टेबल टेनिसपटू शरथची ‘कमाल’

किशोर पेटकर
गुरुवार, 8 मार्च 2018

क्रीडांगण
भारताचा अनुभवी आणि यशस्वी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमाल याने आपल्या दीर्घ कारकिर्दीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. या ऑलिंपियन टेबल टेनिसपटूने आठव्यांदा राष्ट्रीय एकेरीत अजिंक्‍यपद पटकाविले.

भारताचा अनुभवी आणि यशस्वी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमाल याने आपल्या दीर्घ कारकिर्दीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. या ऑलिंपियन टेबल टेनिसपटूने आठव्यांदा राष्ट्रीय एकेरीत अजिंक्‍यपद पटकाविले. या कामगिरीने ३५ वर्षीय खेळाडूने भारताचे माजी महान टेबल टेनिसपटू कमलेश मेहता यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. कमलेश यांनी १९८२-८३ ते १९९३-९४ या कालावधीत आठ वेळा राष्ट्रीय टेबल टेनिसमध्ये वैयक्तिक किताब जिंकला होता. चेन्नईच्या शरथने पहिले राष्ट्रीय विजेतेपद २००३-०४ मध्ये मिळविले होते. सुमारे पंधरा वर्षांनंतर तोच जोश आणि विजेतेपदाची भूक पाहायला मिळाली. केवळ देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसमध्येही या प्रतिभाशाली आणि मेहनती खेळाडूने छाप पाडली आहे. झारखंडमधील रांची येथे झालेल्या ७९व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेतील एकेरीच्या अंतिम लढतीत पेट्रोलियम क्रीडा मंडळ संघातील सहकारी अँथनी अमलराज याला शरथने हरविले, अर्ध्या तासातील खेळात पाच गेममध्ये विजय मिळवून राष्ट्रीय जेतेपदास सलग दुसऱ्या वर्षी गवसणी घातली. महत्त्वाची बाब म्हणजे, शरथचा पराक्रम पाहण्यासाठी कमलेश स्टेडियममध्ये उपस्थित होते. आपल्या विक्रमाशी बरोबरी साधल्यानंतर त्यांनी शरथला आलिंगन देत अभिनंदन केले. कमलेश सध्या राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य आहेत. पुण्यात २००२-०३ मोसमात झालेल्या राष्ट्रीय टेबल टेनिसमध्ये शरथ उपविजेता ठरला होता. त्यानंतर पुढच्या मोसमात त्याने राष्ट्रीय विजेतेपदाचे स्वप्न साकार केले.

 राष्ट्रकुल क्रीडा विजेता
शरथ सध्या निवृत्तीकडे झुकलेला असला, तरी त्याची दीड दशकांची कारकीर्द झळाळती आहे. अजूनही त्याच्या खेळात तेज आहे. भारतीय टेबल टेनिसपटूंत तोच सध्या अव्वल आहे आणि गतवर्षअखेरच्या जागतिक मानांकनात पहिल्या पन्नास खेळाडूंत त्याने स्थान टिकविले होते. २००६ मध्ये मेलबर्न येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने कमाल केली होती. यजमान देशाच्या विल्यम हेन्झेल याला नमवून शरथने एकेरीत बाजी मारली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा पहिला टेबल टेनिसपटू ठरला होता. त्याच स्पर्धेत भारताने शरथच्या धडाकेबाज खेळाच्या बळावर सांघिक सुवर्णपदकही जिंकले होते. २०१० मध्ये शरथने दोन आंतरराष्ट्रीय विजेतीपदे जिंकून भारतीय टेबल टेनिसचा झेंडा फडकावला होता. त्या वर्षी त्याने मिशिगन येथे अमेरिकन खुली स्पर्धा जिंकली, तसेच कैरो येथे इजिप्त खुल्या स्पर्धेत अजिंक्‍यपद मिळविले. या कामगिरीने आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाची मान्यता असलेली व्यावसायिक स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. २००७ मध्ये त्याने उत्तर कोरियातील प्याँगयाँग निमंत्रित आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही किताब पटकाविला होता.

सर्वोत्तम मानांकन
शरथने कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन तीन वर्षांपूर्वी नोंदविले होते. मे २०१५ मध्ये शरथने जागतिक क्रमवारीत ३२वा क्रमांक मिळविला होता. जागतिक टेबल टेनिसमध्ये शरथची कामगिरी सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगी आहे. २००४ मध्ये तो अथेन्समध्ये झालेल्या ऑलिंपिकसाठी सर्वप्रथम पात्र ठरला होता, बारा वर्षानंतरही त्याने खेळातील एकाग्रता आणि जिद्दीच्या बळावर ऑलिंपिकमध्ये पुन्हा खेळण्याचा मान मिळविला. २०१६ मधील रिओ ऑलिंपिकमध्ये त्याचे आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आले, पण त्याची पात्रता भारतीय टेबल टेनिसपटूंसाठी प्रेरणादायी होती. युरोपमध्ये स्पेन, स्वीडन, जर्मनीतील व्यावसायिक लीग टेबल टेनिस स्पर्धेतही तो नियमितपणे खेळलेला आहे. त्याचा लाभ त्याला खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी, तसेच शारीरिक तंदुरुस्ती राखण्यात झालेला आहे. भारतीय टेबल टेनिसपटूंसाठी आदर्शवत अशीच शरथची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आहे.

एकेरी विजेतीपदे (८) ः
२००३-०४ (मानेसर), 
२००६-०७ (अजमेर), 
२००७-०८ (जलपायगुडी),
२००८-०९ (पटना), 
२००९-१० (गुवाहाटी), 
२०१०-११ (कोलकता),
२०१६-१७ (मानेसर), 
२०१७-१८ (रांची)

एकेरी उपविजेतीपदे (४) ः
२००२-०३ (पुणे), 
२००५-०६ (जयपूर), 
२०११-१२ (लखनौ), 
२०१२-१३ (रायपूर).

संबंधित बातम्या