‘सुपरस्टार’ मणिका!

किशोर पेटकर
गुरुवार, 26 एप्रिल 2018

क्रीडांगण
 

गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची महिला टेबल टेनिसपटू मणिका बत्रा ‘सुपरस्टार’ ठरली. तिने एकूण चार पदके जिंकली. यामध्ये दोन सुवर्ण, एक रौप्य व एक ब्राँझपदकाचा समावेश राहिला. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक तक्‍त्यात देश या नात्याने विचार करता, मणिकाची कामगिरी १८व्या क्रमांकाची ठरते. या स्थानावरील त्रिनिदाद-टोबॅगो देशाने दोन सुवर्ण व एक रौप्य अशी तीन पदके जिंकली. भारताचे शेजारी असलेल्या दक्षिण आशियायी देशांच्या तुलनेतही मणिकाची कामगिरी सरस ठरली. पाकिस्तानला एकच सुवर्ण मिळाले, तर श्रीलंका व बांगलादेशसाठी सुवर्णपदकाचा दुष्काळ राहिला. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी उत्साहवर्धक ठरली. २६ सुवर्ण, २० रौप्य व २० ब्राँझ अशी एकूण ६६ पदके जिंकून भारताने ऑस्ट्रेलिया व इंग्लंडनंतर तिसरा क्रमांक मिळविला. त्यात टेबल टेनिसमधील मुसंडी लाजवाब ठरली. या खेळात भारताला तीन सुवर्ण, दोन रौप्य व तीन ब्राँझ अशी आठ पदके मिळाली, त्यातील अर्धा वाटा मणिकाने बहारदार खेळाच्या बळावर उचलला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली, तर एकंदरीत दुसरी टेबल टेनिसपटू हा मान तिने मिळविला. यापूर्वी अचंता शरथ कमाल याने २००६ साली मेलबर्न येथील स्पर्धेत पुरुष एकेरीत विजेतेपद पटकाविले होते. 

चार वर्षांतील प्रगती
मणिका बत्रा २२ वर्षांची आहे. सुरेख खेळते. आक्रमणात आणि बचावात ती परिपक्व झाली आहे. चार वर्षांपूर्वी, तेव्हा १८ वर्षांची असलेल्या मणिकाने ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर दिल्लीच्या या मुलीच्या खेळात प्रगती पाहायला मिळालेली आहे. त्या बळावर ती जागतिक टेबल टेनिसमध्ये ‘टॉप १००’मध्ये आली, सध्या ५८व्या क्रमांकावर आहे. तीन वर्षांपूर्वी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत तिने दोन रौप्य व एकेरीतील ब्राँझसह एकूण चार पदके जिंकली, नंतर दक्षिण आशियायी स्पर्धा जिंकून २०१६मधील रिओ ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविली, तेथे तिला पहिल्याच फेरी गाशा गुंडाळावा लागला, पण तिने लक्ष वेधण्यास सुरवात केली होती. मणिकाने दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेत दुहेरी, मिश्र दुहेरी व सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती, शिवाय जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत खेळताना उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. 

ध्यास अत्युच्च कामगिरीचा
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सिंगापूरच्या टेबल टेनिसपटूंनी वर्चस्व पाहायला मिळते, मात्र यावेळी भारतीय महिलांनी त्यास धक्का दिला. सांघिक सुवर्णपदकाच्या लढतीत सिंगापूरला पराभूत व्हावे लागले. भारताच्या या ऐतिहासिक मोहिमेचे नेतृत्व अर्थातच मणिका हिनेच केले. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या तियानवेई फेंग हिला मणिकाने दोन वेळा हरविले, नंतर एकेरीत विजेतेपदास गवसणी घालताना यू मेंगयू या आणखी एका बलाढ्य खेळाडू सरळ गेम्समध्ये पराजित केले. मणिका ही दिल्लीतील नारायण विहार येथील. वयाच्या चौथ्या वर्षी तिने टेबल टेनिस खेळण्यास सुरवात केली. घरी या खेळाचे वातावरण होते. मोठा भाऊ साहिल हा राज्यस्तरीय, तर थोरली बहीण आंचल ही राष्ट्रीय पातळीवरील टेबल टेनिसपटू. प्रशिक्षक संदीप गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मणिकाची गुणवत्ता बहरली. अभ्यासातही हुशार असलेली मणिका सुमारे सोळा वर्षांची असताना, तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे ‘मॉडेलिंग’बाबत विचारणा झाली होती, पण ही खेळाडू झगमगाटाच्या मोहजालापासून दूरच राहिली व तिने टेबल टेनिसवर लक्ष केंद्रित केले. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी तिने अत्युच्च कामगिरीचा ध्यास घेतला होता. खास आणि अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी ती जर्मनीस गेली. तेथे तिने सर्व्हिस, स्मॅश फटका, चेंडूवरील नियंत्रण या टेबल टेनिसमधील महत्त्वाच्या बाबींवर मेहनत घेतली व त्यात सुधारणा घडवून आणली. गोल्ड कोस्टमध्ये खेळातील परिपक्वतेमुळे मणिकास कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविता आली हे स्पष्टच आहे.

गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत मणिका बत्रा

  •  महिला एकेरीत सुवर्ण
  •  महिला सांघिक गटात सुवर्ण
  •  महिला दुहेरीत मौमा दास हिच्यासह रौप्य
  •  मिश्र दुहेरीत ज्ञानशेखरन साथीयन याच्यासह ब्राँझ

संबंधित बातम्या