आनंदचे ‘जलद’ जगज्जेतेपद

किशोर पेटकर
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

क्रीडांगण
विश्‍वनाथन आनंद हा बुद्धिबळातील ‘भारतरत्न’ आहे. पाच वेळचा जगज्जेता. जगातील सर्वोत्तम बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर अजूनही निवृत्त होत नाही याबद्दल चर्चेस मुद्दा मिळत असतानाच, चेन्नईच्या या ‘सुपर’ बुद्धिबळपटूने टीकाकारांना चपराक दिली. सौदी अरेबियातील रियाध येथे रंगलेल्या फिडेच्या जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ स्पर्धेत ‘विशी’ने विजेतेपद पटकाविले.

विश्‍वनाथन आनंद हा बुद्धिबळातील ‘भारतरत्न’ आहे. डिसेंबर महिन्याच्या ११ तारखेस त्याने ४८वा वाढदिवस साजरा केला. पाच वेळचा जगज्जेता. जगातील सर्वोत्तम बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर अजूनही निवृत्त होत नाही याबद्दल चर्चेस मुद्दा मिळत असतानाच, चेन्नईच्या या ‘सुपर’ बुद्धिबळपटूने टीकाकारांना चपराक दिली. सौदी अरेबियातील रियाध येथे रंगलेल्या फिडेच्या जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ स्पर्धेत ‘विशी’ने विजेतेपद पटकाविले. आनंदचे चाहते, देशातील बुद्धिबळप्रेमी आणि भारतीयांना नववर्षाची संस्मरणीय भेट लाभली. तीन वर्षांपूर्वी दुबईत झालेल्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत त्याला तिसरा क्रमांक मिळाला होता. त्यापूर्वी २००३ मध्ये त्याने व्लादिमीर क्रामनिक याला हरवून जलद बुद्धिबळातील जगज्जेतेपद मिळविले होते. आनंद वयाने मोठा होत आहे, पण बुद्धिबळातील त्याचे बुद्धीकौशल्य आणि सामर्थ्य अजूनही अबाधित आहे हे ताज्या कामगिरीवरून सिद्ध झालेले आहे. आनंद अजून संपलेला नाही, त्याची बुद्धिबळ गुणवत्ता चिरतरुण आहे. ‘रॅपिड’ बुद्धिबळ खडतरच. कमी वेळात झटपट चाली रचताना खेळाडूंची कसोटी लागते. आनंद सर्व प्रकारच्या बुद्धिबळातील तज्ज्ञ आहे, तो या खेळातील ‘लायटनिंग किड’ आहे, जलद बुद्धिबळात त्याचे नाणे अजूनही खणखणीत आहे. विशेष बाब म्हणजे, माजी जगज्जेता रशियाचा महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव यानेही जलद बुद्धिबळातील जगज्जेतेपदाबद्दल आनंदचे कौतुक केले. कास्पारोव आपल्या ट्‌विटमध्ये म्हणाला, ‘‘साठच्या दशकातील माणसाचे जागतिक रॅपिड किताबाबद्दल अभिनंदन! तू कधी निवृत्त होशील, असे तुला सतत विचारणाऱ्यांना तू हा ताजा विजय समर्पित करशील, अशी मला आशा आहे.’’ कास्पारोवने आनंदबद्दलच्या साऱ्या शंकाकुशंकांना तिलांजलीच दिलेली आहे.

जबरदस्त कामगिरी
रियाधमधील स्पर्धेत आनंदने नवव्या फेरीत सध्याच्या जगज्जेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याला पराभूत केले. या निकालामुळे आनंद प्रकाशझोतात आला, कारण कार्लसनसमोर माघार घेतल्यामुळेच आनंदला २०१३ मध्ये जगज्जेतेपदाचा किताब खाली ठेवावा लागला होता. कार्लसनला नमविणे ही सध्याच्या काळात कठीण बाब मानली जाते. आनंद आणि कार्लसन यांच्या वयातही मोठा फरक आहे, २१ वर्षांचा. ‘विशी’ आनंदने तपभराच्या कालावधीत बुद्धिबळात जागतिक ‘सम्राट’ हा मान मिळविला. कार्लसनच्या आगमनानंतर त्याच्या साम्राज्यास तडा गेला. हल्लीच्या काळात आनंदच्या खेळात मोठे सातत्य दिसत नाही, परंतु जगभरातील बुद्धिबळपटूंच्या शर्यतीत तो अजूनही टिकून आहे, ही बाब जास्त कौतुकाची ठरते. अजूनही तो जागतिक बुद्धिबळात ‘टॉप टेन’मध्ये आहे.

विजेतेपदास गवसणी
‘विशी’ आनंदने रियाधमधील स्पर्धेच्या शेवटच्या पंधराव्या फेरीत चीनच्या शियांग्झी बू याला बरोबरीत रोखले. त्याचे, तसेच रशियाचा व्लादिमीर फेडोसीव व इयान नेपोम्नीयाछी यांचे समान साडेदहा गुण झाले. अंतिमपूर्व फेरीपर्यंत कार्लसन विजेतेपदाच्या शर्यतीत होता. जलद जगज्जेतेपदासाठी नॉर्वेच्या ग्रॅंडमास्टरला विजय अत्यावश्‍यक होता, पण तो अलेक्‍झांडर ग्रिश्‍चुकविरुद्ध हरला. त्यामुळे आनंद, फेडोसीव व नेपोम्नीयाछी यांच्यात चुरस राहिली. टायब्रेकर गुणांत आनंद व फेडोसीव यांचे वर्चस्व राहिल्यामुळे त्यांच्यात विजेतेपदाचा फैसला होण्याचे पक्के झाले. त्यांच्यात दोन ब्लिट्‌झ डावांची लढत झाली. त्यात भारतीय ग्रॅंडमास्टरने बाजी मारली. प्रतिकूल परिस्थितीत शांतपणे खेळणे हे आनंदचे वैशिष्ट्य आहे. त्या जोरावर त्याने चौदा वर्षांनंतर पुन्हा ‘जलद’ जगज्जेतेपदाचा मान मिळविला. ‘‘साऱ्यांचे आभार.. वाटतंय मी तरंगतोय. माझ्या डोक्‍यात हेच गीत येतंय... वुई आर द चॅंपियन्स! हे शब्द ब्लिट्‌झनंतर या क्षणी अधिक सत्य वाटतात!’’ विजेतेपदानंतरची आनंदची ही ट्‌विटरवरील प्रतिक्रिया खरोखरच समर्पक आहे. 

जगज्जेता विश्‍वनाथन आनंद...

  •     क्‍लासिकल (५) ः २०००, २००७, २००८, २०१०, २०१२
  •      रॅपिड (२) ः २००३, २०१७
     

संबंधित बातम्या