चौदा वर्षांचा वनवास!

किशोर पेटकर 
गुरुवार, 3 मे 2018

क्रीडांगण

भारतीय गोल्फर राहिल गंगजी याने तब्बल चौदा वर्षांनंतर कारकिर्दीतील दुसरे प्रमुख व्यावसायिक विजेतेपद पटकाविले. भारताचा हा ३९ वर्षीय गोल्फर जपानमधील ओसाका येथे झालेल्या पॅनासोनिक ओपन गोल्फस्पर्धेत विजेता ठरला. यापूर्वी २००४ मध्ये त्याने आशियायी टूरवरील चीनमधील स्पर्धा जिंकली होती. राहिलला त्यानंतर छाप पाडण्याची संधी मिळाली, पण तो विजेतेपदापासून दूरच राहिला. निर्णायक टप्प्यावर त्याला सूर गवसत नव्हता. महत्त्वाची बाब म्हणजे, चौदा वर्षांच्या कालावधीत तो अजिबात निरुत्साही झाला नाही, उलट गोल्फ खेळण्यासाठी प्रेरित बनला. त्यामुळेच जपानमध्ये तो विजेतेपदाचा झेंडा फडकावू शकला. आपण चांगलं खेळतोय हे राहिलला माहीत होते, पण विजेतेपदाचा करंडक त्याच्या हाती येत नव्हता. ओसाका येथील स्पर्धेतही आव्हान कठीण होते. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी त्याने कोरियाच्या किम ह्युंगसुंग याला मागे टाकून विजेतेपदावर मोहोर उठविली. यामुळे राहिलच्या आर्थिक तिजोरीतही मोठी भर पडली आहे. जपानमधील स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी राहिल संयमाने खेळला. त्याचे योग्य बक्षीस त्याला मिळाले. एखादी चूक त्याला महागात पडली असली, मात्र त्याने एकाग्रता ढळू दिली नाही. जपान टूर गोल्फ स्पर्धा जिंकणारा राहिल गंगजी हा तिसरा भारतीय गोल्फर आहे. यापूर्वी २००३ मध्ये ज्योती रंधवा याने, तर जीव मिल्खा सिंग याने २००६ व २००८ मध्ये जपानमध्ये विजेतेपदाचा जल्लोष केला होता. जपानमध्ये जिंकण्यापूर्वी व्यावसायिक गोल्फमध्ये राहिलला अजिंक्‍यपदाने काही वेळा हुलकावणी दिली होती. त्याला २००६ मध्ये तैवान ओपनमध्ये दुसरा, तर २००७ मध्ये इंडियन ओपनमध्ये तिसरा क्रमांक मिळाला होता. २०१२ मध्ये गुजरातमधील स्पर्धेतही त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यावर्षी प्रारंभी प्रकृतीने साथ न दिल्यामुळे त्याला म्यानमार व सिंगापूरमधील स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. अखेर जपान त्याच्यासाठी ‘लकी’ ठरले.

बनयाचं होतं घोडेस्वार...
गोल्फमध्ये कारकीर्द करण्यापूर्वी राहिल गंगजी याने घोडेस्वार (जॉकी) बनण्याचा निश्‍चय केला होता. त्याचा जन्म कोलकत्यातील. वडिलांनी त्याला योग्य सल्ला देत ‘जॉकी’ बनण्यापासून रोखले. घोडेस्वारीत दुखापती होण्याचा संभव असल्यामुळे मुलाने या खेळात कारकीर्द करू नये असे वडिलांना वाटत होते. त्यानंतर राहिलने बंगळूरचा रस्ता धरला आणि गोल्फमध्ये त्याच्या कारकिर्दीस दिशा गवसली. गोल्फमधील वाटचालीत अपेक्षेनुसार त्याला कुटुंबीयांचीही साथ मिळाली. चीनमधील विजेतेपदाच्या करंडकानंतर तो यशाच्या प्रतीक्षेत राहिला. साऱ्यांचा त्याच्या गुणवत्तेवर विश्‍वास होता, त्यामुळेच राहिल गोल्फ मैदानावर भक्कमपणे टिकून राहिला. गोल्फमधील भारताचा दिग्गज खेळाडू अर्जुन अटवाल याला तो प्रेरणास्त्रोत मानतो. अटवाल हा आशियायी गोल्फमधील माजी क्रमांक एकचा खेळाडू आहे. चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेला राहिल व्यावसायिक गोल्फमधील कारकीर्द कितपत लांबवतो आणि यशस्वी ठरतोय हे येणारा काळच ठरवेल, एक मात्र खरं, हा गोल्फर कमालीचा चिवट आहे. त्यामुळेच चौदा वर्षे टिकून राहिला. हार न मानता दीर्घ कालावधीनंतर विजेतेपदास गवसणी घालू शकला.

हौशी मैदानावरही छाप
आशियायी टूरवरील दोन विजेतेपदांसह राहिलने आतापर्यंत कारकिर्दीत चार प्रमुख व्यावसायिक स्पर्धा जिंकल्या आहेत. शिवाय हौशी पातळीवरही तो विजेता ठरलेला आहे. २००० साली तो व्यावसायिक गोल्फर बनला. आशियायी टूर स्पर्धांत खेळण्यापूर्वी राहिल नॅशनवाईड (वेब.कॉम) टूरवर खेळत होता. व्यावसायिक खेळाडू बनल्यानंतर चौथ्या वर्षी तो पहिल्यांदा पूर्ण मोसम खेळला. त्याचे गोड फळ त्याला चीनमध्ये मिळाले. हौशी पातळीवर त्याने १९९७ मध्ये श्रीलंकेत पहिली स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर १९९९ मध्ये ईस्ट इंडिया हौशी स्पर्धेतही बाजी मारली. त्यावर्षी तो भारताचा हौशी गटातील अव्वल गोल्फर होता. या कामगिरीने त्याला व्यावसायिक गोल्फ मैदानावर पदार्पण करण्यास प्रोत्साहित केले. 

राहिल गंगजीचे व्यावसायिक यश

  • पीजीटीआय स्पर्धा ः २००८ व २०१३
  • आशियाई टूर स्पर्धा ः फोक्‍सवेगन मास्टर्स (चीन, २००४), 
    पॅनासोनिक ओपन (जपान, २०१८)

संबंधित बातम्या