काळवंडलेला चिनी जलतरणपटू

किशोर पेटकर
सोमवार, 16 मार्च 2020

क्रीडांगण
 

चीनचा ऑलिंपिक, जागतिक विजेता जलतरणपटू सून यँग याला महान मानावे का? या प्रश्नावर होय आणि नाही ही परस्परविरोधी उत्तरे देता येतील. ऑलिंपिक आणि जागतिक जलतरण स्पर्धेतील त्याची कामगिरी देदीप्यमान आहे आणि डोपिंगप्रकरणी शिक्षा झाल्यामुळे त्याची कारकीर्द काळवंडलेली आहे. सून यँगचे प्रतिस्पर्धी त्याला `चीटर` मानतात, त्याचा अजिबात आदर करत नाहीत. त्यास कारणही आहे, सून यँग २०१४ मध्ये सर्वप्रथम उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळला होता. त्याच्या शरीरात बंदी असलेल्या द्रव्याचे अंश सापडले होते. त्यावेळी सून यँगवर तीन महिन्यांचे निलंबन लादण्यात आले होते. हृदयावरील औषधामुळे बंदी असलेले द्रव्य शरीरात गेल्याचा दावा या अव्वल चिनी जलतरणपटूने केला. आता पुन्हा एकदा डोपिंगप्रकरणी दोषी आढळल्यामुळे २८ वर्षीय सून यँग याच्यावर आठ वर्षांची बंदी लादण्यात आली आहे. क्रीडा लवाद न्यायालयाने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. या निकालाविरुद्ध क्रीडा लवादाचे मुख्यालय असलेल्या स्वित्झर्लंडमधील सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे सून यँग याने ठरविले आहे. क्रीडा लवाद न्यायालयात या चिनी जलतरणपटूवर गंभीर आरोप ठेवण्यात आले. रक्ताचे नमुने नष्ट केल्याप्रकरणी त्याला दोषी धरण्यात आले आहे. बचाव करताना तो समर्पक कारण देऊ शकला नाही. सून यँगचे प्रतिस्पर्धी त्याने फसवणुकीद्वारे पदके जिंकल्याचे मानतात. कुठेतरी पाणी मुरत असल्याचे क्रीडा लवादाच्या निकालावरून जाणवते. 

चीनचा विक्रमी जलतरणपटू
जागतिक क्रीडा क्षेत्रात चीनला महासत्ता मानले जाते, पण २०१२ पर्यंत पुरुष जलतरणात चिनी खेळाडू ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकू शकला नव्हता. ही उणीव सून यँगने भरून काढली. २०१२ मध्ये लंडनमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सून यँगने दोन सुवर्णपदकांसह एक रौप्य व एक ब्राँझपदक जिंकले. फ्रीस्टाइलमधील शर्यतीत त्याने दबदबा राखला. लंडनमध्ये तो २०० व १५०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत विजेता ठरला. १५०० मीटर शर्यतीतील त्याचा विक्रम अजूनही अबाधित आहे. २००८ मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये सून यँगने यजमान देशाचे प्रतिनिधित्व केले होते, पण त्याचे अस्तित्व जाणवले नव्हते. २०११ मध्ये शांघायमध्ये झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत त्याने थक्क करणारे जलतरण वर्चस्व राखले, तेव्हा तो १९ वर्षांचा होता. ८०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत तेव्हा ग्रँट हॅकेट याचा विश्वविक्रम मोडून तो प्रकाशझोतात आला होता. २०१९ पर्यंत जागतिक जलतरण स्पर्धांत त्याने एकूण ११ सुवर्ण, २ रौप्य व ३ ब्राँझपदके जिंकून वर्चस्वाचा ठसा उमटविला. २०१४ मध्ये तीन महिन्यांचे निलंबन भोगल्यानंतर सून यँगने २०१६ मधील रिओ द जानेरो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले. रिओ ऑलिंपिकमध्ये तो २०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये विजेता ठरला, तर ४०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये त्याला ऑस्ट्रेलियाच्या मॅक हॉर्टन याने हरविले. दोन ऑलिंपिक स्पर्धांत तीन सुवर्ण, दोन रौप्य व एक ब्राँझपदक जिंकलेला सून यँग हा चीनमध्ये खूपच लोकप्रिय आहे.

आदर गमावला
चँपियन जलतरणपटू या नात्याने सून यँगकडे कौतुकाने पाहिले जाते, मात्र डोपिंगप्रकरणी झालेल्या कारवाईमुळे त्याच्या सोनेरी कारकिर्दीवर शिंतोडे उडाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा जलतरणपटू चॅड ले क्लोस याने त्याला `डर्टी स्विमर` असे हिणवले आहे. चार वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्ये २०० मीटर शर्यतीत सून यँगने चॅडला हरवून सुवर्णपदक जिंकले होते. डोपिंगमध्ये अडकलेल्या चिनी जलतरणपटूने फसवणुकीद्वारे आपला विजय हिरावला ही चॅड याची भावना आहे. रिओ ऑलिंपिकच्या कालावधीत फ्रेंच जलतरणपटू कामिल लॅकाँ यानेही सून यँगवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. रिओत २०० मीटरमध्ये सून यँगला हरविलेल्या मॅक हॉर्टन याने चिनी जलतरणपटू `ड्रग चिट` असल्याचे संबोधले होते. अतिशय प्रतिभाशाली जलतरणपटू असला, तरी तो नेहमीच वादग्रस्त ठरला. २०१४ मधील आशियायी क्रीडा स्पर्धेत जपानच्या राष्ट्रगीताबद्दल अनुदगार काढल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यापूर्वी वाहन चालक परवाना नसताना गाडी चालवून अपघात घडविल्याबद्दल त्याला पोलिस कोठडीची हवा खावी लागली होती. २०१३ मध्ये त्याने आपल्या दीर्घकालीन प्रशिक्षकाशी भांडण उकरून काढले. या प्रतिभावान जलतरणपटूची कारकीर्द वादामुळे डागळली. आता आठ वर्षांची बंदी आल्यामुळे सून यँगच्या टोकियो ऑलिंपिक स्वप्नाला तडा गेला असून कारकीर्दही संपल्यातच जमा आहे.

संबंधित बातम्या