नीरजची ‘सुवर्ण’ भालाफेक

किशोर पेटकर
गुरुवार, 26 एप्रिल 2018

क्रीडांगण

हरियानाचा नीरज चोप्रा हा नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरलेला भालाफेकपटू. दोन वर्षांपूर्वी जागतिक ज्युनिअर मैदानी स्पर्धेत भालाफेकीत विश्‍वविक्रमासह सुवर्णपदक जिंकून प्रकाशझोतात आला होता, आता या वीस वर्षीय खेळाडूने पुन्हा वाहव्वा मिळविली आहे. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या २१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने ८६.४७ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. त्याच्या ज्युनिअर जागतिक कामगिरीच्या तुलनेत भाला एक सेंटीमीटर फरकाने मागे पडला, पण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्‍समध्ये सुवर्णपदक जिंकणारा अवघा चौथा भारतीय हा मान त्याला मिळाला. वैयक्तिक पातळीवर धावपटू मिल्खा सिंगने १९५८मध्ये, थाळीफेकपटू कृष्णा पुनियाने २०१० मध्ये, गोळाफेकपटू विकास गौडा याने २०१४ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्‍समधील सुवर्णपदक जिंकले होते. गोल्ड कोस्टमधील स्पर्धेत मुख्य फेरीत पहिल्या प्रयत्नात ८५.५० मीटरचे अंतर कापल्यानंतर चौथ्या प्रयत्नात नीरजने सुवर्णपदक निश्‍चित केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत विजेता ठरलेला तो पहिला भारतीय आहे. मोसमाच्या सुरवातीस त्याने जर्मनीत ८२.८० मीटर अंतर कापले होते, नंतर पतियाळा येथील फेडरेशन कप सीनियर मैदानी स्पर्धेत ८५.९४ मीटरची नोंद केली होती. मोसमातील नीरजचा चढता आलेख त्याच्या प्रगतीची साक्ष आहे.

९० मीटरचे लक्ष्य
गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्यामुळे नीरजचा आत्मविश्‍वासही उंचावला आहे. भारतात परतल्यानंतर त्याने आगामी आशियायी क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचा निश्‍चय व्यक्त केला, तसेच ९० मीटर अंतर कापण्याचे ध्येय बाळगले आहे. २०२० मध्ये टोकियोत होणारी ऑलिंपिक स्पर्धाही त्याच्या नजरेसमोर आहे. गोल्ड कोस्टला जाण्यापूर्वी त्याने जर्मनीतील ऑफेनबर्ग येथे नावाजलेले प्रशिक्षक वेर्नेर डॅनिएल्स यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. त्याला आणखी एक प्रतिथयश प्रशिक्षक उवे हॉन यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. या जर्मन भालाफेकपटूने सर्वप्रथम १०० मीटर अंतर कापताना १९८४ मध्ये १०४.८० मीटर अंतर नोंदविले होते. दोन दिग्गज प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने नीरजच्या कौशल्यास योग्य खतपाणी घातले आहे, त्याच्या परिपक्वतेत भर पडली. दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक गॅरी कॅल्वर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली नीरजने ज्युनिअर जागतिक स्पर्धेत विश्‍वविक्रमापर्यंत मजल मारली होती.

ऑलिंपिक स्पर्धा हुकली
नीरजला दोन वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिक स्पर्धा अगदी थोडक्‍यात हुकली होती. पाठदुखीमळे रिओ ऑलिंपिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी आवश्‍यक तयारी करता आली नाही. पात्रतेची तारीख उलटून गेल्यानंतर पोलंडमध्ये त्याने सुमारे दोन मीटर फरकाने ज्युनिअर विश्‍वविक्रम मोडीत काढला, ही कामगिरी ऑलिंपिक पात्रतेच्या तुलनेत सरस होती, पण उशीर झाला होता. गतवर्षी लंडनमधील जागतिक मैदानी स्पर्धेत तो अपेक्षापूर्ती करू शकला नाही, मात्र गोल्ड कोस्टमधील सोनेरी कामगिरीने हा प्रतिभावान ॲथलिट सावरल्याचे दिसून आले. पानीपत जिल्हातील खंडरा हे नीरजचे गाव. तेथे ॲथलेटिक्‍ससाठी आवश्‍यक सुविधा नव्हत्या. आठ भावंडात तो सर्वांत लहान. वडील शेतकरी. खेळातील चांगल्या सुविधांसाठी त्याने घर सोडले. पंचकुला येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ‘स्पोर्टस हॉस्टेल’मध्ये तो भरती झाला. सुरवातीला तो भालाफेकीतील तांत्रिक बाबींबाबत अनभिज्ञ होता. भालाफेकीत तीन वेळा ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकलेल्या चेक प्रजासत्ताकाच्या यॅन झेलेन्झी याच्या चित्रफिती मिळवून तंत्राचा अभ्यास केला, त्यानंतर नीरजने मागे वळून पाहिले नाही.

नीरजची भालाफेकीतील प्रगती

  •  फेब्रुवारी २०१६ मध्ये गुवाहाटी येथे दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेत ८२.२३ मीटर अंतरासह सुवर्णपदक
  •  जुलै २०१६ मध्ये पोलंड येथे २० वर्षांखालील जागतिक ज्युनिअर स्पर्धेत ८६.४८ मीटर अंतर नोंदवून विश्‍वविक्रम व राष्ट्रीय विक्रमही
  •  जुलै २०१७ मध्ये भुवनेश्‍वर येथील आशियायी सीनियर अजिंक्‍यपद स्पर्धेत ८५.२३ मीटरवर भालाफेक, सुवर्णपदक
  •  एप्रिल २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, ८६.४७ मीटर अंतरावर भालाफेक

संबंधित बातम्या