‘करोडपती’ वरुण!

किशोर पेटकर
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

क्रीडांगण
 

इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेतील २०१९ च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव झाला. त्यात एका ‘अनोळखी’ क्रिकेटपटूस कोट्यवधीचा भाव मिळाला. वरुण चक्रवर्ती हे या २७ वर्षीय क्रिकेटपटूचे नाव. फिरकी गोलंदाज ही त्याची तमिळनाडू क्रिकेट वर्तुळातील ओळख. या राज्याबाहेर तो परिचित नाही, मात्र किंग्ज इलेव्हन पंजाब फ्रॅंचाईजीने त्याच्यासाठी ८.४ कोटी रुपये मोजले. या अपरिचित खेळाडूंची बोली रक्कम होती फक्त २० लाख रुपये. या नवख्या क्रिकेटपटूस मिळालेली भलीमोठी रक्कम पाहून सारेच थक्क झाले. तमिळनाडू प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेतील त्याच्या ‘गूढ’ फिरकीने छाप पाडली होती, मात्र राष्ट्रीय पातळीवर त्याची चर्चा नव्हती. आयपीएलच्या लिलावात हा ‘जादुई’ फिरकी गोलंदाज मिळविण्यासाठी फ्रॅंजाईजींत चढाओढ राहिली. वरूणच्या गोलंदाजीत भरपूर वैविध्य असल्याचे सांगितले जाते. लेगब्रेकबरोबरच तो ऑफब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर, टॉप स्पिनर, स्लायडर ही वैशिष्ट्ये त्याच्या गोलंदाजीत आढळतात. तो तमिळनाडू प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत यशस्वी ठरला. त्याच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर मदुराई संघाने स्पर्धा जिंकली. त्या स्पर्धेचे समालोचन करणारे ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू माईक हसी यांना वरुणने खूपच प्रभावित केले. आयपीएल फ्रॅंचाईजींपर्यंत त्याची अफलातून फिरकी गुणवत्ता पोचली.

आर्किटेक्‍ट ते क्रिकेटपटू...
वरुणचा क्रिकेट मैदानावरील प्रवास चढउताराचा आणि नाट्यमय आहे. वयाच्या १३व्या वर्षी त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीस तो यष्टिरक्षक-फलंदाज या भूमिकेत संघात असायचा. तमिळनाडूच्या वयोगट क्रिकेट संघात काही त्याला स्थान मिळाले नाही. आपण क्रिकेटमध्ये कारकीर्द करू शकत नाही, त्यापेक्षा शिक्षणावर भर देणेच योग्य हा विचार करून वरुणने वयाच्या १७व्या वर्षी क्रिकेट सोडले. त्याने वास्तुविद्येत (आर्किटेक्‍चर) पदवी संपादन केली आणि वास्तुविद्याविशारद (आर्किटेक्‍ट) बनला. आर्किटेक्‍ट या नात्याने त्याची कारकीर्द आकार घेत होती, पण त्याच्यावर पुन्हा क्रिकेटने गारुड केले. टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना क्रिकेटमध्येच कारकीर्द करण्याच्या विचाराने त्याला ग्रासले. वास्तुविद्याविशारदाच्या जबाबदारीतून मुक्त होत त्याने क्‍लब पातळीवर वेगवान गोलंदाज बनून क्रिकेट मैदानावर पुनरागमन केले. त्यानंतर त्याला गुडघ्याच्या दुखापतीने ग्रासले. पुन्हा त्याच्या क्रिकेट वाटचालीत अडथळा आला. वरुण हार मानणारा थोडाच होता, त्याने तंदुरुस्ती मिळवत फिरकी गोलंदाज या नात्याने आणखी एक पुनरागमन केले. तमिळनाडूतील क्रिकेटमध्ये २०१७-१८ चा मोसम वरुणच्या फिरकीने गाजवला. त्याला तमिळनाडू प्रिमिअर लीग स्पर्धेत खेळण्याची संधी लाभली.

वरुणचा बोलबाला
प्रामुख्याने लेगब्रेक गोलंदाज असला, तरी वैविध्यपूर्ण फिरकी गोलंदाजी टाकणाऱ्या वरुणने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे. गतवर्षीच्या आयपीएल स्पर्धेपूर्वी त्याला चेन्नई सुपर किंग्जने नेट सरावासाठी बोलावले होते. त्यानंतर दिनेश कार्तिक त्याला आपल्यासोबत कोलकता नाईट रायडर्सच्या शिबिरात घेऊन गेला होता. तमिळनाडूच्या सीनियर क्रिकेट समितीनेही वरुणच्या फिरकी गुणवत्तेला न्याय दिला. २०१८-१९ मोसमातील विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी त्याची तमिळनाडूच्या संघात निवड झाली. तो सर्व नऊही सामन्यांत खेळला आणि ४.२३च्या इकॉनॉमी रेटने २२ गडी बाद केले. या कामगिरीने आयपीएल फ्रॅंजाईजींना त्याच्याकडे दुर्लक्ष करणे शक्‍यच झाले नाही. नोव्हेंबरमध्ये वरुणने तमिळनाडूच्या रणजी क्रिकेट संघात पदार्पण केले. वरुणची वैविध्यसंपन्न फिरकी गोलंदाजी झटपट क्रिकेटसाठी परिणामकारक असल्याचे क्रिकेट पंडितांचे मत आहे. तब्बल ८.४ कोटी रुपयांचा भाव मिळवून हा तमिळनाडूतील गोलंदाज प्रकाशझोतात आला आहे. त्याला ग्लॅमर प्राप्त झाले आहे, ते कितपत टिकते हे प्रत्यक्ष आयपीएल स्पर्धेतच सिद्ध होईल.

संबंधित बातम्या