टी-20 बाबत प्रश्नचिन्ह

किशोर पेटकर
सोमवार, 18 मे 2020

क्रीडांगण
 

कोरोना विषाणू महामारीवर अजून विजय मिळविण्यात आलेला नाही, अशा परिस्थितीत जगातील सारेच देश सावध आहेत. जगभरातील परिस्थिती कधी पूर्वपदावर येईल याबाबत कोणीच निश्चित सांगू शकत नाही. कोविड-१९ वरील लस शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. या महामारीमुळे क्रीडा जगत पूर्णतः ठप्प आहे. स्थगित झालेल्या स्पर्धा पुन्हा कधी सुरू होतील याचीच चर्चा झडत आहे, आशावाद व्यक्त होण्याव्यतिरिक्त बाकी काहीच नाही. बारामाही क्रिकेटची संकल्पना रुजत असताना आता क्रिकेट मैदानेही ओस पडली आहेत. जगातील सर्वांत श्रीमंत स्पर्धा असलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) यंदा ठरलेल्या वेळेत झालेली नाही. मधेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यंदा आयपीएल विसरा असा सल्लाही दिला. 

सामने रिकाम्या स्टेडियमवर झाले, तरीही खेळाडू, संघाचा सपोर्ट स्टाफ यांच्यासह सामन्याची तांत्रिक बाजू पाहणारे, समालोचक या सर्वांची सुरक्षितता लक्षात घ्यावीच लागेल. कोरोना विषाणू संसर्गाचा जगव्यापी संचार आणि साऱ्या देशांचे प्रवासावरील कडक निर्बंध या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा संकटात आहे. ऑस्ट्रेलियात यावर्षी १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत १६ देशांचे संघ भाग घेतील. अंतिम लढतीसह एकूण ४५ सामने खेळले जातील. ऑस्ट्रेलियातील कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती भीषण नाही, तसेच रुग्ण विषाणूमुक्त होण्याची संख्याही उत्साहवर्धक आहे, तरीही महामारीचा धोका पूर्णपणे मोडीत निघालेला नाही.

परिस्थिती पूर्वपदावर येणे आवश्यक
केवळ क्रिकेटच नव्हे, तर सारे खेळ केविलवाणे झालेत. सारे सुरळीत होण्यासाठी कोरोना विषाणूमुळे विस्कटलेली घडी पूर्वपदावर येणे आवश्यक आहे. भारताने लॉकडाऊन आणखी वाढविले आहे. इतर देशांतील परिस्थितीही सारखीच आहे. त्यामुळे टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी आपले संघ पाठविताना प्रत्येक देश हजारदा विचार करेल. महत्त्वाची बाब म्हणजे, खुद्द ऑस्ट्रेलिया सरकार परदेशी संघांना प्रवेश देण्यासाठी राजी असेल का? या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सुरक्षिततेबाबत सर्व शंकांचे निरसन केले, तरच ठरल्यानुसार ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा रंगेल. जगभरातील प्रवासावर निर्बंध आहेत. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या आयोजनातील हा प्रमुख अडथळा आहे. शिवाय जागतिक आरोग्य संघटनेने जग कोरोनामुक्त झाल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. एकंदरीत विचार करता, ऑक्टोबरमध्ये होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा सध्यातरी अव्यवहार्य वाटते. रिकाम्या स्टेडियमवर सामने खेळविण्याचा पर्याय राहील. कोरोना विषाणूच्या धास्तीत स्टेडियमवर गर्दी जमविणे हा गुन्हाच असेल. प्रवास सुरक्षित असेल, तरच विश्वकरंडक स्पर्धा घेण्याचे धाडस ऑस्ट्रेलिया करू शकेल. साहजिकच क्रिकेट खेळणारे सारेच देश टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होण्याबाबत साशंक आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने आपला मोसम जुलैपर्यंत स्थगित केला आहे. तेथील कोरोना विषाणू संसर्ग परिस्थिती काळजी वाढविणारी आहे.

`बीसीसीआय`समोर आव्हानाचा डोंगर
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धा लांबणीवर गेल्यास, त्या कालावधीत आयपीएल घेण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) विचाराधीन आहे, पण त्यांच्यासमोर आव्हानाचा मोठा डोंगर आहे. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत सारे काही सुरळीत झाले नाही, तर २०२०-२१ मोसमाचे नियोजन करताना भारतीय क्रिकेट मंडळाची दमछाक होईल. अगोदर आयपीएल घ्यायची, की देशांतर्गत क्रिकेट मोसम सुरू करायचा याबाबत सखोल चर्चा करावी लागेल. आयपीएल स्पर्धा सुरुवातीस झाल्यास देशांतर्गत मोसम लांबेल आणि २०२१ मधील मार्च महिन्यापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व स्पर्धेतील मिळून दोन हजारांहून जास्त सामने नियोजित करताना बीसीसीआयला तारेवरची कसरत करावी लागेल. कोरोना विषाणूमुळे २०१९-२० मोसमातील काही स्पर्धा अपूर्ण राहिल्या. इराणी करंडक सामना अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आला. समाधानाची बाब म्हणजे, रणजी अंतिम सामना संपला आणि देशव्यापी लॉकडाऊन लागू झाले. २०२१ मधील आयपीएल स्पर्धेपूर्वी देशांतर्गत मोसम संपविण्यासाठी बीसीआयला आटोकाट प्रयत्न करावे लागतील. व्यग्र कार्यक्रम राहिल्यास खेळाडूंना दोन सामन्यांमध्ये पुरेशी विश्रांतीही मिळणार नाही. त्याचा वाईट परिणाम क्रिकेटपटूच्या शरीरावर होऊ शकतो. बीसीसीआयला साऱ्या परिस्थितीची जाणीव आहे, त्यामुळेच त्यांनी २०२०-२१ मधील देशांर्गत क्रिकेट मोसमाचा अजून आराखडाही तयार केलेला नाही. कोरोना विषाणूचा अंत कधी होतोय याचीच त्यांना प्रतीक्षा आहे.  

संबंधित बातम्या