तडाखेबंद शुबमन!

किशोर पेटकर
शुक्रवार, 16 मार्च 2018

क्रीडांगण
 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हल्लीच्या काळात १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक ही यशाची पहिली पायरी मानली जाते. या पातळीवर खेळणारे सारे यशस्वी ठरतात असे नाही, काही जण नंतर विस्मृतीतही जातात. मात्र नवोदितांना आंतरराष्ट्रीय मैदानावर कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी निश्‍चितच लाभते. जानेवारीत न्यूझीलंडमध्ये झालेल्या या वयोगटातील विश्‍वकरंडक स्पर्धेत राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाने जगज्जेतेपद मिळविले. कर्णधार पृथ्वी शॉ, तसेच संघातील अन्य खेळाडू प्रकाशमान झाले. त्यातील एक म्हणजे पंजाबी मुलगा शुबमन गिल याने तडाखेबंद फलंदाजीने १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धा गाजवलीच, शिवाय करंडक जिंकून भारतात आल्यानंतर लगेच विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकविरुद्ध धडाकेबाज शतकी खेळीही केली. या शैलीदार फलंदाजाने १२२ चेंडूंत आठ चौकार व सहा षटकारांच्या मदतीने नाबाद १२३ धावा केल्या. साहजिकच हा खेळाडू केवळ वयोगटातील यशावर समाधान मानणारा नाही हे स्पष्ट झाले. भारतीय क्रिकेटमध्ये भविष्यात सलामीवीर किंवा तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज या नात्याने त्याची चाचपणी होऊ शकते. शुबमनला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. आगामी आयपीएल स्पर्धेतही त्याच्यावर झोत राहील. कोलकता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी १.८ कोटी रुपये मोजले आहेत. भावी कारकिर्दीत हा प्रतिभाशाली फलंदाज प्रसिद्धीचा झगमगाट कितपत पेलतोय हे पाहावे लागेल, मात्र आतापासूनच त्याची विराट कोहलीशी तुलना होऊ लागली आहे. कदाचित ती अतिउत्साही असेलही, पण शुबमनने लक्ष वेधले आहे.

स्पर्धावीर किताब
न्यूझीलंडमधील १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत शुबमन स्पर्धावीर ठरला. झिंबाब्वे (नाबाद ९०) व बांगलादेशविरुद्ध (८६) शतकाने हुलकावणी दिल्यानंतर शुबमनने पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य लढतीतील नाबाद शतक झळकवत १०२ धावांची खेळी केली. संपुर्ण स्पर्धेत ३७२ धावा करत त्याने स्पर्धावीर हा किताब पटकावला. भारताचे महान फलंदाज राहुल द्रविड हे त्यांच्या मैदानावरील कारकिर्दीत ‘द वॉल’ या टोपणनावाने व शास्त्रोक्त भक्कम फलंदाजीसाठीच ओळखले गेले. १९ वर्षांखालील प्रशिक्षक या नात्याने द्रविड यांचा खेळाडूंवर मोठा प्रभाव आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या खेळीनंतर शुबमनने द्रविड यांना श्रेय दिले. ‘‘चेंडू हवेतून मारायचा नाही, मैदानी फटक्‍यांवर भर द्यायचा,’’ हा द्रविड यांचा मंत्र आपण जपतोय असे तो म्हणाला. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्याने रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अमृतसर येथे बंगालविरुद्धच्या पहिल्याच डावात अर्धशतक (६३) केले, नंतर याच ठिकाणी सेनादलविरुद्धच्या पुढच्या लढतीत १२९ धावांची खेळी करून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शतकी कारकिर्दीचा शुभारंभ केला.

लहानपणापासूनच क्रिकेट
शुबमनला लहानपणापासूनच बॅट घेऊन चेंडू टोलवायची भारी हौस. तीन-चार वर्षांचा असल्यापासून तो ‘फलंदाजी’ करतोय. सवंगड्यांसोबत खेळण्याऐवजी तासन्‌तास फलंदाजी करणाऱ्या शुबमनच्या गुणवत्तेला त्याच्या वडिलांनी खतपाणी घातले. लखविंदर गिल यांनी मुलाची उपजत प्रतिभा जाणली. त्यांचे कुटुंब पंजाबमधील फाझिल्का जिल्ह्यातील जलालाबादनजीकच्या चक खेरवाला या गावचे. गावातील शेतजमिनीत टेनिस बॉलने क्रिकेट खेळणाऱ्या शुबमनला घेऊन लखविंदर जलालाबादला आले, त्यानंतर मुलाच्या नैसर्गिक क्रिकेट गुणवत्तेला योग्य दिशा दाखविण्यासाठी, लखविंदर लहानग्या शुबमन आणि कुटुंबासह चंडीगडजवळील मोहाली येथे निवासास आले. शुबमन क्रिकेट अकादमीत दाखल झाला. पंजाबच्या वयोगट संघातून त्याच्या कारकिर्दीला सुरवात झाली.

लाल रुमाल...
शुबमन अंधश्रद्धाळू आहे. तो नेहमीच पॅंटच्या खिशात लाल रुमाल ठेवतो. त्याबाबत स्पष्टीकरणही त्याने दिलेले आहे. पंजाबच्या वयोगट संघातून खेळताना शुबमनच्या धावा होत नव्हत्या. एका सामन्यात पॅंटच्या खिशात सफेद रुमाल असताना त्याने चांगल्या धावा केल्या. नंतर क्षेत्ररक्षणाच्या वेळेस तो रुमाल मळका झाला. दुसऱ्या सामन्यात शुबमनने खिशात लाल रुमाल ठेवला व शतक केले. तेव्हापासून या रंगाच्या रुमालाने त्याच्या पॅंटच्या खिशात कायमची जागा मिळविली.
 

संबंधित बातम्या