बार्सिलोनाची मलमपट्टी...

किशोर पेटकर
गुरुवार, 10 मे 2018

क्रीडांगण
 

स्पेनचा नावाजलेला फुटबॉल संघ बार्सिलोना एफसीला युरोपियन चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत अपयश आले. इटलीच्या ए. एस. रोमा संघाने त्यांना उपांत्यपूर्व फेरीत हरविले. बार्सिलोना संघाला आगेकूच राखणे शक्‍य होते, कारण त्यांनी घरच्या ‘कॅंप नोऊ’वरील पहिल्या टप्प्यातील सामना ४-१ असा आरामात जिंकला होता, पण रोममधील परतीच्या लढतीत रोमा संघाने जोरदार मुसंडी मारली. ३-० फरकाने सामना जिंकत गोलसरासरीत ४-४ अशी बरोबरी साधली. अगोदरच्या लढतीत नोंदविलेल्या ‘अवे गोल’च्या बळावर रोमा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला, बार्सिलोना क्‍लबच्या हाती रिकामे धुपाटणे आले. या अपयशावर मलमपट्टी करताना बार्सिलोना संघाने चाहत्यांना दिलासा दिला. कोपा डेल रे करंडकानंतर त्यांनी ला-लिगा स्पर्धेत चार सामने बाकी असताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. कोपा डेल रे करंडक तिसाव्यांदा, तर ला-लिगा स्पर्धा २५व्यांदा जिंकण्याचा पराक्रम त्यांनी बजावला. स्पॅनिश फुटबॉलमधील या दोन्ही प्रतिष्ठित स्पर्धा एकाच मोसमात जिंकण्याची ‘बार्सा’ संघाची ही आठवी वेळ ठरली. ला-लिगा स्पर्धा सर्वाधिक ३३ वेळा रियल माद्रिद संघाने जिंकली आहे. हा विक्रम निश्‍चितच बार्सिलोना एफसीच्या नजरेसमोर असेल. या कॅटलान संघाने चॅंपियन्स लीग स्पर्धा २०१४-१५ मध्ये शेवटच्या वेळेस जिंकली होती, त्यानंतर युरोपियन क्‍लब फुटबॉलमधील हा मानाचा करंडक बार्सिलोनात आलेला नाही. २०१४-१५ व २०१५-१६ असे सलग दोन मोसम ला-लिगा स्पर्धा जिंकल्यानंतर बार्सिलोना क्‍लब गतमोसमात मागे राहिला, त्याची भरपाई त्यांनी यंदा केली. 

आश्‍वासक प्रशिक्षक
ला-लिगा स्पर्धेत अपराजित राहत बार्सिलोना संघाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ३४ पैकी २६ सामने त्यांनी जिंकले व आठ सामने बरोबरीत राखले. या कामगिरीमुळे त्यांना विजेतेपद निश्‍चित करण्यासाठी साखळी स्पर्धा संपेपर्यंत किंवा इतर संघांच्या यशापशावर अवलंबून राहावे लागले नाही. अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी अर्थातच बार्सिलोनाच्या यशाचा शिल्पकार ठरला. सलग सातव्या मोसमात त्याने क्‍लबसाठी तीसपेक्षा जास्त गोल करण्याचा पराक्रम केला. प्रशिक्षक एर्नेस्टो व्हाल्वेर्दे यांनाही श्रेय द्यावे लागेल. ते बार्सिलोना संघाचे माजी खेळाडू. गतवर्षी २९ मे रोजी त्यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. लुईस एन्रिके यांची जागा त्यांनी घेतली. ५४ वर्षीय व्हाल्वेर्दे यांच्यासाठी पहिला मोसम आश्‍वासक ठरला. चॅंपियन्स लीग करंडक हुकला, पण कोपा डेल रे आणि ला-लिगा असे दोन करंडक प्रशिक्षक या नात्यानेच पहिल्याच मोसमात त्यांनी जिंकले. अर्थात, महान पेप गार्डिओला यांच्यापर्यंत जाण्यासाठी व्हाल्वेर्दे यांना मोठी मजल मारावी लागेल. २००८-२०१२ या कालावधीत बार्सिलोनाचे प्रशिक्षक असताना गार्डिओला यांनी १४ करंडक पटकावले होते. एक मात्र खरं, यंदा बार्सिलोना संघाने चाहत्यांना साफ निराश केले नाही. त्यामुळेच ला-लिगा विजेतेपद निश्‍चित झाल्यानंतर या संघाची भव्य मिरवणूक काढण्यात आली व त्यास प्रतिसादही मोठा लाभला.

इनिएस्टाचा ‘गुडबाय’
बार्सिलोना क्‍लबचा हुकमी मध्यरक्षक आंद्रेस इनिएस्टा याने मोसम संपल्यानंतर संघाला सोडचिठ्ठी देण्याचे ठरविले आहे. हा बार्सा संघासाठी मोठा धक्का आहे. ‘कॅंप नोऊ’वरील इनिएस्टाची कारकीर्द १६ वर्षांची. या कालावधीत त्याने संघाकडून ३२ करंडक जिंकले, या मध्यरक्षकाने नेतृत्वही सांभाळले. बार्सिलोनाच्या आक्रमणातील तो महत्त्वाचा दुवा होता. मेस्सीने भरपूर गोल केले, त्यात इनिएस्टाच्या मदतीचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला. नव्या मोसमात ला-लिगा विजेत्यांना संघातील प्रमुख मध्यरक्षकाची उणीव निश्‍चितच जाणवेल. ३३ वर्षीय इनिएस्टा २००२ मध्ये बार्सिलोनाच्या ‘ब’ संघातून प्रमुख संघात दाखल झाला. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये त्याला बार्सिलोना क्‍लबने आजीवन कराराचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्याने आता नवी वाट चोखण्याचे ठरविले आहे. बार्सिलोना संघाच्या ’८’ क्रमांकाच्या जर्सीत भन्नाट खेळ केलेल्या आंद्रेस इनिएस्टाची कामगिरी संस्मरणीय ठरली.

बार्सिलोना क्‍लबचे पहिले यश
    ला-लिगा ः १९२९
    कोपा डेल रे ः १९०९-१०
    चॅंपियन्स लीग ः १९९१-९२
    क्‍लब विश्‍वकरंडक ः २००९

फोटो फीचर

संबंधित बातम्या