बचावातील भक्कम जेरी!

किशोर पेटकर
गुरुवार, 17 मे 2018

क्रीडांगण
 

भारताचा फुटबॉल संघ पुढील वर्षी संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या आशिया करंडक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. २०११ नंतर प्रथमच भारतीय संघ आशियातील या प्रतिष्ठित स्पर्धेत खेळताना दिसेल. स्पर्धेनिमित्त मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांनी तयारी व सरावास सुरवात केली आहे. ते नवोदितांवर भर देत आहेत, त्यापैकी एक म्हणजे मिझोरामचा १९ वर्षीय जेरी लालरिनझुआला हा आहे. बचाव फळीत ‘लेफ्ट बॅक’ जागी खेळणारा भक्कम तंत्र असलेला हा गुणवान फुटबॉलपटू इंडियन सुपर लीग (आयएसएल)  दोन मोसमात आश्‍वासक ठरला. चेन्नईयीन एफसीच्या बचावफळीत हुकमी एक्का ठरला. चेन्नईयीनने यंदा आयएसएल स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली. या वाटचालीत जेरी २० सामने खेळला व प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांच्या विश्‍वासास पात्र ठरला. भारतीय फुटबॉलमधील जाणकारांना जेरीकडून खूप अपेक्षा आहे आणि सध्या तरी तो गुणवत्तेला न्याय देताना दिसतोय. मिझोराममधील चानमारी एफसीचे एच. वनलालथ्लांगा यांनी जेरीची गुणवत्ता हुडकली. त्यांना तो ‘मेंटॉर’ मानतो. तेव्हा तो १२ वर्षांचा होता. लहान वयातच मिझोराम प्रिमिअर लीगमध्ये जेरीने छाप पाडली. त्यानंतर तो अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अद्ययावत अकादमीच्या छत्रछायेत  आला. त्यानंतर जेरीने मागे वळून पाहिलेच नाही. भारताच्या १३, १६, १९ या वयोगटातील संघातून तो आंतरराष्ट्रीय पातळीवर नियमितपणे खेळला. २०१४ साली भारताने १६ वर्षांखालील ‘सॅफ’ करंडक स्पर्धा जिंकली. तेव्हा यजमान नेपाळविरुद्ध निर्णायक एकमेव गोल जेरी यानेच नोंदविला होता.

प्रभावित करणारी कारकीर्द
जेरी लालरिनझुआला याचे वडील लालबियाक्‍सांगा हे लष्करातील. त्यानंतर ते मिझोराम पोलिस दलात रुजू झाले. मुलाने फुटबॉल खेळणे त्यांना सुरवातीस पसंत नव्हते. मात्र नंतर जेरी उपजत गुणवत्ता पाहून पालकांनी विचार बदलला व अभ्यासऐवजी फुटबॉलसाठी प्रोत्साहन दिले. हा निर्णय जेरीच्या कारकिर्दीत ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. जेरीची फुटबॉलमधील प्रभावी कामगिरी पालकांसाठी अभिमानास्पद ठरलेली आहे. जेरीने गेल्यावर्षी ६ जून रोजी नेपाळविरुद्ध भारताच्या राष्ट्रीय संघातून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत तो चार आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला असून प्रशिक्षक कॉन्स्टंटाईन यांच्याकडूनही शाबासकी मिळविली आहे. मध्यंतरी त्याला फ्रान्समधील एफसी मेट्‌झ संघाच्या अकादमीतही प्रशिक्षण घेण्याची संधी लाभली होती. दोन वर्षांच्या कालावधीत या युवा बचावपटूने नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. आता भारतीय संघाचा नियमित सदस्य बनण्याची त्याची मनीषा आहे.

‘आयएसएल’ गाजविली
यंदाच्या आयएसएल स्पर्धेत चेन्नईयीनचे प्रशिक्षक ग्रेगरी यांनी चार जणांच्या बचावफळीवर भर दिला. त्यापैकी इनिगो काल्देरॉन, हेन्रिक सेरेनो व मेलसन आल्विस हे तिघे परदेशी, तर जेरी हा एकमेव भारतीय. डाव्या पायाने प्रेक्षणीय खेळणारा जेरी सरस ठरला. अंतिम लढतीत बंगळूर एफसीविरुद्ध त्याचा खेळ लाजवाब झाला. तोच त्या लढतीत सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू ठरला. आयएसएल स्पर्धेत हा किताब त्याच्यासाठी नवा नाही. यंदाच्या मोसमात जेरीने सहा सामन्यांत हा पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये तो आयएसएल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू ठरला होता. चेन्नईयीन एफसीच्या जर्सीत खेळताना जेरीने एक गोलही नोंदविला आहे. गतवर्षी त्याने एफसी गोवाविरुद्ध फ्री कीकवर भन्नाट गोल केला होता. वेग आणि चपळता या बाबी जेरीच्या खेळात उल्लेखनीय आहेत. प्रतिस्पर्धी आक्रमणे विफल ठरविताना त्याचे पासिंगही अचाट ठरते. जेरीच्या खेळातील हे वरचढ गुण आणि त्याची कल्पकता चेन्नईयीन संघासाठी वरदान ठरलेली आहे. त्यामुळे २०१६ मध्ये त्याच्याशी केलेला करार या संघाने २०१७-१८ मोसमासाठीही कायम ठेवला.

‘आयएसएल’ स्पर्धेत जेरी लालरिनझुआला
 २०१६ : १३ सामने, १०४६ मिनिटे, १ गोल, २ असिस्ट
 २०१७-१८ : २० सामने, १८०० मिनिटे, २ असिस्ट

संबंधित बातम्या