आंचलचे लक्षवेधक पदक 

किशोर पेटकर
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

क्रीडांगण
विंटर गेम्स... अर्थात हिवाळी क्रीडा स्पर्धा. बर्फाळ भूभागातील खेळ. भारतीयांची अशा प्रकारच्या खेळातील कामगिरी नगण्यच. ‘विंटर स्पोर्टस’ हा प्रकार भारतात दुर्लक्षित राहिलेला आहे. ‘विंटर स्पोर्टस’मधील स्कीईंगमध्ये आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याचा पराक्रम एका भारतीय मुलीने बजावला आहे.

विंटर गेम्स... अर्थात हिवाळी क्रीडा स्पर्धा. बर्फाळ भूभागातील खेळ. भारतीयांची अशा प्रकारच्या खेळातील कामगिरी नगण्यच. ‘विंटर स्पोर्टस’ हा प्रकार भारतात दुर्लक्षित राहिलेला आहे. ‘विंटर स्पोर्टस’मधील स्कीईंगमध्ये आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याचा पराक्रम एका भारतीय मुलीने बजावला आहे. स्कीईंग आपण चित्रपटात पाहतो. देशात या खेळासाठी कोणतेही प्रोत्साहन नसताना मनाली येथील २१ वर्षीय आंचल ठाकूर या मुलीने तुर्कस्तानात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझपदकाची कमाई केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्‌विट करून आंचलचे अभिनंदन केले, या घडामोडीनंतर ही खेळाडू प्रकाशझोतात आली. आंचलने एल्पाईन एजर ३२०० या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्कीईंगमधील स्लालम या प्रकारात तिसरा क्रमांक मिळविला. आंतरराष्ट्रीय स्कीईंगमध्ये पदक जिंकणारी ती भारताची पहिलीच खेळाडू ठरली. देशातील दुर्लक्षित खेळातील तिची कामगिरी असामान्य आहे. विशेषतः भारतीय मुलींसाठी प्रेरणादायी आहे. कोणत्याही साधनसुविधा नसताना तिने जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर आंतरराष्ट्रीय पदकास गवसणी घातली. 

वडिलांचे प्रोत्साहन 
स्कीईंग खेळात कारकीर्द करण्यासाठी आंचलला वडिलांचे प्रोत्साहन लाभले. तिचे वडील रोशन ठाकूर हे भारतीय विंटर गेम्स महासंघाचे सचिव आहेत. या संघटनेला केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालयाकडून अनुदान मिळत नाही. केंद्र सरकारने विंटर स्पोर्टसला क गटात विभागले आहे. राष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय ऑलिंपिक संघटनेनेही राष्ट्रीय विंटर गेम्स घेतलेली नाही. ‘विंटर गेम्स’शी संबंधित भारतीय क्रीडापटू सरकारी सुविधांपासून दूरच आहेत. भारतात उत्तर भागात बर्फ पडतो, तोही हिवाळ्यात. त्यामुळे स्किईंगमध्ये कारकीर्द केलेल्या आंचलला प्रशिक्षणासाठी वारंवार परदेशात जावे लागते. युरोपमध्ये स्कीईंगच्या चांगल्या सुविधा आहेत, पण तेथे राहून कौशल्य संपादन करण्यासाठी खर्चही खूप येतो. अनुदानाअभावी स्पर्धक व त्यांच्या पालकांना स्वतःच्या खिशातून पैसा काढावा लागतो. मुलीच्या कारकिर्दीसाठी रोशन यांनी हेच केले. त्यांनी गुलमर्ग व औली स्कीईंग केंद्र सुरू केले आहे. आंचलसारख्या होतकरू स्कीईंग खेळाडूंना लाभ मिळावा हाच त्या मागचा उद्देश आहे. स्कीईंग केंद्र कार्यरत राखणे सोपे नसते. तुर्कस्तानमध्ये पदक जिंकल्यानंतर आंचल व तिच्या वडिलांनी देशातील ‘विंटर गेम्स’ची दुर्लक्षित स्थिती उजेडात आणली. आपल्या पदकानंतर या खेळाकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन बदलेल अशी अपेक्षा आंचलने व्यक्त केली आहे. आंचल वयाच्या सातव्या वर्षापासून स्कीईंगमध्ये आहे. वडिलांच्या भरीव प्रोत्साहनामुळे तिची आगेकूच राहिली. ती आणि तिच्या भाऊ हिमांशू यांच्या प्रशिक्षणावर रोशन यांनी भरपूर पैसे खर्च केले आहेत, वारंवार युरोप दौरा हे नित्याचेच आहे. 

ऑलिंपिकचे लक्ष्य 
‘विंटर गेम्स’चीही ऑलिंपिक स्पर्धा होते. यंदाची विंटर ऑलिंपिक स्पर्धा फेब्रुवारीत दक्षिण कोरियातील प्यांगचाँग येथे रंगणार आहे. ऑलिंपिक स्पर्धेत खेळण्याचे व देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे आंचलचे ध्येय आहे. स्वप्नपूर्ती कठीण आहे हे तिला पक्के ठाऊक आहे, पण ती जिद्दी आहे. तुर्कस्तानमध्ये तिच्या शर्यतीत प्रथम आलेल्या स्पर्धकालाही ऑलिंपिक पात्रता गाठता आली नव्हती, यावरून स्पर्धा किती खडतर असते हे लक्षात येते. आंचलचे जिगरबाज स्कीईंग पाहता, यंदा संधी मिळाली नाही, तर २०२२ मध्ये बीजिंगमध्ये होणाऱ्या विंटर ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविण्यासाठी तिचे नक्कीच प्रयत्न असतील. आंचल हिचे कुटुंबीय मनालीजवळील बुरुआ या गावचे. वडिलांनी तिला स्कीईंग शिकविले, नंतर हिरालाल यांचे प्रशिक्षण लाभले. रोशन ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, स्कीईंगसाठी सुविधा महागड्या असताना त्यासाठी किमान पाच ते दहा लाख रुपयांचा खर्च येतो. आंचल आणि हिमांशू यांच्यासाठी हा खर्च त्यांनी पेलला. प्रतिकूल परिस्थितीत आंचल व हिमांशू या भावंडांनी वडिलांच्या पाठबळाच्या जोरावर युरोपात जाऊन सरावाद्वारे ऑलिंपिक पात्रतेचे लक्ष्य बाळगले आहे.

संबंधित बातम्या