‘गोल्डन’ मीराबाई!

किशोर पेटकर
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

क्रीडांगण

अपयश माणसाला कणखर बनवते... राखेतून भरारी घेण्याची ऊर्जा देते... मणिपूरची २३ वर्षीय महिला वेटलिफ्टर सैखोम मीराबाई चानू हिने ही बाब खरी ठरविली आहे. रिओ ऑलिंपिकमध्ये साधारणतः दोन वर्षांपूर्वी मीराबाई कमालीची अपयशी ठरली. तिला वजन उचलण्यात अपयश आले. क्‍लीन अँड जर्क प्रकारात तीनपैकी एकाही प्रयत्नात ती वजन पेलू शकली नाही. तिच्यावर प्रचंड टीका झाली. स्वतः मीराबाईही डगमगली. तिला वाटले, की वेटलिफ्टिंगच सोडून द्यावं. मात्र प्रशिक्षकांनी तिला धीर दिला. त्यानंतर या जिगरबाज मणिपुरी युवतीने आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये बजावलेली कामगिरी थक्क करणारी आहे. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मीराबाईने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. महिलांच्या ४८ किलो वजनगटात तिने विक्रमी कामगिरी नोंदविताना स्नॅच आणि क्‍लीन अँड जर्क प्रकारात प्रत्येक टप्प्यावर जादा प्रमाणात वजन उचलून वाहव्वा मिळविली. चार वर्षांपूर्वी ग्लासगो येथे तिला याच वजनगटात रौप्यपदक मिळाले होते. तेव्हा मणिपूरच्याच खुमूक्‍चाम संजिता चानू हिने सुवर्णपदक मिळविले होते. यंदा मीराबाईने प्रचंड आत्मविश्‍वासाच्या बळावर पदकाचा रंग सोनेरी केला. गेल्यावर्षी सप्टेंबरपासून तिने वेटलिफ्टिंगमध्ये साधलेली कामगिरी थक्क करणारी आहे. राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर तिने नोव्हेंबरमध्ये जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा गाजविली. या स्पर्धेतही ती पुन्हा सोनेरी पदकाची मानकरी ठरली. त्यानंतर आता गोल्ड कोस्ट येथे लौकिक राखत मीराबाईने पुन्हा सुवर्णमय जल्लोष केला. अपयशाचा डाग धुवून काढताना इंफाळच्या या ध्येयनिष्ठ वेटलिफ्टरने या वर्षी ‘पद्मश्री’ने सन्मानित होण्यापर्यंत मजल मारली. 

विक्रमी कामगिरी 
भारताची ऑलिंपिक पदक विजेती कर्णम मल्लेश्‍वरी आणि मणिपूरची नावाजलेली वेटलिफ्टर कुंजराणी देवी यांना आदर्श मानणाऱ्या मीराबाईची गोल्ड कोस्टला कामगिरी विलक्षण ठरली. स्नॅच आणि क्‍लीन अँड जर्क प्रकारात मिळून तिने एकूण १९६ किलो वजन उचलले. हा नवा राष्ट्रकुल स्पर्धा विक्रम ठरला. विशेष बाब म्हणजे, भारताच्या वेटलिफ्टिंग संघासमवेत फिजिओ गोल्ड कोस्टला गेलेला नाही, तरीही तंदुरुस्ती सांभाळत मीराबाईने अफलातून ताकद प्रदर्शित केली. तिने सहा वेळा वजन उचलले आणि प्रत्येक वेळी वजन पेलण्याची क्षमता वाढविली. स्नॅचमध्ये अनुक्रमे ८०, ८४ व ८६ किलो, तर क्‍लीन अँड जर्कमध्ये अनुक्रमे १०३, १०७, ११० किलो वजन उचलून मीराबाईने शाबासकी मिळविली. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मॉरिशसच्या मेरी रोईल्या रॅनैव्होसोआ हिला एकत्रितपणे १७० किलो वजन पेलता आले. मीराबाईने तब्बल २६ किलो वजन जास्त उचलले. यावरून भारतीय वेटलिफ्टरच्या अचाट क्षमतेचा अंदाज येतो. मात्र आगामी आशियायी क्रीडा स्पर्धेत तिला तुल्यबळ आव्हान असेल. पण उंचावलेला आलेख लक्षात घेता, इंडोनेशियातही येत्या ऑगस्टमध्ये सुवर्णपदकास गवसणी घालण्याचा पराक्रम मीराबाई बजावू शकते. 

जागतिक विजेती
रिओ ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविताना मीराबाईने एकत्रित १९२ किलो वजन उचलले होते. तेव्हा तिने कुंजराणी देवीचा बारा वर्षे अबाधित राहिलेला राष्ट्रीय विक्रम मोडला होता. रिओत मीराबाई अपेक्षापूर्ती करू शकली नाही, पण गेल्या वर्षभरात तिने कठोर मेहनत आणि अथक सरावाच्या बळावर क्षमता वाढविली. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील ॲनाहेम येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत मीराबाईने एकूण १९४ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले. तिने स्नॅचमध्ये ८५, तर क्‍लीन अँड जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलून थायलंडच्या थुन्या सुकचारोएन (एकत्रित १९३ किलो वजन) हिला मागे टाकले. कर्णम मल्लेश्‍वरी हिने १९९४ व १९९५ मध्ये जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते, त्यानंतर असा पराक्रम करणारी मीराबाई अवघी दुसरीच भारतीय महिला वेटलिफ्टर ठरली.

मीराबाईची प्रमुख आंतरराष्ट्रीय पदके

  • राष्ट्रकुल स्पर्धा ः ग्लासगो (२०१४), रौप्यपदक, १७० किलो
  • जागतिक स्पर्धा ः ॲनाहेम (२०१७), सुवर्णपदक, १९४ किलो
  • राष्ट्रकुल स्पर्धा ः गोल्ड कोस्ट (२०१८), सुवर्णपदक, १९६ किलो

संबंधित बातम्या