आश्‍वासक जिम्नॅस्ट अरुणा 

किशोर पेटकर
बुधवार, 21 मार्च 2018

क्रीडांगण

रिओ ऑलिंपिकमध्ये भारताच्या दीपा कर्माकर हिचे जिम्नॅस्टिक्‍समध्ये ब्राँझपदक अगदी थोडक्‍यात हुकले. व्हॉल्ट प्रकारात ती चौथी आली. मात्र या कामगिरीने दीपाचे नाव सर्वश्रुत झाले. जिम्नॅस्टिक्‍समध्ये भारतीय खेळाडू पारंगत आहेत, याची जाणीव केवळ देशवासीयांनाच नव्हे, तर साऱ्या जगाला झाली. दीपाच्या पाऊलवाटेवरून मार्गक्रमण करणाऱ्या हैदराबादच्या अरुण बुद्दा रेड्डी हिने ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदविली. जिम्नॅस्टिक विश्‍वकरंडक स्पर्धेत या २२ वर्षीय मुलीने ब्राँझपदक जिंकले. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली. व्हॉल्ट प्रकारात अरुणा हिने १३.६४९ गुणांची कमाई केली. स्लोव्हानियाची तासा केस्लोफ हिने सुवर्ण, तर ऑस्ट्रेलियाच्या एमिली विथहेड हिने रौप्यपदक जिंकले. विश्‍वकरंडक ब्राँझपदकामुळे अरुणा प्रकाशझोतात आली. एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धा रंगणार आहे. चार वर्षांपूर्वी ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेत दीपाने व्हॉल्ट प्रकारात ब्राँझपदक जिंकले होते, पण यावेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत ती दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. तिची अनुपस्थिती अरुणा जाणवू देणार नाही, याचे संकेत विश्‍वकरंडक स्पर्धेतील कामगिरीने मिळाले आहेत. अरुणाला ‘नेक्‍स्ट दीपा’ असेही कौतुकाने म्हटले जाते, ती स्वतः दीपाला आदर्श मानते. 

वडील प्रेरणास्रोत 
अरुणाचे वडील बी. नारायण रेड्डी हे हैदराबादमधील सनदी लेखापाल (चार्टड अकाउंटंट) आहेत. अरुणा साधारणतः पाच वर्षांची असताना वडिलांनी तिला कराटे वर्गात पाठविले. अरुणाचे शरीर लवचिक, ही बाब कराटे प्रशिक्षकांनी हेरली व तिला जिम्नॅस्टिक्‍स वर्गात पाठविण्याचा सल्ला दिला. वयाच्या आठव्या वर्षापासून अरुणाचे जिम्नॅस्टिक्‍स सुरू झाले. मुलीत उपजत गुणवत्ता आहे हे हेरून वडिलांनी पाठबळ दिले. तिला हैदराबाद येथील लालबहादूर शास्त्री स्टेडिअमवर जिम्नॅस्टिक्‍स प्रशिक्षक स्वर्णलता व रवींद्र यांचे मार्गदर्शन लाभू लागले. त्यानंतर स्वर्णलता यांचे पती गिरिराज तिचे प्रशिक्षक बनले, पण २००८ मध्ये त्यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर बृज किशोर तिचे नियमित प्रशिक्षक बनले. अरुणाने २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती, पण तेव्हा अवघ्या १४ वर्षांची असलेल्या या मुलीस स्पर्धेत खेळता आले नव्हते. अरुणाने जिम्नॅस्टिक्‍समध्ये नाव कमवावे ही वडिलांची इच्छा. त्यांनी मुलीच्या प्रशिक्षणात पैशांची चणचण भासू दिली नाही. अरुणाची कारकीर्द बहरत असताना, दुर्दैवाने तिच्या वडिलांचे निधन झाले. मात्र बहीण पावनी हिचा वरदहस्त लाभल्यामुळे अरुणाची जिम्नॅस्टिक्‍समधील वाटचाल कायम राहिली. वडिलांप्रमाणेच बहिणीसही अरुणाच्या यशाचे श्रेय जाते. 

राष्ट्रकुल पदकाची अपेक्षा 
मेलबर्नमधील जिम्नॅस्टिक विश्‍वकरंडक स्पर्धेत १६ देशांतील स्पर्धक होते. या स्पर्धेत ब्राँझपदक जिंकल्यामुळे अरुणाचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. चार वर्षांपूर्वी दीपा कर्माकरचे राष्ट्रकुलमधील ब्राँझपदक भारतीय मुलींसाठी नवी दिशा दाखविणारे ठरले होते. विश्‍वकरंडक स्पर्धेतील ब्राँझपदकामुळे राष्ट्रकुल स्पर्धेतही पदक जिंकण्याचा अरुणाला विश्‍वास वाटतो. याचवर्षी होणाऱ्या आशियायी क्रीडा स्पर्धेतही अरुणाकडून पदकाची अपेक्षा राहील. २०१७ मध्ये ती प्रगत प्रशिक्षणासाठी उझबेकिस्तानमधील ताश्‍कंद येथे गेली. दुखापतींवर मात करत तिने व्हॉल्टमध्ये समतोल राखत विश्‍वकरंडक पदकापर्यंत प्रवास केला. दीपा कर्माकरने अरुणाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. दीपा व अरुणा एकत्र सराव करतात. २०११ मध्ये राष्ट्रीय शिबिरात दीपाचे प्रशिक्षक बिश्‍वेश्‍वर नंदी यांचे अरुणाला सर्वप्रथम मार्गदर्शन लाभले. २०१४ ते २०१७ पर्यंत त्या दोघींचा सराव एकत्रच होता. दीपाच्या माहितीनुसार, अरुणाने विश्‍वकरंडक ब्राँझपदक मिळविताना मारलेल्या उडीचे तंत्र प्रशिक्षक नंदी यांच्याकडून आत्मसात केले आहे. 

जिम्नॅस्ट अरुणा रेड्डीविषयी...

  • जन्मतारीख : २५ डिसेंबर १९९५, हैदराबाद 
  • फेब्रुवारी २०१८ मध्ये मेलबर्न येथे झालेल्या जिम्नॅस्टिक विश्‍वकरंडकात व्हॉल्ट प्रकारात ब्राँझपदक 
  • विश्‍वकरंडक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट 
  • २०१३, २०१४ व २०१७ मधील विश्‍वकरंडक स्पर्धेत पात्रता फेरीतच गारद

संबंधित बातम्या