भारतीय मार्गदर्शकाची छाप

किशोर पेटकर
सोमवार, 29 मार्च 2021

क्रीडांगण

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय प्रशिक्षक खालिद जमील यांनी अंतरिम मुख्य प्रशिक्षकपद नेटाने पेलताना नॉर्थईस्ट युनायटेडला स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्ले-ऑफ (उपांत्य) फेरी गाठून दिली. 

भारतीय फुटबॉलमध्ये परदेशी मार्गदर्शकांनाच जास्त पसंती मिळते. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील संघ परदेशी प्रशिक्षकांना प्राधान्य देतात. आयएसएल स्पर्धेचा सातव्या मोसमात बहुतेक संघांनी स्पॅनिश प्रशिक्षकांना झुकते माप दिले. तिसऱ्या क्रमांकावरील गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेडचे सुरुवातीचे प्रशिक्षक जेरार्ड नूस हेसुद्धा स्पेनचेच, पण या ३६ वर्षीय युवा मार्गदर्शकाला आयएसएल स्पर्धा अर्ध्यावरच असताना डच्चू मिळाला आणि नंतर एका भारतीय प्रशिक्षकाने कमाल केली. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात खालिद जमील यांनी अंतरिम मुख्य प्रशिक्षकपद नेटाने पेलताना नॉर्थईस्ट युनायटेडला स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्ले-ऑफ (उपांत्य) फेरी गाठून दिली. नूस यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्थईस्टने ११ लढतीतून फक्त १२ गुणांची कमाई केली होती. साखळी फेरीत जमील यांच्या मार्गदर्शनाखाली संघ सहा विजयांसह सलग नऊ सामने अपराजित राहिला, नंतर उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यात एटीके मोहन बागानला गोलबरोबरीत रोखले, मात्र दुसऱ्या टप्प्यात निसटती हार पत्करल्यामुळे जमील यांच्या संघाची मोहीम खंडित झाली, पण या संघाने जबरदस्त आत्मविश्वासाने फुटबॉल खेळत वाहव्वा मिळविली.

पहिले भारतीय प्रशिक्षक
आयएसएल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारे ‘पहिले भारतीय प्रशिक्षक’ हा मान खालिद जमील यांच्या नावे नोंदवला गेला आहे. व्यावसायिक प्रशिक्षक परवान्याअभावी पूर्वी भारतीय प्रशिक्षकांना आयएसएल स्पर्धेत मार्गदर्शकाची भूमिका निभावणे शक्य होत नव्हते. आता एएफसी (आशियाई फुटबॉल महासंघ) व्यावसायिक परवाना अधिकृत ठरल्याने भारतीय मार्गदर्शक आयएसएल संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी पेलू शकतात. जमील यांचे कौतुक करायलाच हवे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गोव्यात जैवसुरक्षा वातावरणात आयएसएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जमील यांना कोरोना विषाणूने ग्रासले. आजार बळावल्यामुळे त्यांना पणजीजवळील रुग्णालयातही दाखल करावे लागले होते. नंतर त्यांनी कोविड-१९वर मात केली व प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर नूस यांचे साहाय्यक या नात्याने फुटबॉल मैदानावर उतरले, नंतर अंतरिम जबाबदारीही समर्थपणे निभावली. 

प्रशिक्षणातील गाढा अनुभव
जमील येत्या २१ एप्रिलला ४४वा वाढदिवस साजरा करतील. त्यांच्यापाशी फुटबॉल प्रशिक्षणाचा गाढा अनुभव आहे. जमील यांचा जन्म आखातातील कुवेतमधील. त्यांनी भारताचे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये, तसेच खेळाडू या नात्याने मुंबईतील महिंद्र युनायटेड, एअर इंडिया या संघांचे प्रतिनिधित्व केले. मुंबई एफसीचे प्रशिक्षक नात्याने त्यांनी कारकिर्दीतील नव्या इनिंगला सुरुवात केली व त्यात ते सफल ठरले. २०१६-१७ मोसमात त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिझोरामच्या ऐजॉल एफसीने आय-लीग स्पर्धा जिंकली. नंतर त्यांनी कोलकात्यातील ईस्ट बंगाल व मोहन बागान या मातब्बर संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले. नॉर्थईस्ट युनायटेडच्या सेवेत ते २०१९ पासून आहेत.

संबंधित बातम्या