प्रतिकूलतेशी झगडा

किशोर पेटकर
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

क्रीडांगण

मणिपूरच्या मीराबाई चानू हिने गोल्ट कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर, लगेच दुसऱ्या दिवशी तिच्याच राज्यातील खुमुक्‍चाम संजिता चानू हिने महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. संजिताने ५३ किलोगटात सोनेरी कामगिरी केली, पण हे यश तिला सहजासहजी मिळालेले नाही. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत तिने अव्वल कामगिरी नोंदविली. मणिपूरच्या या २४ वर्षीय खेळाडूने सलग दुसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकास गवसणी घातली. यापूर्वी २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या स्पर्धेत संजिता ४८ किलोगटात विजेती ठरली होती. तेव्हा देशवासीय मीराबाई हिला मागे टाकताना तिने १७३ किलो वजन उचलले होते. यावेळी तिने वजनगट बदलला. तिच्या गटात गतविजेती पापुआ न्यू गिनीची लोआ डिका टौआ ही मातब्बर खेळाडू होती. संजिताने स्नॅचमध्ये ८४ किलो, तर क्‍लीन अँड जर्कमध्ये १०८ किलो मिळून एकूण १९२ किलो वजन उचलले, तर डिका टौआ हिला १८२ किलो वजन उचलणेच शक्‍य झाले. शरीर पूर्ण साथ देत नव्हते, राष्ट्रीय स्पर्धेतील पराभवामुळे तिची क्षमता प्रश्‍नांकित ठरविण्यात आली होती, तसेच गतवर्षी तिला अर्जुन पुरस्कारांच्या यादीतूनही डावलण्यात आले होते. या साऱ्या प्रकारांमुळे संजिता दुखावली होती, पण आत्मविश्‍वास खच्ची होऊ दिला नाही. गोल्ड कोस्ट येथे जिंकलेल्या सुवर्णपदकाने तिच्या वेदनेवर हळूवार फुंकर घातली आहे.

जबरदस्त मुसंडी
संजिताने गेल्या वर्षी राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत बदललेल्या ५३ किलोगटात एकूण १९५ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे तिला गोल्ड कोस्टमधील राष्ट्रकुल स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळाली. त्यापूर्वी कर्नाटकात झालेल्या राष्ट्रीय महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत रेल्वेच्या एम. संतोषी हिने हरविले होते, साहजिकच संजिताच्या कुवतीबद्दल शंका व्यक्त झाली. मात्र राष्ट्रकुल वेटलिफ्टिंगमध्ये तिने आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पुन्हा दुर्दैव तिच्या आड आले. जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी सराव करताना तिची पाठ दुखावली, परिणामी कामगिरी घसरली. अमेरिकेत झालेल्या जागतिक स्पर्धेत ५३ किलोगटात तिला पाचवा क्रमांक मिळाला. मात्र संजिता भांबावली नाही. गोल्ड कोस्टला ९० टक्के तंदुरुस्त असतानाही कणखर मनोवृत्तीच्या बळावर तिने सुवर्णमय कामगिरी नोंदविली. स्पर्धेच्या कालावधीत तिला दुखापतग्रस्त पाठ सतावत होती. अधिस्वीकृती पत्र नसल्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी भारतीय वेटलिफ्टिंग संघाचे फिजिओ जाऊ शकत नव्हते. त्यामुळे वेदना सहन करून संजिताने जिंकलेली सुवर्णपदक अतिशय मौल्यवान ठरते. यामुळेच बक्षीस वितरण सोहळ्यात पदक स्वीकारताना संजिताला रडू आले. भावुक होण्यास दुसरी किनारही आहे. आवश्‍यक पात्रता कामगिरी असूनही गतवर्षी संजिताला अर्जुन पुरस्कार यादीत स्थान देण्यात आले नाही. हा तिच्यासाठी धक्काच होता. अन्यायाविरुद्ध दाद मागताना तिने केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालयास दिल्ली उच्च न्यायालयात खेचले होते.

स्नॅचमध्ये विक्रम
गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत संजिताने स्नॅच प्रकारात नवा स्पर्धा विक्रम नोंदविला. तिने ८४ किलो वजन पेलले, त्यामुळे भारताच्याच स्वार्ती सिंग हिने यापूर्वी स्पर्धेत उचललेल्या ८३ किलोंचा विक्रम मागे पडला. संजिता क्‍लीन अँड जर्क प्रकारातही विक्रम नोंदविण्यास इच्छुक होती. अगोदरच्या प्रयत्नात १०८ किलो वजन उचलले, नंतर तिने ११३ किलोसाठी प्रयत्न केला, पण फसली. जादा भार तिला झेपला नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ५३ किलो वजनगटात क्‍लीन अँड जर्कमधील १११ किलोंचा विक्रम अबाधित राहिला. गेल्या वर्षी राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत संजिताने स्नॅचमध्ये ८५ व क्‍लीन अँड जर्कमध्ये ११० किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले होते. दोन्ही प्रकारात विक्रमी ठरली असती, तर गोल्ड कोस्टमधील तिच्या पदकास वेगळीच झळाळी चढली असती. ‘कदाचित आज देव माझ्यासोबत नव्हता,’ अशी बोलकी प्रतिक्रिया संजिताने दिली.

‘सोनेरी’ वेटलिफ्टर संजिता

ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा : २०१४ (४८ किलोगट)
गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धा : २०१८ (५३ किलोगट)

संबंधित बातम्या