलबीर संघातील नवोदित खेळाडू होते, संघात स्थान मिळविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. अर्जेंटिनाविरुद्धच्या लढतीत भारताने ९-१ असा दणदणीत विजय मिळविला, त्यात पदार्पण करणाऱ्या सेंटर-फॉरवर्ड बलबीर यांनी सहा गोल करून आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले. १९५२ मधील हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये ते संघाचे उपकर्णधार होते. अंतिम लढतीत भारताने नेदरलँड्सचा ६-१ फरकाने धुव्वा उडविला, त्यात बलबीर यांनी पाच गोल डागले. ऑलिंपिक हॉकीच्या अंतिम लढतीत सर्वाधिक वैयक्तिक गोल करण्याचा हा विक्रम अबाधित आहे. देशाच्या फाळणीनंतर भारताचे प्रतिनिधित्व केलेले काही हॉकीपटू पाकिस्तानात गेले. त्यामुळे संघाची ताकद घटली होती. आपले सहकारी दुसऱ्या देशाकडून खेळतात ही जाणीव बलबीर यांना टोचत होती, पण त्यांनी खेळावर सारे लक्ष केंद्रीत करत देशाचा लौकिक वाढविण्यावर भर दिला. आपल्यामुळे देशाने नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली. १९५६ मध्ये मेलबर्न इथे भारताने पुन्हा हॉकीत सुवर्ण कमाई करताना पाकिस्तानचा पाडाव केला, तेव्हा बलबीर कर्णधार होते. ऑलिंपिकमधील यशाचे श्रेय त्यांनी कधी स्वतः एकट्याने घेतले नाही. उत्कृष्ट सांघिक कामगिरीमुळे सुवर्णपदकापर्यंत मजल शक्य झाल्याचे ते प्रांजळपणे सांगत. निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षक-व्यवस्थापक या नात्यानेही भारतीय हॉकीत उल्लेखनीय योगदान दिले. ते संघव्यवस्थापक असताना १९७५ मध्ये भारताने हॉकी विश्वकरंडक जिंकला, तेव्हा त्यांनी खेळाडूंचे कौतुक करताना, साऱ्यांनी संयुक्तपणे, एकजुटीने मेहनत घेतल्यामुळे यश साध्य झाल्याची प्रतिक्रिया दिली होती. हॉकी हा सांघिक खेळ आहे आणि संघाशिवाय आपण यश प्राप्त करूच शकलो नसतो ही भावना त्यांनी प्रामाणिकपणे जपली.

जादूची कांडी...
पंजाबमधील हरीपूर खालसा येथे जन्मलेल्या बलबीर यांना दोन ऑलिंपिकमध्ये (१९५२ व १९५६) भारताचा ध्वजधारक होण्याचा बहुमान मिळाला. त्यांच्या हातातील हॉकी स्टीकला कौतुकाने जादूची कांडी संबोधले जात असे. भारताचे ६१ सामन्यांत प्रतिनिधित्व करताना त्यांनी २४६ गोल नोंदविले. गुणवत्तेच्या बळावर हेलसिंकीत आपल्या शर्टवरील १३ क्रमांकाचा आकडाही शूभ ठरविला. तीन ऑलिंपिकमधील आठ सामन्यांत २२ गोल करून आगळी छाप पाडली. १९५७ मध्ये ते पद्मश्रीने सन्मानित झाले, हा गौरवप्राप्त झालेले ते पहिले क्रीडापटू ठरले.

संबंधित बातम्या