मॅरेथॉनपटू किपचोगेचे यश

किशोर पेटकर
गुरुवार, 10 मे 2018

क्रीडांगण
 

आफ्रिकन धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये दबदबा राखलेला आहे. केनियाचा एलियूड किपचोगे हा धावपटू याच परंपरेतील आहे. पाच वर्षांपूर्वी मॅरेथॉनमध्ये धावण्यास सुरवात केल्यापासून या ३३ वर्षीय धावपटूने जागतिक पातळीवरील वर्चस्वाचा ठसा उमटविला आहे. त्याने लंडन मॅरेथॉन यावर्षी तिसऱ्यांदा जिंकली. यावेळच्या लंडन मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे, किपचोगे याला आव्हान देण्यासाठी शर्यतीत काही नावाजलेली नावं होती. ब्रिटनचा मो फराह, इथिओपियाचा केनेनिसा बेकेले, लंडनमधील गतविजेता केनियन डॅनिअल वान्जिरू यांच्या सहभागामुळे ही मॅरेथॉन उत्कंठावर्धक बनली होती. फराह हा पाच हजार मीटर व दहा हजार मीटरमधील सध्याचा ऑलिंपिक विजेता. या दोन्ही शर्यतीत त्याने लंडन आणि रिओ या लागोपाठच्या ऑलिंपिकमध्ये विजेतेपद मिळविले होते. फराह याच्या वर्चस्वापूर्वी या दोन्ही शर्यतीत बेकेले विजेता होता. त्यानेही ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदके जिंकलेली आहेत. किपचोगे याने साऱ्यांना मागे टाकत लंडन मॅरेथॉन जिंकली. इथिओपियाच्या टोला शुरा किटाटा याला हरवून किपचोगे याने वर्चस्वाचा झेंडा पुन्हा फडकाविला. मो फराह याला तिसऱ्या, तर बेकेले याला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गतविजेता वान्जिरू आठव्या क्रमांकावर फेकला गेला. मॅरेथॉनमध्ये धावण्यास सुरवात केल्यापासून किपचोगे याने जिंकलेली ही सहावी प्रमुख (मेजर) स्पर्धा ठरली. 

ऑलिंपिक विजेता 
एलियूड किपचोगे हा ऑलिंपिक विजेता मॅरेथॉन धावपटू आहे. २०१६ मध्ये रिओ ऑलिंपिकमध्ये त्याने २ः०८ः४४ वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. मॅरेथॉनमध्ये धावण्यापूर्वी हा केनियन धावपटू पाच हजार मीटर शर्यतीतील पट्टीचा धावपटू होता. या शर्यतीत त्याने दोन ऑलिंपिक पदकेही जिंकलेली आहेत. २००४ मध्ये अथेन्सला ब्राँझपदकाची, तर २००८ मध्ये बीजिंगला रौप्यपदकाची कमाई केली होती. बीजिंग ऑलिंपिकमध्ये त्याला केनेनिसा बेकेले याने मागे टाकले होते. त्यानंतर किपचोगे याने मॅरेथॉनवरच लक्ष केंद्रित केले. २०१३ मध्ये त्याने मॅरेथॉनमध्ये पदार्पण केले. २१ एप्रिल २०१३ रोजी त्याने हॅम्बर्ग मॅरेथॉन जिंकली. त्याचे हे पहिले मोठे यश ठरले. त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या बर्लिन मॅरेथॉनमध्ये किपचोगेला रौप्यपदक मिळाले. त्यावेळी केनियाच्याच विल्सन किपसांग याने २ः०३ः२३ ही वेळ नोंदवून विश्‍वविक्रमास गवसणी घातली होती. बर्लिनमधील उपविजेतेपदानंतर किपचोगेने सहा प्रमुख स्पर्धांसह आठ मॅरेथॉन शर्यती जिंकल्या आहेत. यामध्ये रिओ ऑलिंपिकचाही समावेश आहे. कमालीचे सातत्य आणि अफलातून तंदुरुस्ती या बळावर किपचोगेने मॅरेथॉनमध्ये वर्चस्व राखलेले आहे. मॅरेथॉनच्या इतिहासात तो ‘महान’ बनलेला आहे.  

विश्‍वविक्रमाचे ध्येय
मॅरेथॉनमधील विश्‍वविक्रम मोडण्याचे किपचोगे याचे ध्येय आहे. केनियाच्या डेनिस किमेटो याने २०१४ मध्ये नोंदविलेली २ः०२ः५७ ही वेळ अजूनही विश्‍वविक्रमी आहे. डेनिसने हा पराक्रम बर्लिन मॅरेथॉनमध्ये बजावला होता. यंदाच्या लंडन मॅरेथॉनमध्ये किपचोगेची सुरवात वेगवान होती, तो विश्‍वविक्रम नोंदविणार असे वाटत असताना अंतिम टप्प्यात संथ झाला. त्याने पहिला क्रमांक राखला, पण २ः०४ः१७ ही वेळ विश्‍वविक्रमाच्या जवळपास फिरकणारी नव्हती. दोन वर्षांपूर्वी किपचोगे याने कारकिर्दीतील वेगवान वेळ नोंदविली होती. तेव्हा लंडन मॅरेथॉन त्याने २ः०३ः०५ वेळेसह जिंकली होती. गेल्या वर्षी सहा मे रोजी इटलीतील मोन्झा येथील मॅरेथॉनमध्ये तो वेगाने धावला होता. त्याने २ः००ः२५ अशी भन्नाट वेळ नोंदविली होती, पण ती अधिकृत विश्‍वविक्रमी ठरू शकली नाही. जागतिक महासंघाने या वेळेस तांत्रिक कारणास्तव मान्यता दिली नाही.

किपचोगेचे ‘मेजर’ मॅरेथॉन सुवर्ण यश
    २०१४ ः शिकागो : २ः०४ः११
    २०१५ ः बर्लिन : २ः०४ः००
    २०१५ ः लंडन : २ः०४ः४२
    २०१६ ः लंडन : २ः०३ः०५
    २०१७ ः बर्लिन ः २ः०३ः३२
     २०१८ ः लंडन ः २ः०४ः१७

संबंधित बातम्या