‘द्विशतक’वीर गोलंदाज झुलन!

किशोर पेटकर
शुक्रवार, 9 मार्च 2018

क्रीडांगण
 

झुलन गोस्वामी ही बंगाली मुलगी. वयाच्या १९व्या वर्षी तिने महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारतात पुरुषांच्या तुलनेत महिला क्रिकेटकडे दुर्लक्षच होते, पण त्यामुळे झुलन कोमेजली नाही, तर उत्साहात तिने आपली कारकीर्द फुलविली. निर्धार आणि जिद्द या बळावर महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम बळींचे द्विशतक गाठण्याचा पराक्रम केला. केवळ भारतीय क्रिकेटसाठीच नव्हे, तर जागतिक महिला क्रिकेटमध्येही झुलनचा हा विक्रम अद्वितीय आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात झुलनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळविण्याचा मान मिळविला. तिने ऑस्ट्रेलियाच्या कॅथरिन फिट्‌झपॅट्रिक हिला मागे टाकले. कॅथरीनने १९९३ ते २००७ या कालावधीत १०९ एकदिवसीय सामने खेळताना १८० गडी बाद केले होते. झुलनने हा आकडा मागे टाकून दोनशे बळींच्या दिशेने कूच केली. सात फेब्रुवारी २०१८ रोजी दक्षिण आफ्रिकेतील किंबर्ली येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झुलनने मैलाचा दगड गाठला. तिने यजमान संघाची सलामीवीर लॉरा वॉल्व्हार्ड हिला यष्टिरक्षक सुषमा वर्मा हिच्याकरवी झेलबाद केले. १६६व्या सामन्यात झुलनचा हा दोनशेवा बळी ठरला. या वाटचालीत झुलनने जबरदस्त आत्मविश्‍वास, कणखर मनोबल, खडतर परिश्रम आणि अफलातून जिगर यांचा सुरेख संगम साधला आहे. केवळ शाळा-महाविद्यालयीन स्तरावर क्रिकेट मर्यादित न राखता तिने मोठे स्वप्न पाहिले. देशातील वेगवान महिला गोलंदाज आणि क्रिकेटपटूंसाठी ती आदर्श बनली.

सोळा वर्षांचा प्रवास
झुलनने सोळा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये चेन्नई येथे ती इंग्लंडविरुद्ध कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळली. त्या सामन्यात ७-०-१५-२ असे प्रभावी पृथक्करण राखत तिने लक्ष वेधले. भरपूर उंची, शिडशिडीत बांध्याची ही बंगाली मुलगी अतिशय वेगाने गोलंदाजी टाकत असल्यामुळे तिच्याविषयी सुरवातीपासून चर्चा आणि उत्सुकताही होती. झुलनने भारतीय महिला संघाची सध्याची कर्णधार मिताली राज हिच्याकरवी इंग्लंडची सलामीवीर कॅरोलिन ॲटकिन्स हिला झेलबाद केले, तिचा तो एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला बळी ठरला. त्यानंतर या हरहुन्नरी खेळाडूने मागे वळून पाहिलेच नाही. महिलांचे क्रिकेट मर्यादित स्वरूपाचे असूनही तिने लक्ष विचलित होऊ दिले नाही. नव्या चेंडूने वेगवान गोलंदाजी करणारी भारताची यशस्वी गोलंदाज हा लौकिक तिने अजूनपर्यंत टिकविला आहे. किंबर्ली येथेच पहिल्या सामन्यात भारताच्या विजयात वाटा उचलताना तिने दक्षिण आफ्रिकेचे चार गडी बाद केले. सध्या ती ३५ वर्षांची आहे, पण तिची गोलंदाजीतील भेदकता चिरतरुण आहे. वेगवान लयबद्ध धाव, चेंडू टाकण्याची तंत्रशुद्ध शैली, अचूकता या बळावर तिने गोलंदाजीत दबदबा राखला आहे. दीड दशकाहून अधिक काळ एका महिला क्रिकेटपटूने कारकीर्द उंचावत नेणे हीच मोठी उपलब्धी आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेली तंदुरुस्ती जपण्याचे भानही तिने राखले. 

सर्वोत्तम खेळाडू
झुलनला २००७ मध्ये वर्षांतील सर्वोत्तम जागतिक महिला क्रिकेटपटू या पुरस्काराने गौरविण्यात आले. पश्‍चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील चाकदाहा या गावची ही मुलगी क्रिकेटसाठी कोलकत्यात आली. टीव्हीवर पुरुषांचे क्रिकेट पाहून ती या खेळाकडे आकर्षित झाली. तिने शिक्षणात कारकीर्द करावी असे पालकांना वाटत होते, पण क्रिकेटपटू बनण्याचा निश्‍चय केलेल्या झुलनने मुलांसमवेत खेळत गुणवत्ता विकसित केली. २००८ ते २०११ या कालावधीत भारतीय महिला संघाचे कर्णधारपदही भूषविले.  नंतर फक्त गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. फलंदाज म्हणूनही तिने अष्टपैलू छाप सोडली. तिला २०१० मध्ये अर्जुन पुरस्काराने, तर २०१२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या ती कारकिर्दीच्या संध्याकाळात आहे, परंतु तीचा जोश कमी झालेला नाही. फलंदाजांना अजूनही तिचे चेंडू खेळणे अवघड ठरते.

झुलनच्या कारकिर्दीतील पदार्पण

  • कसोटी ः विरुद्ध इंग्लंड, लखनौ येथे १४ ते १७ जानेवारी २००२
  • एकदिवसीय ः विरुद्ध इंग्लंड, चेन्नई येथे ६ जानेवारी २००२
  • टी-२० ः विरुद्ध इंग्लंड, डर्बी येथे ५ ऑगस्ट २००६

संबंधित बातम्या