अद्वितीय रॉजर फेडरर 

किशोर पेटकर
बुधवार, 21 मार्च 2018

क्रीडांगण

रॉजर फेडरर हा पुरुष टेनिसपटू म्हणजे एक आगळेच रसायन आहे. गगनचुंबी आत्मविश्‍वास हे त्याचे प्रमुख अस्त्र. त्या जोरावर त्याने कारकिर्दीत तब्बल २० ग्रॅंड स्लॅम करंडक जिंकले आहेत आणि अजूनही अजिंक्‍य ठरण्याची त्याची मनीषा आहे. या वर्षी फेब्रुवारीत चौथ्यांदा जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकाविला, तेव्हा तो ३६ वर्षे, सहा महिने व नऊ दिवसांचा होता. पुरुष एकेरीत प्रथम क्रमांकावर विराजमान होणारा तो सर्वांत वयस्कर टेनिसपटू ठरला. त्याने अमेरिकेच्या आंद्रे अगासीचा (३३ वर्षे व १३१ दिवस) विक्रम मागे टाकला. ३१ वर्षीय स्पेनच्या राफेल नदालला मागे सारून त्याने अव्वल क्रमांकाची पुनःप्राप्ती केली. त्यानंतर तो म्हणाला, ‘मला वाटते, मी लवचिकता दाखविली आहे. माझे नियोजन दीर्घकालीन होते आणि पुन्हा विजयी मार्गावर येताना मी कधीच हिंमत हरली नाही.’ खरोखरच फेडररचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कारकिर्दीत त्याने अनेक चढउतार पाहिले. २०१६ मध्ये दुखापतीमुळे त्याचे मानांकन कमालीचे घसरले. प्रथमच तो पहिल्या १५ खेळाडूंच्या यादीतून बाहेर पडला, पण निराश झाला नाही. गुडघ्यावर शस्त्रक्रियेचे वार झेलत पुन्हा टेनिस कोर्टवर उतरला. २०१७ मध्ये दोन ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या, ऑस्ट्रेलियन ओपन व विंबल्डन. यंदा मेलबर्नला ऑस्ट्रेलियन ओपनचा करंडक स्वतःपाशीच राखला. टेनिस कारकिर्दीकडे पाहण्याचा त्याचा आशावादी दृष्टिकोन आदर्शवत आहे. ‘आपण संपलेलो नाही, अजूनही अव्वल खेळ करण्याची क्षमता आहे,’ या आत्मविश्‍वासाच्या जोरावर फेडरर खेळताना दिसतोय. ३६ वर्षे व १७३ दिवसांचा असताना त्याने विसावी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकली. फेडररने महानतेची रेष ओलांडून त्याही पुढे मार्गक्रमण केले आहे. तो म्हणजे एक आख्यायिकाच आहे. 

चौथ्यांदा प्रथम क्रमांकावर 
रॉजर फेडररने २००३ पासून ग्रॅंड स्लॅम यशाचा धडाका लावला. २०१३ ते २०१६ या कालावधीत त्याला एकही ‘मेजर’ स्पर्धा जिंकता आली नाही, तरीही तो डगमगला नाही. स्वतःच्या शरीरावर आणि कुवतीवर त्याचा पूर्ण विश्‍वास होता. फेब्रुवारी २००४ मध्ये पहिल्यांदा जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर विराजमान झाला. त्यानंतर ऑगस्ट २००८ पर्यंत २३७ आठवडे त्याने मानांकनातील ‘सम्राट’पद टिकवून ठेवले. जुलै २००९ मध्ये त्याने गमावलेले अव्वल स्थान पुन्हा मिळविले. जून २०१० पर्यंत ४८ आठवडे त्याने हे मानांकन राखले. त्यानंतर जुलै २०१२ ते नोव्हेंबर २०१२ या कालावधीत तो १७ आठवड्यांसाठी तो अव्वल स्थानी होता. त्यानंतर फेडररच्या निवृत्तीची चर्चाच जास्त रंगत होती, पण हा जिगरबाज दिग्गज खेळाडू साऱ्यांना पुरून उरला. आता कारकिर्दीत चौथ्यांदा अव्वल क्रमांक त्याने वर्षभराच्या कालावधीत तीन ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकून मिळविला आहे. पहिल्यांदा आणि आताचे अव्वल स्थान या दरम्यान १४ वर्षे आणि १७ दिवसांचा काळ लोटला. त्याने पाच वर्षे आणि १०६ दिवसांनंतर पुन्हा प्रथम क्रमांक मिळविला. हे पुनरागमन विलक्षण आहे. त्याच्या खेळातील कौशल्य, कलात्मकता, आक्रमकता, विजयी जिगर आजही टिकून आहे. तो केवळ गतवैभवावर खेळत नाही, तर खडतर मेहनत, अचाट जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती, तसेच नवनिर्मितीचा ध्यास या बळावर त्याची आगेकूच सुरू आहे. 

लॉरियस पुरस्कारांत छाप 
रॉजर फेडरर यावेळच्या लॉरियस पुरस्कार वितरण सोहळ्यातही ‘बिनतोड’ ठरला. २०१७ मधील कामगिरीसाठी त्याने दोन पुरस्कार मिळविले. ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू’ आणि ‘वर्षातील यशस्वी पुनरागमन करणारा खेळाडू’ या किताबांनी तो गौरविला गेला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर फेडररने आपल्यातील सद्‌गृहस्थाचेही दर्शन घडविले. यशस्वी ‘कमबॅक’साठी त्याने पारंपरिक प्रतिस्पर्धी राफेल नदाललाही श्रेय दिले. गतवर्षी नदालला ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम लढतीत नदालला हरवूनच फेडरनने अव्वल स्थान आणि ग्रॅंड स्लॅम यशाच्या दिशेने पुनरागमन केले होते. सध्याच्या आपल्या वाटचालीत तो प्रशिक्षक सेव्हेरिन लुथी व इव्हान ल्युबिसिच, तसेच फिजिकल थेरपिस्ट पिएरे पागानिनी यांचाही उल्लेख करतो. 

रॉजर फेडररची कारकीर्द 
     सर्वप्रथम १०० मानांकनात ः २० सप्टेंबर १९९९
     सर्वप्रथम अव्वल स्थानी ः २ फेब्रुवारी २००४
     प्रथम क्रमांकावर पुनरागमन ः १९ फेब्रुवारी २०१८

संबंधित बातम्या