दैवी गुणवत्तेचे चुनी गोस्वामी

किशोर पेटकर
सोमवार, 18 मे 2020

क्रीडांगण
 

चुनी गोस्वामी यांचे मूळ नाव सुबीमल गोस्वामी, पण भारतीय क्रीडा क्षेत्रात ते चुनी गोस्वामी या नावानेच ओळखले गेले, अजरामर ठरले. त्यांची क्रीडा गुणवत्ता दैवी होती. फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये नाव कमावलेल्या या महान क्रीडापटूचे वयाच्या ८२ व्या वर्षी कोलकात्यात निधन झाले. चुनी यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे हेच खरे. फुटबॉलवेड्या कोलकात्यात चुनी यांनी मैदाने गाजविली, भारतीय फुटबॉल संघाचे ते हुकमी आघाडीपटू होते. त्यांच्या फुटबॉलमधील पराक्रमांच्या कितीतरी नोंदी वाचण्यास मिळतात, त्यावरून चुनी यांची महत्ता लक्षात येते. मागील शतकातील साठचे दशक भारतीय फुटबॉलसाठी सोनेरी ठरले. त्या काळात भारतीय फुटबॉलमधील ते मौल्यवान रत्न होते. १९६२ मध्ये जाकार्ता येथील आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने देदीप्यमान पराक्रम साकारला. भारतीय पुरुष संघाने फुटबॉलमधील सुवर्णपदक जिंकताना मातब्बर दक्षिण कोरियास २-१ फरकाने मात दिली. त्या संस्मरणीय कामगिरीत चुनी यांचे कर्णधार या नात्याने योगदान लाखमोलाचे ठरले. त्यांच्या आघाडीफळीतील कामगिरीने प्रेरित होत भारताने सोनेरी यश साध्य केले. चुनी यांचे नेतृत्वगुणही वाखाणण्याजोगे ठरले. संघाला एकत्रित ठेवण्याचे त्यांचे कसब असाधारण होते, याबाबत जुनेजाणते फुटबॉलपटू खास उल्लेख करतात. या आघाडीपटूचे ड्रिबलिंग प्रेक्षणीय आणि प्रतिस्पर्ध्यांना गुंगारा देणारे होते. आकडेवारीच्या नजरेतून चुनी यांची महानता पहायची झाल्यास, ३६ अधिकृत आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले, त्यांपैकी १६ वेळा त्यांनी कर्णधारपद भूषविले. स्ट्रायकर या भूमिकेस न्याय देताना १३ आंतरराष्ट्रीय गोल नोंदविले. त्या काळच्या भारतीय फुटबॉलचा विचार करता, चुनी यांची कामगिरी अलौकिक आहे. 

मोहन बागानचा कॅप्टन...
भारताने जाकार्ता येथील आशियायी क्रीडा स्पर्धेत फुटबॉलमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर सातासमुद्रापार इंग्लंडमध्येही भारतीय फुटबॉलपटूंची दखल घेतली गेली. इंग्लंडच्या टॉटेनहॅम हॉट्सपर संघाने चुनी यांना चाचणीसाठी निमंत्रण धाडले, पण चुनी यांनी ते नाकारले. कोलकात्यातील महान परंपरा असलेला संघ मोहन बागानला सोडण्यास त्यांची तयारी नव्हती. मोहन बागानसाठी ते सदासर्वकाळ कॅप्टनच राहिले. इंग्लंडला जाण्याऐवजी त्यांनी कोलकात्यात राहून भारतीय फुटबॉलची सेवा करण्यात धन्यता मानली. कारकिर्दीत शेवटपर्यंत ते मोहन बागान संघाशी एकनिष्ठ राहिले. १९५४ ते १९६८ अशी सलग पंधरा वर्षे मोहन बागानकडून खेळताना त्यांनी गोलांचे द्विशतकही नोंदविले. याशिवाय १९५५, १९५८, १९५९ मध्ये संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविलेल्या बंगाल संघाचे ते सदस्य होते. १९५८ च्या टोकियो आशियायी क्रीडा स्पर्धेत चुनी यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. ब्रह्मदेश (आताचे म्यानमार) संघाविरुद्ध पदार्पणात गोल करण्याची किमया त्यांनी साधली. याशिवाय १९६० च्या रोम ऑलिंपिक स्पर्धेत त्यांनी भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मोहन बागानचा हा नियमित कॅप्टन भारतीय फुटबॉल संघाचाही कर्णधार झाला. केंद्र सरकारनेही चुनी यांच्या असामान्य गुणवत्तेची दखल घेत, १९६३ मध्ये अर्जुन पुरस्काराने, तर १९८३ मध्ये पद्मश्रीने त्यांना सन्मानित केले. 

क्रिकेट मैदानेही गाजविली
फुटबॉलव्यतिरिक्त चुनी यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट मैदानेही गाजविली. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील निवृत्तीनंतर त्यांनी क्रिकेट मैदानावर लक्ष केंद्रित केले. १९६८-६९ मोसमात बंगालचा संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत खेळला. मुंबईविरुद्धचा तो सामना अनिर्णित राहिला, पण पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबईला बाजी मारणे शक्य झाले. त्या लढतीत चुनी यांची लढवय्यी फलंदाजी लक्षवेधी ठरली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर पहिल्या डावात ९६, तर दुसऱ्या डावात ८४ धावा करून या फुटबॉलपटूने क्रिकेट मैदानावरही झुंजार वृत्ती प्रदर्शित केली. बंगालने पुन्हा १९७१-७२ मध्ये चुनी यांच्या नेतृत्वाखाली रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, पण पुन्हा एकदा मुंबई संघ भारी ठरला. फुटबॉलमधील स्ट्रायकरची आक्रमकता क्रिकेटमधील फलंदाजात झळकायची, असे जुनेजाणते क्रिकेटपटू नमूद करतात. ४६ प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी एक शतक व सात अर्धशतकांसह १५९२ धावा केल्या. चुनी मध्यमगती गोलंदाजीही टाकायचे. त्यांचे इनस्विंगर प्रभावी होते. त्यांनी ४७ विकेट्सही चटकावल्या. १९६६ मध्ये पाहुण्या वेस्ट इंडीजविरुद्ध सराव लढतीत चुनी यांच्या दाहक माऱ्याने प्रतिस्पर्ध्यांना सतावले होते. संयुक्त मध्य-पूर्व विभाग संघाने बलाढ्य विंडीजला त्या लढतीत पराभवाचा धक्का दिला होता. आठ वर्षांपूर्वी बंगाल क्रिकेट संघटनेने चुनी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले.

संबंधित बातम्या