प्रतिभावान गोलंदाज एन्गिडी

किशोर पेटकर
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

क्रीडांगण
सेंच्युरियन येथील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात लुंगी एन्गिडी नामक नवोदित वेगवान गोलंदाज स्टेनच्या जागी संघात आला. दक्षिण आफ्रिकेच्या नाताळ प्रांतातील डर्बन येथे जन्मलेला हा कृष्णवर्णीय गोलंदाज वेगासाठी ओळखला जातो.

भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन जायबंदी झाला. सेंच्युरियन येथील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात लुंगी एन्गिडी नामक नवोदित वेगवान गोलंदाज स्टेनच्या जागी संघात आला. दक्षिण आफ्रिकेच्या नाताळ प्रांतातील डर्बन येथे जन्मलेला हा कृष्णवर्णीय गोलंदाज वेगासाठी ओळखला जातो. या एकवीस वर्षीय गोलंदाजाने अनुभवी गोलंदाजाची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांना भेदक गोलंदाजीने सतावताना सहा गडी बाद केले. पदार्पणातील कसोटी सामन्यात डावात पाच बळी आणि सामनावीर पुरस्कार अशी अफलातून कामगिरी त्यांच्या नावे नोंद झाली. पहिल्या डावात त्याने पार्थिव पटेलला बाद केले, हा त्याचा कसोटीतील पहिला बळी ठरला. दुसऱ्या डावात त्याने अवघ्या ३९ धावांत भारताच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले, यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीचा याची मौल्यवान विकेटही होती. विराटने पहिल्या डावात १५३ धावांची संस्मरणीय खेळी केली होती, मात्र दुसऱ्या डावात एन्गिडीने विराटला अवघ्या पाच धावांवर पायचीत केले. २८७ धावांच्या आव्हानासमोर भारताचा डाव १५१ धावांत संपुष्टात आला. नवोदित एन्गिडी भारतीय संघासाठी कर्दनकाळ ठरला. त्याने गेल्या वर्षी जानेवारीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सेंच्युरियन येथेच तो श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-२० क्रिकेट सामना खेळला होता. दोन गडी बाद करत त्याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकाविला होता.  

विद्यार्थिदशेत प्रोत्साहन
लुंगी एन्गिडी याची गोलंदाजीतील गुणवत्ता शालेय पातळीवर बहरली. क्वा-झुलू नाताळमधील हिल्टन महाविद्यालयात त्याचे शिक्षण झाले. डर्बन येथून सुमारे १०० किलोमीटरवर असलेले हे महाविद्यालय निवासी धर्तीवरील आहे. त्याचे पालक घरगुती कामगार. घरची परिस्थिती बेताचीच. गौरवर्णीय माईल मिल्स यांच्याकडे एन्गिडीचे माता-पिता कामाला होते. मिल्स यांच्या  प्रयत्नामुळे त्याला शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या. शिक्षणाबरोबरच त्याला क्रीडा क्षेत्रातही संधी लाभली. सुरवातीस तो क्रिकेटप्रमाणेच रग्बी, जलतरण, हॉकी, फुटबॉल हे खेळ खेळत होता. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एन्टिनी हा त्याचा आदर्श. त्याच्याप्रमाणे आपणही वेगवान गोलंदाज व्हायचे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न एन्गिडीने शालेय संघातून खेळतानाच बाळगले होते. एन्गिडीचे शालेय शिक्षण हायबरी प्रीपेरॅटरी स्कूलमध्ये झाले. क्रिकेटमधील गुणवत्तेमुळे शिष्यवृत्तीद्वारे त्याला हिल्टन महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. 

भेदक गोलंदाज
एन्गिडी याची गोलंदाजी भन्नाट वेगामुळे लक्षवेधक ठरते. त्याची गुणवत्ता नैसर्गिक. दक्षिण आफ्रिकेचा सध्याचा अव्वल वेगवान गोलंदाज काजिसो रबाडा हा महाविद्यालयीन पातळीवर एन्गिडीचा प्रतिस्पर्धी होता. एकदा रबाडाच्या भेदकतेसमोर एन्गिडीचा हिल्टन महाविद्यालय संघ ९० धावांतच गारद झाला. त्यानंतर एन्गिडीने कमाल केली. रबाडाच्या सेंट स्टायथियन्स महाविद्यालय संघाला त्याने ८ बाद ९० असे रोखले. त्याच्या वेगवान चेंडूंचा प्रसाद मिळाल्यामुळे एक फलंदाज इस्पितळात होता, तर एकाचा हात मोडला. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना सामना जिंकता आला नाही. हिल्टन महाविद्यालयात एन्गिडी शिकत असताना झिंबाब्वेचे माजी क्रिकेटपटू नील जॉन्सन तेथील क्रिकेटचे प्रमुख होते. या महाविद्यालयाचे क्रिकेट प्रशिक्षक शॉन कार्लाईल यांचे एन्गिडीला मार्गदर्शन लाभले. खरं म्हणजे, त्याला फलंदाज बनायचे होते, परंतु फलंदाजीस आवश्‍यक किट बाळगण्याची त्याची ऐपत नव्हती. त्यामुळे त्याने फक्त चेंडू घेऊन गोलंदाजी टाकण्याचे ठरविले. धावत येऊन जबरदस्त वेगाने चेंडू टाकणे हा त्याचा छंदच बनला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला प्रतिभासंपन्न युवा वेगवान गोलंदाज मिळाला. 

एन्गिडीचे क्रिकेटमधील पदार्पण

  • कसोटी ः दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, सेंच्युरियन येथे १३ ते १७ जानेवारी २०१८
  • टी-२० ः दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, सेंच्युरियन येथे २० जानेवारी २०१७
  • प्रथम श्रेणी ः नॉर्दन्स विरुद्ध बॉर्डर, सेंच्युरियन येथे ५ ते ७ जानेवारी २०१६
     

संबंधित बातम्या