‘अव्वल नंबरी’ ॲक्‍सेलसन

किशोर पेटकर
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

क्रीडांगण

  • व्हिक्‍टर ॲक्‍सेलसन या डेन्मार्कच्या २३ वर्षीय बॅडमिंटनपटूसाठी २०१७ हे वर्ष यशस्वी ठरले. ग्लासगो येथे जगज्जेतेपद, तसेच वर्षाच्या अखेरीस दुबईत सुपर सीरिज फायनल्स स्पर्धा जिंकून या खेळाडूने आपणच बॅडमिंटनमधील सध्याचा ‘अव्वल नंबरी’ असल्याचे सिद्ध केले.

डेन्मार्कच्या व्हिक्‍टर ॲक्‍सेलसन या २३ वर्षीय बॅडमिंटनपटूसाठी २०१७ हे वर्ष यशस्वी ठरले. ग्लासगो येथे जगज्जेतेपद, तसेच वर्षाच्या अखेरीस दुबईत सुपर सीरिज फायनल्स स्पर्धा जिंकून या खेळाडूने आपणच बॅडमिंटनमधील सध्याचा ‘अव्वल नंबरी’ असल्याचे सिद्ध केले. हा मान मिळविताना त्याने जगातील दोघा मातब्बर खेळाडूंना हरविले. जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्याने चीनच्या दिग्गज लिन डॅन याचा पाडाव केला, दुबईतील स्पर्धेत मलेशियाच्या ली चाँग वेई याला नमविले. कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन नोंदविताना ॲक्‍सेलसनने २८ सप्टेंबर २०१७च्या जागतिक मानांकनात पहिला क्रमांक पटकाविला व वर्षअखेरीस हे स्थान टिकवून ठेवले. जागतिक बॅडमिंटनमध्ये डेन्मार्कला मोठी परंपरा आहे, हा वारसा तो पुढे नेत आहे. जगज्जेतेपद मिळविणारा तो तिसरा डॅनिश बॅडमिंटनपटू ठरला आहे. यापूर्वी फ्लेमिंग डेल्फ्स याने १९७७ मध्ये, तर पीटर रॅसम्युसन याने १९९७ मध्ये जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धा जिंकली होती. २०१७च्या सुरवातीला ॲक्‍सेलसन इंडिया ओपनमध्ये अजिंक्‍य ठरला. ली चाँग वेई याला नमवून त्याने जपान ओपन किताब जिंकला. चायना ओपनमध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चीनचा चेन लाँग त्याला भारी ठरला.

दोन्ही गटांत जगज्जेता
ॲक्‍सेलसन सर्वप्रथम २०१० मध्ये प्रकाशझोतात आला. त्या वर्षी त्याने मेक्‍सिकोत ज्युनिअर जगज्जेतेपद पटकाविले. २०१७ मध्ये सीनियर गटात जागतिक स्पर्धा जिंकल्यामुळे दोन्ही गटात जगज्जेता बनण्याचा आगळा मान त्याने मिळविला आहे. उजव्या हाताने  खेळणारा हा डॅनिश खेळाडू आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत त्याने कारकिर्दीत ११ किताब पटकाविले आहेत, त्यापैकी जागतिक विजेतेपद अत्युच्च ठरले आहे. व्हिक्‍टर २०१६ मध्ये रिओ ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.  या पदकाच्या लढतीत त्याने चिवट झुंजीनंतर लीन डॅनला तीन गेम्समध्ये नमविले. त्यापूर्वी उपांत्य लढतीत चीनच्याच चेन लाँगकडून हार पत्करावी लागल्याने त्याचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले होते. २०१६ मध्ये डेन्मार्कने प्रतिष्ठेचा थॉमस कप जिंकला, या कामगिरीत व्हिक्‍टरने प्रमुख वाटा उचलला. त्या वर्षअखेरीस तो सुपर सीरिज फायनल्सचाही मानकरी ठरला. २०१६ मध्येच तो पहिल्यांदा ‘युरोपियन चॅंपियन’ बनला. व्हिक्‍टरने २०१२ पासून सीनियर गटात गांभीर्याने खेळण्यास सुरवात केली. २०१४ मध्ये त्याला ‘टॉप १०’ खेळाडूंत स्थान मिळाले. त्या वर्षी त्याला जागतिक स्पर्धेत ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले होते. 

चिनी भाषेवर प्रभुत्व
व्हिक्‍टर ॲक्‍सेलसन हा युरोपियन खेळाडू असला, तरी त्याचे चिनी भाषेवर प्रभुत्व आहे. चीनमधील मंदारिन भाषा तो न संकोचता बोलतो. साधारणतः पाच वर्षांपूर्वी चिनी खेळाडू जागतिक बॅडमिंटनमध्ये वर्चस्व राखून होते, त्या कालावधीत ॲक्‍सेलसनची नुकतीच सुरवात होती. चिनी खेळाडूंना नमविण्यासाठी तो प्रेरित होता, पण त्यांची भाषा येत नसल्यामुळे त्याला खेळाडू-प्रशिक्षक यांच्यातील डावपेच समजत नव्हते. यातून मार्ग काढण्यासाठी या हरहुन्नरी खेळाडूने मंदारिन भाषा शिकून घेतली. त्यामुळे चिनी प्रशिक्षक आपल्या खेळाडूंना देणाऱ्या मार्गदर्शनपर सूचना त्याला समजू लागल्या. चिनी बॅडमिंटनपटूंवर ॲक्‍सेलसनने वर्चस्व मिळविण्याची भाषा हे एक कारण मानले जाते, चिनी भाषा अवगत झाल्यानंतर त्याने जगज्जेतेपदापर्यंत मजल मारली. मंदारिन भाषेमुळे ॲक्‍सेलसनचे चीनमध्येही बरेच चाहते आहेत. ॲक्‍सेलसनच्या यशामुळे डेन्मार्कमध्ये बॅडमिंटन खेळ पुन्हा लोकप्रियतेच्या दिशेने सरकत आहे. २०१६ व २०१७ तील बॅडमिंटनमधील त्याचा उंचावता आलेख, त्याची मेहनत व सरस खेळ लक्षात घेता २०१८ वर्षीही तो दबदबा राखण्याचे संकेत आहेत.

व्हिक्‍टर ॲक्‍सेलसनचे प्रमुख यश

  • जागतिक स्पर्धा ः सुवर्ण २०१७, ब्राँझ २०१४
  • ऑलिंपिक स्पर्धा ः ब्राँझ २०१६
  • थॉमस कप ः सुवर्ण २०१६, ब्राँझ २०१२
  • युरोपियन स्पर्धा ः सुवर्ण २०१६, ब्राँझ २०१२, २०१४, २०१७

संबंधित बातम्या