सेरेनाचे पुनरागमन लांबले 

किशोर पेटकर
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

क्रीडांगण
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सेरेनाने मुलीला (ऑलिंपिया) जन्म दिला, पण ही जिद्दी महिला टेनिस कोर्टपासून काही दूर गेली नव्हती. तिचा दैनंदिन सराव सुरूच होता. ३० डिसेंबरला तिने प्रदर्शनीय सामन्याद्वारे पुनरागमनाची चाचपणी केली.

ग्रॅंडस्लॅम टेनिस मोसमाची सुरवात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेने होते. आई झाल्यानंतर सेरेना विल्यम्स नव्या वर्षात स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक होती. सेरेना ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील गतविजेती! त्यावेळी ती आठ आठवड्यांची गर्भवती होती, असे असूनही तिने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये झुंजार खेळ करत विजेतेपदास गवसणी घातली होती. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याची तिची ती सातवी वेळ. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सेरेनाने मुलीला (ऑलिंपिया) जन्म दिला, पण ही जिद्दी महिला टेनिस कोर्टपासून काही दूर गेली नव्हती. तिचा दैनंदिन सराव सुरूच होता. ३० डिसेंबरला तिने प्रदर्शनीय सामन्याद्वारे पुनरागमनाची चाचपणी केली. अबुधाबी येथे ती येलेना ऑस्टापेन्को हिच्याविरुद्ध खेळली, पण पुरेशा स्पर्धात्मक सरावाअभावी पराभूत झाली. साहजिकच तिने आपल्या ‘टीम’शी चर्चा करून मेलबर्नमधील ग्रॅंडस्लॅम स्पर्धेतील माघारीचा निरोप आयोजकांना पाठविला. २०११ नंतर प्रथमच सेरेना या स्पर्धेत खेळणार नाही. पूर्णपणे तयार असशील तेव्हाच स्पर्धेत खेळ, असे प्रशिक्षक व तिच्या संघातील सहकाऱ्यांनी तिला सांगितले. 

आपण खेळू शकतो, परंतु फक्त सहभागासाठी खेळायचे नाही, असे सांगत सेरेनाने माघार घेतली. तिचा निर्णय योग्यच आहे. सेरेनाने कारकिर्दीत २३ ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकून विक्रम रचला आहे. मार्गारेट कोर्टच्या सर्वकालीन २४ ग्रॅंडस्लॅम स्पर्धा विजेतेपदांशी बरोबरी साधण्यासाठी सेरेनाला आणखी एक करंडक हवा आहे. या विक्रमाशी बरोबरी साधणे हे सेरेनाच लक्ष्य आहे हे स्पष्टच आहे, म्हणूनच मुलीला जन्म दिल्यानंतर पुन्हा स्पर्धात्मक टेनिस खेळू इच्छिते. 

मेलबर्न पार्कवरील यश 
सेरेनाने मेलबर्न पार्कवर सात वेळा करंडकासह जल्लोष केलेला आहे. याठिकाणी तिने पहिले यश २००३ मध्ये मिळविले. सेरेनाने पहिला ग्रॅंडस्लॅम करंडक १९९९ मध्ये अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकून मिळविला होता. त्यानंतर चार वर्षांनी ती ऑस्ट्रेलियन विजेती ठरली. पंधरा वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत बाजी मारताना या अमेरिकन खेळाडूने आपली थोरली बहीण व्हीनस विल्यम्स हिला नमविले होते. २०१७ मध्ये तिने पुन्हा व्हीनस हिलाच नमवून ही स्पर्धा जिंकली. मध्यंतरीच्या या काळात या ठिकाणी विजेतेपद मिळविताना तिने लिंडसे डेव्हनपोर्ट (२००५), मारिया शारापोवा (२००७), दिनारा साफिन (२००९), जस्टिन हेनिन (२०१०), पुन्हा मारिया शारापोवा (२०१५) यांना हरविले होते. २०१६ मधील स्पर्धेत तिला अंतिम लढतीत अँजेलिक केर्बर हिने हरविले होते, परंतु सेरेनाने गतवर्षी जबरदस्त भरारी घेत विजेतेपद पटकावले होते. मात्र आता तिला ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

टेनिसमधील ‘सुपर मॉम’ 
बेल्जियमची माजी अव्वल महिला टेनिसपटू किम क्‍लायस्टर्स हिला ग्रॅंडस्लॅम स्पर्धेतील ‘सुपर मॉम’ मानले जाते. आई बनल्यानंतर तिने तीन ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकल्या. २००७ मध्ये तिने ‘ब्रेक’ घेतला. बाळंतपणानंतर तिने पुनरागमन केले. २००९ मध्ये ती अमेरिकन ओपन स्पर्धेत बिगरमानांकित व वाइल्ड कार्ड खेळाडू होती, अफलातून जिगर प्रदर्शित करत तिने विजेतेपदास गवसणी घातली. 

१९८० मध्ये आई बनल्यानंतर इव्होनी गूलागाँग हिने विंबल्डन स्पर्धा जिंकली होती, त्यानंतर ग्रॅंडस्लॅम जिंकणारी क्‍लायस्टर्स ही पहिली ‘मॉम’ बनली. तिने नंतर २०१० मध्ये अमेरिकन ओपन विजेतेपद राखले, तसेच २०११ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन किताबही जिंकला. अमेरिकेची माजी अव्वल मानांकित लिंडसे डेव्हनपोर्ट हिनेही आई बनल्यानंतर दोन वेळा पुनरागमन केले होते, तर गतवर्षी मुलास जन्म दिल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर व्हिक्‍टोरिका अझारेन्का हिने विंबल्डन स्पर्धेच्या चौथ्या फेरीपर्यंत प्रगती साधली होती. 

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेना 

  •      विजेतेपद ः ७ (२००३, २००५, २००७, २००९, २०१०, २०१५, २०१७) 
  •      अंतिम फेरी ः १ (२०१६) 
  •      उपांत्यपूर्व फेरी ः ३ (२००१, २००८, २०१३)

संबंधित बातम्या