फेडररची ग्रॅंड स्लॅम द्विदशकपूर्ती!

किशोर पेटकर
गुरुवार, 8 मार्च 2018

क्रीडांगण
लबर्न येथे स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब जिंकला, तेव्हा तो ३६ वर्षे व १७३ दिवसांचा होता. ‘एजलेस वंडर’ असं कौतुकाने संबोधले जाणाऱ्या फेडररचा खेळ वाढत्या वयागणिक बहरत आहे.

लबर्न येथे स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब जिंकला, तेव्हा तो ३६ वर्षे व १७३ दिवसांचा होता. ‘एजलेस वंडर’ असं कौतुकाने संबोधले जाणाऱ्या फेडररचा खेळ वाढत्या वयागणिक बहरत आहे. टेनिस कोर्टवर तो कौशल्य, ताकद, फटके यांचा खुबीने वापर करतोच, त्याच वेळेस प्रतिस्पर्ध्यांच्या कच्च्या दुव्यांच्या बारकाईने अभ्यास करून त्यांना कोंडीत अडकविण्याची कल्पकता दाखवितो. यामुळेच क्रोएशियाच्या मरिन चिलीच याने पाच सेट्‌समध्ये झुंजवूनही ‘बुजुर्ग’ फेडरर अजिंक्‍य ठरला. पुरुष एकेरीची अंतिम लढत तीन तास तीन मिनिटे चालली. या कालावधीत २९ वर्षीय चिलीच आपल्यापेक्षा सात वर्षांनी मोठा असलेल्या फेडररचे आव्हान परतावून लावू शकला नाही. यातच स्विस खेळाडूचे सर्वश्रेष्ठत्व सिद्ध होते. पंधरा वर्षांत या जिगरबाज आणि मेहनती खेळाडूने वीस ग्रॅंड स्लॅम किताब जिंकले आहेत. त्याच्यावर दडपणाचा परिणाम होत नाही. ग्रॅंड स्लॅम स्पर्धांत त्याने तब्बल तीस वेळा अंतिम फेरी गाठली, त्यापैकी वीस वेळा तो अजिंक्‍य ठरला. टेनिस खेळताना तो सध्या सर्वंकष आनंद लुटताना दिसतोय, जिंकल्यानंतर भावुकही होतो, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून अलगद आनंदाश्रू टपकतात. फेडररची स्फूर्ती आणि धडाका अचंबित करणारा आहे. वडील, पती, मुलगा, व्यावसायिक खेळाडू या साऱ्या भूमिका त्याने चोखपणे वठविताना खेळावर कुठेच परिणाम होऊ दिलेला नाही. हेच त्याचे माहात्म्य आहे!

सहाव्यांदा विजेता
ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम लढतीत फेडररने चिलीचवर ६-२, ६-७ (५-७), ६-३, ३-६, ६-१ अशा फरकाने विजय मिळविला. ऑस्ट्रेलियन ओपन सहाव्यांदा जिंकणारा फेडरर हा तिसरा पुरुष टेनिसपटू ठरला आहे. रॉय इमरसन आणि नोव्हाक जोकोविच यांच्या विक्रमाशी त्याने बरोबरी साधली आहे. सर्वाधिक  ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकण्याचा विक्रम  लढवय्या फेडरर हा स्वतःच्या नावावर करू शकतो, कारण पुढील वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळण्याचा मनोदय त्याने आताच बोलून दाखविला आहे. त्याची झुंजार वृत्ती पाहता, त्याच्यासाठी अशक्‍य काहीच नाही. मेलबर्नला त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ९४ विजय नोंदविले आहे, पुढील वर्षी या मैदानावर विजयाचे शतक नोंदवत सातवा करंडकही तो जिंकू शकतो. त्याची जिंकण्याची जिद्द, ईर्षा, जिगर सारं काही अवर्णनीय आणि असामान्य आहे. मेलबर्नला चिलीचला नमविताना फेडररने बॅकहॅंड फटक्‍यांचा सुरेख वापर केला. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकताना ‘रॉड लेव्हर अरेना’च्या खास कक्षात त्याची पत्नी मिर्का, आई-वडील लिनेट व रॉबर्ट, प्रशिक्षक इव्हान ल्युबिसिच, सपोर्ट स्टाफ यांची उपस्थिती होती,  सारे जण त्याचा उत्साह वाढवीत होते. अंतिम लढतीत त्याने २४ बिनतोड सर्व्हिस नोंदविल्या, यावरून त्याच्या भेदक आणि धारदार  खेळाचा प्रत्यय येतो.  

पराक्रमी कामगिरी
फेडररने २००३ ते २०१८ या कालावधीत २० ग्रॅंड स्लॅम करंडक जिंकले आहेत. गतवर्षी त्याने ऑस्ट्रेलियन आणि विंबल्डन स्पर्धा जिंकून, त्याच्या वाढत्या वयाकडे अंगुलिनिर्देश करणाऱ्या टीकाकारांना सणसणीत चपराक दिली होती. २०१८ वर्षाची सुरवातही त्याने ग्रॅंड स्लॅम जिंकून मोठ्या झोकात केलेली आहे. त्याच्या तुलनेत राफेल नदालने १६ ग्रॅंड  स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहे आणि हा स्पॅनिश डावखुरा खेळाडू अजूनही टेनिस कोर्टवर कार्यरत आहे. दुखापतींचा ससेमिरा असला, तरी नदालच फेडररच्या सर्वाधिक ग्रॅंड स्लॅम विक्रमांना आव्हान देऊ शकतो. नोव्हाक जोकोविचने १२ ग्रॅंड स्लॅम करंडक जिंकलेत, पण सध्या दुखापतीमुळे त्याचा खेळ उतरतीच्या दिशेने आहे. १९७२ मध्ये केन रोझवॉल याने ३७ वर्षे व ६३ दिवसांचा असताना ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. पुढील वर्षी जिद्दी फेडरर हा विक्रम मोडू शकतो. त्याच्यासाठी वय फक्त आकडा आहे.

रॉजर फेडररचे ग्रॅंड स्लॅम यश
ऑस्ट्रेलियन ओपन - ६ ः २००४, २००६, २००७, २०१०, २०१७, २०१८
फ्रेंच ओपन - १ ः २००९
विंबल्डन - ८ ः २००३, २००४, २००५, २००६, २००७, २००९, २०१२, २०१७
अमेरिकन ओपन - ५ ः २००४, २००५, २००६, २००७, २००८

संबंधित बातम्या