शाहजारचा ‘सुवर्ण’ नेम!

 किशोर पेटकर  
गुरुवार, 22 मार्च 2018

क्रीडांगण     

विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताने चार सुवर्णपदकांसह एकूण नऊ पदके जिंकताना गुणतक्‍त्यात अव्वल स्थान मिळविले. ही कामगिरी साधताना त्यांनी अमेरिका व चीनला मागे टाकले. मेक्‍सिकोतील ग्वाडालाजारा येथे झालेल्या या स्पर्धेत भारताच्या युवा नेमबाजांनी छाप पाडली. यामध्ये मेरठमधील शाहजार रिझवी याचाही समावेश होता. त्याने विश्‍वविक्रमासह पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्णपदक जिंकले. मेरठमधील छोटा मावाना येथील या २३ वर्षीय नेमबाजाची ही पहिलीच विश्‍वकरंडक स्पर्धा होती. पदार्पणात विक्रमी नेम साधून त्याने वाहव्वा मिळविली. शाहजरने २४२.३ गुण नोंदविताना जर्मनीच्या ख्रिस्तियन रेट्‌झ याला मागे टाकले. रिओ ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या जर्मन नेमबाजाने २३९.७ गुणांचा नेम साधला. भारताचा अनुभवी नेमबाज जितू राय याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. शाहजारची कामगिरी भारतीय नेमबाजीसाठी सुखद आणि दिलासा देणारी आहे. विश्‍वकरंडक सुवर्णपदकानंतर या प्रतिभाशाली नेमबाजाने आता २०२० मधील ऑलिंपिक स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. रिओ ऑलिंपिकसाठी त्याला पात्रता हुकली होती, त्याची भरपाई टोकियोत करण्याचे ध्येय आहे.

गुणवत्तेला प्रोत्साहन
शाहजार विद्यार्थी दशेत असताना नेमबाजीकडे आकृष्ट झाला. साधरणतः नऊ वर्षांपूर्वी ‘एनसीसी’ शिबिरात त्याला बंदूक चालविण्याची संधी लाभली. त्यावेळी उपस्थित तज्ज्ञांना शाहजरच्या नेमबाजी कौशल्याने प्रभावित केले. या खेळात कारकीर्द करण्याविषयी सुचविले. शाहजारचे वडील शमशाद हे मेरठमधील एका कंपनीतील वाहतूक कंत्राटदार. मुलाने नेमबाजीतील भवितव्याबाबत सांगितल्यानंतर, शमशाद यांनी त्याला उधारीवर बंदूक आणून दिली व शाहजारचा सराव सुरू झाला. या खेळात शाहजार पारंगत झाल्यानंतर २०१२ मध्ये त्याला स्वतःचे पिस्तूल मिळाले. त्याचाहा भाऊ अहमर सुद्धा नेमबाज आहे. शाहजारची प्रगती पाहून वडिलांनी घरीच नेमबाजी रेंजची व्यवस्था केली. शाहजारने २०१४ साली पुण्यात झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रौप्य, तर २०१५ मध्ये दिल्लीत झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीने त्याला भारतीय हवाई दलात संधी दिली. तेथे तो ‘सार्जंट’ म्हणून रुजू झाला. हवाई दलाच्या पाठबळामुळे त्याला नेमबाजीतील दर्जेदार साधनसुविधांचे दालन खुले झाले. शाहजारच्या उपजत नेमबाजी गुणवत्तेला धुमारे फुटले. आंतरराष्ट्रीय आव्हानासाठी तो सज्ज झाला आणि त्याने पदकेही जिंकली.

राग काढला...
शाहजारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्रिस्बेन येथे झालेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकताना देशवासीय ओमकार सिंग व जितू राय यांना मागे टाकले होते. मात्र त्याला एप्रिलमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. राष्ट्रीय संघटनेने त्याच्याऐवजी अनुभवी जितू रायला प्राधान्य दिले आहे. निवडीत डावललेल्या शाहजारने सारा राग विश्‍वकरंडक स्पर्धेत काढला. जबरदस्त एकाग्रतने नेम साधत त्याने सुवर्णपदक जिंकून निवड समितीलाही चपराक दिली. ग्वाडालाजारा येथे त्याने जपानी नेमबाज तोमोयुकी मात्सुदा याने गेल्यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये नोंदविलेला २४१.८ गुणांचा विश्‍वविक्रम मोडला. राष्ट्रीय मानांकनात १० मीटर एअर पिस्तुलमध्ये ओमप्रकाश मिथरवाल पहिला, तर शाहजार दुसरा आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पहिल्या दोघा नेमबाजांची निवड होणे अपेक्षित होते, पण तसं न होता, अनुभव सरस ठरला. या प्रकारामुळे शाहजार चिडला होता. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) अमोल प्रताप सिंग हे शाहजरचे प्रशिक्षक, त्याला रौनक पंडित यांचेही मार्गदर्शन लाभते. राष्ट्रकुल स्पर्धेतील संधी हिरावली असली, तरी नाउमेद न होता शाहजारने विश्‍वकरंडकातील यशाने प्रेरित होत ऑलिंपिक स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे.

नेमबाज शाहजारची आंतरराष्ट्रीय पदके

  •      विश्‍वकरंडक नेमबाजी ः 
  • सुवर्ण (ग्वाडालाजारा, २०१८)
  •      राष्ट्रकुल नेमबाजी ः 
  • सुवर्ण (ब्रिस्बेन, २०१७)
  •      आशियाई एअरगन नेमबाजी ः सुवर्ण (तेहरान, २०१६)

संबंधित बातम्या