मनूचा सुवर्णवेध

किशोर पेटकर
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

क्रीडांगण
 

मनू भाकर हिला नेमबाजीने प्रभावित केले. या खेळात कारकीर्द करण्याची या मुलीने ठरविले. तिने वडील रामकिशन यांच्याकडे पिस्तूलाची मागणी केली. मुलीचा हट्ट पुरविताना अभियंता असलेल्या वडिलांनी अंदाजे एक लाख ४० हजार रुपयांचे पिस्तूल खरेदी केले. हक्काचे पिस्तूल मिळाल्यामुळे मनूचा उत्साह दुणावला. अचाट एकाग्रता आणि अचूकतेच्या बळावर हरियानातील झज्जर येथील या १६ वर्षीय मुलीने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा गाजविली, नंतर विश्‍वकरंडक नेमबाजीत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले, सिडनीतील विश्‍वकरंडक ज्युनिअर स्पर्धेतही सुवर्णपदकावरच नेम धरला, तसेच गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पुन्हा सुवर्णवेध साधला. मनूला आता ‘गोल्डन फिंगर’ नेमबाज मानले जाते. दोन महिन्यांच्या कालावधीत तिने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सात सुवर्णपदके जिंकली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत तिने देशभगिनी हीना सिद्धू हिला नमविले. पात्रता फेरीत तिने ३८८ गुणांचा वेध घेत पात्रता विक्रम नोंदविला. अंतिम फेरीत अचूकतेवर भर राखत २४०.९ गुणांची नोंद करत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. रौप्यपदक विजेत्या हीना सिद्धूला तिने ६.९ गुणफरकाने मागे टाकले. 

विश्‍वकरंडक स्पर्धा गाजविली
विश्‍वकरंडक स्पर्धेतील सोनेरी कामगिरीने मनू आंतरराष्ट्रीय नेमबाजीत सर्वप्रथम प्रकाशझोतात आली. मेक्‍सिकोतील ग्वाडालाजारा येथे झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत मनूने साऱ्यांनाच चकित केले. अनुभवात कमजोर, पण प्रतिभेत सरस असलेल्या या भारतीय मुलीने शूटिंग रेंजवर भन्नाट नेम साधला. तिने २३७.५ गुणांचा वेध घेत विश्‍वकरंडक सुवर्णपदकास गवसणी घातली. मेक्‍सिकोची दोन वेळची विश्‍वकरंडक विजेती अलेजांड्रा झावाला मनूच्या तुलनेत दुप्पट वयाची आणि अनुभवीही. झावाला हिला २३७.१ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात विजेतेपद मिळविल्यानंतर मनूने ओमप्रकाश मिथरवाल याच्या साथीत मिश्र दुहेरीतही सुवर्णपदकाची कमाई केली. राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी सिडनी येथे झालेल्या विश्‍वकरंडक ज्युनिअर नेमबाजी स्पर्धेतही मनूने नेम अचूक राखताना सुवर्णपदक निसटू दिले नाही. 

राष्ट्रीय विक्रम
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिरुअनंतपुरम येथे झालेल्या ६१व्या राष्ट्रीय स्पर्धेत मनूने भन्नाट कामगिरी प्रदर्शित केली होती. अकरावी इयत्तेतील या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल नऊ सुवर्णपदके जिंकली. १० मीटर एअर पिस्तूलमध्ये तिने अनुभवी हीना सिद्धूला मागे टाकताना राष्ट्रीय विक्रमही नोंदविला. मनूने केंद्र सरकारच्या खेलो इंडिया स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूलमध्ये ज्युनिअर राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. केवळ नेमबाजीतच नव्हे, तर इतर खेळांतही मनू तरबेज आहे. तिने कराटे, स्केटिंग, जलतरण, टेनिससह थांग ता या मार्शल आर्ट खेळातही प्रावीण्य संपादले असून राष्ट्रीय पदकेही जिंकलीत. बॉक्‍सिंग, क्रिकेट, कबड्डी हे खेळही ती शालेय पातळीवर खेळली आहे. थांग ता या मणिपुरी मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात मनू सलग तीन वर्षे राष्ट्रीय विजेती ठरली आहे. सहा वर्षांची असताना बॉक्‍सिंगद्वारे तिच्या क्रीडा कारकिर्दीस सुरवात झाली. पालकांच्या प्रोत्साहनामुळे तिने मागे वळून पाहिले नाही. बरेच खेळ अनुभवल्यानंतर ती आता नेमबाजीत स्थिरावली आहे.

नेमबाज मनू भाकरविषयी...

  • जन्मतारीख ः १८ फेब्रुवारी २००२
  • डिसेंबर २०१७ ः राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूलमध्ये विक्रम (२४२.३ गुण)
  • मार्च २०१८ ः विश्‍वकरंडक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूलमध्ये वैयक्तिक व मिश्र दुहेरीत सुवर्ण, विश्‍वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सर्वांत युवा भारतीय
  • मार्च २०१८ ः विश्‍वकरंडक ज्युनिअर नेमबाजीत १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिकसह चार सुवर्णपदके
  • एप्रिल २०१८ ः राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूलमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक व स्पर्धा विक्रम

फोटो फीचर

संबंधित बातम्या