मुदतवाढीची `राष्ट्रीय स्पर्धा`

किशोर पेटकर
रविवार, 7 जून 2020

क्रीडांगण

वारंवार लांबणीवर पडलेल्या गोव्यातील ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे भवितव्य अजूनही धूसरच आहे. चार वर्षांत सहा वेळा मुदतवाढ मिळालेल्या या स्पर्धेस आता कोरोना विषाणू महामारीने ग्रासले आहे. कोविड-१९ चा देशव्यापी उद्रेक लक्षात घेत, यावर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत नियोजित असलेली स्पर्धा गोवा सरकारने बेमुदत काळासाठी लांबणीवर टाकली. देशातील मोठ्या राज्यातील कोरोना विषाणूचा उपद्रव लक्षात घेता, संबंधित राज्यातील क्रीडापटू राष्ट्रीय स्पर्धेसाठी ऑक्टोबरपर्यंत सज्ज होतील का याबाबत साशंकता होती. लॉकडाउन ४.० मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वांसह शरीर संपर्क नसलेल्या खेळांच्या सरावास परवानगी दिली. क्रीडा संकुले, स्टेडियम खुली करण्यास मान्यता मिळाली, पण सराव वेग पकडू शकला नाही. क्रीडापटू, प्रशिक्षक, क्रीडा संघटनांचे प्रशिक्षक कोरोना विषाणूमुळे धास्तावलेले आहेत. कोविड-१९ मुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून देशात क्रीडा स्पर्धा घेण्यास इतक्या लवकर मंजुरी मिळण्याची शक्यता कमीच आहे, तसे स्पष्टही करण्यात आले आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा म्हटले, की खेळाडूंचा प्रवास, निवास आदी बाबी महत्त्वाच्या असतात, त्यावर कोरोना विषाणूचे सावट असताना स्पर्धा घेणे म्हणजे आत्मघातच, यामुळेच गोवा सरकारनेही धाडस टाळले. स्पर्धा यावर्षीच घ्यावी यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) घोडे दामटत होते, पण गोवा सरकारने आयओएला बाजूस ठेवत ऑक्टोबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा घेण्यास रेड सिग्नल दाखविला.

टोकियो ऑलिंपिकचे अनुकरण
जपानमधील टोकियोत यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये ऑलिंपिक स्पर्धा रंगणार होती. कोविड-१९ वर अजून लस आलेली नाही, त्यामुळे मानवाचे जीवन संकटातच आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे आता टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढील वर्षी २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होईल. पुढील वर्षी ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑलिंपिक स्पर्धा झाली नाही, तर रद्द करावी लागेल असे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी सूचित केले आहे. जपान सरकारही कोविड-१९ च्या सावटाखाली ऑलिंपिक घेण्यास तयार नव्हते. हाच मुद्दा पकडून ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्याचे स्पष्टच आहे. खेळाडूंच्या आरोग्याशी खेळ न खेळता गोवा सरकारने स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकत असल्याची घोषणा केली. राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी सुवर्णसंधी असलेली ही स्पर्धा कधी होईल याबाबत शाश्वती नाही. कदाचित टोकियो ऑलिंपिकनंतर ही स्पर्धा खेळली जाऊ शकते. ऑलिंपिकपूर्वी राष्ट्रीय स्पर्धा घेण्यास आयओए परवानगी देण्याची शक्यता खूपच कमी आहे, कारण ऑलिंपिक खेळणाऱ्या भारतीय क्रीडापटूंस टोकियोतील स्पर्धेपूर्वी काही महिने अगोदर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मैदानात उतरविण्याचा धोका आयओए पत्करेल असे वाटत नाही.

पुढे ढकलण्याची परंपरा
स्पर्धा लांबणीवर पडण्यास खरे म्हणजे गोवा सरकारही जबाबदार आहे. २००८ मध्ये यजमान करारपत्रावर सही करूनही गोव्याला सज्ज होता आले नाही. साधनसुविधांच्या पूर्ततेच्या अभावामुळे वेगवेगळी कारणे देत २०१६ पासून गोव्याने ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकली. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये घेण्याचे ठरल्यानंतर पुन्हा एकदा गोव्याने मुदतवाढ पदरी पाडून घेतली. आताही सर्व तयारी झालीच नव्हती, ३० ऑगस्टपर्यंत गोवा सरकारने वेळ मागितला होता, पण त्यापूर्वीच कोविड-१९ मुळे स्पर्धा लांबणीवर टाकण्याची आयती संधी साधली. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाद्वारे ''खेलो इंडिया यूथ गेम्स'' घेतली जाते. २०१८ पासून सलग तीन वर्षे ही स्पर्धा युवा क्रीडापटूंसाठी सुवर्णसंधी ठरली आहे. दिल्ली, पुणे व गुवाहाटीत झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत शालेय क्रीडापटूंनी कौशल्य प्रदर्शित करत पदके जिंकली, पण आयओएच्या मान्यतेने होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनात आडकाठी येत आहे हे खेळाडूंचे दुर्दैवच आहे. राष्ट्रीय स्पर्धा ठरलेल्या वेळेतच व्हायला हवी हे मत मागे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले होते, तर दर दोन वर्षांनी स्पर्धा घेण्यासाठी आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा प्रयत्नशील आहेत. मात्र, गोव्यातील स्पर्धेला मुहूर्तच सापडत नसल्यामुळे पुढील तीन स्पर्धेसाठी यजमान असलेल्या अनुक्रमे छत्तीसगड, उत्तराखंड, मेघालय या राज्यांची घालमेल सुरू आहे. शेवटची राष्ट्रीय स्पर्धा २०१५ ला केरळमध्ये झाली होती, त्यानंतर पाच वर्षे उलटली, पण गोव्याची स्पर्धेचे शिवधनुष्य पेलताना दमछाक झालेली आहे. यापूर्वी १९८७ मध्ये केरळ इथे स्पर्धा झाल्यानंतर सात वर्षांनी पुणे-मुंबईत १९९४ मध्ये स्पर्धा झाली होती. आंध्रनंतर (२००२) आसामात (२००७) स्पर्धा होण्यास पाच वर्षे लागली होती. स्पर्धा लांबल्यामुळे खेळाडूंचे विनाकारण नुकसान होते.

संबंधित बातम्या