अॅथलेटिक्समध्ये अमेरिकेचा ठसा

किशोर पेटकर
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

क्रीडांगण
 

ऑलिंपिक स्पर्धेच्या एक वर्ष अगोदर होणारी जागतिक मैदानी स्पर्धा अॅथलिट्सना फार महत्त्वाची असते. जगभरातील क्रीडापटूंच्या मेळाव्यात आपली तयारी कितपत आहे याची चाचपणी अॅथलिट्सना करता येते. ऑलिंपिक स्पर्धा असो, वा अन्य बहुखेळांच्या स्पर्धा असो, अॅथलेटिक्सवर जास्त झोत राहतो. वेगवान पुरुष व महिला हा किताब खूपच वलयांकित असतो. स्प्रिंट, तसेच मध्यम पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यती, फिल्ड क्रीडा प्रकार इत्यादी कमालीची चुरस अनुभवायला मिळते. कतारमधील दोहा येथे झालेली १७वी जागतिक मैदानी क्रीडा स्पर्धा संस्मरणीय ठरली. माता झाल्यानंतर ट्रॅक अँड फिल्डवर आलेल्या धावपटूंनी आपली क्षमता अजमावून पाहिली. शेली-अॅन फ्रेझर-प्राईस, अॅलिसन फेलिक्स या मातांनी चक्क सुवर्णपदकास गवसणी घातली. ख्रिस्तियन कोलमनने वेगवान धाव घेतली. एकूण २०६ देशांचा सहभाग असलेल्या दोहा येथील जागतिक स्पर्धेत अमेरिकेने ठसा उमटविला. एकूण १४ सुवर्णांसह त्यांनी २९ पदके जिंकून पदक तक्त्यात अव्वल क्रमांक पटकाविला. एकूण ४३ देशांच्या क्रीडापटूंनी पदके जिंकली, त्यात अमेरिका पुन्हा एकदा महासत्ता ठरली. २०१७ मध्ये लंडनमध्ये झालेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेने १० सुवर्णपदके जिंकली होती, दोन वर्षांनंतर आणखी प्रगती साधताना त्यांनी चार सुवर्णपदके जास्त जिंकली. २०१५ मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या स्पर्धेत अमेरिकेस सहा सुवर्णपदकांवर समाधान मानावे लागले होते. चार वर्षांच्या कालावधीत या बलाढ्य देशाने अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदके वाढविण्यावर भर दिला. मध्यंतरीच्या काळात उसेन बोल्ट याच्या जादूई धावेमुळे जमैकाने ट्रॅक प्रकारात क्रांती केली होती. मात्र, बोल्टच्या निवृत्तीनंतर यंदा जमैकाला पुरुष गटातील ट्रॅक क्रीडा प्रकारात एकही सुवर्णपदक मिळाले नाही. शेली-अॅन हिच्या पराक्रमामुळे महिलांच्या ट्रॅकमध्ये जमैकाची सुवर्णपदकांची पाटी कोरी राहिली नाही. लांब उडीत या देशाच्या टॅजे गेल यानेही विजेतेपद मिळविले. 

टोकियो ऑलिंपिकमध्येही वर्चस्व अपेक्षित
 दोहा येथे अमेरिकेने १४ सुवर्ण, ११ रौप्य व चार ब्राँझपदकांची कमाई केली. त्या खालोखाल केनियाने पाच सुवर्ण, दोन रौप्य व चार ब्राँझपदके जिंकली. केनियाने २०१५ मध्ये सात सुवर्णपदके जिंकून अव्वल क्रमांक मिळविला होता. दोहा येथील जागतिक स्पर्धेत अमेरिका, केनिया, जमैका यांच्यानंतर चीन व इथिओपिया या देशांनी पहिल्या पाच जणांत स्थान मिळविले. अमेरिकेच्या अॅथलिट्सची कामगिरी पाहता, पुढील वर्षी टोकियोत होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत याच देशाचे वर्चस्व अपेक्षित असेल. टोकियो ऑलिंपिक नजरेसमोर ठेवूनच अमेरिकन क्रीडापटूंची तयारी सुरू आहे. आफ्रिकन धावपटू मध्यम-लांब पल्ल्याच्या शर्यतीत वर्चस्व राखून आहेत. त्यामुळेच केनियाने जागतिक मैदानी स्पर्धांत सुवर्णपदकांचे सातत्य राखले आहे. हल्लीच केनियाचा विश्वविक्रमवीर इलियुड किपचोगे याने दोन तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा पराक्रम केला. इथिओपियाचीही अॅथलेटिक्समधील प्रगती उल्लेखनीय आहे. तुलनेत युरोपातील देशांना अजून खूप मजल मारावी लागेल. आशियातील चीनने दोहा येथील स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकून छाप पाडली. टोकियोतील ऑलिंपिकमध्ये अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात चीनच्या स्पर्धकांकडून अपेक्षा असतील.

वेगवान ख्रिस्तियन कोलमन
 दोहा येथे अमेरिकेचा २३ वर्षीय धावपटू ख्रिस्तियन कोलमन याने १०० मीटर स्प्रिंटमध्ये ९.७६ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. ही कामगिरी करताना त्याने देशवासीय ३७ वर्षीय जस्टिन गॅटलिन याला मागे टाकले. दोन वर्षांपूर्वी लंडनमधील स्पर्धेत गॅटलिन व कोलमन यांनी उसेन बोल्टला तिसऱ्या क्रमांकावर ढकलण्याची किमया साधली होती. लंडनमध्ये गॅटलिनने सुवर्णपदक जिंकले होते, यावेळी त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, कारण तरुण कोलमनचा वेग भन्नाट ठरला. टोकियो ऑलिंपिकमध्येही तोच सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार असेल. दोहा येथे अमेरिकेच्या रिले संघानेही विजेतेपद मिळविले, या संघातही कोलमनचा समावेश होता. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता, टोकियोतील स्पर्धेपर्यंत तो वेग आणखी वाढवू शकेल. तसे झाल्यास, ऑलिंपिकमध्ये पुरुष गटात नवा स्प्रिंट विजेता गवसेल. उसेन बोल्टने २००८, २०१२ व २०१६ मधील मिळून असे सलग तीन ऑलिंपिक स्पर्धांतील १०० मीटर स्प्रिंटमध्ये अजिंक्य राहत अजरामर कामगिरी बजावली आहे. दोहा येथील जागतिक स्पर्धेत अमेरिकेच्याच नोह लिल्ज याने २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळविले. त्यामुळे टोकियो ऑलिंपिकमध्ये तो दावेदार असेल. बोल्टनेच मागील तीन ऑलिंपिक स्पर्धांत २०० मीटरमध्येही बाजी मारली होती, साहजिकच पुढील वर्षी ऑलिंपिकमध्ये २०० मीटरमध्येही नवा विजेता गवसेल हे निश्चित.   

संबंधित बातम्या