गोल्फर शुभांकरचा धडाका!

किशोर पेटकर
शुक्रवार, 9 मार्च 2018

क्रीडांगण
 

भारताचा युवा गोल्फर शुभांकर शर्मा याची घोडदौड स्वप्नवत ठरली आहे. या २१ वर्षीय उमद्या खेळाडूने युरोपियन टूरवरील दोन गोल्फ स्पर्धा जिंकून धडाका कायम राखला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे जोबर्ग ओपन स्पर्धेत विजेता ठरला, तर  फेब्रुवारीत त्याने मलेशियातील कुआलालंपूर येथे मेबॅंक स्पर्धा जिंकली. या दोन प्रमुख स्पर्धांतील यशामुळे शुभांकरने जागतिक गोल्फ मानांकनात १९३ वरून ७२व्या स्थानी उडी घेतली. २०१७ वर्षअखेरीस तो २०२व्या क्रमांकावर होता, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रगतीमुळे त्याने दोन महिन्यांत मोठे अंतर कापले. गेल्यावर्षी मेबॅंक स्पर्धेत त्याला नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. वर्षभरात मेहनत, आत्मविश्‍वास आणि जिद्दीच्या बळावर शुभांकरने थेट अजिंक्‍यपदाचा करंडक उंचावला. या युवा भारतीय गोल्फरने अपेक्षा उंचावल्या आहेत. युरोपियन टूरवरील जिंकलेल्या दोन प्रमुख स्पर्धा त्याच्या कारकिर्दीत ‘टर्निंग पॉइंट’ ठरणाऱ्या आहेत. ‘द ओपन’, तसेच मेक्‍सिकोतील जागतिक गोल्फ या प्रतिष्ठित स्पर्धेत खेळताना त्याच्या कामगिरीवर नजरा असतील. स्कॉटलंडमधील ‘द ब्रिटिश ओपन’ खडतर गोल्फ स्पर्धा मानली जाते. व्यावसायिक गोल्फमध्ये एका मोसमात दोन युरोपियन टूर गोल्फ स्पर्धा जिंकणारा शुभांकर हा तिसरा भारतीय ठरला आहे. २००६ मध्ये जीव मिल्खा सिंग याने, तर २०१५ मध्ये अनिरबन लाहिरी याने असा पराक्रम केला होता. 

लहान वयात छाप
शुभांकरने गोल्फ खेळण्यास वयाच्या सहाव्या वर्षी सुरवात केली. त्याचे वडील मोहन शर्मा हे सेनादलातील निवृत्त कर्नल. शुभांकरच्या गोल्फ कोर्सवरील वाटचालीत वडिलांचा मोलाचा वाटा आहे. टायगर वूड्‌सचा खेळ शुभांकरला भावतो. जेस्सी ग्रेवाल व गुरबाझ मान हे त्याचे प्रशिक्षक. लहान वयातच त्याने छाप पाडली. वयाच्या १७ वर्षी २०१४ मध्ये त्याने कोचीन मास्टर्स  स्पर्धा जिंकली. त्याचे हे पहिले व्यावसायिक यश ठरले. पीजीटीआय किताब मिळविणारा तो सर्वांत युवा भारतीय विजेता ठरला. भारताचा महान गोल्फर जीव मिल्खा सिंग यालाही शुभांकरने प्रभावित केले आहे. चंडीगडच्या युवा खेळाडूचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे भाकीत जीव याने केले आहे. त्याने खेळात सातत्य राखले, तसेच सराव शास्त्रोक्त राहिल्यास शुभांकर पहिल्या पन्नास खेळाडूंतही लवकरच स्थान मिळवेल, असे जीव याला वाटते. जागतिक गोल्फमध्ये जीव मिल्खा सिंगने स्वतः विक्रमी ठसा उमटविलेला आहे. २००९ मध्ये त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम २८वे मानांकन मिळविले होते. भारतीय गोल्फरचे हे आतापर्यंतचे सर्वोत्तम मानांकन आहे. या प्रतिथयश गोल्फरने युवा शुभांकरला दिलेली शाबासकी शुभांकरची प्रतिभा आणि क्षमता अधोरेखित करते.

भारताचा अव्वल गोल्फर
व्यावसायिक गोल्फमध्ये लागोपाठ दोन प्रमुख स्पर्धा जिंकल्यामुळे शुभांकर आता भारताचा अव्वल गोल्फर ठरला आहे. त्याच्या ७२व्या मानांकनाच्या तुलनेत अनिरबन लाहिरी ७६व्या स्थानी आहे. त्याच्या कामगिरीचा आलेख असाच उंचावता राहिल्यास जीव मिल्खा सिंगच्या सर्वोत्तम कामगिरीच्या जवळपास येणेही त्याला शक्‍य होईल. वयाच्या २१व्या वर्षी त्याने जागतिक गोल्फमध्ये बजावलेली कामगिरी आश्‍चर्यचकित करणारी आहे. शुभांकरने २०१३ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी व्यावसायिक गोल्फमध्ये पदार्पण केले. त्यानंतर पीजीटीआय, आशियायी टूर, युरोपियन टूर स्पर्धेत तो खेळला आहे. डिसेंबरमध्ये तो जोबर्ग ओपन स्पर्धेत जिंकला तेव्हा युरोपियन टूर जिंकणारा सर्वांत युवा भारतीय ठरला होता. त्याला प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या ‘द ओपन’साठीही निमंत्रण मिळाले. गोल्फमधील बहारदार कामगिरीमुळे ‘बर्डी बॉय’ हे टोपणनाव त्याला मिळाले आहे.

दृष्टिक्षेपात शुभांकरची वाटचाल

  • वयाच्या सोळाव्या वर्षी भारतीय हौशी स्पर्धा जिंकली
  • सतराव्या वर्षी पीजीटीआय दर्जाच्या कोचीन मास्टर्स स्पर्धेत विजेता
  • ऑक्‍टोबर २०१७ पासून चार करंडक जिंकले 
  • २०१७-१८ मोसमातील सहा युरोपीय टूर स्पर्धांत सहभाग, दोन स्पर्धांत विजेता

संबंधित बातम्या