अव्वल नंबरी श्रीकांत!

किशोर पेटकर
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

क्रीडांगण
 

तब्बल ३८ वर्षांपूर्वी, १९८० मध्ये प्रकाश पदुकोण याने पुरुषांच्या जागतिक एकेरी बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले होते, पण तेव्हा मानांकन अधिकृत नव्हते. आता आणखी एका भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूने एकेरीत अधिकृतपणे जागतिक प्रथम क्रमांक पटकाविला आहे... किदांबी श्रीकांत. हैदराबाद येथील गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकादमीत शास्त्रोक्त पैलू पाडले गेलेला हा प्रतिभाशाली २५ वर्षीय बॅडमिंटनपटू. गोपीचंद यांनीही २००१ मध्ये ‘ऑल इंग्लंड’ किताब जिंकताना जागतिक बॅडमिंटन कोर्ट गाजविले होते, आज त्यांचा शिष्य जगातील ‘अव्वल नंबरी’ बॅडमिंटनपटू बनला आहे. एप्रिल २०१५ मध्ये साईना नेहवाल महिला बॅडमिंटनमध्ये ‘टॉप’ची खेळाडू बनली होती. दुखापती, आजार यांच्यावर मात करत श्रीकांतने कारकिर्दीत आगेकूच राखली. जुलै २०१४ मध्ये श्रीकांतला मेंदूज्वराने दणका दिला. हैदराबाद येथील गोपीचंद यांच्या अकादमीत सराव सत्राच्या कालावधीत श्रीकांत आजारपणामुळे प्रसाधनगृहात बेशुद्धावस्थेत सापडला. इस्पितळातील अतिदक्षता विभागात काही दिवस राहिल्यानंतर तो पुन्हा मैदानात उतरला. त्यानंतर २०१६ मध्ये पुन्हा त्याची कारकीर्द अडचणीत आली. दुखापतीमुळे त्याला सुमारे चार महिने बॅडमिंटन कोर्टपासून दूर राहावे लागले. गोपीचंद यांच्या खंबीर पाठबळामुळे तो सावरला. गेल्या वर्षी चार सुपर सीरिज स्पर्धा जिंकून मोठी झेप घेतली आणि आता पहिला क्रमांकही मिळविला.

‘टॉप’ राहण्याचे आव्हान
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातील (१२ एप्रिल २०१८) जागतिक बॅडमिंटन मानांकनात श्रीकांतचे ७६,८९५ गुण झाले आहेत. त्याने डेन्मार्कचा उंचपूरा आक्रमक खेळाडू व्हिक्‍टर ॲक्‍सेल्सन याला मागे टाकले. जागतिक विजेत्या ॲक्‍सेल्सनला दुखापतींमुळे सुमारे तीन महिने स्पर्धात्मक बॅडमिंटनपासून दूर राहावे लागले आहे. त्याच्या गुणांत घट होऊन ती ७५,४७० पर्यंत आली. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये नागपुरात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पूर्ण तंदुरुस्त नसतानाही श्रीकांतला खेळावे लागले. पायाची दुखापत त्याला सतावत होती. वर्षअखेरीस दुबईत झालेल्या सुपर सीरिज ‘ग्रॅंड फायनल्स’ स्पर्धेत त्याची कामगिरी लौकिकास साजेशी झाली नाही. अव्वल बनलेल्या श्रीकांतला पूर्ण तंदुरुस्ती आणि वेगवान-आक्रमक खेळात सातत्य राखावे लागेल. २००८ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर पदार्पण केले, सहा वर्षांपूर्वी तो जागतिक क्रमवारीत तब्बल ३३८व्या स्थानी होता. त्यानंतर त्याने गाठलेली उंची विलक्षण आहे. श्रीकांतने अव्वल कामगिरीचे श्रेय पालक, प्रशिक्षक, त्याला तंदुरुस्त राखणारे फिजिओ व सपोर्ट स्टाफला दिले आहे. शारीरिक क्षमता अपुरी असेल, तर बॅडमिंटनसारख्या खेळात प्रगती साधणे अशक्‍यच. श्रीकांतसाठी आगामी स्पर्धा महत्त्वाच्या असतील. ‘वर्ल्ड टूर’ स्पर्धांत खेळताना अव्वल क्रमांकासाठी आवश्‍यक असलेले गुण गमावणार नाही याची दक्षता आंध्र प्रदेशच्या या गुणी खेळाडूस बाळगावी लागेल.

‘जायंट किलर’ खेळाडू
कमी बोलणारा, शांत वृत्ती आणि एकाग्र खेळ या स्वभाववैशिष्ट्यामुळे श्रीकांतला ‘मिस्टर कूल’ असे कौतुकाने संबोधले जाते. प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी प्रतिआक्रमण करण्यात पटाईत असलेल्या श्रीकांतला बॅडमिंटन कोर्टवर ‘जायंट किलर’ मानले जाते. नोव्हेंबर २०१४ मध्ये चायना ओपन सुपर सीरिज स्पर्धा जिंकताना श्रीकांतने सनसनाटी कामगिरी नोंदविली होती. चीनचा महान खेळाडू लिन डॅन, ज्याने पाच वेळा जगज्जेतेपद आणि दोन वेळा ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले, त्याला हरवून श्रीकांतने मोठे यश प्राप्त केले. २०१५ मध्ये इंडिया ओपन किताब जिंकताना त्याने व्हिक्‍टर ॲक्‍सेल्सनवर मात केली होती. जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी येण्यापूर्वी श्रीकांतने गोल्ड कोस्टमधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आणखी एका दिग्गज खेळाडूस दणका दिला. मिश्र सांघिक सुवर्णपदकाच्या लढतीत भारताने मलेशियास पराभूत केले. पुरुषांच्या एकेरीत श्रीकांतने माजी अव्वल खेळाडू ली चाँग वेई याला नमविले. अगोदरच्या चार लढतीत या महान खेळाडूकडून हार पत्करल्यानंतर, श्रीकांतने प्रथमच विजय मिळविला. 

किदांबी श्रीकांतची २०१७ मधील कामगिरी

  • सुपर सीरिज विजेता ः इंडोनेशियन ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, डेन्मार्क ओपन, फ्रेंच ओपन
  • सुपर सीरिज उपविजेता ः सिंगापूर ओपन

संबंधित बातम्या